मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अॅलन ब्रुक हा ब्रिटिश माणूस दोन दिवसांपूर्वी दाखल झाला होता. भारतात आल्यापासून तो श्रीपाद कलशेट्टी याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, पण काही केल्या संपर्क होत नव्हता म्हणून तो अस्वस्थ झाला होता. अॅलन ब्रुक लंडनमध्ये राहत होता. तिथल्या आयटीव्हीमध्ये तो विशेष प्रतिनिधी म्हणून काम करत होता. वैद्यकीय क्षेत्रातील एका खळबळ उडवून देणार्या बातमीचा माग घेण्यासाठी तो भारतात आला होता.
लंडनमधील मोठ्या हॉस्पिटलमध्ये जे रूग्ण उपचार घेतात, त्यांचा डेटा भारतात उपलब्ध होत असल्याची माहिती त्याला मिळाली होती, त्याचा शोध घेण्यासाठी तो मुंबईत आला होता. सुरुवातीला त्याचा या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता, पण डार्कनेटवर सर्च करताना हा डेटा उपलब्ध असल्याचे त्याला दिसले, तेव्हा त्याला विश्वास ठेवण्यावाचून गत्यंतर नव्हते. हा डेटा इथे कसा आला, याची शहानिशा करण्याचे त्याने ठरवले. डार्क वेबवर प्रोटॉन ईमेलवर त्याने आपण हा डेटा विकत घेण्यास तयार असल्याचे सांगितले. तेव्हा सतीश कलशेट्टी नावाच्या व्यक्तीचा मेल त्याला आला. मी तुम्हाला हा डेटा देण्यास तयार आहे, असे त्याने सांगितले.
आपल्याला हा डेटा खरोखरच मिळणार आहे का, आपली फसवणूक तर होणार नाही ना, या विचाराने अॅलनने शर्टच्या कॉलरच्या बटनात छुपा कॅमेरा बसवला. आपली कलशेट्टीसोबत जी काही चर्चा होईल, ती सगळी रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, त्या हॉटेलच्या दारात एक ३२ वर्षांचा तरूण येऊन थांबला होता. त्याने अॅलनला फोन केला, सर, मी इथे आलो आहे, कुठे येऊ. त्यावर अॅलनने त्याला, ‘पूल साइडला असणार्या कॉफी शॉपमध्ये जाऊन थांब, मी आलोच पाच मिनिटात’ असे सांगितले. अॅलन भेटल्यावर कलशेट्टी याने अॅलनला स्वत:ची ओळख करून दिली. आपण डेटा मॅनजेमेंटचे काम करतो, आपली छोटी कंपनी असून तिची भारतात चार शहरांत कार्यालये आहेत. आपण सर्व प्रकारच्या डेटावर काम करतो, अशी माहिती तो देत असताना अॅलनने त्याला थांबवले आणि तो घायकुतीला आल्यासारखा म्हणाला, मला लंडनमधल्या हॉस्पिटलचा डेटा हवा आहे, तो मिळेल ना?
त्यावर उत्तर आलं, ओ… सर व्हाय नॉट?… १०० परसेन्ट.
तुम्हाला मी लंडनमधल्या दोन हजार ग्राहकांचा डेटा देतो, पण त्यासाठी तुम्हाला चार लाख रुपये द्यावे लागतील. अॅलनला खात्री करून घ्यायची होती, म्हणून त्याने कलशेट्टीला त्याचे प्रात्यक्षिक दाखवणार का, असे विचारले. त्यावर कलशेट्टी लगेच राजी झाला. कलशेट्टी आणि अॅलन हे दोघे हॉटेलच्या रूममध्ये गेले. तिथे कलशेट्टीने आपल्या लॅपटॉपवर पेन ड्राइव्ह लावला आणि एक्सएल शीटमध्ये असणारा डेटा अॅलनला दाखवला. त्यामध्ये लंडनच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्या आणि घेतलेल्या अशा दोन्ही पेशंटचा डेटा होता. त्यामध्ये पेशंटची वैयक्तिक माहिती, त्याचे नाव, पत्ता, फोन नंबर, त्याला असणारा आजार, उपचार करणार्या डॉक्टरांची माहिती, त्याचे मेडिकल रिपोर्ट, त्याची आर्थिक स्थिती, बँकेचे डिटेल्स, असा सर्व तपशील त्यामध्ये होता. अॅलनला हे सगळे पाहिल्यावर धक्काच बसला.
तुम्ही चार लाख रुपये सांगत आहात, ते जास्त आहेत, ते कमी होणार नाही का? असे अॅलनने त्याला विचारले. त्यावर कलशेट्टी म्हणाला, सर, तुम्हाला फार कमी किंमत सांगितली याची. तसे पहिले तर याची किंमत सात लाख रुपयांपर्यंत जाते. पण तुम्हाला मी तीन लाख रुपये कमी केले आहेत, हा सगळा संवाद ऐकून अॅलन अवाक झाला. हे जे डोळ्यांदेखत घडत होते त्यावर अॅलनचा विश्वासच बसत नव्हता. या बातमीने लंडनमध्ये मोठी खळबळ उडणार होती.
एका ३२ वर्षांच्या भारतीय तरूणाकडे एवढा डेटा कसा, असा प्रश्न अॅलनला पडला होता. त्यामुळे पत्रकारितेमधील कौशल्य वापरून त्याने कलशेट्टीला बोलते करण्यास सुरुवात केली. माझ्याकडेही एक दोन कंपन्या आहेत, त्यांना डेटा मॅनेजमेंट करायचे आहे, ते काम तुला मिळवून देतो, असे आश्वासन देऊन त्याने कलशेट्टीला बोलते केले. आपण हे काम कसे करतो, हे तो सांगू लागला होता. इंग्लंडमधील हॉस्पिटलचा डेटा प्रोसेसिंग करून देण्याचे काम भारतातील एका कंपनीला मिळाले होते, ती कंपनी हे काम अगदी स्वस्तात करून देणार होती. पण त्या कंपनीने या कामाचे सब कॉन्ट्रॅक्ट सतीश कलशेट्टीच्या कंपनीकडे आऊटसोर्स केले होते. ही माहिती एकत्र करता करता सतीश हा डेटा अनधिकृतपणे विकण्याचा धंदा करत होता, त्यामधून तो लाखो रुपये मिळवत होता. हा डेटा विकणे हा कायद्याने गुन्हा असताना सतीश उघडपणे हे करत होता. डेटामध्ये ज्या व्यक्तीची माहिती आहे, त्याला सायबर फसवणूक किंवा अन्य माध्यमातून धोका पोहचू शकतो, हे माहित असताना हा सगळा प्रकार घडला होता.
अॅलनने या सगळ्या प्रकारचे रेकॉर्डिंग केले. आपल्याला या सगळ्या व्यवहाराची किंमत जास्त वाटते आहे, त्यामुळे मला आता तरी हा डेटा नको आहे, पुढल्या महिन्यात मी पुन्हा भारतात येईन, तेव्हा तुला सांगतो, असे सांगून त्याने कलशेट्टीचा निरोप घेतला. आपल्या हातात मोठी बातमी लागली आहे, याची माहिती त्याने त्याच्या कार्यालयाला दिली. दोन दिवसांत तो लंडनमध्ये जाऊन पोहोचला आणि तिसर्या दिवशी या डेटाविक्रीच्या प्रकरणाचा भांडाफोड त्याने केल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर ‘डेटा सिक्युरिटी’ या विषयावर चर्चा सुरू झाली. दोन्ही देशांच्या सरकारांनी ही माहिती एकमेकांना दिली, त्यानंतर सरकारने ठोस पावले उचलत सगळ्या प्रकरणाचा छडा लावून कलशेट्टी याला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात केली. डेटाविक्रीतून पैसे मिळवण्याचा हा प्रकार गंभीर होता.
हे लक्षात ठेवा…
– कोणत्याही ठिकाणी व्यक्तिगत माहिती देताना योग्य ती काळजी घ्या.
– आवश्यक तेवढीच माहिती द्या.
– अधिकची माहिती देण्याचा आग्रह धरला गेला, तरी ते टाळा.
– कोणत्याही वेबसाइटवर माहिती भरताना ती योग्य आहे का, याची शहानिशा करा.