दादासाहेब फाळके या मराठी माणसाने चित्रपट निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली. यानंतरच भारतात सिनेमा तयार होऊ लागला. मराठी माणसाने लावलेल्या सिनेमाच्या रोपट्याचा आज विशाल महाकाय वटवृक्ष झाला आहे. केवळ आजच नाही, तर तेव्हापासूनच हिंदी चित्रपटांमध्येही मराठीचा दबदबा कायम आहे. याचाच घेतलेला हा आढावा…
– – –
उपेंद्र लिमयेंनी साकारलेल्या फ्रेडी पाटीलवर सध्या कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. ‘अॅनिमल’ या बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा गाठलेल्या सिनेमातील सर्व कलाकारांच्या अभिनयासोबतच रणबीर, बॉबी देओल, उपेंद्र लिमये यांची एन्ट्री चर्चेचा विषय ठरली. उपेंद्र लिमयेंनी रणबीर कपूरला शस्त्रसाठा पुरवणार्या डीलरची भूमिका केली आहे. त्यांची एन्ट्री झाल्यावर सिनेमागृहांमध्ये एक वेगळाच माहोल तयार होत असल्याचं अनेक व्हायरल व्हिडिओमधे पाहायला मिळतंय. उपेंद्र यांनी यापेक्षा जास्त लांबीच्या भूमिका ट्रॅफिक ‘सिग्नल’, ‘पेज-३’, ‘सरकार राज’ अशा अनेक हिंदी चित्रपटांत साकारल्या; पण सोशल मीडियाच्या जमान्यात आज त्यांचं काम आणि यश अधिक प्रमाणात आपल्यापर्यंत पोहोचत आहे.
‘अॅनिमल’मधील एका सीनने उपेंद्र यांना नवीच ‘फ्रेडी पाटीलकी’ बहाल झाली आहे. हे मराठी कलावंतांच्या बाबतीत नवीन नाही. चित्रपटाची किंवा त्या पात्राची भाषा, भूमिकेची लांबी, सीन्सची संख्या यापलीकडे जाऊन मराठी कलाकार आपलं काम चोख करतात. म्हणूनच तर मराठी मातृभाषा असलेले कलाकार हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांतील अगदी छोट्याशा रोलमध्येही भाव खाऊन जातात. उदा. ‘शोले’ सिनेमातून गब्बरचे ‘नमक आणि गोली’ खाऊन अजरामर झालेले विजू खोटे (कालिया) असोत की ‘धमाल’ सिनेमात नाव सांगेपर्यंत गोवा येईलच की, असं निरागसपणे सांगणारे मुत्तुस्वामी चिन्नास्वामी वेणुगोपाल अय्यर उर्फ विनय आपटे असोत की फिजिक्स का डेफिनेशन क्या है, असं विचारणारे ‘थ्री इडियट्स’मधले प्रोफेसर साकारणारे अच्युत पोतदार असोत, यांच्यासारख्या मराठमोळ्या कलाकार मंडळींनी हिंदी सिनेमात छाप सोडली आहे. केवळ हिंदीतच नव्हे तर इतरही भाषांमध्ये मराठी कलाकार झळकले आहेत. पण, मुळात भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ जिथे एका मराठी माणसाने रोवली आहे तिथे मराठी माणूस सर्व भाषांतील सिनेमात काम करण्यात मागे कसा राहिलं?
७ जुलै १८९६ रोजी फ्रान्समधील लुमिए बंधूंनी तयार केलेला लघुपट मुंबईत दाखविण्यात आला. यापासून प्रेरणा घेऊन सावे दादा भाटवेकर यांनी त्याच वर्षी मुंबईतील हँगिंग गार्डनमध्ये कुस्तीगीर कृष्णा न्हावी आणि पुंडलिक दादा यांच्या कुस्तीचे प्रत्यक्ष चित्रण करून त्या चलचित्राचे खेळ दाखवले. ही भारतात बनलेली पहिली डॉक्युमेंट्री होती. हे चित्रण पाहून भारतीय जनता हरखून गेली. आता चलतचित्राच्या पुढील पायरी होती सिनेमानिर्मिती. पुन्हा एका मराठी माणसानेच बाजी मारली. दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र या सिनेमाची निर्मिती करून भारतीय सिनेसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. चित्रीकरणासाठी लागणार्या मूवी कॅमेर्याचं तंत्रज्ञान तेव्हा पूर्णपणे परदेशी होतं, पण कलामहर्षी बाबुराव पेंटर यांनी कल्पकतेने स्वदेशी कॅमेरा तयार केला. मराठी तंत्रज्ञ कलाकारांची घोडदौड सुरू झाली. मराठी माणसाने लावलेल्या सिनेमाच्या रोपट्याचा आज विशाल महाकाय वटवृक्ष झाला आहे.
दादासाहेब फाळके यांच्या राजा हरिश्चंद्रनंतर चार वर्षांनी १९१७ साली त्याचा बंगाली रिमेक बनविण्यात आला. याच वर्षी तेलगू आणि मल्याळम भाषेतील चित्रपट प्रदर्शित झाले. वेगवेगळ्या प्रांतांमध्ये त्या त्या भाषांतली सिनेनिर्मिती व्हायला लागली. स्थानिक कलावंत आपल्या भाषेत काम करू लागले. पण, महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांत काम होऊ लागलं. कारण, हिंदी चित्रपटनिर्मितीची पंढरी मुंबई महाराष्ट्रात होती. प्रभातसारख्या कंपनीचा दबदबा देशभर होता. पण हळुहळू पंजाबी निर्माते, बंगाली दिग्दर्शक येऊन स्थिरावू लागले, हिरो गोराचिट्टा, दिसायला देखणा, उंचीला सहा फूट हवा अशी पंजाबी अपेक्षा निर्माण झाली. मराठी कलावंतांच्या हिंदी उच्चारणाला मराठीचा गंध होता. तो चालेनासा झाला. त्यामुळे हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेऐवजी बहुतांश मराठी कलाकारांच्या वाट्याला दुय्यम भूमिका आल्या.
अर्थात, काही कलाकार याला अपवाद होते, हिंदी सिनेमात पहिला मोठा मराठी स्टार म्हणून छप्पर फाड यश मिळवणारे होते भगवान पालव उर्फ भगवान दादा. १९५१ साली ‘अलबेला’ सिनेमाने भगवान दादांना बंगला, नोकर चाकर, दाराशी उभ्या असलेल्या सात गाड्या, लाखोंची संपत्ती दिली. लक्ष्मी पायावर लोळण घेत होती. पण दुर्दैवाने हे यश फार काळ टिकलं नाही. पुढे सत्तरच्या दशकात अमोल पालेकर यांनी अमिताभ बच्चन नावाच्या सुनामीत मध्यमवर्गीय हिरो टिकवून ठेवला. ७७ साली ‘अमर अकबर अँथनी’ आणि ७८ साली ‘डॉन’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर अवॉर्ड अमिताभ बच्चन यांनी मिळवला होता. पुढील वर्षी मिस्टर नटवरलाल मधून अमिताभ हॅटट्रीक मारणार अशी सर्वांना खात्री वाटत असताना ‘गोलमाल’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर अवॉर्ड पटकावून अमोल पालेकर यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. याच दरम्यान लोकप्रिय बालकलाकार सचिन पिळगावकर यांनी ‘बालिका वधू’, ‘नदिया के पार’ असे हिट सिनेमे देऊन त्या काळात टीनएज हीरो ही प्रतिमा तयार केली होती. मीना आपा म्हणजे स्व. मीना कुमारीकडून मिळालेल्या उर्दूच्या तालमीने जबान साफ झालेल्या सचिन पिळगावकरांनी हिंदी सिनेमात नायक-उपनायकाच्या भूमिका वठवल्या. नव्वदीच्या दशकात मराठीतील सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांना हिंदी सिनेमात खूप चांगली लोकप्रियता लाभली. ‘मैने प्यार किया’ चित्रपट प्रदर्शित होताना महाराष्ट्रातील अनेक सिनेमागृहांबाहेर ‘लक्षा हिंदीत आला रे’ असे पोस्टर्स लागलेले होते, कारण तेव्हा नवोदित सलमान खानपेक्षा लक्ष्मीकांत बेर्डे यांची लोकप्रियता जास्त होती.
काही काळाने हीरोसारखा न दिसणारा रांगडा एक मराठी माणूस हिंदी सिनेमात स्टार झाला. हिंदी सिनेमातील स्टार म्हणजे तो सांगेल (याला व्यावसायिक सल्ला देणे असंही म्हणतात) ती अभिनेत्री, संगीतकार, सहकलाकार सिनेमात घ्यायचे किंवा नाही घ्यायचे असा एक अलिखित नियम आहे. ‘क्रांतिवीर’ या सिनेमाच्या ब्लॉकबस्टर यशाने नाना पाटेकर एकट्याच्या नावावर हिंदी सिनेमा सुपरहिट करू शकतो हे दाखवून दिलं. आजवरच्या मराठी कलाकारांपैकी असा ऑरा, फेम फक्त नाना पाटेकर यांनी निर्माण केला होता. समोर विधू विनोद चोप्रा असो की संजय लीला भन्साळी, सेटवर नाना पाटेकर यांचा दरारा कायम असायचा. १९९५ सालच्या फिल्मफेअर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता नाना पाटेकर (‘क्रांतिवीर’) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री माधुरी दीक्षित (‘हम आपके हैं कौन’) या मराठी कलाकारांनी मराठीचा झेंडा हिंदी सिनेमाच्या कळसावर लावला होता. आज बहात्तर वर्षांचे झाले, तरी नाना पाटेकर हे नाव आजही सेलेबल आहे. नानांनंतर रितेश देशमुख आणि श्रेयस तळपदे यांनी अनेक हिंदी सिनेमात नायक आणि सहनायकाच्या भूमिका साकारल्या.
हिंदी सिनेमात मराठी अभिनेत्रींनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. देव आनंद, दिलीप कुमार, राज कपूर, सुनील दत्त, मेहमूद यासारख्या मोठ्या स्टार्ससोबत मुख्य हिरोईन म्हणून काम करणार्या मराठी अभिनेत्रींच्या नावाची खूप मोठी लिस्ट आहे. शोभना समर्थ, नलिनी जयवंत, मीनाक्षी शिरोडकर, शशिकला, नूतन, तनुजा, शुभा खोटे, नंदा, लीना चंदावरकर, पद्मिनी कोल्हापुरे, सारिका, यांनी आपापला काळ गाजवला. नव्वदीच्या दशकात उर्मिला मातोंडकर, सोनाली बेंद्रे, सोनाली कुलकर्णी, ममता कुलकर्णी, शिल्पा आणि नम्रता शिरोडकर, वर्षा उसगावकर, अश्विनी भावे, किशोरी शहाणे, ईशा कोप्पिकर अशा अनेक मराठी मुली एकाचवेळी हिंदी सिनेमात स्टार अभिनेत्री रूपात दिसू लागल्या. या सर्वात प्रमुख नाव माधुरी दीक्षित. तेजाब, साजन, दिल, बेटा अशी सुपरहिट सिनेमे देऊन पण माधुरी दीक्षितला सुपरस्टार अभिनेत्रीपदाला गवसणी घालता येत नव्हती. अनेक वर्षे ते पद श्रीदेवीकडे होतं. पण १९९४ साली ‘हम आपके हैं कौन’च्या ‘न भूतो न भविष्यती’ यशाने माधुरी दीक्षित हिंदी सिनेमाची अनभिषिक्त सम्राज्ञी बनली. माधुरीचं कौतुक करताना, समांतर सिनेमाची अनभिषिक्त सम्राज्ञी स्मिता पाटील यांना विसरून कसं चालेल? ‘मिर्चमसाला’, ‘मंथन’, ‘मंडी’ या सिनेमांत नैसर्गिक अभिनयाने चित्रपटरसिकांच्या मनावर ठसा उमटवणार्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. स्मिताने सुपरस्टार अमिताभ बच्चनसोबत ‘नमक हलाल’ आणि ‘शक्ती’ आशा व्यवसायिक चित्रपटांतही समर्थ अभिनयाची छाप पाडली होती. अवघ्या काही वर्षांच्याच काळात त्यांनी एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमांमधून अभिनयाचा ठसा उमटवला.
या प्रमुख तारकांसोबत हिंदी सिनेमात वात्सल्यसिंधू आईची भूमिका अनेक मराठी अभिनेत्रींनी साकारली आहे. सुलोचना दीदी ते तरूण आई रीमा लागू असे ममत्त्व मराठीतून हिंदीत आलं आहे. उषा किरण, ललिता पवार, दुर्गा खोटे, जयश्री गडकर, सुहासिनी मुळे, सीमा देव, रोहिणी हट्टंगडी, स्मिता जयकर अनेक नावं घेता येतील.
ऑस्करपर्यंत धडक मारणारे ‘लगान’चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, ‘तेजाब’ सिनेमात ‘एक दो तीन’ म्हणत यशाची पायरी चढणारे एन. चंद्रा म्हणजेच आपले चंद्रशेखर नार्वेकर (अंकुश, तेजाब), महेश मांजरेकर (वास्तव, अस्तित्व) निशिकांत कामत (दृष्यम, मदारी), ओम राऊत (तानाजी) ही नावं पाहता असं दिसतं की काही अपवाद वगळता फार कमी मराठी दिग्दर्शकांनी हिंदी चित्रपटात उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच मराठी दिग्दर्शक या क्षेत्रात दीर्घकाळ टिकू शकले आहेत. हे असं का आहे या प्रश्नाचे उत्तर हिंदी चित्रपटातल्या स्टार सिस्टममध्ये आहे. कोणत्या दिग्दर्शकाने चित्रपट बनवला आहे या गोष्टीचं सर्वसामान्य सिनेरसिकांना काही घेणं देणं नसतं, सिनेमात हिरो कोण आहे हे पाहून तो सिनेमा पाहायचा की नाही हे ठरवतो. जितका मोठा स्टार तितका तो रिस्क घ्यायला घाबरणार आणि फक्त यशस्वी दिग्दर्शक, मोठे स्टुडिओ यांच्यासोबत काम करणार. नवीन दिग्दर्शकाला सिनेमाची मोट बांधताना निर्माता शोधवा लागतो. मोठा स्टार काम करणार असेल तरच सिनेमाला निर्माता मिळण्याची शक्यता जास्त असते. सलमान खान, शाहरुख खान अशा मोठ्या स्टार्सना सिनेमाची कथा पटकथा ऐकवयाची असेल, तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं नवीन दिग्दर्शकाला अवघड आहे. काही जुगाड करून तिथपर्यंत पोहचलं आणि त्या हीरोला कथा आवडली तरी त्याच्याकडे आधीपासून अनेक प्रोजेक्ट्स रांगेत उभे असतात. ते पूर्ण होऊन आपला नंबर कधी लागेल याची पेशन्स ठेवून वाट पाहावी लागते. इतकी वाट पाहण्यापेक्षा बरेचसे मराठी दिग्दर्शक मराठी चित्रपट बनविण्याची वाट चोखाळतात.
इतर प्रादेशिक भाषांमधे काम करणार्या मराठी कलाकारांमधे मुख्य भूमिका (हीरो) करणारे नट दिसत नाहीत. मराठी प्रायोगिक चित्रपट देशभरातील फिल्म फेस्टिवल्समध्ये दाखवले जातात किंवा राष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेत पाठवले जातात, तेव्हा इतर भाषेतील दिग्दर्शकांचे लक्ष मराठीतील उत्तम काम करणार्या कलाकारांकडे जातं. यातूनच विविध भाषेतील सिनेमांची दारं मराठी कलाकारांसाठी उघडतात. कलाकाराने कोणत्याही भाषेत केलेलं काम जेव्हा योग्य व्यक्तीच्या पाहण्यात येतं, तेव्हा एका कामातून दुसरं काम मिळत जातं. ‘शूल’ सिनेमातील बिहारी बच्चू यादवची भूमिका पाहून तामिळ दिग्दर्शक ज्ञान राज शेखरन यांनी तामिळनाडूचे प्रसिद्ध कवी सुब्रमण्यम भारती यांच्यावरील बायोपिकसाठी सयाजी शिंदे यांची निवड केली. सयाजी यांनी साकारलेल्या या भूमिकेचं दक्षिण भारतीय सिनेसृष्टीत खूप कौतुक झालं. यानंतर सयाजी शिंदे यांनी दक्षिण भारतातील सर्व भाषेतील चित्रपट आणि गुजराती, भोजपुरी भाषेत अनेक चित्रपटांत महत्वाच्या भूमिका साकारल्या. बहुभाषेत भरपूर काम करणार्या मराठी कलाकारांत सचिन खेडेकर, रवी काळे, गिरीश कुलकर्णी, पल्लवी जोशी, अतुल कुलकर्णी ही नावं घेता येतील. गुजराती, मल्याळम, कन्नड, तेलगू, बंगाली, ओडिया भाषेत मराठी कलाकारांनी उत्तम कामाची छाप पाडली आहे.
काही वर्षांपूर्वी भूमिका देताना कलाकार किती ताकदीचा आहे हे पाहून भूमिका दिली जायची. पण गेल्या काही वर्षांत कास्टिंग डायरेक्टरचं प्रस्थ वाढलं आहे. ही मंडळी सिनेमातील किंवा वेबसिरीजमधील पात्राची भाषा, प्रांत यावरूनच कलाकारांना ऑडिशनसाठी बोलावतात. यामुळे हल्ली मराठी कलाकारांच्या वाट्याला प्रामुख्याने मराठीभाषिक पात्रांच्या भूमिका येतात. मुंबईत घडणारी गोष्ट असेल तर मराठी पोलीस इन्स्पेक्टर, हवालदार, भाऊ नावाचा राजकारणी ही काही उदाहरणे देता येतील.
चरित्र अभिनेते म्हणून हिंदीत श्रीराम लागू, रमेश देव, विक्रम गोखले, सचिन खेडेकर, अच्चूत पोतदार, शरद केळकर, संजय नार्वेकर, मकरंद देशपांडे, शिवाजी साटम, गिरीश कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, सुमित राघवन, सिद्धार्थ जाधव यांनी अनेक हिंदी चित्रपटात काम केलं आहे. खलनायकी भूमिकेत मोहन जोशी यांनी दोनशेपेक्षा जास्त हिंदी सिनेमात काम केलं आहे. निळू फुले (सारांश), मोहन आगाशे (त्रिमूर्ती), सदाशिव अमरापूरकर (सडक) गणेश यादव (कंपनी) या मराठी कलाकारांनी देखील खलनायक म्हणून कामाचा ठसा उमटविला आहे.
ओटीटी हे माध्यम प्रभावीपणे भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात सेक्रेड गेम्स या वेबसिरीजचा मोठा वाटा होता. सेन्सॉरशिप
नसल्याने कथेला साजेशी हिंसा, वारेमाप शिव्या आणि बोल्ड सीन्स याने या सिरीजचा अल्पावधीतच बोलबाला झाला. सरफराज या मुख्य अभिनेत्यासोबत जितेंद्र जोशीने साकारलेला हवालदार काटेकर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकून गेला. जितेंद्र जोशीच्याच पावलावर पाऊल टाकून मग अनेक अभिनेत्यांनी हिंदी ओटीटीची वाट चोखाळली. राधिका आपटे हे नाव नसेल तर वेबसिरीज बनवायला परवानगी मिळत नाही अशी चर्चा तेव्हा रंगायची. अमृता सुभाष, अमेय वाघ हे देखील गेल्या काही महिन्यांत विविधांगी भूमिका करताना दिसले. यासोबतच नुकत्याच येऊन गेलेल्या तेलगी या हंसल मेहतांच्या ‘स्कॅम’ सिरीजमध्ये शशांक केतकर यांनी सेकंड लीडची भूमिका साकारली होती. मराठी कलाकारांचा हा धडाका पाहून लवकरच मराठी कलाकार वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसतील यात शंका नाही.
ही सर्व नावं पाहिल्यावर एक मराठी चित्रपटरसिक म्हणून या सर्व कलाकारांचा अभिमान वाटतो, पण माधुरी दीक्षित वगळता हिंदी सिनेमाच्या सर्वोच्च स्थानी हिरो म्हणून अमिताभ बच्चन, शाहरूख, सलमान किंवा खलनायक म्हणून अमजद खान किंवा अमरीश पुरी असं दीर्घकाळ टिकणारं यश मराठी कलाकारांना का मिळालं नाही हा प्रश्न पडतो.
पंजाब आणि उत्तरेकडील राज्यातून हिरो बनायला रोज शेकडोंनी तरुण मुंबईत येतात. एका खोलीत दहा जण राहून वर्षानुवर्षं स्ट्रगल करतात. अभिनयाची संधी मिळाली नाही तर उदरनिर्वाहासाठी लेखन, दिग्दर्शन करून तग धरून राहतात. त्या तुलनेत मराठी कलाकारांना मराठी कलाकारांना एकाच वेळी दोन पर्याय उपलब्ध असतात. भरत जाधव, सुबोध भावे, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी या मराठीतील स्टार कलाकारांचं असं म्हणणं आहे की हिंदीत नोकराचे किंवा इतर फुटकळ कामपेक्षा मराठी चित्रपटात मी हिरोचं काम करेन. पण काळ बदलतोय. पूर्वीच्या काळात हिंदी सिनेमात पंजाबी लॉबी होती, ज्यांचे स्वतःचे काही ठोकताळे होते. जंजीर सिनेमा येण्याअगोदर खुद्द अमिताभ बच्चन यांच्या उंची आणि चेहर्यावर टीकाटिप्पणी करून अनेक निर्मात्यांनी त्यांना नाकारलं होतं. अनुराग कश्यपसारख्या दिग्दर्शकांनी हिरोची चौकट मोडून चांगला अभिनय करणार्या कलाकाराला प्राधान्य दिलं. याचंच अनुकरण आज हिंदी सिनेमातील अनेक निर्माते दिग्दर्शक मराठी कलाकारांची निवड करून करत आहेत.
टेलिव्हिजनवर साऊथचे हिंदीत डब केलेले चित्रपट पाहून आपल्याला अल्लू अर्जुन, महेश बाबू, विजय सेतुपती, प्रभास, ज्युनिअर एनटीआर, रामचरण तेजा असे दक्षिणेतील अभिनेते माहित झाले आहेत. आवडायला लागले आहेत. याचाच फायदा जेव्हा ‘बाहुबली’, ‘केजीएफ’, ‘कांतारा’, ‘आरआरआर’ या प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर पॅन इंडिया मार्वेâट काबीज करताना झाला. आज मराठी कलाकारांचा अभिनय पाहून देशभर त्यांचा प्रेक्षकवर्ग तयार झाला, तर पुढे काही वर्षांनी मराठी सिनेमा वेगवेगळ्या प्रादेशिक भाषेत डब होऊन मराठी सिनेमांचे मार्केट पॅन इंडिया होऊ शकतं.
फिल्म रिलीज गप्पा
बॉक्स ऑफिसवर २०२३मध्ये उसळलेल्या अॅक्शनच्या लाटेत शाहरूख खानचा ‘डंकी’ तग धरून उभा आहे. आतापर्यंत ‘डंकी’ने जगभरात ३२० कोटी तर भारतात १७० कोटी कमावले आहेत. प्रभासच्या ‘सालार’ने जगभरात ४७० कोटी तर भारतात ३२० कोटी कमावले आहेत. मराठी चित्रपटांपैकी नोव्हेंबरमधे प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा-२’नंतर कोणताही मराठी चित्रपट उल्लेखनीय कामगिरी करू शकला नाही. १५ डिसेंबरला ‘सोंग्या’, ‘छापा काटा’, ‘क्लब-५२’, ‘लई झकास’ हे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. ‘अॅनिमल’चे शो कमी झाले होते, ‘डंकी’ सहा दिवसांनी रिलिज होणार होता. त्यामुळे या चार मराठी सिनेमांना मैदान मोकळं होतं, पण तरीही प्रेक्षकांना ते आकर्षित करू शकले नाहीत.
नवीन काय?
नववर्षाचे स्वागत करायला ‘पंचक’, ‘ओले आले’ आहेत. नाना पाटेकर अभिनेता आणि माधुरी दीक्षित निर्माती अशी लढत या सिनेमांच्या निमित्ताने बॉक्स ऑफिसवर रंगणार आहे. यांच्या जोडीला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपटही ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर काय सुरू आहे या प्रश्नाला ‘सध्या अॅक्शनची लाट सुरू आहे’ हे उत्तर आहे. ‘टायगर-३’, ‘अॅनिमल’, ‘सालार’ या सिनेमांना मिळणारे यश पाहून २०२४मधे हिंदी सिनेमात आपल्याला प्रत्येक हीरोचे मारधाडवाले चित्रपटच पहावे लागतील असं दिसतंय.