भारतीय रेल्वेने भारत दर्शन योजना अंतर्गत, आयआरसीटीसीच्या मदतीने महांकालेश्वर सह उत्तर भारत देवभूमी यात्रा, भारत गौरव स्पेशल ट्रेनने आयोजित केली होती. २२ जून २०२३ ते १ जुलै २०२३ पर्यंतची ही यात्रा पुण्याहून पुण्यापर्यंत होती. यात उज्जैन, आग्रा, मथुरा, हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवी या महत्वाच्या धार्मिक स्थळांचे दर्शन समाविष्ट होते. माझे व्याही पुण्यातील सुनिल देशपांडे यांनी ही माहिती कळवल्यानंतर लगेचच आम्ही या यात्रेच्या बुकिंग करण्याच्या मागे लागलो. मी, माझी पत्नी उमा वैद्य, माझे व्याही सुनिल देशपांडे आणि त्यांच्या पत्नी मनिषा देशपांडे यांनी त्याची तयारी सुरू केली. २ जूनला आम्ही आयआरसीटीसीच्या साईटवर ऑनलाईन बुकिंग तर करुन टाकले. मात्र बुकिंग केल्यानंतर प्रवासाची सर्व माहिती अठ्ठेचाळीस तास आधी कळेल असे सांगण्यात आले. ही माहिती फोनवरच तोंडी देण्यात येईल, लेखी काहीही मिळणार नाही असेही समजले तेव्हा मन थोडे साशंक झाले. तरीही भारतीय रेल्वेवर विश्वास ठेवून आम्ही हळूहळू तयारी सुरू केली.
बरोबर ४८ तास आधी प्रवासाची माहिती म्हणजे ट्रेनची वेळ, प्लॅटफॉर्म, सीट नंबर्स अशी माहिती मिळाली. त्यानुसार सर्व तयारी करून आम्ही २२ जूनला सकाळी पुणे स्टेशनवर पोचलो. तेथे बघावे तर गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर हार फुलांनी सुभोषित केली होती. प्रवाशांसाठी रेड कार्पेट टाकले होते. बँडबाजाच्या स्वागतात प्रवासी आत येत होते. तेथे सर्व प्रवाशांना कागदपत्रे करून एक ओळखपत्र दिले गेले. असे स्वागत बघून तर सर्वच प्रवासी भारावून गेले. संपूर्ण गाडीवर धार्मिक, सांस्कृतिक महत्व दाखवणारी मोठमोठी पोस्टर्स लावली होती. आता पुढील आठ दिवस ही गाडी म्हणजेच आपले ‘हाऊस ऑन व्हील्स’ असल्यामुळे गाडीला नमस्कार करून सर्व प्रवासी गाडीत बसले. काही उत्साही पर्यटक विशाखापट्टणम, हैदराबाद, लातूर, सातारा, सांगली, कोल्हापूर येथून विविध मार्गांनी पुण्याला येऊन यात्रेमध्ये सामील झाले होते.
आपल्या बोगींमध्ये स्थानापन्न झाल्यावर सर्वांनी ‘हर हर महादेव’ अशा गजरात साडेनऊला प्रवासास सुरुवात केली. आमच्या बोगीमध्ये सर्वचजण अतिशय उत्साही असल्यामुळे सगळ्यांचा एक ग्रुप लगेचच जमला. गप्पाटप्पा करत प्रवास सुरू झाला. या यात्रेमध्ये इंदूरच्या ओंकारेश्वर, उज्जैनच्या महांकालेश्वर, आग्रा येथील ताजमहाल, मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी, हरिद्वार येथील श्री हर की पौडी येथील गंगा आरती, ऋषिकेश येथील रामझुला, जानकीझुला, अमृतसर येथील सुवर्णमंदिर आणि जालियावाला बाग, बाघा सीमेवरील भारत-पाकिस्तानमधील परेड आणि सर्वात शेवटी कटरा येथील माता वैष्णोदेवीचे दर्शन असा भरगच्च कार्यक्रम होता.
संपूर्ण प्रवासात रेल्वेने चहा-नाष्टा-जेवण याची व्यवस्था केली होती. अर्थात हे अन्न घरच्यासारखे नसले तरी चांगले होते. प्रवासाचे पुढील टप्पे रेल्वेच्या योजनेप्रमाणे तसे व्यवस्थित होते. यात थोडीफार गैरसोय होते पण त्यासाठी तडजोड करण्याची तयारी प्रवाशांनी केली होती. इंदूरला पोचल्यानंतर रेल्वेने तेथे वातानुकुलित बसेसची व्यवस्था केली होती. त्यापूर्वी सर्व प्रवाशांनी हॉटेल्समध्ये जाऊन चेक-इन केले आणि फ्रेश होऊन, श्री ओंकारेश्वर आणि उज्जैन येथे जाऊन श्री महांकालेश्वराचे दर्शन घेतले. प्रचंड रांगा असतानाही सर्वांना व्यवस्थित दर्शन मिळाले. नंतर रात्रीचे भोजन करून सगळे मुक्कामी असलेल्या हॉटेल्समध्ये परतले.
दुसर्या दिवशी सकाळीच नाष्टापाणी करून पुढील प्रवासास सुरुवात केली. त्यानंतरचा पुढचा प्रवास थोडासा त्रासदायक झाला असे म्हणता येईल. कारण रात्रीचा प्रवास आणि दिवसा विविध ठिकाणांना भेटी असे स्वरूप होते. अर्थात एवढ्या कमी दिवसांमध्ये एवढ्या ठिकाणांना भेटी द्यायच्या म्हणजे हे होणे क्रमप्राप्तच होते म्हणा!
आग्रा येथील ताजमहालाचे वर्णन काय करावे? त्यासाठी शब्दही अपुरे पडतील. मात्र मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीचे स्वरूप बघून मन विषण्ण झाले. अर्ध्या क्षेत्रात मशिद आणि अर्ध्या भागात श्रीकृष्णाचे मंदिर! श्रीकृष्णजन्मभुमीचा विस्तीर्ण भाग मात्र अतिशय व्यवस्थित ठेवला आहे. इस्कॉनचे श्रीकृष्ण मंदिरही बघण्यासारखे आहे. राममंदिराप्रमाणेच श्रीकृष्ण जन्मभूमीलाही सर्वोच्च न्यायालय न्याय देईल अशी अपेक्षा करूनच सर्व प्रवाशांनी मथुरा सोडली.
यात सर्वात भारावून टाकणारा प्रसंग होता, हरिद्वारमधील हर की पौडी येथील श्री गंगा आरती! दुथडी भरून वाहणारी गंगा माता, दोन्ही बाजूंना बांधलेले मोठेमोठे घाट, दोन्ही काठांवर हजारोंच्या संख्येने जमलेले भाविक, भक्तांकडून चाललेले धार्मिक विधी, जय गंगामैय्या आणि हर हर महादेव असा प्रचंड गजर आणि सर्वात शेवटी श्री गंगेची महाआरती! त्या आरतीचे दृश्य बघून तर सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले आणि आपले जीवन धन्य झाल्याची जाणीवही झाली. ऋषिकेशमध्ये श्रीराम झुला, जानकी झुला बघितला. तेथील मंदिरांचे दर्शन घेतले. लक्ष्मण झुला काही वर्षांपूर्वी पडल्याचेही तेथील स्थानिकांनी सांगितले.
त्यानंतर आम्ही अमृतसरला पोचलो. सुवर्ण मंदिराची भव्यता बघितली. अगदी गावातच असलेल्या या सुवर्णमंदिरामध्ये १९८४ मध्ये स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सैनिकी कारवाई करून अनेक धोकादायक अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते, या प्रसंगाची आठवण झाली. सुवर्णमंदिरामध्ये सर्वांसाठी लंगर असते आणि त्यात प्रसाद म्हणून भाविकांना भोजनही दिले जाते. मंदिराशेजारी असलेल्या जालियानवाला बागेलाही आम्ही भेट दिली. एवढ्या मोठ्या मैदानात प्रवेश करण्यासाठी अजूनही केवळ एक चिंचोळा बोळ आहे. तत्कालीन ब्रिटिश अधिकारी जनरल डायरने याच ठिकाणी जमलेल्या हजारो निर्दोष भारतीय नागरिकांवर गोळ्यांचा वर्षाव केला होता. तेथे विविध हॉल्समधून तत्कालीन इतिहासाची साक्ष देणारे फोटो-व्हिडिओ दाखवून नवीन पिढ्यांना ब्रिटिशांनी केलेल्या अन्यायाची माहिती देण्यात येते. या ठिकाणी शहीद उधमसिंग यांच्या अस्थी आजही जतन केल्या आहेत. या सर्व क्रांतीकारकांना नमन करून आम्ही वाघा बॉर्डरकडे मार्गस्थ झालो.
वाघा बॉर्डरला गेल्यानंतर तेथील दृश्य बघून थक्क झालो. एकीकडे महात्मा गांधींचा फोटो आणि तिरंगा लावलेली भारताची बाजू आणि दुसर्या बाजुला बॅरिस्टर जीनांचा फोटो आणि पाकिस्तानी झेंडा लावलेला! दोन्ही बाजूंना प्रचंड भिंती असलेले कंपाऊंड आणि मध्यभागी एक स्लायडिंग गेट! तेथील परेडसाठी भारताच्या बाजूला पंचवीस तीस हजार लोक तर पाकिस्तानच्या बाजूला केवळ दहा पंधरा सैनिक आणि शंभराच्या आसपास असलेले पाकिस्तानी नागरिक! तेथील परेड खरोखर प्रेक्षणीय आणि देशगौरवात भरच घालणारी आहे यात शंकाच नाही. भारताचे सामर्थ्य दाखवण्याचे ते योग्य ठिकाण आहे यातही वाद नाही. पण प्रत्यक्ष परेडला सुरुवात होण्यापूर्वी तेथे जे काही दाखवले गेले ते पटले नाही.
आपला भारत देश समर्थ आहे आणि हे सामर्थ्य भारतीयांना शंभर टक्के माहिती आहेच, पण ज्यांना हे सामर्थ्य दाखवणे आवश्यक आहे ते पाकिस्तानी नागरिक तर तेथे आलेच नाहीत. परेड सुरू होण्यापूर्वी भारतीय जवानाने देशप्रेमाच्या असंख्य घोषणा दिल्या आणि भारतीयांनीही त्याला प्रचंड प्रतिसादही दिला. मात्र त्यानंतर त्या जवानाने काही महिलांना तेथे ‘डान्स’ करण्यासाठी पाचारण केले. त्याबरोबर तीन-चारशे महिला तेथे जमून नाचू लागल्या. हे बघून तर आम्हाला हसावे की रडावे तेच कळेना! बराच वेळ ‘तो’ नाच संपेचना! भारत पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानला ‘खिजवण्यासाठी’ महिलांच्या नाचाचा हा प्रकार जेवढा घृणास्पद होता तेवढाच संतापजनकही होता. प्रत्यक्ष परेड मात्र प्रेक्षणीय होती. केंद्र सरकारने या परेडच्या बाबतीत पुनर्विचार करणे अत्यावश्यक आहे आणि त्याची आवशक्यता, निकड, महत्व, फायदा आणि एकूणच त्याची गरज आहे का यावर विचार करून योग्य निर्णय घेतला पाहिजे. थोडक्यात काय तर कोणतेही गांभीर्य नसलेला तो एक ‘इव्हेंट’ होता! अर्थात हा माझा विचार आहे आणि इतरांचे विचार वेगळेही असू शकतात हेही मान्य करावे लागेल.
सर्वात शेवटी आव्हान होते ते चौदा किलोमीटरचा घाट पायी चढून माता वैष्णोदेवीचे दर्शन घेण्याचे. मात्र आम्ही आधीच ठरवले होते की दर्शन झाले नाही तरीही हरकत नाही पण हा घाट पायीच चढायचा आणि उतरायचा. त्याप्रमाणे आम्ही दोघे आणि आमचे सहयात्री पुण्यातीलच धनंजय जोशी आणि त्यांच्या पत्नी नीला जोशी यांनी दुपारी बारा वाजता घाट चढायला सुरुवात केली. साडेनऊ-दहा तास लागले. तेथे अपेक्षेप्रमाणे हजारो लोक रांगेत उभे होते तेही कित्येक तासांपासून! तेव्हा आम्ही मंदिराच्या कळसालाच नमन केले आणि पुन्हा घाट पायीच उतरायला सुरुवात केली. पाच तासांनी आम्ही पायथ्याशी पोचलो. मातेचे दर्शन न झाल्याचे कोणतेही वैषम्य आम्हाला वाटले नाही हे विशेष, ही मातेचीच कृपा!
२९ जून रोजी रात्री साडेनऊला आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आणि २ जुलै रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास पुणे येथे पावते झालो. रेल्वेने सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाचे स्वागत होईल अशी आशा आहे. ज्याप्रमाणे, ‘पंढरीची एक तरी वारी अनुभवावी’ असे म्हटले जाते, अगदी तसेच ही ‘वारी’ सुद्धा प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी, अशीच आहे. आता आम्हालाही अपेक्षा आहे अशीच आणखी एक वारी अनुभवण्याची! सर्वात महत्वाचे म्हणजे या यात्रेचा एकूण खर्च आहे पस्तीस हजार रुपये, वातानुकुलीत रेल्वे, मुक्कामी हॉटेल्स, चहा-नाष्टा-भोजन, स्थानिक प्रवासासह! म्हणजे आहे की नाही अफलातून? एकदा तरी जरूर जा सगळे! या ट्रिपचे तीन स्तरावर दर आहेत. १६,०००, २८,८०० आणि ३५,१०० असे रेट्स आहेत. थोड्याच दिवसात नऊ ठिकाणे बघायची असल्याने थोडीशी धावपळ होते हे खरे, पण एवढ्या कमी खर्चात एवढी सारी ठिकाणे बघायला मिळतात, हेही नसे थोडके! (सविस्तर माहितीसाठी आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या).