१९८३ साली काँग्रेसच्या अधिवेशनासाठी आलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना विमानतळावरून राजभवनात नेण्यासाठी खास बुलेटप्रूफ रथ तयार करण्यात येणार आहे, या बातमीवरून बाळासाहेबांनी रेखाटलेलं हे मुखपृष्ठ भारतीय लोकशाहीला सरंजामशाही, राजेशाही वृत्तीचा कसा विळखा बसलेला आहे, ते दाखवून देणारं आहे. पंतप्रधानपद हे लोकशाहीतलं सर्वोच्च पद आहे, पण ते काही राजाचं किंवा सम्राटाचं, सम्राज्ञीचं पद नाही. खर्या अर्थाने प्रगत लोकशाही असलेल्या अनेक देशांमध्ये पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष हे सार्वजनिक वाहनांनी, कसलाही बडेजाव न बाळगता फिरतात, साध्या घरांमध्ये राहतात आणि आपण लोकांनी नेमलेले तात्पुरते सेवक आहोत, याचं भान ठेवतात. भारतात मात्र लोकशाहीत सरकारी अधिकारी, पोलिस अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान या सगळ्यांना विशेष वागणूक मिळते, मुख्यमंत्री, पंतप्रधान हे तर सम्राट असल्यासारखेच वागतात… अर्थात, इंदिरा गांधी यांनी क्वचितप्रसंगी असा डामडौल दाखवला असला तरी त्या सुरक्षा व्यवस्था झुगारून देऊन लोकांमध्ये मिसळायच्या, लोकांचे ऐकून घ्यायच्या आणि मुख्य म्हणजे पत्रकार परिषदेत, मुलाखतींत आणि संसदेत आपण जनतेला उत्तरदायी आहोत, याचे भान ठेवून बोलायच्या, लोकशाहीच्या प्रक्रिया त्यांनी सदासर्वदा पायदळी तुडवल्या नाहीत. हे आजच्या काळात आक्रीतच वाटते.