ब्राह्मणी वातावरणात राहूनही बहुजनांचं आणि त्यातही अस्पृश्यांचं दु:ख समजावून घेण्याची संवेदनशीलता लोकमान्यांचे सुपुत्र श्रीधरपंत यांच्याकडे होती. त्यामुळे अन्यायाच्या छावणीकडून न्यायासाठी झगडणार्या समतेच्या छावणीपर्यंत त्यांचा प्रवास अगदी सहज झाला. त्या प्रवासाच्या सर्वात जवळच्या साक्षीदारांपैकी एक प्रबोधनकार होते.
– – –

या सह्यांमुळे टिळक बंधू फसले. पुढची दोन तीन वर्षं त्यांना त्यांचा सुगावा लागला नाही. पण हळूहळू त्यांचा संबंध केळकर कंपूच्या विरोधकांशीही येऊ लागला. तीही मोठी माणसं होती. केळकर प्रभृतींना नीट ओळखून होती. त्यांच्याशी सार्वजनिकपणे संघर्ष केलेली होती. त्यात संदेशकार अच्युतराव कोल्हटकरांसारखे ताकदीचे संपादक होते. ते टिळकभक्त असूनही ब्राह्मणेतर चळवळीकडे आस्थेने बघत. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर हे तेव्हाचे पुण्यातले सर्वात मोठे विद्वान होते, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. शिवाय महादेव राजाराम बोडस हे मुंबई हायकोर्टातले प्रसिद्ध वकील त्यांच्या आद्य शंकराचार्यांवरील पुस्तकांसाठी तेव्हा गाजत होते. प्रामुख्याने या तिघांशी संपर्क आल्यानंतर टिळक बंधूंना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.
पुढच्या काळात टिळक बंधूंनी विविधवृत्तातच दिलेल्या एका सविस्तर खुलाशात केसरीचे संपादक न. चिं. केळकर, लोकमान्यांचे भाचे धोंडोपंत विद्वांस, जावई केतकर आणि साने या चौघांनी तसंच इतर ट्रस्टींनी लोकमान्यांची मालमत्ता कशी घशात घातली याचं वर्णन केलंय. संपादकांनी स्वतःला मोठी रक्कम घेणं, केतकर वकिलांचं मोठं कर्ज रद्द करणं, सानेंना मृत्यूपत्रात नमूद केल्याहून दुप्पट रक्कम देणं, असे अनेक आरोप टिळक बंधूंनी केले आहेत. त्यामुळे वाद झाल्यास लोकमान्यांनी पंच म्हणून निवडलेल्या केळकर, केतकर आणि साने यांच्यासमोर जाण्यास टिळक बंधूंनी नकार दिला. त्यामुळे ट्रस्टी विरुद्ध टिळक बंधू हा वाद कोर्टात गेला. ही गोष्ट फार उशिराची म्हणजे १९२७ची आहे.
त्याच्या आधीपासून श्रीधरपंत पुण्यातल्या इतरही जाणकार मंडळींच्या सहवासात येत होते. त्यांचे डोळे उघडत होते आणि विशेष म्हणजे सामाजिक सुधारणांसाठीचा त्यांचा आग्रह अधिक ठाम होता. त्यात आधुनिक कवितांसाठी प्रसिद्ध असणार्या रविकिरण मंडळाशी आलेला त्यांचा संपर्क महत्त्वाचा होता. रविकिरण मंडळाचे सदस्य असलेलं श्री.बा. आणि मनोरमाबाई रानडे हे जोडपं टिळकपुत्रांच्या वाट्याला आलेल्या गाडकवाड वाड्याच्या भागात भाडेकरू होतं. रविकिरण मंडळाचे सगळे मोठमोठे कवी तिथे येत. कविहृदयाचे संवेदनशील श्रीधरपंत त्यांच्या संपर्कात असत. या सुधारणावादी, रोमँटिक कवींच्या सोबतीने श्रीधरपंतांना बिघडवल्याची भावना टिळकवाद्यांमध्ये झाली होती. प्रबोधनकारांनाही रविकिरण मंडळाच्या कविता फारशा पसंत नव्हत्या, पण त्यांचे सुधारणावादी विचार मात्र मान्य होते.
दरम्यान श्रीधरपंतांच्या पत्नीचे एक नात्यातले भाऊ डॉ. बाबासाहेब परांजपे यांच्या मुलीचं लग्न पार पडलं. पण ते सामान्य लग्न नव्हतं. कारण या लग्नातल्या वधू विधवा होत्या आणि त्यांना एक मुलगीही होती. त्यांचा पुनर्विवाह लावण्यात रविकिरण मंडळ आणि दोन्ही टिळकपुत्र आघाडीवर होते. वधूच्या पाठीमागे एक मुसलमान मुलगी करवली उभी होती, तर दोन्ही टिळकपुत्र वराच्या मागे करवले म्हणून उभे होते. या लग्नाची पार्टीही गायकवाड वाड्यात श्री. बा. रानडेंच्या बिर्हाडीच झाली.
या सगळ्या काळात श्रीधरपंत झालेल्या फसवणुकीमुळे अस्वस्थ होते. याच दरम्यान त्यांची कविता ज्ञानप्रकाशात प्रसिद्ध झाली होती.
गेला सर्व हुरूप ओसरूनि
ये बुद्धिवरी झापडे
आता मी जगलो कशास न कळे,
हृद्रोग चित्ता जडे।
घ्यावे अल्प समाजकार्य स्वशिरी,
राहे मनीषा दुरी
आहे एकुलती एक दयाघन प्रभो
ती पूर्ण हो सत्वरी
केसरीच्या ट्रस्टींनी असलेल्या भांडणामुळे आपल्याला सामाजिक कार्य करता येत नाही, याचं दुःख या कवितेतून व्यक्त झालं आहे. ही परिस्थिती त्यांनी लिहून ठेवली आहे, ती अशी, शत्रुपक्षाने बुद्धिचातुर्याने रचलेल्या चक्रव्यूहाचे गराड्यात गवसलेल्या एका अभिमन्यूप्रमाणे सध्या गायकवाड वाड्यात टिळक बंधूंची असहाय स्थिती आहे. दोन्ही टिळक बंधू गायकवाड वाड्यात कसे अस्वस्थ होते, याचं वर्णन श्रीधरपंतांच्या मित्राने सुबोधपत्रिकेत केलं होतं. ते असं, टिळकांच्या मृत्यूनंतर बापूरावांच्या (श्रीधरपंतांच्या) चरित्राला साहजिकच निराळे वळण लागले. असहकारितेच्या वावटळीत यांनी शिक्षणाचा मार्ग सोडला आणि पुढे त्यांच्या सभोतालच्या वातावरणात संशय, मत्सर, द्वेष इत्यादि रोषांचा काळाकुट्ट अंध:कार अधिकाधिक वाढत जाऊन आता टिळक बंधूंचा या परिस्थितीशी एकदा काय तो सोक्षमोक्ष ठरविणारा निकराचा झगडा सुरू झाला आहे. टिळक बंधू आपल्या वडिलोपार्जित घरात वडिलांच्या आश्रितांचा घोळका इतस्तत: अहोरात्र वावरत असतानाही नजरकैद्यासारखे बहिष्कृत बनले.
केळकर–विद्वांसांच्या त्रासाला कंटाळून ते त्यांच्या सुधारणावादी विरोधकांकडे गेले, असं मात्र नाही. रामभाऊ आणि श्रीधरपंत हे दोघेही मुळातच सुधारणावादी होते. पण पुढे त्यांचा प्रवास सुधारणावादाकडून सत्यशोधक चळवळीकडे होत गेलेला दिसतो. ब्राह्मणांचे बहुजनांवर होणारे अन्याय आणि अस्पृश्यता याच्या निवारणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न थक्क करणारे आहेत. पण त्याची सुरवात मात्र त्याकाळात पुण्यात ब्राहणेतर चळवळीचे पुढारी केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर यांच्याशी संघर्षातून झाली.
पुण्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सवात मेळ्यांच्या गाण्यांनी आरोप प्रत्यारोपांची राळ कशी उडवली होती, हे आपण आधी पाहिलंच आहे. त्यातल्या छत्रपती मेळ्याच्या गाण्यांची पुस्तिका जेधे जवळकरांनी छापली होती. त्याविरोधात ऑक्टोबर १९२५मध्ये श्रीधरपंतांनी बदनामीची केस केली होती. या पदसंग्रहात टिळकांवर टीका आणि शिवीगाळही होतीच पण श्रीधरपंतांचंही नाव होतं. तात्या, अण्णा, भाऊ, बापू खिसेकापू असा उल्लेख होता. यातले तात्या म्हणजे तात्यासाहेब न. चिं. केळकर, अण्णा म्हणजे वकील अण्णासाहेब भोपटकर, भाऊ म्हणजे भालाकार भोपटकर या केसरी कंपूबरोबरच बापू म्हणजे श्रीधरपंतांचंही नाव होतं. एकतर श्रीधरपंत हे केळकर कंपूपेक्षा वेगळे आहेत, हे जेधे जवळकारांना माहीत नव्हतं किंवा बापू आणि खिसेकापू असं यमक जुळवण्यासाठी बापूंचा उल्लेख झाला असावा. पण हे जेधे जवळकरांना महागात पडलं. कोर्टाने श्रीधरपंतांच्या बाजूने निकाल दिला. जवळकर आणि लाड यांना शिक्षा सुनावली.
पुढे जवळकरांच्याच देशाचे दुष्मन या पुस्तकाने लोकमान्यांची बदनामी होते म्हणूनही श्रीधरपंत कोर्टात जाणार होते. पण विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे पुतणे आधीच कोर्टात गेलेले असल्यामुळे त्यांची केस कोर्टाने दाखल करून घेतली नाही. अर्थातच पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या जोरदार युक्तिवादामुळे जेधे, जवळकर आणि लाड आरोपमुक्त झाले. या संघर्षात संवेदनशील मनाच्या श्रीधरपंतांना ब्राह्मणेतरांचा संघर्ष समजून घेता आला. स्वत: ब्राह्मण असूनही ब्राह्मणी छळ ते स्वत: अनुभवत होते. त्यामुळे ते स्वत: जेधे मॅन्शनमध्ये केशवरावांच्या भेटीला गेले. पुढच्या काळात टिळक बंधू ब्राह्मणेतरांचा बालेकिल्ला असलेल्या जेधे मॅन्शनमध्ये आणि जेधे जवळकर ब्राह्मणी बालेकिल्ल्यात म्हणजे गायकवाड वाड्यात असं अनपेक्षित चित्र पुण्यात दिसू लागलं. केवळ शत्रूचे शत्रू ते आपले मित्र म्हणून श्रीधरपंत जेधे जवळकरांचे मित्र बनले, असं म्हणणं त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल.
श्रीधरपंतांची जेधे जवळकरांशी जवळीक निर्माण झाली तोवर सनातन्यांसाठी ठीक होतं, पण त्याहीपुढे जाऊन त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या अस्पृश्यांच्या पुढार्यांशी अकृत्रिम स्नेह निर्माण झाला, हे मात्र फारच धक्कादायक होतं. केसरी ट्रस्टीविरोधातली केस बाबासाहेबांनी लढावी, अशी टिळक बंधूंची इच्छा होती. पण ते बाबासाहेबांना शक्य झालं नाही. टिळक बंधू मुंबईला जात तेव्हा आवर्जून बाबासाहेबांची भेट घेत, बाबासाहेब पुण्यात येत तेव्हा जाणीवपूर्वक त्यांना घरी येण्यासाठी आग्रह करत. पण त्यामुळे टिळक बंधूंना त्रास होईल, असं समजावून सांगत बाबासाहेब त्यांना परत पाठवत. पण टिळक बंधूंना आता त्याच्या पुढचं पाऊल उचलायचं ठरवलं. ते म्हणजे १९२६च्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांच्या गायकवाड वाड्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सवात थेट अस्पृश्यांचा मेळा घेऊन जाण्याचं ठरवलं. हा निर्णय प्रबोधनकारांच्या साक्षीने झाला असावा, इतके याचे बारीकसारीक तपशील प्रबोधनकारांनी लिहिले आहेत. जवळकरांच्या आठवणींच्या नुसार श्रीधरपंतांनी जेधे मॅन्शनमध्ये जाऊन ही कल्पना मांडली. ब्राह्मणेतरांच्या पाठिंब्याशिवाय हा पराक्रम शक्यच होणार नव्हता. केशवराव जेधेंनी या प्रस्तावाला केवळ पाठिंबाच दिला नाही, तर जेधेंच्या मालकीच्या मारुतीच्या देवळातही अस्पृश्यांचा मेळा भरवण्याचं ठरवलं.
गायकवाड वाड्यातल्या मानाच्या गणपतीपुढे अस्पृश्यांचा मेळा घेऊन जाण्याचं ठरवल्यामुळे पुण्यातल्या ब्राह्मणी कंपूत काय प्रतिक्रिया उमटली याचं वर्णन प्रबोधनकारांनी केलं आहे. ते असं, एकीकडे दंगलबाज छत्रपती मेळ्याची दहशत आणि त्यातच टिळक बंधुंचा हा उपद्व्याप! ट्रस्टी मंडळी भेदरून गेली. बामणेतर मंडळींच्या पाठिंब्याने रामभाऊ आणि बापू मनात आणतील ते करतील ही त्यांची खात्री असल्यामुळे, त्यांनी दोन मार्ग पत्करले. पहिला अस्पृश्य मेळा वाड्यात आणू नये असा मनाई हुकूम बजावून घेतला. पण टिळक बंधूंनी असे हुकूम बेधडक झुगारून फेटाळण्याचा आणि परिणामांना तोंड देण्याचा धीटपणा अनेक वेळा दाखविला होता. तो अनुभव लक्षात घेऊन ट्रस्टींनी दुसरी एक शक्कल काढली. फौजदारी प्रतिबंधाला ठोकरून त्या पोरांनी मेळा आत घुसवलाच,तर निदान गणपतीबाप्पाला अस्पृश्यांच्या स्पर्श तरी होऊ नये, एवढ्यासाठी वाड्यातल्या गणपतीच्या मखराभोवती लोखंडी पिंजरा उभारून त्याला भलेभक्कम टाळे ठोकले. पण हे टाळेही फोडले तर? त्याचाही एक मनाई हुकूम ट्रस्टींनी मिळवून तो टिळक बंधूंवर बजावण्यासाठी बेलिफाला वाड्याच्या दरवाजावर आणून बसवला.