• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कोकणचा किनारा धोक्यात

- सुधीर साबळे (निसर्गायण)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
March 3, 2022
in निसर्गायण
0

गेल्या काही वर्षांपासून हवामानबदलाचे परिणाम वेगवगळ्या प्रकारे होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. पावसाळा संपला तरी हिवाळ्यात देखील अधूनमधून पाऊस पाडण्याचे प्रकार घडत असतात. ऋतुचक्र बदलल्याचे जाणवत आहे. अलीकडच्या काळात वादळाची तीव्रता देखील वाढलेली दिसत आहे. पावसाळ्यात कोकण परिसरात दरडी पडणे, महापूर येण्याचे प्रकार आता नवीन राहिलेले नाहीत. त्यामुळे भविष्यात या सार्‍याचा परिणाम कोकणावर विविध प्रकारामधून होऊ शकतो.
– – –

महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ज्याची ओळख आहे, अशा कोकणाचा लौकिक जगभर पसरलेला आहे. खासकरून देश-विदेशातून पर्यटनासाठी इथे येणार्‍या मंडळींची कोकणाकडे पावले वळली नाहीत, असे कधीच होत नाही. कोकणातला निसर्ग, खाद्यपदार्थ इथपासून ते तिथला सागरकिनारा आणि अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील, त्याची भुरळ कोणाला पडल्याशिवाय राहत नाही. अलीकडच्या काळात होत असणारे हवामानबदल, जागतिक तापमानवाढ याचा सामना आगामी काळात कोकणाला करावा लागू शकतो. किंबहुना त्यामुळे भविष्यात कोकणचा किनारा त्यामुळे धोक्यात येऊ शकतो, असे निरीक्षण जेष्ठ भू-पर्यावरण अभ्यासक डॉ. सतीश ठिगळे यांनी या परिसरात अभ्यास करून नोंदवले आहे.
दिवसेंदिवस गंभीर होत चाललेले हवामानबदलाचे संकट, जागतिक तापमानवाढ, भविष्यात वाढणार्‍या समुद्राच्या पाण्याची उंची, अशा प्रमुख घटकांचा कोकणावर कसा परिणाम होऊ शकतो, डॉ. ठिगळे यांनी नोंदवलेली निरीक्षणे काय आहेत, चला आपण जाणून घेऊयात… गेल्या काही वर्षांपासून हवामानबदलाचे परिणाम वेगवगळ्या प्रकारे होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. पावसाळा संपला तरी हिवाळ्यात देखील अधूनमधून पाऊस पाडण्याचे प्रकार घडत असतात. ऋतुचक्र बदलल्याचे जाणवत आहे. अलीकडच्या काळात वादळाची तीव्रता देखील वाढलेली दिसत आहे. पावसाळ्यात कोकण परिसरात दरडी पडणे, महापूर येण्याचे प्रकार आता नवीन राहिलेले नाहीत. त्यामुळे भविष्यात या सार्‍याचा परिणाम कोकणावर विविध प्रकारामधून होऊ शकतो.

अरबी समुद्राच्या पोटात चाललंय काय!…

अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या पश्चिमेस सुमारे ४५० किलोमीटर अंतरावर असणार्‍या जलमग्न पर्वतरांगेला लक्ष्मी पर्वतशृंखला म्हणून ओळखले जाते. या शृंखलेत खचदरीसारख्या अनेक भेगा आहेत. त्या भेगांखाली असणार्‍या तप्तस्थळांमधून पृथ्वीच्या पोटातला वितळलेला लाव्हा हा अधूनमधून बाहेर पडून दोन्ही दिशांना पसरत असतो. लाखो वर्षांपासून सुरू असणार्‍या या प्रक्रियेतून सागरतळाच्या विस्ताराची प्रक्रिया सुरू आहे. प्रतिवर्षी २६ मिलीमीटर अशा मंदगतीने त्याचा विस्तार होत आहे. विशेष म्हणजे लक्ष्मी पर्वतशृखंलेत आढळणारा खडक आणि महाराष्ट्रातील पठाराच्या परिसरात बेसाल्ट यामध्ये साम्य दिसते. सागरतळ विस्ताराची प्रक्रिया होण्याचा परिणाम त्या भागात नवीन बेटे निर्माण होणे, भूकंपाचे धक्के बसणे, त्यामधून सुनामी निर्माण होणे, अशा प्रकारच्या माध्यमातून होत असतो. पॅसिफिक महासागर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. हे प्रकार ज्याप्रमाणे तिथे होऊ शकतात, त्याचप्रमाणे भविष्यात अरबी समुद्रात देखील होऊ शकतात, याची शक्यता नाकारता येत नाही.
कोकणाचा परिसर हा सह्याद्री पर्वतरांगांपासून खूपच जवळ आहे. कोयना परिसरात बर्‍याचदा सौम्य प्रमाणात भूकंपाचे धक्के बसत असतात. सागरतळाशी भूकंपाचे धक्के बसले तर ज्या ठिकाणी वारंवार भूकंप होतात, त्या ठिकाणी ताकद एकवटण्याचे प्रकार होतात, त्यामुळे भूपृष्ठावर दबाव येतो. त्यामुळे ते क्षेत्र भूकंपप्रवण होते. गेल्या १० वर्षाच्या काळात म्हणजे २०१० ते २०२० या काळात कोयना आणि चांदोली परिसरात एकूण ११० भूकंपाचे धक्के बसले असून त्यामध्ये ४ रिश्टर स्केलचे ९, ३ ते ३.९ रिश्टर स्केलचे २८, २ ते २.९ रिश्टर स्केलचे ३० आणि १ ते १.९ रिश्टर स्केलचे ४५ भूकंप या भागात झालेले आहेत. सागरतळ विस्तारत असताना त्या ठिकाणी होणार्‍या भूकंपांचा काही अंशी परिणाम या ठिकाणी होऊ शकतो, त्यामुळे भविष्यात वेगवेगळ्या माध्यमातून कोकण किनारपट्टीला त्याचा धोका सहन करावा लागू शकतो, असे निरीक्षण डॉ. ठिगळे यांनी नोंदवले आहे.

जुन्या घटनांना उजाळा

२७ नोव्हेंबर १९४५मध्ये ओमानजवळील मकराना किनार्‍यालगत झालेल्या भूकंपातून सुनामी निर्माण झाली होती, त्यामध्ये ४००० लोक मरण पावले होते. या सुनामीच्या परिणाम मुंबईपर्यंत जाणवला होता. अरबी समुद्रात दोन मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या होत्या, त्यामध्ये १५जणांना जीव गमवावा लागला होता. कच्छमध्ये २००१ साली झालेल्या भूकंपाच्या वेळीही समुद्रात सौम्य सुनामीच्या लाटा उसळल्या होत्या, याची नोंद आहे. २००४ साली सुमात्रामध्ये झालेल्या सुनामीच्या लाटा पश्चिम किनारपट्टीवर आदळल्या होत्या. त्यामुळे सिंधुदुर्गनजीकच्या देवबाग किनार्‍यावरील वाळू दूर जाऊन नदीच्या पात्रात सुनामीचे बेट तयार झाले होते. कोकणातच केळशी परिसरात सुनामीची टेकडी भूतकाळातील दुर्घटनेची साक्ष देत उभी आहे.
या सर्व घटना पहिल्या तर भविष्यात मकराना भागात भूकंप होऊन सुनामीसारखे संकट आले तर त्याचा परिणाम कोकण किनार्‍यावर होऊ शकतो, हे लक्षात घ्यावे लागेल. त्यासाठी कोकणाचा विकास आराखडा करताना त्या भागाचे सर्वेक्षण करून तिथली सुरक्षायंत्रणा अधिक सक्षम आणि सज्ज करावी लागणार आहे.

मरीन हीट वेव्ह प्रोसेस त्रासदायक…

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटिरिओलॉजी मधल्या संशोधनामध्ये हिंदी महासागरातील तापमान मागल्या तीन दशकांपासून वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम तापमानवाढीबरोबरच समुद्रातील ठराविक भागामध्ये उष्णतेच्या लाटा निर्माण होऊ लागल्या आहेत. पूर्वी अशा प्रकारच्या लाटा हिंदी महासागरात अभावानेच आढळत असत. आता त्याचा प्रभाव अरबी समुद्र आणि त्याच्यालगतच्या क्षेत्रात म्हणजे कोकणच्या परिसरात असणार्‍या समुद्र परिसरात वाढू लागला आहे. या लाटांच्या प्रभावामुळे सागरी पर्यटन, मुंबई-गोवा सागरी मार्ग, बंदरे, किनारे यालगत असणार्‍या पर्यावरणाला आव्हान निर्माण होऊ शकते. त्याकडे देखील गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.

समुद्रकिनार्‍यालगतच्या वस्त्यांना धोका…

आगामी काळात समुद्रातील पाण्याची उंची वाढत जाणार, त्यामुळे त्यालगत असणार्‍या शहरांना धोका निर्माण होणार असल्याच्या बातम्या आपण ऐकल्या असतीलही. पण कोकणात समुद्रकिनार्‍यालगत असणारी गावे, वाड्या, वस्त्या या लो लाइंग म्हणजे सखल क्षेत्रात वसल्या आहेत. दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीच्या बीच रॉकवर या वस्त्या वसलेल्या आहेत. आपल्याला मोठ्या शहरांबरोबरच या वस्त्यांचा विचार आतापासूनच करायला हवा. समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर तिथे राहणार्‍या लोकांना साहजिकच मोठया प्रमाणात धोका निर्माण होणार असल्याचे डॉ. ठिगळे सांगतात.

सागरी जैवविविधतेचे काय?

पूर्वी समुद्रकिनार्‍याच्या लगत असणार्‍या खारफुटीच्या जंगलांचे प्रमाण मोठे होते. अलीकडच्या काळात मानवी हस्तक्षेपामुळे म्हणा, विकासामुळे म्हणा, हे क्षेत्र कमी होत चालले आहे. समुद्रातील मासे या ठिकाणाचा वापर अंडी घालण्यासाठी करतात, पण आता तेच क्षेत्र कमी झाले आहे. खारफुटीच्या ठिकाणी माशांना अंडी घातल्यावर जे संरक्षण मिळते, ते अन्य ठिकाणी मिळत नसल्यामुळे त्यांच्या प्रजननावर त्याचा परिणाम होऊ लागलेला आहे. त्याकडे देखील गांभीर्यानी पाहण्याची आवश्यकता आहे. याखेरीज कोकणातील आंबा, फणस, काजू, या पिकांवर देखील हवामानबदलाचा परिणाम होऊ लागला आहे. कृषी विद्यापीठ, सरकारी यंत्रणा यांनी पुढाकार घेऊन त्यावर मार्ग काढण्याची आवश्यकता आहे.

नैसर्गिक समस्यांचे मूळ सागरात

अनेक नैसर्गिक समस्यांचे मूळ हे समुद्रात दडलेले आहे. आपण कोकणाचा विचार करताना तो केवळ ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, दापोली असा करतो, ते पूर्णपणे चुकीचे आहे. हे जिल्हे म्हणजे फक्त मानवनिर्मित भौगोलिक सीमा आहेत, असे म्हणता येईल. निसर्गाला कोणत्याही सीमा जाणत नाहीत, त्यामुळे भविष्याचा विचार करता कोकणच्या संरक्षणाचा विचार करत असताना तो अरबी समुद्रापासून ते अगदी सह्याद्री पर्वतापर्यंत होणे अपेक्षित आहे. समुद्रालगतच्या भागातील खारफुटीची जंगले संवर्धन करण्याच्या दृष्टीने एक योजना तयार होणे अपेक्षित आहे.

Previous Post

अशाने ईडीला काडी लागेल!

Next Post

आय कॅन डू इट

Next Post

आय कॅन डू इट

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.