नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या ‘वस्त्रहरण’ नाटकाने व्यवसायिक रंगभूमीवर मालवणी नाटकांची पताकी ताकदीने फडकविली. बोलीभाषेतला प्रयोग रसिकमान्य करून रंगभूमीवर नवे पर्व सुरू केले. मच्छिंद्र कांबळी यांनी त्यात कळसच चढविला. त्यांच्यात ‘तात्या सरपंच’ पुरता भिनला होता. पांडगो इलो रे, बा इलो; घास रे रामा, केला तुका नि झाला माका, चाकरमानी, येवा कोकण आपलाच असा, भैय्या हातपाय पसरी अशा ‘अस्सल’ मालवणी नाटकांची त्यांच्या भद्रकाली प्रॉडक्शनने निर्मिती केली होती. ‘वस्त्रहरण’ तर नाबाद पाच हजार प्रयोगांच्या जागतिक विक्रमाचे मानकरी ठरले, ज्याने सातासमुद्रापार मालवणी भाषेचे ‘मनोरंजन मूल्य’ वसूल केले! १९७५नंतर मालवणी नाटकांची लाटच रंगभूमीवर आली. त्यात सुंदर तळाशीलकर, मधू मंगेश कर्णिक, भालचंद्र निखार्गे, रमेश पवार, प्र. ल. मयेकर, सदानंद चव्हाण, आत्माराम सावंत, गणेश हिर्लेकर, पां. तु. पाटणकर, रामकृष्ण पेडणेकर, प्रभाकर भोगले, प्रवीण शांताराम अशा अनेक नाटककारांनी मालवणीतली नाटके रंगभूमीला दिली खरी; पण या प्रवाहात ‘वस्त्रहरण’ने आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान टिकवून ठेवले…
…आणि एका मध्यंतरानंतर पुन्हा एकदा ‘वन्समोअर तात्या’ हे नाटक ‘वस्त्रहरण’ची दुसरी आवृत्ती म्हणून रंगमंचावर नव्या वर्षात वाजत-गाजत आलं आहे, जे मनोरंजनाचा हुकमी एक्का ठरतेय. मालवणी बोलीभाषेतल्या नाटकांपासून काही काळ दुरावलेल्या प्रेक्षकांना भरपेट हसवून गाववाल्यांच्या मनोवृत्तीवर अंजन घालण्याचंही काम करतेय.
‘वस्त्रहरण’चा या संहितेवर पूर्ण प्रभाव आहे. तुलना केली तर कथानकापासून ते सादरीकरणापर्यंत त्यात पदोपदी साम्य किंवा अनुकरण दिसून येतं, तरीही एकेक वैशिष्ट्यपूर्ण धूमशान व्यंगचित्रे प्रगट होतात, जी नजरेत भरतात आणि तीच या नाट्याचे बलस्थानही ठरतात.
महाभारतातील ‘द्रौपदी वस्त्रहरण’चे नाटक उभं करण्यासाठीची घटना. जी वस्त्रहरण नाटकाने एका कथानकात गुंफून मांडली होती. त्यानिमित्ताने गाववाल्यांचे स्वभाव त्यांचे जीवन हे प्रकाशात आणले. त्याचप्रकारे ‘वन्समोअर’ नाटकातही सारं काही जत्रेतल्या नाटकासाठीची पूर्वतयारी आहे. कोकणी माणूस हा नाटकवेडा. जत्रा, उत्सव म्हटलं की गाववाले नाटकाचा प्रयोग करणारच. एका गावात दोन गाववाल्या वस्त्यांमध्ये वादविवाद, भांडणे आहेत. स्थानिक गाववाल्यांची एक वस्ती, तर दुसरी मुंबईकर गाववाले! अशा दोन वाड्यांमध्ये कायमचा संघर्ष. यातून दोन्ही वाड्यांना एकत्र घेऊन नाटक बसविण्यासाठी ‘तात्या’ प्रामाणिक प्रयत्न करतात. पहिल्या अंकात कलाकारांची परीक्षा उर्फ ऑडिशन आणि दुसर्यात रंगीत तालीम! अशी विभागणी कथानकाची करून संहितेत एकेक किस्से मांडण्यात येतात. त्यात भर म्हणजे वस्त्रहरणासाठी तमाशातील सुंदरीची हजेरी आणि तिच्याभोवती इब्लीस गाववाल्यांचा गराडा! यातल्या अडचणी वादविवादांचा शेवट सावरतांना अन् आवरतांना काय घडतं ते रंगमंचावरच पाहायला हवं.
गेली तीसेक वर्षे राज्य नाट्यस्पर्धेपासून सक्रीय असलेला कल्पक रंगकर्मी मिलिंद पेडणेकर यांचे लेखन, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका यात आहे. मच्छिंद्र कांबळी या मालवणी नटसम्राटाप्रमाणे नवंकोरं नाटक करण्याचा त्यांचा इरादा पक्का दिसतो. त्यांच्या एकहाती प्रयत्नांमुळे निर्मितीत नेमकेपणा आलाय. लेखन आणि दिग्दर्शन वेगवान. जसे अर्कचित्र, व्यंगचित्रच! चार्ली चॅप्लिनच्या कार्टून फिल्मप्रमाणे भन्नाट व्यक्तिमत्वांची जुळवाजुळवी यात करण्यात आलीय. प्रत्येक भूमिका आणि त्यांचे सादरीकरण धम्माल उडवते. तर्कशास्त्र, युक्तिवाद याला मात्र यात अजिबात थारा नाही. उलट ‘भरपेट हसविण्यासाठी भूमिका माझी!’ हा हास्यमंत्र घेऊनच सारेजण दोन्ही अंकात तात्यांसोबत वावरतात. यातले सारे कलाकार हे तसे व्यावसायिक रंगभूमीवर प्रथमच प्रवेश करीत आहेत. मालवणी भाषेत ‘संवाद’ साधण्यासाठी त्यांच्या पुरेपूर तालमी घेतल्या आहेत, हे जाणवते. खुद्द टायटल रोलमध्ये मिलिंद पेडणेकर यांची देहबोलीही मच्छिंद्र कांबळी यांची वारंवार आठवण करून देणारी आहे. दोन्ही वाड्यांना एकत्र आणून नाट्यप्रयोगासाठी त्यांनी केलेली धडपड ही नजरेत भरते. ‘वस्त्रहरण’चा नवा तात्या सरपंच यात प्रगटल्याचा भास होतो. हशा, टाळ्या आणि ठेवणीतली वाक्ये यांची पुरेपूर वसुली ‘तात्या’ करतो. शेवटच्या प्रसंगात हृदय हेलावून सोडणारे विचार मनात भरतात. पेडणेकरानु, करतलो तो भोगतलो!
वाडीवाल्यांचो चाळो, हसून पोटात गोळो, म्हणण्याची वेळ येते. तात्यांसोबतची टीम म्हणजे इरसाल मालवणी नमुनेच! सुनील मुळेकर यांचा सुन्या, ओमकार गावडे यांचा नकुल, अमोल तांबे यांचा सहदेव, नंदकुमार तळवडकरांचा धर्म, अभिमान अजितांचा अर्जुन, प्रशांत सातार्डेकरांचा भीम, किरण तांबे यांचा दुर्योधन, रेखा गावकरांची पत्नी माई आणि लावणी नृत्यांगना अपेक्षा निर्मळ ही भट्टी मस्त जुळून आलीय. प्रत्येकात ‘व्यंग’ पुरेपूर भरलेलं. सारेजण त्यातून मनमुराद हसवून बरगड्या दुखेपर्यंत बेजार करतात!
गाजलेल्या हिंदी गाण्यांना मालवणी तडका देणारे ‘वस्त्रहरण’सह अनेक मालवणी नाटकांचे अनुभवी संगीतकार प्रणय दरेकर यांचं ‘लाइव्ह म्युझिक’ नाट्याला गती देते. दोन्ही लावण्या अप्रतिमच. त्यातली ‘माझ्या गं दुधात नाही पाणी गं…’ ठेका धरायला भाग पडतो. ‘वन्समोअर’ची दादही प्रेक्षकांकडून मिळते. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना, पंकज पेडणेकरांची वेशभूषा, अंकुश कांबळी यांचे नेपथ्य या तांत्रिक बाजू नाट्याच्या शैलीला अनुरूप आहेत, ज्या वातावरणनिर्मितीला सहाय्यभूत ठरतात.
आजवर वीस-एक नाटकांची निर्मिती करणारा तरूण निर्माता राहुल भंडारे यांनी हे ‘मालवणी नाटक’ विचारपूर्वक निवडलंय. तो घाटावरला असूनही कोकणातल्या मालवणी भाषेच्या प्रेमापोटी हे धाडस त्यांनी केलंय. निर्मितीमूल्यात कुठेही तडजोड केलेली नाही. यातून मच्छिंद्र कांबळी यांच्या रंगवाटचालीला वंदन करण्याचा त्यांचा श्रद्धापूर्ण प्रयत्न त्यामागे आहे. जो नोंद घेण्याजोगा. त्यामागल्या भावनेला सलाम.
पु. ल. देशपांडे यांनी पहिल्या परिपूर्ण व्यवसायिक मालवणी नाटकाचे वर्णन करतांना म्हटले होते की ‘वस्त्रहरण’च्या रूपाने मराठी रंगभूमीवर देशी फार्सचे भरजरी वस्त्र अर्पण केले आहे. याला म्हणायचे शंभर टक्के देशी फार्स!’ हेच वर्णन याही नाटकाला शंभर टक्के लागू पडतेय!
मालवणी मुलखातली ‘शिवी’ मागली ओवी, भांडणामागला भोळेपणा, कपटामागला गोडवा, नाटकामागलं प्रेम जगजाहीर आहे. शंखासुराच्या संवादात म्हणायचं तर- ‘गावात भय गावकरांचो, रानात भय वाघाचो, राज्यात भय राजाचो आणि भरलेल्या सभेत भय या वाडीवाल्यांचे!’ याची प्रचिती या नाट्यात येते. एका प्रदीर्घ मध्यंतरानंतर अस्सल देशी मालवणी फार्स आलाय. कोपर्यातल्या अडगळीत पडलेली ‘हाउसफुल्ल’ची पाटी ही नाट्यगृहाबाहेर ताठ मानाने झळकत आहे. यातच या तात्यांचो ‘वन्समोअर’ यश असा!
वन्समोअर तात्या!
निर्मिती – अद्वैत थिएटर्स
लेखन / दिग्दर्शन – मिलिंद पेडणेकर
संगीत – प्रणय दरेकर
नेपथ्य – अंकुश कांबळी
प्रकाश – शितल तळपदे
वेशभूषा – पंकज पेडणेकर
सूत्रधार – गोट्या सावंत
निर्माता – राहुल भंडारे / विशाल परब
sanjaydahale33@gmail.com