संक्रातीला इवलुशा तिळगुळाच्या बदल्यात लोकांना गोड बोलायला लावण्याची ही जी आवळा देऊन कोहळा काढणारी अघोरी प्रथा बोकाळली आहे त्यावर आवाज उठवणारा एकही माईचा लाल पुढे येत नाही. इतकं सगळ्यांनी, सर्वदा एकमेकांशी गोड बोलून या देशाला डायबिटीसच्या कठड्यावरून खाली ढकलायचा कुणा परकीय शक्तीचा डाव तर नसेल ना, अशीही मला शंका येतेय. म्हणूनच, लोकांना गोड बोलायला लावण्याच्या या कारस्थानात कोणत्या देशी, परदेशी शक्तींचा हात आहे, यात कुणाकुणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत, या सर्वांचा शोध घेऊन मीडियासमोर त्याचा पुराव्यानिशी पर्दाफाश करण्याची विनंती मी किरीट सोमय्या साहेबांना करणार आहे.
– – –
संक्रांतीचा सण येऊन गेला म्हणून घरातले तिळगुळ देखील संपले असं काही होत नाही. घरी बनविलेले तिळाचे लाडू कितीही कडक झालेले असले तरी कुरकूर न करता ते संपविण्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो. (बायको तर म्हणते की संक्रांत आणि दिवाळीला तुमच्या अंगात काशिनाथ घाणेकर संचारतो… लाडू कितीही चांगले झाले असले तरी तुमचा अभिप्राय ठरलेलाच असतो… कऽऽडऽऽक!).
तिळाचा लाडू खाल्ला आणि विषय संपला असेही होत नाही. खरपूस भाजलेल्या गुळाची चव जिभेवर बराच काळ रेंगाळत राहते आणि एका ठराविक अंतराने अक्षयकुमारचे सिनेमे यावेत तसा एकेक तीळ दातांच्या विंगेतून जिभेच्या स्टेजवर येत राहतो. अशावेळी आपण जिभेवरील तिळाकडे कितीही दुर्लक्ष केलं तरी, ‘तिळा तिळा दार उघड’ असं न म्हणताही आठवणींच्या अलिबाबाची गुहा उघडतेच.
संक्रांतीच्या निमित्ताने मिळणारे तिळाचे लाडू आणि शहरभर पाहायला मिळणारी काळ्या साड्यांतील नेत्रसुखद हिरवळ या दोन्ही मर्मबंधातील ठेवी असल्याने मकर संक्रांतीचा सण माझ्या आवडत्या सणांपैकी एक आहे. या सणाच्या बाबतीत बाकी सगळं चांगलं असलं तरी ‘तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला’ या अट्टाहासाचं काय कारण असावं हे काही माझ्या गळी उतरत नाही. म्हणजे तिळगुळ घ्या आणि खा किंवा गिळा इतपर्यंत ठीक आहे- पण आम्ही गोडगोड का म्हणून बोलावं? ज्या धर्माचे आपण गोडवे गातो तो सनातन धर्म म्हणतो की, ‘सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्, न ब्रूयात् सत्यम् अप्रियम्। प्रियं च नानृतम् ब्रूयात्, एष धर्मः सनातन:।।’ अर्थात सत्य बोलावे, कानाला प्रिय (गोड) वाटेल असं बोलावं, पण कानाला अप्रिय वाटेल असं सत्य बोलू नये आणि कानाला गोड वाटेल असं असत्य बोलू नये. अशा परिस्थितीत केवळ कुणी दोन-पाच रुपयांचा तिळाचा लाडू फुकट दिला म्हणून काय आपण आपला स्वाभिमान, आपला माज हे सगळं गुंडाळून ठेवून मिट्ट गोड बोलायचं? समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून बोललेल्या ‘नरो वा कुंजरो वा’पासून ‘चीनने आपला भूप्रदेश बळकावलाच नाही’ इथपर्यंतच्या गोड बोलण्यांनी, आलेली संकटं टळली नाहीत तर केवळ लोकांचा बुद्धिभेद झालाय, हे ठाऊक असूनही आपण कुणाला गोड बोलण्याची गळ का घालावी? मी तर म्हणेन की, गोड बोलायचा अट्टाहास धरला तर वाद होऊ शकत नाही, संवाद होऊ शकत नाही, विसंवादही होऊ शकत नाही, केवळ रेडिओ किंवा टीव्हीवर ‘मन की बात’ होऊ शकते.
गोड बोलण्याचं मला अगदी बालपणापासूनच वावडं आहे. एकतर माझी रास वृश्चिक आणि जन्म वसईचा. त्यामुळे मी लहानपणापासूनच समोरच्याला काय वाटेल याची पर्वा न करता जे मनाला वाटेल ते रोखठोकपणे किंवा कडवट तिरकसपणे बोलतो. मला अशी एक शंका आहे की अठराव्या शतकातील वसईच्या लढ्यात चिमाजी आप्पाच्या फौजेसोबत आलेली पुण्याची माती, वसईच्या मातीत मिसळली असल्याचा हा परिणाम असावा. लहानपणी खेळताना खाल्लेली माती आणि नंतर वेळोवेळी व्यवहारात खाल्लेल्या मातीमुळे हा पुणेरी गुणधर्म माझ्या डीएनएमध्ये घुसला असावा. तिर्हाइतासमोर फटकळ बोलण्याच्या माझ्या या सवयीचा आईवडिलांना खूप त्रास व्हायचा. आई म्हणायची, अरे एखाद दिवस गोड बोललास तर काही मरत नाहीस. मलाही ते क्षणभर पटायचं, पण विषाची परीक्षा का घ्या!
आपला तो रोखठोक आणि इतरांचा तो उद्धट या न्यायाने सगळे माझी उद्धट म्हणून संभावना करीत असले तरी मला माझ्या रोखठोक, फटकळ किंवा उद्धटपणाचा अभिमान आहे. आणि हा स्वभाव अजूनही मी मोठ्या कष्टाने जोपासला आहे. कधी चुकून कुणाच्या तोंडावर नाईलाजाने एखादं वाक्य चांगलं, गोड बोलावं लागलंच तर त्याची पाठ फिरताच त्याच्याविषयी पन्नास वाईट विधानं करून भरपाई करायचा शिरस्ता मी पाळला आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, कटू बोलण्याची आणि द्वेष पसरविण्याची माझी ही कीर्ती ऐकून, द्वेषप्रसारणाच्या एकमेव मुद्द्यावर सत्तेवर आलेल्या एका राजकीय पक्षाने मला त्यांच्या ‘राज्य आयटी सेल’च्या प्रमुखपदाची ऑफर दिली आहे.
राजकीय पुढारी तर वर्षभर संक्रांत असल्यागत गोडगोड बोलतच असतात. पण म्हणून आपण संक्रांतीच्या नावाखाली ही, एक दिवसापुरती का होईना, गोड बोलायची सक्ती सगळ्यांवर करू शकत नाही. अशी गोड बोलायची सक्ती सगळ्यांवर झालीच तर देशभरातील पोलीस, बस कंडक्टर, रेल्वेचे तिकीट क्लार्क, सरकारी बाबू, रिक्षावाले ही सगळी गोडग्रस्त मंडळी १८५७पेक्षा मोठ्ठं बंड करतील अशी मला भीती वाटते आहे.
घरांघरातील सार्वत्रिक अनुभव असा आहे की, बायकांचं एकदा कशावरून तरी बिनसलं की मग तुम्ही त्यांच्याशी कितीही प्रेमाने बोला, त्या तिरकस उत्तरच देणार. तुम्ही कितीही चांगले वागा, त्या वाकड्यातच शिरणार. अशावेळी बायका म्हणजे अक्षरशः पाकिस्तान होतात… तुम्ही सज्जन, निष्पाप आणि निर्दोष असल्याचे कितीही पुरावे द्या, त्यांना ते कमीच पडतात! त्यामुळे तिळगुळ देऊन बायकोकडून गोड बोलण्याची हमी मिळत असती तर जगभरातील समस्त नवरे मंडळी चोवीस तास खिशात तिळगुळ घेऊन फिरली असती. रोज सकाळी एक तिळगुळ बायकोला दिला की दिवसभराची चिंता मिटली. मज्जानी लाईफ!
आपल्याकडे दिवाळी आली की फटाक्यांपासून होणारे दुष्परिणाम सांगणारे विचारवंत उगवतात. गणपती उत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे होणार्या पाण्याच्या प्रदूषणाबद्दल गळा काढणारे एनजीओ जागे होतात. होळी आली की रंगातील केमिकल्स आणि पाण्याच्या नासाडीवर बोलणार्या समाजसेवकांना कंठ फुटतो. संक्रातीला पतंग उडविल्यामुळे पक्ष्यांना होणार्या अपघाताबद्दल चिंता व्यक्त करणारे पक्षीप्रेमी प्रकट होतात. पण संक्रातीला इवलुशा तिळगुळाच्या बदल्यात लोकांना गोड बोलायला लावण्याची ही जी आवळा देऊन कोहळा काढणारी अघोरी प्रथा बोकाळली आहे त्यावर आवाज उठवणारा एकही माईचा लाल पुढे येत नाही. इतकं सगळ्यांनी, सर्वदा एकमेकांशी गोड बोलून या देशाला डायबिटीसच्या कठड्यावरून खाली ढकलायचा कुणा परकीय शक्तीचा डाव तर नसेल ना, अशीही मला शंका येतेय. म्हणूनच, लोकांना गोड बोलायला लावण्याच्या या कारस्थानात कोणत्या देशी, परदेशी शक्तींचा हात आहे, यात कुणाकुणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत, या सर्वांचा शोध घेऊन मीडियासमोर त्याचा पुराव्यानिशी पर्दाफाश करण्याची विनंती मी किरीट सोमय्या साहेबांना करणार आहे.