अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, केतू वृश्चिकेत, शुक्र-मंगळ धनु राशीत, रवी-शनी (अस्त)-बुध-प्लूटो मकरेत, गुरू-नेपच्यून कुंभेत, चंद्र मीनेत त्यानंतर मेष, वृषभ आणि सप्ताहाच्या अखेरीस मिथुनेत, हर्षल-मेषेत.
दिनविशेष – १२ फेब्रुवारी रोजी जया एकादशी
मेष – येणारा आठवडा अनुकूल राहणार आहे. विशेषकरून वैयक्तिक, शैक्षणिक, नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. शनी अस्त स्थितीत आहे, त्यामुळे अनेक दिवसांपासूनची खोळंबलेली कामे मार्गी लागण्यासाठी सकारात्मक स्थिती निर्माण होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी मनमानी झालेली असेल तर ती शमण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अतिशय लाभदायक काळ राहणार आहे. लग्नेश मंगळ भाग्यात सप्तमेश शुक्रासोबाबत युतीत असल्यामुळे परदेशस्थित नातेसंबध लाभदायक ठरणार आहेत.
वृषभ – काही कारणाने बिघडलेली मानसिक स्थिती आता पूर्ववत होणार आहे. शनिची अस्तस्थिती भाग्यात, सोबत रवी आणि बुध त्यामुळे या आठवड्यात शारीरिक दगदग कमी होणार आहे. दशमातील गुरूचे भ्रमण आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत सहकार्य करणारे राहील. व्यवसायात असाल तर त्या ठिकाणी पूर्ण सहकार्य मिळेल. नवीन कामे मिळतील, पैसे खेळते राहतील. विद्यार्थीवर्गाचे अनेक दिवसांपासून रखडलेले शैक्षणिक प्रश्न एका झटक्यात मार्गी लागतील. जुन्या आजारावर बारीक लक्ष ठेवा, पुन्हा त्रास होऊ शकतो. कोरोना अजून गेलेला नाही त्यामुळे आपली तब्येत सांभाळा, म्हणजे झाले. स्वभावात चिडचड वाढेल, पण देवाचे नाव घ्या, आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा.
मिथुन – विज्ञानक्षेत्रात काम करत असाल तर तुमच्याकडून येत्या आठवड्यात नवीन शोधकार्य घडून येईल. बौद्धिक क्षमतेच्या जोरावर अवघड संशोधनात घवघवीत यश मिळेल. काही मंडळींना वडिलोपार्जित हक्कात वाटा मिळण्याचे योग जुळून येत आहेत. बुधासोबत, शनी (अस्त) रवी, प्लूटो अशी ग्रहस्थिती असल्यामुळे कोणतेही काम सरळमार्गानेच करा, चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका, कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. गैरमार्गाने पैसे कमावणे टाळा. भागीदारी व्यवसायात चांगला फायदा होईल. दाम्पत्यजीवनात आनंद मिळेल.
कर्क – कामे शांत आणि सुरळीत पार पडणार आहेत, त्यामुळे चेहर्यावर समाधान दिसेल. सप्तमस्थानातील पापग्रहांच्या युतीमुळे कौटुंबिक आणि व्यावसायिक ठिकाणी झालेले नुकसान आता भरून येणार आहे. मंगळ आणि चतुर्थेश शुक्र षष्ठम भावात असल्यामुळे नोकरीत बदल घडून येतील. नवी नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. घरच्यांबरोबर वादाचे प्रसंग टाळा. जमीनजुमल्याच्या व्यवसायात विनाकारण शत्रू निर्माण करून घेऊ नका. वैद्यकीय शिक्षण घेणार्यांना हा आठवडा शुभ जाणार आहे. बाजारातून चांगले लाभ मिळण्याचे संकेत आहेत.
सिंह – येत्या आठवड्यात काय प्लस आणि काय मायनस याचा ताळमेळच राहणार नाही. त्यामुळे तुमचे गणित बिघडू शकते. रवी षष्ठात, शनी (अस्त), बुध आणि प्लुटोसोबत, सुखस्थानात केतू, दशमात राहू त्यामुळे संमिश्र फळे मिळणारा काळ आहे. गुरूमुळे व्यावसायिक प्रगती चांगली होईल आणि चांगला फायदा मिळेल. मित्रमंडळींसोबत वैरभाव टाळा. वकिली पेशा करणार्यांसाठी लाभदायक आठवडा राहणार आहे. पक्षकाराची बाजू व्यवस्थित मांडल्यामुळे वादविवादात वरचढ राहाल.
कन्या – बुधाचे पंचमातील मकरेतील भ्रमण, शनी-रवी-बुध-प्लूटो युती त्यामुळे लेखक, पत्रकार, टीकाकार, राजकारणी या मंडळींसाठी हा काळ टीकात्मक चर्चेचा राहणार आहे. सरकारी क्षेत्रातून चांगले लाभ होतील. संततीमुळे सार्वजनिक जीवनात त्रास होण्याची शक्यता आहे. सुखस्थानातील शुक्र-मंगळ युती आणि पंचमात शनी-रवी यांच्यामुळे एखाद्या प्रेमप्रकरणात आपली बेअब्रू होणार नाही याची दक्षता घ्या. नवी गुंतवणूक करण्याचा मोह टाळा.
तूळ – कोणतेही वादविवाद झाले असतील तर त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय लागण्याचा हा काळ आहे. कामाच्या निमित्ताने प्रवास घडतील. काही मंडळींना मात्र सावधगिरी बाळगावी लागणार आहे. अतिजोशात एखाद्याला भुरळ घालण्याच्या नादात पाय घसरण्याची दाट शक्यता आहे. आपल्याकडून संशयास्पद वर्तन होईल असे वागू नका. त्यामधून भलतेच प्रसंग निर्माण होऊ शकतील. सुखस्थानात शनी-रवी युती होत असल्यामुळे गालबोट लागू शकते. गुरू महाराजांमुळे भावंडे, नातेवाईक यांच्याकडून सहकार्य मिळेल. विद्यार्थीवर्गाला प्रगतीचा काळ राहणार आहे.
वृश्चिक – या आठवड्यात संघटनात्मक कौशल्य आणि आत्मविश्वास या जोरावर घवघवीत यश मिळणार आहे. अंदाज बरोबर येतील, त्यामुळे कामाचा हुरूप वाढेल. सुखस्थानातील गुरुचे भ्रमण सुखप्राप्तीचे राहणार आहे. कुटुंबात पूजा, सत्संग यासारखे कार्यक्रम पार पडतील. काही महिलांना पतीच्या यशात भागीदार होण्याचा मान मिळेल. हटवादी आणि हेकट स्वभावामुळे नुकसान होईल, असे वर्तन करणे प्रकर्षाने टाळा. ९ ते ११ या तारखा विशेष लाभदायक राहणार आहेत.
धनु – अविवाहित असाल तर लग्न ठरण्याचे योग आता जमून येत आहेत. कला, क्रीडा, क्षेत्राशी निगडित असणार्या मंडळींसाठी नावलौकिक कमवण्याचा काळ राहील. मैदानी खेळाडूंना यशप्राप्तीचा काळ. संगत चांगली ठेवा. व्यावसायिकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. लघुउद्योग करणार्या मंडळींसाठी यशस्वी आठवडा. कर्जाच्या माध्यमातून पैसे उभे करण्यात अडचण येणार नाहीत. नोकरदार व्यक्तींच्या कामात चांगले परिवर्तन घडेल. एखादी नवीन जबाबदारी मिळेल.
मकर – कोणतेही कारण असले तरी नाहक चिडचिड करू नका. त्यामुळे मानसिक त्रास वाढू शकतो. आगामी काळ काही क्लेशदायक स्थिती निर्माण करणार आहे. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य सांभाळा. अनपेक्षित खर्चात मोठी वाढ होईल. त्यामुळे पैसे जपूनच खर्च करा. नवी गुंतवणूक नको. कोणत्याही प्रलोभनांपासून दोन हात दूरच राहा. सहलीच्या निमित्ताने लांबचे प्रवास होतील. पण व्ययस्थानातील मंगळामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्या.
कुंभ – शनी व्ययभावात आहे. आतापर्यंत बरेच चढउतार पाहत आला आहात. कामातील अडथळे, अपयश यामुळे खचून गेले आहात. राहूचे भ्रमण होत असल्यामुळे कौटुंबिक अशांतता राहणार आहे. त्यामुळे विचलित होऊ नका. शांत राहिलात तर चांगला फायदा होईल. आरोग्याची विशेष काळजी घ्या, एखादी शस्त्रक्रिया होऊ शकते. व्यावसायिक मंडळींना काही प्रमाणात चांगले लाभ होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काही पेच निर्माण झाला असेल तर तो आता सुटेल. सहकारी संस्थांच्या माध्यमातून लाभ मिळेल.
मीन – येणारा काळ उत्तम जाणार आहे. परदेशात व्यवसाय किंवा नोकरीच्या माध्यमातून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यात यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी बढतीचे योग आहेत. गृहसौख्याच्या दृष्टीने शुभदायक काळ आहे. सुखवास्तूचे प्रतीक असलेल्या वस्तूची खरेदी होईल. शेअर, लॉटरी या माध्यमातून अनेपक्षित लाभ होतील. नवीन वास्तूचे प्रश्न मार्गी लागतील.