तुम्ही संक्रांतीला किती लाडू खाल्ले?
– सोनाली गावकर, पेण
५१/२
नेते आणि अभिनेते यांच्यात अभिनयात सरस कोण?
– शिवराम गोंदवणकर, नरसोबाची वाडी
अर्थातच नेते!
नाटक्या हा शब्द कायम नकारार्थी का वापरला जातो? आयुष्यात काही वाईट झालं की नाटक झाले जन्माचे, असं म्हणतात. नाटकाविषयी हा असा दृष्टिकोन का?
– वैदेही पारसनीस, पुणे
कारण नाटक हे बेतलेले असते आणि ते खोटं आहे हे सगळ्यांना माहित असते…
तिळगुळ घ्या, गोड बोला, असं सांगण्याची वेळ का येते? माणसं एरवी गोड का बोलू शकत नाहीत?
– तात्या शिंदे, अक्कलकोट
तिळगुळाचा आणि गोड बोलण्याचा काहीही संबंध नाही… उगाच आपला एक काही तरी जोडायचं म्हणून जोडलंय… उद्या गोडबोले आडनावाचा माणूस गोड का बोलत नाही विचाराल..
नाटकाच्या व्यवसायात मत्सर असतो का? तुम्हाला त्याचा काही अनुभव आला आहे का?
– मोरेश्वर निस्ताने, चंद्रपूर
असतो, कारण, जिथे जिथे स्पर्धा असते तिथे तिथे मत्सर असतो… तो एक वेळ चालतोही, पण माणसं फार विषारी असतात ते फार लागतं मनाला…
खाई त्याला खवखवे, असं म्हणतात- पण मी म्हणते, ज्याने खवखवेल असे पदार्थ खावेतच कशाला?
– जोनिता फर्नांडिस, मालवण
तुम्हाला कळलंय तर तुम्ही खाऊ नका!
माणूस लहानपणी पहिल्यांदा खोटं बोलतो, तो त्याचा अभिनयाचा पहिला प्रयत्न असतो, असं म्हणतात. तुम्ही पहिल्यांदा अभिनय कधी आणि कसा केलात?
– राम शेंडगे, पिंपळगाव बसवंत
मी प्रथम रडलो तेव्हा
तमाशामध्ये सोंगाड्याला कथानकाचा संदर्भ न सोडता अधूनमधून ताज्या घडामोडींवर उत्स्फूर्त भाष्य करावं लागतं, तेही चुरचुरीत. हे आव्हानात्मक काम तुम्ही करू शकाल? आजच्या नाट्यविश्वात असा अस्सल सोंगाड्या कोण आहे असं वाटतं?
– राघव बेंडखळे, सिन्नर
मी नाही करू शकणार… सतीश तारे अस्सल सोंगाड्या होता. आजच्या काळात संतोष पवार आहे.
लोकांनी मला चांगला माणूस म्हणावं, अशी माझी फार इच्छा आहे… मी कसा वागू?
– केशव चौगुले, जळगाव
लोकांसाठी चांगला माणूस व्हायचं असेल, तर खोटं वागायला शिका.
बुवा तेथे बाया का असतात?
– खंडू भुसारी, शिंगणापूर
ऑपोझिट पोल्स अट्रॅक्ट… विजातीय ध्रुवांमध्येच आकर्षण निर्माण होतं ना!
तिसर्या घंटेलाच नाटक का सुरू होतं? पहिल्या किंवा दुसर्या घंटेला का होत नाही?
– इशिता बोडके, गायवाडी
असं काही नाहीयेय… ४, ५, ६, ७ अशा कितीही वाजवू शकता… किंवा घंटाच वाजवू नका.
भाजीत भाजी मेथीची, बायको माझ्या प्रीतीची, यापेक्षा वेगळा एखादा उखाणा तुम्हाला येतो का?
– अनिता खरात, कोल्हापूर
घ्या… भाजीत भाजी शेपूची, बायको माझ्या प्रीतीची!
कलावंताने आपल्या विचारधारेच्या विरोधी विचारांच्या नाटकात काम करावे की करू नये?
– यशवंत सहस्त्रबुद्धे, सांगली
पैशासाठी कुणी काय करावे हे आपण कसे सांगावे?