ते वर्ष असेल २००६…. पुण्यातल्या आबासाहेब गरवारे कॉलेजमधून मास्टर ऑफ कम्प्यूटर मॅनेजमेंटची पदवी घेऊन बाहेर पडलो होतो. एका आयटी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती. तसे माझे आईवडील सुरुवातीपासून संगीतक्षेत्राशी संबधित होते, त्यामुळे संगीताचे बाळकडू मला लहानपणापासूनच मिळाले होते. पण, मी संगीताचा फक्त छंद जोपासावा आणि चांगल्या आयटी कंपनीत किंवा बँकेमध्ये नोकरी करावी, अशी घरातल्यांची पहिल्यापासूनच इच्छा होती. तसंच झालं. कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून माझी चांगली प्रगती होत गेली. तेव्हा दर महिन्याला ४० हजार रुपये इतका पगार हातात पडायचा. त्यामध्ये खर्च भागवून थोडे फार पैसे हातात उरायचे. त्यातून चांगली बचत व्हायची. २००८-०९च्या सुमारास सॅप प्रणालीने जोर पकडला होता, त्यात करियर करण्याची चांगली संधी चालून आली होती. माझाही तिकडे सुरुवातीपासूनच ओढा होता, त्यामुळे संधी मिळताच मी तिकडे वळलो. कंपनीत मला सॅपचे प्रशिक्षण मिळाले, त्यात गोडी निर्माण झाली आणि नवे ज्ञान आत्मसात केल्यामुळे पगारही १० हजार रुपयांनी वाढला, त्यामुळे मी भलताच खूष होतो. एकीकडे संगीताचा रियाझही छंद म्हणून सुरू होताच.
स्थिर नोकरीत, स्थिर आयुष्यात वर्षं सरत होती, दिवस पुढे जात होते, कामाचा ताण वाढत चालला होतो. ऑफिसमध्ये जाण्याची वेळ निश्चित होती, ती सकाळी नऊची. पण कामावरून परत येण्याची वेळ नक्की नव्हती. त्यामुळे रोजची संगीताचा रियाझ करण्याची सवय मोडत चालली होती. माझी चिडचिड होऊ लागली होती. रियाझ झाला नाही की मी कमालीचा अस्वस्थ व्हायचो. यावर काहीतरी मार्ग काढायला हवा, म्हणून मी वरिष्ठांना भेटून त्यांच्या कानावर हा विषय घातला आणि सकाळी नऊ ते चार या वेळेत मी अर्धवेळ काम करीन, असे सांगितले. वरिष्ठांनी त्याला मान्यता तर दिलीच, शिवाय कंपनीत रियाझ करण्यासाठी एक खोली देखील उपलब्ध करून दिली. अर्थात, मी तिचा कधी वापर केला नाही.
नोकरी अर्धवेळ झाली होती खरी, पण आयटीमधल्या कामाचा रेटा असा असतो की चार वाजताही ऑफिसमधून निघणे शक्य व्हायचे नाही. त्यामुळे अर्धवेळ नोकरी करूनही कधी कधी रियाझ व्हायचा नाही. मनाची उलघाल व्हायची. नोकरी आणि संगीत या दोन्हीचा मेळ साधताना मला खूप त्रास व्हायचा. माझ्या मनातली ही खदखद विकास देवधर यांनी ओळखली. एकदा ते म्हणाले, धवल, आयटी कंपनीत काम करणे हा तुझा कल नाही, काम अशा ठिकाणी करायला हवे, जिथे तुला त्याचा कंटाळा येता कामा नये. या वाक्याने मनात घर केले. पण संगीतक्षेत्रात यशस्वी झालो नाही तर पुन्हा पुढे नोकरीच करावी लागणार आहे असा विचार सारखा मनात यायचा. त्यामुळे मी दुहेरी कात्रीत सापडलो होतो.
२०१०मध्ये ही कोंडी फुटली. झी टीव्हीने व्यावसायिक गायकांसाठी सारेगमप स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. आता नोकरीचे कसे करायचे, हा प्रश्न होता. विकास देवधर सरांनी मला त्यांच्या कंपनीत नोकरीची
ऑफर दिली. त्यांनी घरातून काम करण्याची मुभा दिली. सारेगमपच्या पर्वाची सुरवात झाली आणि आयटी कंपनीच्या नोकरीपासून मी दूर गेलो. गाण्यासाठी एक वर्ष देऊ या, इथे काही शक्य झाले नाही, काही भवितव्य दिसले नाही तर पुन्हा देवधर सरांच्या कंपनीमध्ये नोकरी सुरू करू या, असा विचार करून गाण्यावर लक्ष केंद्रित केले.
स्पर्धा सुरू झाली, चांगले यश मिळत गेले, पुढे पुढे जात राहिलो. मात्र, दुसरीकडे नोकरी सोडल्याने दर महिन्याला मिळणारा पगार बंद झाला होता. देवधर सर मात्र मला दर महिन्याला ४० हजार रुपये देत होते. सारेगमप संपले होते, त्या स्पर्धेत उपविजेता ठरलो, तेव्हाच ठरवले की आता करियर करायचे तर संगीताच्या क्षेत्रातच. सारेगामापामुळे मला कामे मिळू लागली होती. देवधर सरांनी दर महिन्याला दिलेल्या त्या रकमेतला एकही पैसा खर्च न करता ती रक्कम त्यांना परत करू शकलो.
रोमँटिक गाण्यांवर सर्वाधिक प्रेम
गायक म्हणून करियरला सुरुवात केली, तेव्हापासून माझे मराठी आणि हिंदी रोमँटिक गाणी म्हणण्यावर सर्वाधिक भर राहिला आहे. ज्येष्ठ गायक महंमद रफी यांची गाणी गायला मला आवडतात. ‘सारेगमप’च्या पर्वाला सुरवात झाली होती तेव्हा त्या स्पर्धेत पहिले गाणे गायले होते ते संगीतकार निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेले ‘घन आज बरसे’. त्यानंतर अनेक मराठी, हिंदी गाणी या स्पर्धेत मी गात गेलो. या स्पर्धेत उपविजेता झाल्यानंतर तेव्हा झी मराठीच्या नवीन सिरियल्सच्या प्रमोशनसाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्याची संधी मिळाली. तेव्हा ‘फू बाई फू’ ही मालिका सुरू होती. ‘नया है यह’ हे तिचे टायटल साँग गाण्याची संधी मिळाली. त्यानंतर झी सारेगमचे ज्ञानेश्वर माऊली हे प्रमोशनल साँग देखील गायले.
भारताच्या विविध भागामध्ये माझे गाण्याचे कार्यक्रम सुरू झाले. मिलिंद ओक यांच्या निस एंटरटेनमेंट यांच्यातर्फे अमेरिकेतल्या अनेक शहरांमध्ये गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिथे थीम शोना जास्त मागणी असते. त्यामुळे मदन-मोहन, शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्याचे कार्यक्रम तिथे सादर केले. त्यानंतर अबुधाबी, दुबई, शारजा, कतार, झिम्बाबे याठिकाणी शम्मी कपूर, दिलीप कुमार, देव आनंद, यांची प्रसिद्ध गाणी सादर केली. रसिकांनी त्यांना भरभरून पसंती दिली, अनेक गाण्यांना वन्समोअर देखील मिळायचा.
आतापर्यंत अजय-अतुल, निलेश मोहरीर, अविनाश विश्वजित, अजय नाईक, आनंद मोडक अशा नावाजलेल्या संगीतकारांबरोबर काम करत आलो आहे. हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे संगीतकार बाप्पी लाहिरी, गायिका साधना सरगम, गायक सुरेश वाडकर यांच्या लाइव्ह कार्यक्रमामध्ये मला गायची संधी मिळाली होती. पानिपत, अग्निपथ, पीके, ब्रदर या चित्रपटासाठी बँकिंग व्होकल गायक म्हणून काम केले.
आयटीमधली नोकरी सोडली, ५० हजार रुपये पगारावर पाणी सोडले, तेव्हा तो निर्णय घरातल्या मंडळींना बिलकुल आवडला नव्हता. हा निर्णय घेण्याआधी चारपाच वेळा विचार कर, असा सल्ला आईने मला दिला होता. पण मी, माझ्या त्या निर्णयावर ठाम होतो. पुढे संगीताच्या क्षेत्रात हळूहळू जम बसत गेला, २०११ ते १३ या काळात आर्थिक आमदनी चांगली वाढत गेली. नोकरीच्या ठिकाणी मिळणार्या पगाराच्या दुप्पट रक्कम दर महिन्याला मिळत होती. पुढे अमेरिका, दुबई, अबुधाबी, झिम्बाबे, सिंगापूर या ठिकाणी दौरे केले, तिथे चांगले पैसे मिळाले. तेव्हा नोकरी करत बसलो असतो तर गाण्यातून मिळणारा आनंदही मिळाला नसता. उलट महिनाभर काम करून मिळणार्या पैशापेक्षा चांगली रक्कम मिळत होती, त्यामुळे आयुष्य आनंदात सुरू होते. पावसाळ्यात कामे कमी असतात, कधी कार्यक्रम नसल्यामुळे एखादा महिना खाली जायचा. पण त्यामुळे निर्णय चुकला असा पश्चाताप मला कधीच झाला नाही.
या काळात मला शाहू पुरस्कार, स्वर्गीय राम कदम पुरस्कार, असे अनेक पुरस्कार मिळत गेले. त्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढत गेला. २०१५-१६ या वर्षांमध्ये लव्ह आजकाल या आधुनिक संगीत नाटकाची निर्मिती करून त्याचे २५ प्रयोग केले, त्यामधून एक वेगळा आनंद मिळाला.
निराशेने घेरले तेव्हा…
२०१८मध्ये मी दोन वेळा एका हिंदी सिनेमासाठी प्लेबॅक सिंगर म्हणून गायलो होतो. तेव्हा मला वाटलं होतं की इथे आपल्याला चांगला ब्रेक मिळू शकतो. हिंदी चित्रपटाची दारे आपल्यासाठी उघडू शकतात. निर्मात्याने देखील माझ्या आवाजाचे कौतुक केले होते. त्यामुळे अंगावर मूठभर मांस चढले होते. पण तसं काही घडलं नाही, तेव्हा मी निराशेच्या गर्तेत अडकलो. त्यातून बाहेर पडायला खूप वेळ लागला. मात्र नंतर मनाशी ठरवले की जे काम हातात येईल, ते घेऊन पुढे जायचे, ते काम उत्तम करायचे, त्याचे सोने करायचे.
म्युझिक बॅण्डची स्थापना
२०१९मध्ये सहकारी मित्रांना हाताशी धरून एक चांगला म्युझिक बॅण्ड तयार करण्याचे ठरवले होते, पण ‘व्हिटॅमिन एम’ची म्हणजे पैशांची कमतरता असल्यामुळे ते पुढे सरकत नव्हते. २०२०मध्ये कोविड आला आणि सार्या गोष्टी बदलून गेल्या. आपण आता आयटीमध्ये असतो तर बरे झाले असते, नोकरी केली असती पैसे मिळाले असते, असा विचार मनात येऊन गेला होता. पण त्यात जास्त अडकून न बसता पुढे जाऊन वेगळे काहीतरी करण्याचा ध्यास मनाने घेतला आणि त्याच काळात आमचा मेलान्ज नावाचा दहाजणांचा बँड तयार झाला. आम्ही त्याचे ऑनलाइन शो केले, गाणी तयार करून ती यूट्यूब चॅनेलवर टाकली, प्रेक्षकांना ती आवडली.
तुझ्यावर शिंपिते मी या नभीचे चांदणे
लॉकडाऊन सुरू असतानाच्या रिकामपणाच्या काळात संगीतकार होता येईल का, याची चाचपणी करून ‘तुझ्यावर शिंपिते मी या नभीचे चांदणे’ हे गाणे स्वरबद्ध केले. केतकी माटेगावकरने ते गायले. पहिल्यांदाच केलेले हे गाणे रसिकांना खूप आवडले, सगळीकडे त्याचे तोंडभरून कौतुक झाले. तिथून मला हिंदी गाणे स्वरबद्ध करण्याची स्फूर्ती मिळाली. क्षितिज पटवर्धन याने त्याचे शब्द लिहिले आहेत, मददगार हे गाणे लवकरच रिलीझ होणार आहे, त्यानंतर संगीतकार म्हणून कारकिर्दीला वेगळा आयाम देण्याचा माझा मानस आहे.
सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत असताना एक चाकोरीबद्ध जीवन होते, त्यातून जीवनाचा आनंद मिळायचा नाही. जसजशी संगीतक्षेत्राशी नाळ घट्ट जोडली जाऊ लागली, तसतसा आत्मविश्वास अधिक प्रबळ होत गेला आहे. आपण निवडलेल्या या वेगळ्या मार्गामध्ये भविष्यात काहीतरी ठसठशीत कामगिरी करण्याच्या संकल्प मी सोडलेला आहे. त्यासाठी कितीही मेहनत घ्यावी लागली तरी ती मी करणार आहे, हे नक्की…