□ मोदी सरकारची सरकारी मालमत्तांचे मॉनिटायझेशन करण्याची योजना
■ अरेच्चा, अवघ्या सात वर्षांत सगळ्या उभारल्या आणि विकायला काढल्यासुद्धा… त्या आधीच्या काळात तर सगळं वैराण वाळवंटच होतं ना देशात?
□ दिल्लीमध्ये हवेच्या शुद्धीकरणाचा पहिला स्मॉग टॉवर
■ हा खास भारतीय उपाय… स्मॉग टॉवर बांधू पण मुळात प्रदूषण करणं काही थांबवणार नाही! बायदवे, राजकीय हवा शुद्ध करण्याचा काही टॉवर निघतोय का पाहा… त्याचीही फार गरज आहे.
□ अलाहाबाद आणि उत्तराखंड ही उच्च न्यायालये अविचारी आदेश देत आहेत : सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
■ तिथल्या एकंदर वातावरणाचा परिणाम की सत्ताधार्यांच्या दबावाने निर्णय घेतले जाताहेत, याचा तपास आता सुप्रीम कोर्टानेच लावायला हवा.
□ मुलांच्या आरोग्याच्या चिंतेमुळे शाळा सुरू करणे धोक्याचे : अमर्त्य सेन यांचा इशारा
■ जे सेन यांना समजते ते आपल्याकडे काही हस्तिदंती मनोर्यातल्या संपादकांनाही कळलं असतं तर?
□ लस तुटवड्याबाबत खुलासा करा : मुंबई उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश
■ काय खुलासा करणार, कप्पाळ! आम्हाला फक्त मोठमोठ्या इव्हेंटबाज बाताच मारता येतात, कामाच्या बाबतीत शून्य, हे सांगणार?
□ मुंबई विमानतळावर सलमान खानला रोखणारा जवान अडचणीत; प्रसारमाध्यमांशी बोलणे भोवणार
■ व्हीआयपी संस्कृतीचा परिणाम. परदेशांत असे कितीतरी व्हीआयपी समजूतदारपणे नियमांचं पालन करतात, त्याच्या बातम्या होत नाहीत.
□ पोलिसांना दाढी वाढवण्याचा घटनात्मक अधिकार नाही : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय
■ तलवारकट मिशी ठेवता येईल का, ठेवल्यास तिची टोकं किती मिलिमीटर वर ठेवायची, यावर काही मार्गदर्शन केलंय का न्यायालयाने?
□ अफगाणिस्तानमधील स्थितीस पाकिस्तानच जबाबदार : अफगाण पॉप स्टारचे उद्गार
■ जोवर तिथल्या परिस्थितीचं खापर इतरांवर फोडलं जातंय, तोवर त्या परिस्थितीत काहीच बदल होणार नाही. आता तरी जबाबदारी घ्यायला शिका आपल्या देशाची.
□ खाद्यतेलासह डाळींच्या किंमतीतही २० टक्के वाढ
■ सेंट्रल व्हिस्टाचं काम वेळापत्रकानुसार सुरू आहे ना, ते महत्त्वाचं. बाकी बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी भाववाढ होती रहती है.
□ देशातील पहिले मद्यसंग्रहालय गोव्यात
■ मद्यभक्तांची मांदियाळी जमण्यासाठी त्याहून मोठे ‘तीर्थ’क्षेत्र नाही!
□ श्रावणात उपवास महाग, साबुदाणा ५० रुपयांवर
■ खर्या उपवासाचं म्हणजे पूर्णपणे अन्नाविना राहण्याचं पुण्य मिळेल आता श्रावण पाळणार्यांना.
□ लखनौमध्ये कल्याणसिंहांच्या पार्थिवावर तिरंग्यावर भाजपचा झेंडा
■ अख्खा देश ज्यात गुंडाळला गेला, त्यात तिरंगा गुंडाळला जाणारच… असाही राष्ट्रध्वजाशी यांचा संबंध काय?
□ चिनी राजदूताची तालिबानींबरोबर भेट
■ पाकिस्तान, चीन, रशिया आणि तालिबान यांचं साटंलोटं आधीच जमलेलं आहे… आता भारताला सावध राहावं लागणार खूप.
□ आणखी तीस वर्षे महापुराचा धोका : सांगलीत पूरतज्ज्ञांचा इशारा
■ तीस वर्षांत सगळं जलमय होईल, मग वेगळा पूर येण्याची शक्यता उरणार नाही, असं तर म्हणत नाहीयेत ना ते?
□ तरुणांमध्ये वाढताहेत पोटाचे विकार; आधुनिक जीवनशैलीचे दुष्परिणाम
■ अरे देवा, ज्या वयात दिलाची दुखणी जडायची त्या वयात पोटाचे विकार… या पोरांचं कसं होणार?
□ मोदी हे काम करणारे बैल : रावसाहेब दानवे यांचा बैलपोळा
■ बाकी सगळे गुबू गुबू वाजलं की माना डोलावणारे नंदीबैल, हे दाजींनी सांगायची गरज नाही.
□ जपानमध्ये लोकसंख्यावाढीसाठी दाम्पत्यांना रोमान्ससाठी खास १० दिवसांची पेड लीव्ह मिळणार
■ फक्त विवाहित जोड्यांनाच ही रजा देण्याची अट काढा, लोकसंख्या किती झपाट्याने वाढेल पाहा.
□ राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण पक्ष त्यांच्या पाठिशी : फडणवीस
■ म्हणजे खुनाचं समर्थन नाही, पण पोलिस खुन्याच्या पाठिशी.