राजकारणातल्या माणसांच्या राजकारणातल्या आणि राजकारणापलीकडच्या सुरस आणि चमत्कारिक आठवणींचा खजिना
—-
१९९० साली महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीचा पराभव झाल्यानंतर १९९५ साली पुन्हा झालेल्या विधानसभा निवडणुका या युतीने अधिक ताकद लावून लढविल्या आणि राज्यात प्रथमच सत्तांतर होऊन शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीचे सरकार राज्यात सत्तेवर आले. या निवडणुकीचे एका वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसचे त्या वेळेचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांचा लातूर मतदारसंघात तत्कालीन जनता दलाच्या शिवाजीराव पाटील यांनी पराभव केला. विलासराव देशमुख यांच्या पराभवाने सारा महाराष्ट्र हादरून गेला. पण एखादा दिवस एखाद्यासाठी लाभदायक नसतोच, तसा तो दिवस विलासरावांचा नव्हता आणि त्यामुळे त्यांचा पराभव झाला. या पराभवाने विलासराव इतके संतप्त झाले की या निवडणुकीपाठोपाठ झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी थेट आपल्याच म्हणजे काँग्रेस पक्षाविरुद्ध बंड केले.
काँग्रेसमधील त्यांचे नेतृत्व मानणार्या काही आमदारांनी त्यांना मते दिली. याखेरीज विरोधी पक्षातील काही मते मिळविण्यातही ते यशस्वी झाले. पण इतका प्रयत्न करूनही त्या निवडणुकीत विलासरावांचा केवळ अर्ध्या मताने पराभव झाला. ते जिंकले असते तर काँग्रेस सोडून त्यांना विरोधी पक्षाचेच राजकारण करावे लागले असते, पण ते हरले आणि त्यांनी नशिबाला दोष देत आपले जे काही व्हायचे असेल ते काँग्रेसमध्ये होईल असा विचार करून काँग्रेसमध्येच राहायचे ठरविले. १९९५ नंतर पुन्हा १९९९ साली महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीत १९९५ साली ज्यांनी पराभव केला होता त्या शिवाजीराव पाटील यांचा दारूण पराभव करीत विलासराव विधानसभेवर निवडून आले. काँग्रेसच्या प्रथेप्रमाणे मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचे हे ठरविण्यासाठी दिल्लीहून पक्षश्रेष्ठींनी निरीक्षक म्हणून माधवराव शिंदे यांना मुंबईत पाठवले आणि त्यांनी निवडून आलेल्या काँग्रेसच्या आमदारांची मते जाणून घेऊन विलासराव देशमुख यांच्या बाजूने सर्वाधिक आमदारांचा कल असल्याने त्यांनाच मुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी असा अहवाल पक्षश्रेष्ठींना दिला. तो मान्य करून पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री म्हणून विलासराव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. ज्या काँग्रेस पक्षाच्या विरोधात आपण बंड केले, त्याच पक्षाने आपल्याला मुख्यमंत्री बनविले, असा एक आगळा अनुभव विलासरावांच्या वाट्याला आला. १९९९ ते २००४ या काळात विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदी होते, पण २००४ साली होणार्या विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी पक्षश्रेष्ठींनी अगदी अचानकपणे विलासरावांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला करून सुशीलकुमार शिंदे यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुका काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या आणि शिंदे यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला पुन्हा विजयी करून सत्तेवर आणले. आता मुख्यमंत्रीपदी सुशीलकुमार शिंदे राहतील असा राजकीय वर्तुळात अंदाज असताना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पुन्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आणि परत एकदा विलासराव देशमुख यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपविली.
नासिकराव तिरपुडेंना पवारांनी शिकवला धडा
१९७७ साली जनता पक्षाकडून देशभर काँग्रेसचा दारूण पराभव झाला. या पराभवाने हादरून गेलेल्या इंदिरा गांधी यांनी स्वतःला पुन्हा आजमावून घेण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार होते आणि मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते. दादांच्या मंत्रिमंडळात नासिकराव तिरपुडे आदिवासी विकास मंत्री होते. ते इंदिरा गांधी यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात उपस्थित राहिले आणि तेथूनच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा वसंतदादांकडे पाठवून दिला. दिल्लीच्या मेळाव्यात इंदिरा काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली आणि विविध राज्यात पक्षाध्यक्ष नियुक्त करण्यात आले. महाराष्ट्रात ती जबाबदारी नासिकराव तिरपुडे यांच्यावर सोपविण्यात आली. तिरपुडे दिल्लीहून मुंबईत दाखल झाले ते महाराष्ट्र प्रदेश इंदिरा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनच. नंतर लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जो दारूण पराभव झाला, त्यामुळे इंदिरा गांधींचे नेतृत्व अमान्य करून यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी रेड्डी काँग्रेसची स्थापना केली होती. या रेड्डी काँग्रेसचे महाराष्ट्रात वर्चस्व होते. त्यामुळे १९७८ सालच्या विधानसभा निवडणुकीत जनता पक्ष विरूद्ध रेड्डी काँग्रेस आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली. या लढतीत जनता पक्षाने सर्वाधिक ९९ जागा जिंकल्या. काँग्रेसनेही ६९ जागा जिंकल्या तर इंदिरा काँग्रेसने पहिल्याच प्रयत्नात ६२ जागा जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. रेड्डी काँग्रेसचे नेते वसंतदादा पाटील यांनी इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा करून रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांचे संयुक्त मंत्रिमंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेऊन जनता पक्षाला सत्तेबाहेर ठेवले. जे नवे मंत्रिमंडळ स्थापन झाले त्यात नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते, तर शरद पवार यांच्याकडे उद्योग मंत्रीपद होते. उपमुख्यमंत्रीपद हातात मिळताच तिरपुडे यांनी पक्ष विस्तारासाठी महाराष्ट्रभर दौरे सुरू केले. या दौर्यात तिरपुडे हे यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका करायचे. ही टीका अशीच चालू राहिली तर राजकारणात काम करणे अशक्य होईल हे लक्षात घेऊन शरद पवार यांनी तिरपुडे यांना धडा शिकविण्याचा निर्धार केला आणि जनता पक्षाशी हातमिळवणी करून वसंतदादा आणि तिरपुडे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडण्याचा निर्णय घेतला. फक्त मुख्यमंत्रिपद आपल्याकडे आणि बाकी सगळी महत्त्वाची मंत्रीपदे जनता पक्षाला, अशी रणनीती आखून शरद पवार यांनी विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना सुंदरराव सोळंके, सुशीलकुमार शिंदे आणि दत्ता मेघे या तीन मंत्र्यांना बरोबर घेऊन विधानसभेतच मंत्रिपदाचे राजीनामे दिले. पवारांचा हल्ला इतका वर्मी होता की त्याच दिवशी वसंतदादा आणि तिरपुडे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले आणि नंतर १८ जुलै १९७८ रोजी शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेऊन जनता पक्षाला अन्य महत्त्वाची खाती दिली, पण उपमुख्यमंत्री पद निर्माण होणार नाही याची काळजी घेतली. पवारांच्या या दणक्याने तिरपुडे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील अस्तित्वच संपुष्टात आले. शरद पवार मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचे वय अवघे ३८ वर्षांचे होते आणि अत्यंत कमी वयात मुख्यमंत्रिपद मिळविण्याचा विक्रम त्यांनी देशभरात प्रस्थापित केला होता. नंतरच्या काळात पुन्हा पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यांनी पवारांचे मंत्रिमंडळ बरखास्त केले. मात्र त्यानंतर शरद पवार सातत्याने राजकारणात चढत्या क्रमाने प्रसिद्धीच्या झोतात राहिले ते आजपर्यंत.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)