नरेंद्र मोदी
आधीच भरपूर वाढवून ठेवले
पेट्रोल-डिझेलचे मी भाव
जनतेलाही गॅसवर ठेवून
पाहात होतो धावाधाव
आता एकदम ट्यूब पेटली
निवडणुका दिसता समोर
कोहळा घेऊन दिला आवळा
दिसला जेव्हा अंधार घनघोर
ही तर होती चालबाजी
जेव्हा तिच्या लक्षात येईल
मग मात्र निवडणुकीत
सणसणीत लाथ देईल
—– —–
जनता
महागाई गगनाला भिडली
जगणे झाले महामुश्कील
‘अच्छे दिन’ची वाट पाहता
‘बुरे दिन’चे दिसतात कंदील
मोदींचे तर विदेश दौरे
करतात म्हणे नाती घट्ट
खर्चाची तर नाहीच पर्वा
चमकोगिरीचा मंत्रच फिट्ट
मोदी मोदी भजन करत
अंध भक्त पिटतात टाळ्या
ब्रेन वॉशिंग करून करून
प्रचाराच्या लाटतात पोळ्या
—– —–
अमित शहा
सत्तेसाठी काय करतील
याचा मुळीच नेम नाही
आमचे मोदी त्यातच माहीर
हिटलर, मुसोलिनी बघत राही
‘तुझ्याशिवाय कोणीच नाही
आमचा खरा वारसदास
वारसा आमचा चालवा पुढे
धर्माचेच पाजळून हत्यार’
‘छळ-छावण्या बांधण्याचीही
तुमच्या देशात गरज नाही
त्यापेक्षाही लोक भोगतायत
नरकयातना ठायी ठायी’
—– —–
विरोधी पक्ष
निवडणुका आल्यावरती
मंदिर-मशीद सारे आठवते
महागाईला बाजूला सारून
धर्माचे मग भरते येते
भंपक सारा कारभार पाहून
लोक मते देणार नाहीत
याची खात्री पटते तेव्हा
देश लोटतात धर्म खाईत
लोक लक्षात ठेवून आहेत
कशा मारल्यात तुम्ही थापा
त्याचे उट्टे नक्की काढतील
यांना सुबुद्धी दे रे बाप्पा
—– —–
देवेंद्र फडणवीस
मी पुन्हा येईपर्यंत
घसा माझा सुकून जाईल
भीती फक्त एकच वाटते
आवाज एकदम गायब होईल
नेहमी सारखा बोलत असतो
लोक म्हणतात तोंडफाट्या
बेंबीचा देठ पाहायला हवा
पिचल्या वाटते त्याच्या तोट्या
ती किती सुंदर गाते
कान्स पाहायला फ्रान्सला गेली
मीच इथे कोकलत बसलो
हीरो होण्याची संधी हुकली