कार्टूनिस्ट कंबाईनची स्थापना १९८३ साली झाली. शिवसेना भवन, दादर, मुंबईला त्यावेळी महाराष्ट्रात मोजकेच अगदी हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतकेच व्यंगचित्रकार होते. बहुतेक व्यंगचित्रकार त्यावेळी पन्नाशीच्या पुढचे म्हणजे ज्येष्ठ म्हणता येतील असे होते. त्याचं कामही जबरदस्त. प्रभाशंकर कवडी, द. अ. बंडमंत्री, बाळ राणे, मोहन रेळे, बोरगांवकर, प्रभाकर ठोकळ अशी अनेक निवडक दर्जेदार व्यंगचित्रे काढणारी नावे. त्यावेळी संमेलनात तरूण आणि पुढे-पुढे करणारे व्यंगचित्रकार म्हणजे मी, विवेक मेहेत्रे, सुरेश क्षीरसागर, खलील खान, इ. त्या संमेलनात माझी आणि विवेक मेहेत्रेशी मैत्री झाली. आम्ही जवळपास समवयस्क, दोघेही २०-२२ वर्षांचे होते. त्याआधी विकास सबनीस मला दादरला `आस्वाद’ हॉटेलजवळ भेटले होते. त्यांनी सांगितले की आम्ही दादरला एक व्यंगचित्रकार मेळावा घेत आहोत, तू ये. त्याप्रमाणे मी नेहमीप्रमाणे वेळेच्या अगोदर गेलो होतो.
विवेक मेहेत्रेने मला ज्येष्ठ व्यंगचित्रकारांना टॅक्सीने घेऊन यायला सांगितले. मी ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत हळबे यांच्या दादरच्या घरी गेलो. ते चित्रकथा रेखाटत होते- टिंकल कॉमिक्ससाठी. ती ते कशी रेखाटतात, ते त्यांनी मला दाखविले. म्हणाले, `बस. मी जरा तयारी करतो.’ त्यांची वन रूम किचन होती. त्यांना बहुतेक तीन मुली. त्याही सुंदर. त्यामुळे माझा वेळ तसा चांगला गेला. त्यांना टॅक्सीने घेऊन सेनाभवनात आलो. मुलींनाही टॅक्सीत बसायला सांगत होतो. पण त्या म्हणाल्या `जागा पुरणार नाही. आम्ही चालत येतो.’ त्यामुळे हळबेंना शिवसेना भवनात आणले आणि दुसर्या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराला आणण्याच्या मोहीमेवर निघालो.
त्या निमित्ताने विवेक मेहेत्रे आणि मी जवळ आलो. दर रविवारी आम्ही दादरला भेटत असू. चौपाटीवरची भेळ खात असू आणि कार्टूनिस्ट कंबाइन ही नव्याने स्थापन झालेली संस्था कशी पुढे नेता येईल याविषयी चर्चा करीत असू. एक दिवस पुण्याला पूनम हॉटेलात एक दिवसाचा व्यंगचित्रकार मेळावा घेण्याचे ठरले. मी, विवेक, क्षीरसागर पुण्याला गेलो. त्यावेळी बाहेरून आलेल्या व्यंगचित्रकारांची, स्थानिक व्यंगचित्रकार आपल्या घरी सोय करीत असत. आम्ही तिघे हरिश्चंद लचके यांच्या एरंडवणा येथील `मंदाकिनी’ बंगल्यात राहिलो. त्यांनी आमची उत्तम बडदास्त ठेवली. एवढंच नव्हे, तर त्यांच्या उच्चशिक्षित मुलाने आम्हाला प्रत्येकाला एकेक करीत पूनम हॉटेलवर सोडले.
त्यानंतर एकदा विकास सबनीस अध्यक्ष असताना म्हणाले, `हरिश्चंद्र लचके यांना ७५ वर्षे झालीत. त्यांचा आपण तिकडे जाऊन सत्कार करू या. त्याप्रमाणे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार गवाणकर, विकास सबनीस आणि मी लचकेंच्या बंगल्यावर गेलो. पण तिथे बंगला दिसेना. तिथे मोठ्ठा टॉवर झाला होता आणि एका भव्य मजल्यावर लचके राहात. त्यांच्या भव्य हॉलमध्ये आम्ही तिघांनी सत्कार केला. तेव्हाही त्यांनी आमचं लक्षात राहील असं आतिथ्य केलं.
`मार्मिक’च्या पहिल्या अंकाचं प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते म्हणाले होते, `आम्ही हरिश्चंद्र लचके यांची व्यंगचित्रे पाहात मोठे झालो.’ इतका मोठा व्यंगचित्रकार. लचके कुर्डुवाडीच्या भूम गावातले. १९२१ साली, म्हणजे १०१ वर्षांपूर्वी त्यांचा जन्म झाला. गेल्या वर्षी त्यांची जन्मशताब्दी झाली. पण कोरोनाकाळामुळे ती त्यांच्या योग्यतेला साजेशा पद्धतीने साजरी करता आली नाही, याची खंत आहे. लचके लहान होते, तेव्हा आपल्याकडे नियतकालिके फार नव्हती. त्यामुळे रद्दीही इंग्लंडमधून म्हणजे परदेशातून यायची. त्या रद्दीत व्यंगचित्रे असलेली पाने लचके पाहात. त्यातून त्यांना व्यंगचित्रांची आवड निर्माण झाली. घरची परिस्थिती बेताची. आई हातमागावर नोकरी करून घर चालवत असे. त्या कठीण परिस्थितीत लचके यांनी व्यंगचित्र कलेचं वेड कमी होऊ दिलं नाही. व्यंगचित्रे पाठवता-पाठवता अखेरीस `किर्लोस्कर’ मासिकात त्यांचे एक व्यंगचित्र प्रसिद्ध झाले. शं. वा. किर्लोस्कर हे महाराष्ट्राचे आद्य व्यंगचित्रकार, त्यांचे प्रोत्साहन त्यांना मिळाले. १९४३मध्ये त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून जी. डी. आर्टचा कोर्स पूर्ण केला. सुरुवातीला त्यांना औध संस्थानातील कोट्याळकर आणि पुरम या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.
`उद्यम’ मासिकाने त्यांची अनेक व्यंगचित्रे छापली. त्यानंतर हंस, मोहिनी अशा अनेक मासिकांतून त्यांची दर्जेदार व्यंगचित्रे छापून यायला लागली. सुरुवातीला त्यांनी राजकीय व्यंगचित्रेही काढली. १७ ऑगस्ट १९४५ला त्यांचे राजकीय व्यंगचित्र टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर छापून आलं होतं.
`हसा आणि लठ्ठ व्हा’, `गुदगुल्या’, `हसा मुलांनो हसा’, `हसा आणि हसवा’ असे त्याचे व्यंगचित्र संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी काही वर्षापूर्वी व्यंगचित्रपट बनविण्याचा प्रयत्न केला होता. तो आर्थिकदृष्ट्या यशस्वी झाला नाही. पण फिल्म्स डिव्हिजनशी संपर्क साधून व्यंगचित्रांचे फिल्म युुुनिट, अॅनिमेशनपट युनिट चालू करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांची अनेक व्यंगचित्रे काळाच्या कसोटीवर उतरली आहेत, आजही ती पाहिल्यावर चेहर्यावर हसू फुलतं, त्यांची कल्पना रसिकांची दाद घेते. व्यंगचित्रकाराचा याहून मोठा सन्मान कोणता?