लाज किंवा शरम ही एक मानवी भावना आहे. एखाद्या देखण्या कोंबडीला पाहून कोंबड्याने बांग ठोकली, तर कोंबडी लाजून पळाल्याचे ऐकिवात नाही. पोट भरलेले असताना गंमती गंमतीत एखादे हरीण ठार मारले, याची शरम वाटून एखादा वाघ, सिंह किंवा कोल्हा शरमेने काळाठिक्कर पडल्याचेही कोणी पाहिलेले नाही. निसर्गात खोटे जगणे नाही, त्यामुळे त्याची लाज नाही. लाज वाटण्यासारखी कामे माणूसच करतो आणि माणसालाच- तेवढे मोठे मन आणि संवेदनशीलता शिल्लक असेल तर- हातून घडलेल्या अपकृत्यांची लाज वाटते. माणूस चारचौघांत भले काहीही बोलो, कितीही छाती पुढे काढून चालो, मनातल्या मनात तो काही गोष्टींबद्दल तरी शरमिंदा असतोच. कारण, चूक करणे हाही मानवी स्वभाव आहे. जो काही काम करतो, तो चुकतो; जो काही कामच करत नाही, त्याच्याकडून चूक होणे संभवतच नाही, त्याला कशाची शरमही वाटत नाही. ज्यांना आपण पृथ्वीवर आलेले देवाचे अवतार समजतो, अशा महामानवांच्या हातूनही हिमालयाएवढ्या चुका घडलेल्या आहेत आणि त्यांची शरम वाटल्याने त्यांनी क्षमायाचना आणि शोकही केल्याचे दिसते. त्याने केवळ मन हलके होत नाही, तर त्या चुकांपासून शिकून पुढे त्यांची पुनरावृत्ती टाळता येते. आपले काही चुकले आहे, हेच ज्यांना मान्य नसते, त्यांच्यात काही सुधारणा होण्याची शक्यता नसते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीला २६ मे रोजी आठ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने केलेल्या भाषणात आपल्या कार्यकाळात आपल्याला शरम वाटावी असे आपल्या सरकारच्या हातून काहीच घडले नाही, असे ते म्हणाले. आपल्या सरकारने सगळ्या योजनांचे १०० टक्के लाभ लोकांपर्यंत पोहोचवले, असाही त्यांनी दावा केला. गांधी आणि पटेलांच्या स्वप्नातला भारत आपण घडवतो आहोत, असेही त्यांनी सांगितले. हे वाचून, पंतप्रधान ज्यांना फॉलो करतात, ते समाजमाध्यमांवरचे हिंस्त्र, विखारी, विकृत ट्रोलसुद्धा चमकले असतील. मोदींना थेट दैवी अवतारच मानणारे काही अपवाद वगळता त्यांच्या समर्थकांनाही हे वाचून धक्का बसला असेल.
विज्ञानातही १०० टक्के अचूकता सहसा मानली जात नाही. ९९.९९ टक्के असा शब्दप्रयोग केला जातो. कारण, ०.०००१ टक्क्यांची का होईना गडबड होण्याची शक्यता त्या काटेकोर शास्त्रातही असते. इथे मोदी हे अवतारी पुरुष असल्याने जे काही करतात ते १०० टक्केच करतात, हा विनोद आहे. त्याचबरोबर त्यांनी गांधी-पटेलांचा(च) उल्लेख करणे हे कोतेपणाचे दर्शन घडवणारे आहे. आधुनिक भारत घडवण्यात गांधी-नेहरू-पटेल या त्रिमूर्तीने एकत्रितपणे केलेले काम आहे. ब्रह्मा आणि महेश यांचाच उल्लेख करायचा, विष्णूचा उल्लेख करायचाच नाही, अशातला हा प्रकार. मोदींनी नेहरूंच्या पुण्यतिथीला त्यांना अभिवादन करणेही टाळले. यातून नेहरूंच्या उत्तुंगतेला बाधा येत नाही; नेहरूगंडाने पछाडलेल्या मोदींचा खुजेपणा अधिक दिसून येतो.
मोदी यांच्या कार्यकाळात लाजिरवाणे काय काय घडले याची यादी फार मोठी आहे. कोणालाही विश्वासात न घेता लादलेली आणि संपूर्णपणे फसलेली नोटबंदी, अतिशय चुकीच्या पद्धतीने आणलेली जीएसटी प्रणाली, हम करे सो कायदा या पद्धतीने रेटलेले सीएए आणि एनआरसीसारखे कायदे, जमीनधारणा आणि कृषी कायद्यांच्या माध्यमातून राज्य सरकारांच्या अधिकारांवर अतिक्रमण करण्याचे प्रयत्न, राजकीय इव्हेंटबाजीसाठी आणि मध्य प्रदेशातले सरकार पाडण्यासाठी कोरोना संकटाची दखलच न घेणे, नंतर पुन्हा कुणाला विश्वासात न घेता, घाईने लादलेली अशास्त्रीय टाळेबंदी, कोरोना संकटाची बेजबाबदार हाताळणी, कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर स्वत:ची (परदेशात भारतीयांचे हसे करणारी) प्रच्छन्न जाहिरातबाजी, निवडणुकीच्या तोंडावर घडून आलेले रहस्यमय पुलवामा हत्याकांड, चीनने आक्रमण करून बळकावलेला प्रदेश, गॅस आणि इंधनाचे दर वाढवून अर्थव्यवस्थेला लावलेली घरघर, शिगेला पोहोचलेली महागाई, असे अनेक लाजिरवाणे मुद्दे सहज आठवतील.
जपानमध्ये झालेल्या क्वाडच्या बैठकीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सर्वांसमक्ष सपशेल दुर्लक्ष केल्याने दुर्मुखून सर्वांच्या पुढे चालणार्या पंतप्रधानांची छबी पाहून त्यांच्या भाबड्या भक्तजनांना जगाचे नेतृत्त्वच मोदी करत आहेत, असा साक्षात्कार झाला; पण हे खरे आहे काय? कोणत्याही देशाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय विकास मोजणार्या सगळ्याच निर्देशांकांवर आपला देश आठ वर्षांपूर्वी होता, त्याच्या तुलनेत किती तरी मागे पडला आहे, ही वस्तुस्थिती आहे, ती लाजिरवाणी नाही? विश्वगुरू मोदींच्या काळात आपल्या पासपोर्टची ८२व्या स्थानावरून ९०व्या स्थानावर घसरण झाली आहे आणि अत्यंत नगण्य देशांच्या पंक्तीत आपण आहोत, हे लाजिरवाणे नाही? मोदी यांच्या सतत समाजात दुही माजवण्याच्या, फूट पाडण्याच्या, मंदिर-मशीद वादांमध्ये देशाला अडकवून ठेवण्याच्या नीतीमुळे सामाजिक सौहार्दाच्या बाबतीत आपण तळ गाठलेला आहे आणि काही निरीक्षकांच्या मते जिथे वांशिक हत्याकांड होऊ शकते, अशा देशांपैकी एक बनलो आहोत, हा मोठा सन्मान आहे का?
या टप्प्यावरून देश खरोखरच पुढे न्यायचा असेल, तर तो मुळात मागे पडलेला आहे, हे मान्य करायला हवे आणि त्याला सर्वस्वी आपण जबाबदार आहोत, हेही मोदींनी स्वीकारायला हवे. आपल्याकडून शरम वाटावे असे काहीच झाले नाही, असे मोदी यांना वाटत असेल, तर त्यांच्याकडून घडलेल्या हिमालयाएवढ्या चुका दुरुस्त होण्याची सुतराम शक्यता नाही.
हे लक्षात घेऊन आता भारतीय मतदारांनी २०२४ साली राम मंदिर, काशी-मथुरा, भोंगा, हिंदू-मुस्लिम दंगली वगैरे ‘भूलभुलय्या पार्ट टू’मध्ये न अडकता आपली दहा वर्षांपूर्वीची चूक दुरुस्त करावी लागेल. तेवढाच उपाय आहे.