बदल कायमच होत असतात. बदलामध्ये नावीन्याचे आकर्षण खूप महत्त्वाचे ठरते. काही बदल काही काळाने विसरले जातात. पण काही मात्र संपूर्णपणे समाजाचे स्वास्थ्य ढवळून काढणारे ठरतात. अशा बदलांच्या संदर्भात शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? हा गेले ५० वर्षे अनेकांना छळणारा विषय. इंग्रजी येत नाही हा न्यूनगंड. इंग्रजी माध्यमामधून शिकले म्हणजे सारे काही छान असते ही त्यातूनच निर्माण झालेली एक भ्रामक समजूत. इंग्रजीला वाघिणीचे दूध असे समजून वाघिणीच्या शोधात हिंडणारे सगळेच. पण, गावाकडच्या शेळीचे दूध सुद्धा तितकेच पौष्टिक असते, हे मात्र आपण सारेच विसरलेलो.
१९७०च्या दशकामध्ये हे सारे बदल प्रकर्षाने दिसायला लागले. शास्त्र व गणित इंग्रजी माध्यमातून शिकवायचे, हे एक सेमी इंग्लिश नावाचे खूळ सुरू झाले. नामवंत शाळांमध्ये सुद्धा हुशार मुलांच्या तुकडीला सेमी इंग्लिशची तुकडी समजून वेगळी काढून देणे असे हे खूळ वाढत गेले. यानंतरची सुरुवात म्हणजे इंग्रजी माध्यमाच्याच शाळा. बुटाची लेसपण न बांधता येणार्या लहानग्याला टाय लावून शाळेत जाताना पाहून आईबापांचे मन कसे भरून येई.असे वातावरण आता गेली वीस वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात मोबाईलच्या वेडाप्रमाणे पसरले आहे.
मराठी माध्यमात घातले म्हणजे आईबापाची ऐपत नाही असे समजले जाण्याचा काळ सुरू झालेला असताना निनादला त्याच्या आई-वडिलांनी आवर्जून पुण्यातील एका मराठी माध्यमाच्या साध्या शाळेत घातले. शाळेचे नाव सुद्धा अस्सल मराठी, गोपाळ हायस्कूल. खरे तर वडिलांची ऐपत इतकी उत्तम होती की मुलाला वाटले तर इंटरनॅशनल किंवा कॉन्व्हेंट शाळेत सुद्धा सहज घालता आले असते. पण मराठीतून शिक्षण झाल्यावर सर्व तांत्रिकी गोष्टींमधील मूलभूत संकल्पना छान येतात, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. ते स्वतः मरीन इंजिनियर होते. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या अर्ध्या कच्च्या इंजिनीयरांचे ज्ञान पाहून त्यांना कायमच मनस्ताप होत असे. त्याहीपेक्षा गमतीची गोष्ट म्हणजे कामातील चुका इंग्रजीतून समजावून सांगायला लागले तर त्या मुलांना इंग्रजीही धड येत नसे. मुलाला मराठी माध्यमात घातले या विषयावर त्यांची भरपूर टिंगल त्यांच्या सधन, सुशिक्षित, मोठमोठ्या कंपनीत नोकर्या करणार्या मित्रांनी केली. स्वतःच्या मतावर ते ठाम होते व त्यांच्या पत्नीने सुद्धा त्यांना तितकीच साथ दिली. एक गोष्ट मात्र त्यांनी केली, ती म्हणजे निनादला विचारले, ‘तुला ही शाळा आवडेल का? चालेल का? मराठीतून शिकताना आनंद वाटेल का?’ निनादचे उत्तर सर्व बाजूंनी होकारार्थी आल्यावरच त्यांनी हा निर्णय घेतला होता.
निनाद तसा जात्याच चुणचुणीत. वाचनाची पण खूप आवड. मुख्य म्हणजे अभ्यास स्वतः आवडीने करणारा विद्यार्थी. तितकाच चौकस. हिंदी, संस्कृत, इंग्रजी, आणि अर्थातच मराठी या सगळ्या भाषांमध्ये त्याची सारखीच प्रगती इयत्ता पाचवीपासून दिसू लागली. शास्त्र व गणित हेही आवडीचे विषय होतेच. फार उत्तम मार्क नसले तरी शाळेत कधीही पहिल्या पाच नंबरच्या खाली निनादचा नंबर घसरला नाही. नोकरीनिमित्त वडील सात आठ महिने तरी पुण्याच्या किंवा देशाच्या बाहेर बोटीवर असायचे. अभ्यासाकरता कधीही क्लास न लावता स्व-अभ्यासातून त्याची प्रगती छान चालू होती. आठवी नववीपासून इंग्रजी वाचनाचे त्याचे वेडही वाढू लागले. मराठी अवांतर वाचन चौफेर होतेच. त्याला इतिहास व भूगोल या विषयातील इंग्रजीतील पुस्तकांची जोड मिळाली. अशी छान छान पुस्तके वडील दर वेळेला परदेशातून घेऊन येत असल्याने जगाची माहिती वाचून त्याचे सर्वांगीण आकलन वाढत होते. छानशा मार्काने त्याची दहावी संपली. अकरावी बारावी शास्त्र शाखा घेऊन त्याने पूर्ण केली. पण ती करत असतानाच त्याच्यावर अवांतर वाचनाचा सखोल परिणाम झाला होता. इंजिनीयर किंवा मेडिकल अशा स्वरूपाचे तांत्रिकी शिक्षण घ्यायचे का शास्त्र विषयातील मूलभूत शिक्षणाकडे वळायचे, याबद्दल त्याची द्विधा मन:स्थिती होती. वडिलांबरोबर मोकळेपणे चर्चा करताना त्यांनी एक छान उपाय योजला. त्यांचे एक मित्र शास्त्रज्ञ म्हणून नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये काम करत होते. त्यांची व निनादची भेट घालून दिली. त्या भेटीनंतर मात्र निनादचे सगळेच विचार झपाट्याने बदलत गेले. तांत्रिकी कामात अडकवायचे नाही हे त्याने पक्के ठरवले आणि बारावीला उत्तम मार्क मिळून सुद्धा त्याने बीएससीला प्रवेश घेतला.
देश पुढे कसा जातो?
इतिहास व भूगोलाचे वाचन करत असताना निनादच्या मनात सातत्याने एक प्रश्न पडत होता. जर्मनी हा एक छोटासा देश. जेमतेम महाराष्ट्राएवढा असून अनेक प्रकारच्या उत्पादनांमध्ये, संशोधनामध्ये, एवढेच काय नामवंत संशोधक व शास्त्रज्ञ तयार करण्याच्या संख्येमध्ये अन्य सार्यांना मागे कसा काय टाकतो? एवढेच नव्हे तर अमेरिकेतील अनेक नामवंत शास्त्रज्ञ हे मूळचे जर्मनच होते. महायुद्धानंतर त्यांना अमेरिकेमध्ये उचलून नेण्यात आले किंवा त्यांनी आसरा घेतला म्हणून अमेरिकेची समृद्धी वाढत गेली. अशा माहितीमुळे जर्मनीबद्दलची निनादची उत्सुकता वाढत गेली. त्या उत्सुकतेला खतपाणी घालण्यासाठी म्हणून त्याने जर्मन भाषा शिकायला सुरुवात केली. पदवी हाती येईपर्यंत त्याच्या जर्मन भाषेतील बहुतेक पातळ्या चांगल्या मार्काने पूर्ण झाल्या होत्या. मुंबईतील एका नामवंत संस्थेमध्ये केमिस्ट्री या विषयात पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी निनादने प्रवेश मिळवला. तिथे तो उत्तम मार्कांनी चमकला. बहुतेक प्राध्यापकांनी त्याला डॉक्टरेट करण्यासाठी अमेरिकेला कधी जाणार असा प्रश्न विचारला. तो काळ डॉक्टरेट करण्यासाठी अमेरिकेला सहजपणे जाण्याचा होता व आजही आहे. मुख्य म्हणजे अमेरिकेत स्थायिक होण्याची ती एक सहज संधी होती. पुण्या-मुंबईचीच नव्हे तर भारतातील ९५ टक्के मुलेमुली अमेरिकेचा रस्ता धरत होती. मास्टर्स किंवा डॉक्टरेट करायचे व अमेरिकेत नोकरी करता स्थायिक व्हायचे हा रस्ता आज रुळलेलाच आहे. या सार्यांना धक्का देणारा निर्णय निनादने त्यांना सांगितला.
अमेरिकेतील डॉक्टरेटसाठीचा खर्च सुमारे २५ लाख रुपये होता. शिवाय जाणेयेणे, राहणे हा वेगळाच. याउलट फक्त जाणेयेणे व राहणे हा खर्च करून जर्मनीमध्ये त्याला डॉक्टरेट मिळणार होती. सुमारे साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या एका नामवंत जर्मन विद्यापीठात निनादला त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहून सहज प्रवेश मिळाला. वडिलांचे जग फिरून झाले असल्यामुळे त्यांना निनादचा हा निर्णय अजिबातच अनपेक्षित नव्हता. जर्मनीतील विविध बंदरांवर त्यांच्या कामानिमित्त फेर्या झालेल्या होत्या. मात्र या निर्णयाची पुन्हा एकदा त्यांच्या सर्व मित्रांकडून हेटाळणीच्या सुरात टिंगल झाली. मुलाला आयटीमध्ये घातले नाही, इंजिनियर बनवले नाही व आता अमेरिकेलाही पाठवत नाही हा एक सगळ्यांनाच न कळणारा विषय होता. मात्र निनादच्या या निर्णयाला त्याच्या प्राध्यापकांनी मात्र पाठिंबा दिला. जर्मनीतील विविध स्वरूपाच्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये चाललेल्या अवाढव्य उलाढालीची त्यांना पूर्ण कल्पना होती. जगडव्याळ स्वरूपाच्या या कंपन्यांबद्दल फारसे न ऐकलेले निनादचे मित्र सुद्धा या निर्णयाने चकित झालेले होते. यानंतरचा मोठा काळ निनाद काय करतो आहे, कुठे आहे, यापेक्षा तो जर्मनीत गायब झाला आहे,
एवढेच वाटावे असा होता. कारण पाच वर्ष पीएचडीची सतत अभ्यासात बुडून जाण्याची, त्यानंतरची दोन वर्षे पोस्ट डॉक्टरल कामाची म्हणजेच एका जागतिक दर्जाच्या नामवंत कंपनीत उमेदवारी करतानाची होती. तब्बल सात वर्षांनंतर निनादला जिथे उमेदवारी चालू होती, त्या कंपनीने शास्त्रज्ञ म्हणून त्यांच्या रिसर्च डिपार्टमेंटमध्ये दाखल करून घेतले. या दरम्यान जर्मन भाषेवर त्याचे उत्तम प्रभुत्व प्रस्थापित झालेले होते. शिक्षण इंग्रजीतून चालू असले तरी जर्मनचा अभ्यास व वापर करणे त्याने कधीच थांबवले नव्हते. त्याचा महत्त्वाचा फायदा त्याला असा झाला की कंपनीमध्ये नोकरी सुरू झाल्यानंतर कोणत्याही चर्चेमध्ये, सेमिनारमध्ये भाग घेताना सर्व जर्मन सहकार्यांच्या बरोबर तो सहज संभाषण करू शकत असे.
निनादचे लग्न करायचे वेध त्याच्या आईला लागले होते. पण जर्मनीत राहणारी मुलगी सहजी मिळत नव्हती. अमेरिकेला एका पायावर जायला तयार असलेल्या अनेक मुली सांगून येत होत्या, पण एकीचीही जर्मनीत जायला तयारी नव्हती. अशातच याच कंपनीच्या मुंबईतील एका प्लांटवर कामानिमित्त निनादला पाठवले गेले. ते काम लांबता लांबता चार वर्षे लांबले. आता लग्नाचा विषय सोपा झाला होता. मुंबईत असताना पहिल्याच वर्षी निनादचे लग्नही छान पार पडले. कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये काम करणार्या एका मुलीशी त्याचे मैत्र जुळले त्याचे रूपांतर विवाहात झाले. संशोधक शास्त्रज्ञ म्हणून काम करत असताना निनादच्या लक्षात आले की कोणत्याही संशोधन प्रकल्पाला मंजुरी देणारी माणसं वेगळीच असतात. तो रस्ता स्वीकारायचा असेल तर एमबीए करण्याला पर्याय नाही. नोकरी सोडून एमबीए करणे शक्यही नव्हते व्यवहाराला धरूनही नव्हते. इथेही पुन्हा जर्मनीच त्याच्या मदतीला आली. काही वर्षे नोकरीचा अनुभव घेतलेल्या कोणालाही एक्झिक्युटिव्ह एमबीए करण्यासाठी जर्मन विद्यापीठात प्रोत्साहन दिले जाते. खर्चही फारसा नसतो. भारतात अशा स्वरूपाच्या अभ्यासक्रमाला १८ ते २० लाख रुपयांचा खर्च येतो. अर्थातच त्याने कंपनीची परवानगी घेऊन एक्झिक्यूटिव एमबीए करायचा निर्णय घेतला.
काम करत शिक्षण
एमबीएसाठी छोटी बॅच, पण सखोल अभ्यासक्रम. रोजचे काम सांभाळत करण्याचे विविध प्रोजेक्टस. दर रविवारी असलेले सेमिनार्स व त्यात करायची प्रेझेंटेशन हा दमवून टाकणारा प्रकार असला, तरी तो शिकण्याची तीव्र इच्छा असलेल्यासाठी सुखद ठरतो. पाहता पाहता कामाचे दडपण व शिकण्याचे नावीन्य हा काळ संपला. मुख्य म्हणजे हा एमबीएचा संपूर्ण कोर्स जर्मन भाषेतून त्याने पूर्ण केला होता. त्याचे त्याच्या कंपनीतील सर्वच लोकांना खूप कौतुक वाटले. इंग्रजी माध्यम घ्यायचे का जर्मन, असे दोन्ही पर्याय उपलब्ध असताना त्याने जर्मनचा निर्णय घेतला होता. ज्या दिवशी पदवी प्रदान समारंभ झाला, त्याच दिवशी त्याच्या कंपनीच्या एका डायरेक्टरने निनादला मुलाखतीसाठी बोलावले. मुंबईत काम चालू असताना ही कुठली मुलाखत? असा त्याला प्रश्न पडला होता. सलग तासभर चाललेल्या गप्पानंतर कंपनीच्या डायरेक्टरने तुला मूळ कंपनीमध्ये येऊन जर्मनीतच स्थायिक व्हायला आवडेल का, असा प्रश्न विचारला. जर्मनीबाहेरच्या देशातील कोणालाही अशा स्वरूपाची ऑफर सहसा दिली जात नाही. वर्क परमिट असा शब्द वापरून नोकरी करण्याची परवानगी मात्र मिळते. अशी अपूर्वाईची संधी त्याच्यापुढे चालत आली. सांगायची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगातील ७२ देशांत या कंपनीची उत्पादने व कामेही चालतात. या सर्वांच्या देखरेखीच्या संदर्भातील काम आता निनादला मिळणार आहे. वेगळी दिशा, वेगळे विचार, आणि शिकण्यातील सातत्य याचे फळ जेमतेम चाळिशीत असलेल्या निनादच्या हाती आले आहे.
तात्पर्य : मराठीतून शिक्षण घेणे हे दुय्यम समजू नये. इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया हे भारतीयांचे आकर्षण असलेले देश सोडून तितक्याच संपन्न जर्मनीमध्ये खूप कमी खर्चात वेगळ्या पद्धतीत शिकायचा रस्ता निवडला, तर निनादसारखे यश मिळू शकते. मुख्य म्हणजे भाषेवर प्रभुत्व असले तर जर्मनीमध्ये शिकण्याचा खर्च जवळपास नसतो. पण हे माहिती करून घेतले तर ना?