□ नारायण राणे यांची दहशत सिंधुदुर्गाने कधीच मोडीत काढली असून यापुढे ती खपवून घेतली जाणार नाही. – आमदार वैभव नाईक
■ तिकडे दिल्लीत नि:शस्त्र शेतकर्यांनी मोदीशहांची दहशतही मोडून काढली, त्यांच्यापुढे इतरांचे काय!
□ लखनऊमधील तरुणींकडून २२ वेळा थप्पड खाणारा कॅबचालक शहादत अली राजकारणात; पुरुषांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणार
■ नाव सार्थ करतोयष्ठ हो बाबा हौसेने शहीद!
□ देशाच्या संविधानाला फॅमिली पार्टीकडून धोका : पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ आधी आपल्या पक्षातल्या वंशपरंपरेने नेते बनलेल्यांना घरी पाठवा, मग बोला. कुटुंबकबिलेवाल्यांना सर्वसामान्य लोकांच्या सुखदु:खांची जरा तरी चाड असते. पंचतारांकित फकीर अधिक घातक.
□ लातूरच्या जिल्हा बँकेतही भारतीय जनता पक्षाचा धुव्वा; काँग्रेसप्रणीत पॅनेलला १९पैकी १८ जागा
■ शिल्लक राहिलेला एकमेव सदस्यही नाराज काँग्रेसीच निघायचा!
□ कर्जबुडव्यांना सोडणार नाही : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा इशारा
■ हा इशारा कोरोनात नोकरीधंदा गमावलेल्या, किरकोळ हप्ते थकवलेल्या सर्वसामान्यांनाच; हजारो कोटींची कर्जं थकवलेल्यांना परदेशांत सुखरूप सोडून येता काय?
□ श्रीरामाच्या घोषणाबाजीबरोबर आपले आचरणही प्रभू रामचंद्राप्रमाणे असायला हवे – सरसंघचालक मोहन भागवत
■ श्रीरामाच्या चरित्रातला आपल्या सोयीचा निवडक भाग वापरून तेवढंच आचरण करणारे महाभाग फार वरच्या पदावर पोहोचले भागवतजी!
□ उस्मानाबाद जिल्ह्यातील एका जोडप्याच्या मुलाचे नाव ‘पंतप्रधान’; पहिल्या मुलाचे नाव ‘राष्ट्रपती’!
■ पद्मश्री जोशीशी लग्न करून तहहयात ‘पद्मश्री’ मिळवणार्या विजय कदमांची आठवण झालीष्ठ आता सगळं मंत्रिमंडळ बनवू नका म्हणजे झालं!
□ वाग्दत्त वधूला अश्लील संदेश पाठवणं म्हणजे विनयभंग नव्हे; सत्र न्यायालयाचे निरीक्षण
■ लग्नाच्या रात्रीसाठी तीन प्रतींत अर्ज करून संमतिपत्र मिळवून ते साक्षांकित करून घ्यायला लागणार बहुतेक अशाने!
□ लस नाही तर दारू नाही- संभाजीनगरात तळीरामांची चिंता वाढली
■ अर्थव्यवस्थेच्या या आधारस्तंभांची- ते स्वखर्चाने रोज थेट आतून सॅनिटाइझ होत असताना- काहीतरी बूज राखली जायला हवी!
□ सातारा जिल्हा बँकेत भाजपचा धुव्वा; महाविकास आघाडीची सरशी
■ विरोधकांची एकजूट हीच भाजपविरोधात वज्रमूठ ठरते, हे पुन्हा स्पष्ट झालं.
□ शीख समुदायाबद्दल आक्षेपार्ह विधानं करणार्या कंगना राणावतविरोधात ठिकठिकाणी गुन्हे
■ लोकांमध्ये फूट पाडण्यासाठीच तिला ‘पद्मश्री’ देण्यात आलेला आहे, त्याचा ‘मान राखते’ आहे ती!
□ आता भाड्याने ट्रेन घेण्याचीही सोय : केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घोषणा
■ उत्तम निर्णय; पेट्रोलडिझेलचे चढे दर पाहता, त्यापेक्षा ट्रेन भाड्याने घेऊन प्रवास करणेच परवडेल यापुढे!
□ निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार मेहेरबान होणार, पेट्रोल डिझेल स्वस्त करणार
■ हे सेलवाल्या बनियांसारखे झाले. १००ची वस्तू आधी ३०० रुपयांना सांगायची आणि मग उदार मनाने सवलत देऊन अडीचशेला गळ्यात मारायची… ये पब्लिक है सब जानती है…
□ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा बनावट व्हिडिओ बनवून प्रसृत केल्याबद्दल संबित पात्रा यांच्यावर गुन्हा दाखल
■ खोटेपणाला, अपप्रचाराला खरोखरच शासन होत असते तर भाजपचा आयटी सेल, अमित मालवीय यांच्यासकट सगळा तुरुंगात खडी फोडताना दिसला असता!
□ संसाराची झूल नको, पण मूल हवे! नाशिकमध्ये आठ महिलांनी मुलं दत्तक घेऊन एकल पालकत्व स्वीकारलं..
■ अनाथ मुलांना पालक मिळणं महत्त्वाचं. लग्नं करून मुलं जन्माला न घालणारेही लोक आहेतच की!
□ समाजमाध्यमांमधल्या हनी ट्रॅपपासून सावधान; मुलगी असल्याची बतावणी करून पुरुषांना लुबाडण्याचे प्रकार वाढीला लागले…
■ सुंदर मुखड्याचा डीपी दिसला की ‘छान दिसता तुम्ही’, ‘जेवण झालं का’ वगैरे गूळ पाडायला जाणार्यांना धडा मिळायलाच हवा!
□ क्रोएशियामधल्या स्त्रीने पतीला घटस्फोट देऊन पाळीव कुत्र्याशी लग्न केले
■ तो अधिक इमानदार आणि एकनिष्ठ निघेल यात शंका नाही.
□ फसव्या जाहिराती करणार्या सौंदर्य प्रसाधन कंपन्यांवर कारवाई
■ पण मुळात सौंदर्य प्रसाधन हीच सौंदर्याची फसवी जाहिरात नाही का?