दिमाखदार रूपातील आकर्षक अंक
साप्ताहिक ‘मार्मिक’चा अंक आता दिमाखदार रूपात निघतो ते पाहून आनंद वाटतो. यंदाचा दिवाळी अंकही आकर्षक झाला आहे. तो विकत घेऊन वाचला. त्यात जवळपास सर्वच लेख आवडले यात शंका नाही, परंतु त्यातही वात्रटायन (श्रीकांत आंब्रे), हास्यझुळूक (प्रभाकर झळके), काक फेस्टिवल (पुरुषोत्तम बेर्डे), वार्षिक भविष्य (प्रशांत रामलिंग), सहृदय बाळासाहेब (ज्ञानेश सोनार) आणि संघर्षाचा प्रवास (सचिन परब) हे लेख तर अतिशय उत्तम झाले आहेत.
– अशोक परब, ठाणे
गेले द्यायचे राहून…
साप्ताहिक ‘मार्मिक’ अंकाचा मी नियमित वाचक आहे. त्यामुळे या अंकातील छोटीशी चूकही खटकते. १६ ऑक्टोबरच्या अंकामधील कोडंकौतुक क्र. ४७चे उत्तर द्यायचे राहून गेले आहे. या ४७ क्रमांकाच्या कोड्याचे उत्तर २० नोव्हेंबरच्या अंकात देण्यात आले आहे. कोडंकौतुक क्र. ४७मध्ये आलेले उत्तर वास्तविक दिवाळी अंकात येणे अपेक्षित होते. योग्य ती दखल घ्यावी ही अपेक्षा.
– दिलीप तटकर, पुणे
(उत्तर छापले आहेच… क्रमांक चुकला दिलीपजी, आपण चूक निदर्शनास आणून दिलीत त्याबद्दल धन्यवाद. मात्र कोड्याचे उत्तर बरोबर देण्यात आले आहे. क्रमांकामध्ये गफलत झाली आहे. त्याबद्दल दिलगीर आहोत. पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घेतली जाईल. – कार्यकारी संपादक)
प्रभावी आणि अभ्यासपूर्ण लेख
‘जय किसान’ हा संतोष देशपांडे यांचा लेख वाचला. अतिशय सुरेख व अभ्यासपूर्ण लेख आहे… लेखकाने शेती कायद्यांसंदर्भात विविध महत्त्वाच्या मुद्दयांचा अतिशय मोजक्या शब्दांत पण प्रभावी पद्धतीने समाचार घेतलेला आहे.
भारतासारख्या महाकाय देशात प्रत्येक प्रांतात शेतीच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, तिथे तीन सपक कायद्यांची मात्रा कशी चालणार?
फडणवीसांची समिती माहीत नव्हती… आणि समितीच बनवायची होती तर विविध तज्ञांची हवी होती…
तसे आपल्याला प्रत्येक क्षेत्रात ‘संशोधन व विकास’ बळकट करणे महत्त्वाचे आहे. किती दिवस आयात केलेल्या तंत्रज्ञानावर जगणार? शेतीतसुद्धा खूप संशोधनाची गरज आहे. अवर्षण तसेच महापूर दोन्हीतही तगणारे वाण आणि अशा बर्याच विषयांवर संशोधन हवे. परदेशी कंपन्यांनी संशोधन करायचे व आपण वाट्टेल तेवढा पैसा खर्च करून त्यांचे उत्पादन घ्यायचे यासारखे लाजिरवाणे नाही.
आपल्याकडील कृषी विद्यापीठे सध्या फक्त वर्ग १ व वर्ग २ अधिकारी निर्माण करण्याची कारखाने आहेत. यावर विचार व्हायला हवा….
– संदीप मराठे, बेलापूर, नवी मुंबई
संयमित चपराक ओढणारा लेख
‘जय किसान’ हा संतोष देशपांडे यांचा लेख अतिशय सुरेख होता. लेखातील अनेक ठिकाणं लक्षात राहतील अशी आहेत. सणसणीत चपराक पण ती संयमित भाषेत ओढणारा हा लेख आहे. सवंगता व शिवराळपणा टाळला आहे, ते विशेष आवडले.
– प्रा. संजीव बोंडे, सातारा
——————–
‘रिंगण’ अंकातर्फे वक्तृत्व स्पर्धा
संतविचारांचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या ‘रिंगण’ या वार्षिक अंकाने यंदा दहाव्या वर्षाच्या निमित्ताने एका वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. संतविचारांचा जागर तरुणांपर्यंत पोहोचावा यासाठी रविवार १९ डिसेंबर रोजी ही राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. अमृतनाथ स्वामी महाराज संस्था, चाकण चौक, आळंदी देवाची, पुणे येथे होणार्या या स्पर्धेत १) संत नामदेव : ग्लोबलही, लोकलही २) ज्ञानेश्वरी : माझ्या नजरेतून ३) ऐसे कैसे झाले भोंदू ४) धर्म तेथ विवेका, असणे की जे ५) रिंगण : आपल्या मुळांचा शोध या पाच विषयांचा समावेश असून विजेत्याला पहिले पारितोषिक ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. बक्षिसांमध्ये दुसरे ९ हजार, तिसरे ७ हजार, चौथे ५ हजार आणि पाचवे ३ हजार रुपये यांचा समावेश आहे. प्रवेशासाठी १५ ते ३० वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आली असून प्रवेशशुल्क ५० रुपये आहे. नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी प्रवीण शिंदे (८४४६६९५४३४) यांच्याशी संपर्क साधावा असे ‘रिंगण’चे संपादक सचिन परब यांनी कळवले आहे. ‘रिंगण’ हा वार्षिक अंक दरवर्षी एका संताविषयी समग्र माहिती एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. हा अंक २०१२पासून प्रत्येक आषाढी एकादशीला प्रकाशित होतो.