‘नक्की होते तरी काय पाहू’ असा विचार करून जानकीदास तीच मोहोर घेऊन अमावस्येच्या दिवशी गढीत पोचला. कुठलाही यज्ञ नाही, हळदी-कुंकवाचे रिंगण नाही, पूजाविधी देखील नाही.. त्याला फार आश्चर्य वाटले. अश्वत्थ देखील साधासा कुडता पायजमा घालून आला होता. त्याने काही मंत्र पुटपुटले आणि जानकीदासला आणलेले सोने हवेत उडवायला सांगितले. जानकीदासने देखील एखादी गंमत बघतोय अशा थाटात, हातातील मोहोर वरच्या दिशेने उधळली आणि काही सेकंदात दोन मोहोरा त्याच्या पायापाशी येऊन कोसळल्या.’
—-
समोर बसलेल्या चाळिशीतल्या दोन इसमांकडे इन्स्पेक्टर राघव शांतपणे बघत बसला होता. त्या दोघांची कथा ऐकून इन्स्पेक्टर राघवच काय, पण चौकीतल्या इतरांनाही हसावे का रडावे ते कळेनासे झाले होते. खरेतर त्या दोघांनी सांगितलेली कथा तशी काही फार अशक्य कोटीतली किंवा अद्भुतरम्य वगैरे नव्हती. अशा केसेस यापूर्वी देखील पोलिसांनी खूपदा हाताळलेल्या होत्या. मात्र त्या केसेसच्या वेळी फसवलेले गेलेले, नाडले गेलेले मध्यमवर्गीय नोकरदार किंवा आर्थिक अडचणीत सापडलेले सामान्य नागरिक होते. यावेळी मात्र चक्क दोन सोनारांनाच गंडा पडला होता आणि तोही सोन्याच्या पावसाच्या आमिषाने!
‘मिस्टर जयराम, तुम्ही जरा वेळ बाहेर बसता का? मी तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा आत बोलावतो,’ राघवने अत्यंत मार्दवयुक्त स्वरात म्हटले आणि जयराम उठून बाहेरच्या बाकड्याकडे निघून गेला.
‘हां तर सावळाशेठ, आता तुम्ही एकट्याने पुन्हा एकदा घडलेली कथा सांगा. मघाशी तुम्ही दोघे बोलत असताना, माझे लक्ष काही काही मुद्द्यांकडे नीट जाऊ शकले नाही असे मला वाटते आहे.’
‘काय सांगू साहेब… मी स्वत: एक सोनार आहे, पण कसा काय या दुष्टचक्रात अडकलो, ते माझे मला देखील समजले नाही. भानावर आलो तोवर वेळ गेलेली होती आणि धुपाटणे पण राहिले नव्हते.’
‘हे घ्या पाणी घ्या… आणि शांतपणे सगळा घटनाक्रम पहिल्यापासून सांगा. नीट आठवून, तुम्हाला हवा तितका वेळ घेऊन सांगितले तरी चालेल. शक्यतो एकही लहान सहान बारकावा देखील सोडू नका. जे काही घडले, ते संपूर्ण घडले तसे सांगा. त्यातले काय महत्त्वाचे आहे, काय महत्त्वाचे नाही आहे ते पोलिसांवर सोडा.’
‘महिन्याभरापूर्वीची गोष्ट आहे साहेब, एक चांगल्या घरातला साठी-सत्तरीचा म्हातारा संध्याकाळच्या वेळेस दुकानात आला. मागून आलेल्या त्याच्या ड्रायव्हरने हातात एक काळी ब्रीफकेस पकडली होती. आल्या आल्या मोठ्या भक्तिभावाने त्याने दुकानातल्या लक्ष्मीमातेच्या फोटोला नमस्कार केला. गिर्हाईकाचा आब ओळखून मी स्वत: त्याला सामोरा गेलो. त्याने मलादेखील मोठ्या आदराने नमस्कार केला. मी त्याला आदराने काउंटरसमोरच्या खुर्ची बसवले आणि पोराला पाणी आणायचा हुकूम सोडला.’
‘त्याचा ड्रायव्हर तिथेच थांबला होता?’
‘नाही साहेब, तो माणूस, त्याचे नाव जानकीदास आहे हे मला नंतर कळले; तो बसताच त्याच्याशेजारी बॅग ठेवून ड्रायव्हर बाहेर निघून गेला. त्यानंतर जानकीदासची आणि माझी दोन चार जुजबी गोष्टींवर बोलणी झाली, ओळखपाळख देखील झाली. काही वेळानंतर जानकीदासने इकडे तिकडे बघत, हळूच बॅग उघडली आणि त्यातून एक चमचमते नाणे काढून माझ्या हातावर ठेवले. माझ्या पारखी नजरेने त्याचे तेज आणि वजन बघूनच ते अस्सल सोन्याचे नाणे असल्याचे ओळखले होते. नीट तपासले असता, ती एक सोन्याची मोहोर असल्याचे लक्षात आले. कोणत्याश्या अगम्य भाषेत तिच्यावर काही कोरलेले होते आणि एक सापाचे चित्र देखील होते.’
‘त्याच्याकडे तशी एकच मोहोर होती?’
‘त्याच्या बॅगेच्या झाकणामुळे मला काही कळले नाही साहेब, पण अजून काही असण्याची शक्यता आहे. त्याने तिच्या अस्सलपणाची खात्री पटल्यावर निघण्याची लगबग सुरू केली. मी पण हाडाचा व्यापारी साहेब. मी हळूच प्रश्न टाकला, ‘फक्त तपासायची होती का विकायची पण आहे?’ त्यावर तो जरा संभ्रमात पडल्यासारखा दिसला. नंतर त्याने दबक्या आवाजात विचारले, ‘तुम्ही घ्याल? वडिलोपार्जित आहे शेठ ही. बाकी तिच्या मालकी हक्काचा काही पुरावा नाही माझ्याकडे.’ मला आयतीच संधी चालून आल्यासारखे वाटले. मी म्हणालो, ‘सरकार कडक झाले आहे आता काका. उद्या काही कमी जास्त झाले तर मी आत जायचो.’ त्यावर तो कसनुसा हसला आणि म्हणाला, ‘इतकी वर्षं फार हलाखीत गेली असे नाही, पण आता सुखाचे हंडे हाताला लागलेत, ते पण ह्या वयात..’
‘सुखाचे हंडे?’
‘मलाही त्याची भाषा जरा गूढच वाटली साहेब. पण मी जास्ती चौकशी केली नाही. तो पण ‘विचार करून पुन्हा येतो’ म्हणाला आणि गडबडीत निघून गेला. का कोण जाणे, पण मला काहीतरी विचित्र जाणीव होत होती. संध्याकाळी माझा दोस्त जयराम आला आणि आमच्या बैठकीत मी त्याला घडलेली घटना सांगितली. जयरामला देखील फार आश्चर्य वाटले. वडिलोपार्जित एकच मोहोर नक्की नसणार, त्या म्हातार्याला बहुदा एखादा हंडाच गवसला असावा अशी शंका जयरामला आली आणि मला देखील त्यात तथ्य वाटायला लागले. खात्रीसाठी, मी इतर काही व्यापारी मित्रांना फोन लावून आडून आडून चौकशी केली. पण त्या म्हातार्याबद्दल कोणालाच काही कल्पना नव्हती. याचा अर्थ सावज पहिल्यांदा माझ्याच दुकानात शिरले होते. मग मी आणि जयरामने तो पुन्हा आल्यावर काय करायचे याचा बेत आखायला सुरुवात केली.’
‘या पुढे जे काही घडले, ते जसेच्या तसे, अगदी शक्य झाले तर संभाषणासह सांगा सावळाशेठ..’
‘कसे विसरू शकेन साहेब मी? पौर्णिमेच्या बरोबर तीन दिवस आधीची गोष्ट. जानकीदास पुन्हा माझ्या दुकानात शिरले आणि मी हळूच जयरामला फोन लावला. यावेळी जानकीदास विक्रीच्या तयारीनेच आले होते. मी देखील थोडावेळ त्यांना इकडच्या तिकडच्या गप्पांमध्ये गुंतवले आणि जयराम येईपर्यंत वेळ काढला. निरोप मिळताच जयराम दहाव्या मिनिटाला दुकानात हजर झाला. मी अगदी सहज करतोय असे दाखवत दोघांची ओळख करून दिली. जयराम वागण्याबोलण्यात एकदम हुशार माणूस. त्याने पाचच मिनिटात जानकीदासला घोळात घेतले. आधी ठरल्याप्रमाणे मी देखील जानकीदासला त्याच्या अपेक्षांपेक्षा थोडी जास्तच रक्कम त्या मोहोरेसाठी दिली आणि त्याला एकदम खूश करून टाकले. जयरामने जानकीदासला संध्याकाळी जेवणासाठी थांबण्याचा आग्रह केला. जानकीदासचे गाव तसे आमच्या गावापासून फारसे लांब नव्हते. शेवटी आढेवेढे घेत तो तयार झाला. अनायासे जयरामची बायको माहेरी गेलेली होती, त्यामुळे त्याच्याच बैठ्या बंगल्यात आम्ही मैफिल जमवली. हो-नाही म्हणता म्हणता आमच्या सगळ्यांचेच तीन तीन पेग झाले आणि जयरामने हळूच विषयाला हात घातला. म्हातारा आधी काही बोलायलाच तयार होईना.. पण शेवटी पाचव्या पेगला त्याची गाडी आणि जीभ दोन्ही घसरली आणि एक अद्भुत कहाणी आमच्यासमोर आली. या म्हातार्याच्या आणि आमच्या गावाच्यामध्ये एक पुरातन गढी आहे. पूर्ण मोडकळीला आलेल्या त्या गढीकडे कुत्रीसुद्धा आता फिरकत नाहीत. ही गढी या म्हातार्याच्या कोणा पूर्वजाची. तिथे अधून मधून जाणे आणि पूर्वजांची श्रीमंती आठवून उसासे टाकणे एवढेच काय ते या म्हातार्याला सध्या उरलेले काम. अशाच एका फेरीत त्याला गढीत बसलेल्या एका माणसाचे दर्शन झाले. माणूस साध्या कपड्यातला असला तरी त्याच्या चेहर्यावरचे तेज काही लपत नव्हते. या पडक्या गढीत हा माणूस नक्की करतोय काय? या उत्सुकतेपोटी जानकीदासने त्याला ओळख सांगितली आणि तिथल्या उपस्थितीचे कारण विचारले. जानकीदास गढीचा वारस आहे हे कळल्यावर त्या माणसाच्या चेहर्यावर विलक्षण आनंद पसरला. ‘देवा… ऋणातून मुक्त होण्याची संधी दिलीस रे बाबा..’ असे काहीतरी पुटपुटत त्याने जानकीदासच्या हातात एक सोन्याची मोहोर ठेवली आणि तडक बाहेरचा रस्ता पकडला. जानकीदास पुरता गोंधळून गेला होता. कोणी अनोळखी माणूस समोर येतो काय, अचानक हातावर मोहोर ठेवतो काय… त्याला काही सुचतच नव्हते. तो भानावर येईपर्यंत तो गढीत भेटलेला सद्गृहस्थ बराच लांब पोचला होता. जानकीदास वयाचे भान विसरून त्या माणसाच्या मागे धावत गेला आणि त्याला शेवटी त्याने रोखले.’
‘इंटरेस्टिंग… चांदोबाच वाचतोय असे वाटले मला क्षणभर..’
‘मी आणि जयराम देखील उत्सुकतेच्या टोकाला पोचलो होतो साहेब. बर्याच विनवण्या केल्यानंतर त्या माणसाने जानकीदासला सांगितले की, त्याचे नाव ‘अश्वत्थ’ असून, तो गेली अठरा वर्षे एका नागा साधूच्या सेवेत होता. त्याच्या सेवेचे फळ म्हणून त्याला काही शक्ती प्राप्त झाल्या आहेत. त्यातील एक म्हणजे सोने दुप्पट करणे. मात्र या शक्ती ठरावीक ठिकाणीच कार्य करतात आणि त्यांना मदतीसाठी एखाद्या अतृप्त शक्तीची गरज भासते. अनेक वर्षे फिरल्यानंतर त्याला जानकीदासच्या गढीत अशी शक्ती सापडली, जी ताकदवान होती आणि अतृप्त देखील. त्यानंतर त्या शक्तीच्या मदतीने अश्वत्थने दोन वेळा त्याच्याकडील सोने दुप्पट केले. मात्र त्याला सतत त्या गढीच्या ऋणातून मुक्त होण्याची आस लागली होती जी आज पूर्ण झाली. जानकीदासचा मात्र यावर काही विश्वास बसेना. शेवटी अश्वत्थने त्याला शनी अमावस्येला थोडे सोने घेऊन गढीत येण्यास सांगितले. ‘नक्की होते तरी काय पाहू’ असा विचार करून जानकीदास तीच मोहोर घेऊन अमावस्येच्या दिवशी गढीत पोचला. कुठलाही यज्ञ नाही, हळदी-कुंकवाचे रिंगण नाही, पूजाविधी देखील नाही.. त्याला फार आश्चर्य वाटले. अश्वत्थ देखील साधासा कुडता पायजमा घालून आला होता. त्याने काही मंत्र पुटपुटले आणि जानकीदासला आणलेले सोने हवेत उडवायला सांगितले. जानकीदासने देखील एखादी गंमत बघतोय अशा थाटात, हातातील मोहोर वरच्या दिशेने उधळली आणि काही सेकंदात दोन मोहोरा त्याच्या पायापाशी येऊन कोसळल्या.’
‘दोन मोहोरा? सोन्याच्या?’
‘होय साहेब, अस्सल सोन्याच्या.. अगदी एकमेकीची झेरॉक्स असावी अशा. मी स्वत: तपासले आहे त्यांना. मी आणि जयरामने मग वेळ दडवला नाही आणि जानकीदासला बाटलीत उतरवले. अडचण एकच होती की, जानकीदासकडे अश्वत्थचा पत्ता नव्हता. पण तो दर अमावस्या-पौर्णिमेला गढीत यायचा हे नक्की. जानकीदासला देखील पटकन अब्जाधीश व्हायचे होतेच. तो ही आम्हाला साथ द्यायला तयार झाला. जयराम, मी आणि जानकीदास तीनच दिवसांनी येणार्या पौर्णिमेची वाट पाहू लागलो.’
‘तुमचा प्लॅन काय होता?’
‘साहेब, काही दिवसांपूर्वीच माझ्या सासर्याची जमीन विकली गेली. बायकोला सासरकडून अडीच कोटी रुपयांची रक्कम मिळाली होती. मी त्या सगळ्या रकमेच्या सोन्याचा विटा करून घेतल्या होत्या. म्ााझ्याकडे देखील एखाद कोटीचे सोने बिस्किटाच्या स्वरूपात होते. हे सगळे सोने आम्ही वापरणार होतो. ते एकदा दुप्पट झाले, की त्यातला २० टक्के हिस्सा जानकीदास आणि अश्वत्थचा आणि उरलेला ८० टक्के आम्ही वाटून घेणार होतो. मी गुंतवलेल्या सोन्याच्या बदल्यात जयराम मला कॅश पैसे देणार होता. आम्ही तीन दिवस कशीतरी कळ काढली आणि शेवटी एकदा त्या अश्वत्थला भेटण्याचा योग आला. साधे सुती कपडे, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि पायात कोल्हापुरी चपला अशा साध्या वेषातला तो माणूस इतका करामती असेल असे खरेच वाटत नव्हते. त्याच्या हातापाया पडून, बायको आजारी आहे, कर्ज आहे असे काय काय सांगून शेवटी त्याला राजी केले. दोन तास लागले त्याचे मन बदलायला. शेवटी तो तयार झाला, पण एका अटीवर… त्याचे म्हणणे होते ‘तुम्ही लोक खरं बोलताय यावर माझा अजूनही विश्वास नाही. पण या गढीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी शेवटचे म्हणून तुमचे हे काम करून देतो. पण या बदल्यात मला रुपया देखील नको.’
‘काय सांगताय सावळाशेठ?’
‘आम्हाला देखील धक्का बसला साहेब. पण तेवढाच हिस्सा कमी होतोय याचा आनंद देखील होताच. लवकरच येणार्या सर्वपित्री अमावस्येला सोन्याचा पाऊस पाडायचे ठरले आणि आम्ही कामाला लागलो. सगळ्यांनाच आस लागलेला सर्वपित्री अमावस्येचा दिवस उजाडला आणि आम्ही रात्र कधी होते त्याची वाट बघू लागलो. त्या रात्री एका दोन बॅगांमध्ये सर्व सोने लादून मी आणि जयराम गढीवर पोचलो. काही वेळात जानकीदास देखील आला. अखेर बरीच वाट पाहिल्यानंतर अश्वत्थ देखील आला. काही एक मंत्र पुटपुटत त्याने आम्हाला त्याच्या मागे येण्याची खूण केली. गढीत शिरल्यावर त्याने आम्हाला रिंगण करून उभे केले. एकमेकांचे हात हातात घ्यायला लावल्यावर त्याने काही मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. मंत्रांचा आवाज वाढत गेला आणि त्याच वेळी त्याने पिशवीतून एक नारळ काढून फोडला. त्याचे पाणी सर्वत्र उडवले आणि खोबरे आम्हाला खायला दिले. काही क्षणात अचानक डोळ्यापुढे अंधार झाला आणि भानच नाहीसे झाले. भानावर आलो तेव्हा सकाळ झाली होती आणि मी आणि जयराम गढीत अस्ताव्यस्त पडलो होतो. आणि सगळे सोने, अश्वत्थ आणि जानकीदास गायब झाले होते…’ दोन्ही हातात डोके खुपसत सावळाशेठने शेवटचे वाक्य कसेबसे पुरे केले. सावळाशेठ केबिन बाहेर गेले आणि राघवने हवालदार मोरेंकडे पाहिले.
‘मोरे.. या सावळाशेठकडे अचानक मोठी रक्कम येणे, त्याचवेळी त्याची जानकीदासशी ओळख होणे हा मला काही योगायोग वाटत नाही! तुम्ही एक काम करा, जरा या सावळाशेठच्या सासरची माहिती काढा आणि मी सांगतो त्या लोकांचे मोबाइल रेकॉर्ड मागवून घ्या आणि ते नंबर ट्रॅकिंगला पण टाका. जाताजाता त्या जयरामला आत पाठवा,’ इन्स्पेक्टर राघवने भराभरा हुकूम सोडले आणि हवालदार मोरे अंमलबजावणी करायला धावले.
—-
‘सर आपली शंका खरी ठरली. ४८ तासात केस उलगडण्याचा पराक्रम करणार सर तुम्ही…’ मोरेंच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
‘कॉल रेकॉर्डची कमाल मोरे..’
‘तुमच्या चाणाक्षपणाला पण मानायला हवे सर. त्या कॉल रेकॉर्डला ट्रेस केले आणि महान तपस्वी अश्वत्थ महाराज आणि राजघराण्याचे वंशज राजे जानकीदास दोघेही हाताला लागले. कोल्हापुरातल्या एका छोट्याश्या लॉजमध्ये दडले होते.’
‘बोलवा.. सावळाशेठ आणि जयरामला बोलवा…’
—-
‘साहेब तुमचे उपकार कसे फेडू? फार मोठ्या संकटातून वाचवलेत साहेब तुम्ही..’ सावळाशेठचा कंठ दाटून आला होता.
‘उपकार कसले? हे तर आमचे काम आहे सवळाशेठ. पण यापुढे अशा आमिषांना बळी पडू नका. कष्टाची लक्ष्मीच खरी असते हे कायम लक्षात ठेवा आणि मुख्य म्हणजे माणूस कितीही जवळचा असो, आपली खाजगी माहिती देताना कायमच सावध राहा.’
‘पण साहेब तुम्ही त्याला पकडले कसे?’
‘सावळाशेठ, तुमच्याकडे अचानक मोठी रक्कम येणे आणि तुम्हाला जानकीदास भेटायला येणे हा योगायोग नाही याची मला ठाम खात्री वाटत होती. पण तुमच्याकडे रक्कम आली आहे आणि त्याचे तुम्ही सोने केले आहे याची बातमी जानकीदासला कळली कशी? याचा अर्थ तुमच्या जवळचा कोणीतरी यात सामील असणार हे नक्की. आम्ही तुमच्या घरच्या, सासुरवाडीच्या सगळ्या लोकांवर पाळत ठेवली, त्यांची माहिती गोळा केली. ‘जयरामची बायको त्याच्या जुगाराच्या नादाला कंटाळून घर सोडून गेली आहे’ ही कुजबूज आमच्यापर्यंत पोचली आणि माझ्यासमोरचे चित्र स्पष्ट झाले. तुम्ही जयरामला आलेल्या पैशाबद्दल सांगितले आणि कर्जात बुडालेल्या जयरामच्या डोक्यात तुम्हाला लुबाडण्याची कल्पना शिरली. आधी त्याने पैशाचा पाऊस पाडण्याची चाल रचली होती. पण तुम्ही सोन्याच्या विटा बनवल्याचे त्याला सांगितले आणि त्याने पैशाच्या जागी सोने दुप्पट करण्याची शक्कल लढवली. पण त्याने कितीही हुशारी दाखवली असली, तरी त्याच्या मोबाइलचे रेकॉर्ड, अश्वत्थ आणि जानकीदासची स्टेटमेंट त्याला चांगलीच अडकवणार आहेत हे नक्की!’