सर्वसामान्य माणसांचे वाहन असलेली एसटी सध्या अडचणीत सापडलेली आहे. एसटी कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला गेला. उच्च न्यायालयाने तंबी दिल्यानंतरही तो सुरू राहिला. संप करणारे नेमके कोण आहेत, हे कळेनासे व्हावे, इतक्या संघटना संपात उतरल्या. एकाशी वाटाघाटी कराव्या, तर दुसरा गट अडून बसणार. त्यात या महामंडळाचे सरकारमध्ये विसर्जनच करून टाका, ही मागणी घेऊन काही कर्मचारी अजून अडून बसलेले आहेत. घसघशीत पगारवाढीच्या घोषणेनंतर बहुसंख्य कर्मचारी कामावर परतत असताना अनेक ठिकाणी एसटीवर दगडफेक करण्याचे, तिचे नुकसान करण्याचे प्रयत्न झाले. हा आपल्याच पोटावर फटका मारून घेणे आहे, हे कर्मचार्यांना, त्यांना चिथावणी देणार्यांना कळत नसेल का?
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना बनून भारतीय जनता पक्षाने या आंदोलनात घुसून जनक्षोभ उसळवण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांमधल्या परिवहन मंडळांची काय अवस्था आहे, तिथले पगार किती आहेत, याचा लेखाजोखा बाहेर पडू लागला, तेव्हा एसटी कर्मचारी शहाणे झाले असावेत. शिवाय या पक्षाच्या हातात आंदोलन गेले तर ते एखाद्या उद्योगपतीला एसटी विकूनच थांबतील, हेही लक्षात आले असावे. जंग जंग पछाडूनही एसटी संपाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला अपशकुन करता येणार नाही, उलट आपणच अडकून पडू हे लक्षात येताच या पक्षाने काढता पाय घेतला.
एसटीच्या अनेक समस्या आहेत. कर्मचार्यांचेही प्रलंबित प्रश्न आहेत. एसटी कर्मचार्यांच्या सेवेला तोड नाही. कोरोनाकाळात मुंबईसारख्या महानगरात एसटीच्या कर्मचार्यांनी दिलेल्या सेवेमुळे हे महानगर धावते राहिले, हे विसरता येणार नाही. मुक्कामाची, खानपानाची सोय नाही, रस्ते माहिती नाहीत, थांबे माहिती नाहीत, अशा स्थितीत प्रवाशांच्या सहकार्याने एसटी चालक आणि वाहकांनी मुंबईची लाइफलाइन जिवंत ठेवली. एसटीला लाल डब्बा म्हणून कितीही हिणवले तरी दुर्गम भागात सेवा पुरवते ती एसटीच. म्हणूनच तर यावेळी ‘मार्मिक’च्या मुखपृष्ठावर ‘ये एसटी हम नहीं छोडेंगे’ ही सर्वसामान्य मराठीजनांची भावना व्यक्त करण्यात आलेली आहे. मात्र, ही दोस्ती टिकायची असेल तर तसा प्रयत्न दोन्ही बाजूंनी व्हायला हवा. संपाच्या निमित्ताने इतका काळ रस्त्यांवरून एसटी गायब राहणे हे सर्वसामान्य नागरिकांबरोबरच एसटी कर्मचार्यांनाही परवडणारे नाही. आजकाल लोकांना झटपट पर्याय हवे असतात. एसटीच्या वाहतुकीला रिक्षा, जीप आणि वडापचे पर्याय ठिकठिकाणी निर्माण झालेले आहेत. ही वाहने छोटी, सुटसुटीत आणि त्यांच्या फेर्याही अधिक. त्यांनी संपाचा फायदा घेऊन बस्तान बसवले आणि त्यांची लोकांना सवय लागली तर लोक पुन्हा एसटीकडे वळतील का, याचाही विचार करायला हवा.
आज स्वत:च्या वातानुकूलित गाडीतून फिरणार्या, खासकरून ग्रामीण भागातल्या माणसाला एसटीविषयी प्रेम आहे, कृतज्ञता आहे. अनेकांच्या शिक्षणाच्या खडतर काळात एसटीने त्यांना शाळा-कॉलेजांत पोहोचवले आहे. ठरलेल्या गाडीबरोबर अनेकांचा चटणी-भाकरीचा डबा गावाकडून शहरात यायचा. एसटीच्या टपावर टाकून गावचा वानोळा यायचा. एसटीशी या पिढीच्या कितीतरी आठवणी जोडलेल्या आहेत. एसटीचा कायापालट करून, उत्तम प्रतीची वाहने ताफ्यात आणून तिला आदर्श रस्ते वाहतूक महामंडळ बनवणे अशक्य नाही. मात्र, त्यासाठी सगळ्यांनी सबुरीचे धोरण स्वीकारायला हवे. महामंडळांचे सरसकट सरकारमध्ये विसर्जन करता येणार नाही, हे लक्षात ठेवायला हवे. त्याचबरोबर कोरोनाकाळातून हळुहळू सावरत असलेल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा भारही टाकता येणार नाही, याचेही भान हवे.
हे भान सर्व संबंधित दाखवतील आणि एसटीबरोबरची मराठीजनांची दोस्ती आणखी भक्कम होईल, याची खात्री वाटते.
तीनचाकी आणि एकचाकी
एकीकडे एसटीच्या संपातून मार्ग निघत असताना दुसरीकडे भाजपाने कायम ‘तीन चाकी रिक्षा’ म्हणून हिणवलेल्या महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांचा काळ पूर्ण केला आणि भाजपच्या जखमेवर मीठ चोळले गेले. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेबरोबर सत्तेत येण्याची संधी आसुरी महत्त्वाकांक्षांमुळे हरवल्यापासून भाजपची राज्यातली अवस्था जत्रेतल्या, पालकांचं बोट सुटलेल्या पोरासारखी झाली आहे. हे सरकार स्थापन होऊ नये, यासाठी टोकाचे प्रयत्न करूनही ते स्थापन झाले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली त्याने दमदार वाटचाल केली, अंतर्विरोधांनी ते कोसळले नाही, याचे शल्य भाजपच्या उरात ठसठसते आहे. त्यामुळेच रिकामटेकडे होराभूषण आणि आयात त्रिकालतज्ज्ञ अधूनमधून आता ‘हे सरकार पडणार आणि आमचे सरकार येणार’ अशा वल्गना करत असतात. असे सरकार स्थापन होण्यासाठी भाजपला ४०पेक्षा जास्त आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. सुस्थिर सरकार अस्थिर करून असा पाठिंबा देऊन आपल्या पायावर धोंडा कोण आणि कशाला पाडून घेईल? त्यात आज निवडणुका झाल्या तरी महाविकास आघाडीचेच सरकार पुन्हा येईल, असे काही सर्वेक्षणांतून स्पष्ट झालेले आहे.
तीन पायांची रिक्षा दुचाकीपेक्षाही स्थिर असते. तिच्यात चालकाला सतत तोल साधावा लागत नाही. सत्तेच्या आसुरी महत्त्वाकांक्षेमुळे आणि कारभार वार्यावर सोडून निव्वळ निवडणूकजीवी बनून बसल्यामुळे भाजपची अवस्था पंक्चरलेल्या एकचाकी सायकलसारखी झालेली आहे. ती दुरुस्त करून किमान विरोधी पक्ष म्हणून सकारात्मक पद्धतीने तरी काम करा. तीन वर्षांनी जनतेला कोणत्या तोंडाने सामोरे जाल?