१६३४ ते १६३७ दरम्यान डच रिपब्लिक (युनायटेड प्रॉव्हिन्सेस ऑफ नेदरलँड्स) या त्याकाळी अस्तित्वात असलेल्या देशात ट्युलिप फुलांच्या कंदाची मागणी एकाएकी वाढू लागली. मागणीच्या प्रमाणात पुरवठा नसल्यानं किंमती झपाट्यानं अव्वाच्या सव्वा वाढू लागल्या. एकवेळ तर अशी आली की एक फुलाचा कंद आजच्या हिशेबाने साधारणपणे तब्बल तीन हजार डॉलर्सला मिळत होता. विचार करा एक फूल तीन हजार डॉलर्सना… जवळपास सव्वा दोन लाख रुपयांना! प्रत्यक्षात फुलं घेण्याऐवजी त्यावेळीही भविष्यातल्या पुरवठ्याच्या आणि किंमतीच्या अंदाजावर सट्टेबाजार सुरू झालेला. असं एकतरी फूल आपल्या घरी असणं हे त्याकाळी प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जात असे. आणि एकदिवस धडाम करून किंमती पडल्या… ज्यांनी सट्टेबाजाराच्या भरवश्यावर लागवडी केलेल्या, गुंतवणूक केलेली त्यांची अवस्था काय झाली असेल हे सांगायची गरज नाही.
त्यावेळच्या एकूण अर्थव्यवस्थेचा विचार करता हा धक्काही मोठ्ठाच म्हणता येईल. योगायोगाने हा कालावधी सुरुवातीच्या डच वसाहतीकरणाशी आणि म्हणूनच डच सुवर्णकाळाच्या सुरुवातीशी जुळतो. म्हणजेच वसाहतींच्या शोषणातून आलेला ताजा ज्यादाचा पैसा कुठं रिचवावा हे अर्थव्यवस्थेला न कळण्याचा या किंमती वाढण्याला हातभार लागला. अर्थशास्त्रात या घटनेला ट्युलिप मॅनिया असं नाव दिलं गेलं. कोणत्याही गोष्टीच्या किंमती अव्वाच्यासव्वा झपाट्यानं वाढल्यास ट्युलिप मॅनियाशी तुलना केली जाते.
अनेकांना बिटकॉइन्स म्हणजेच असाच एक प्रकार वाटतो.
बिटकॉइन्सचे पाठीराखे तंत्रज्ञानाची तुलना फुलांशी करू नका म्हणून बचाव करताना दिसतात. क्रिप्टो‘करन्सी’ची सुरक्षितता, त्याचं वेगळेपण अनेकांना, विशेषतः ज्यांना शासनाची बंधनं जाचक वाटतात अश्या अराज्यवादी मंडळींना भुरळ घालणारंच आहे. एल-सल्वोडोअर या एका देशाने बिटकॉइनला चलन म्हणून मान्यता दिल्यानंतर तर यांना आनंदाचं भरतं आलेलं. त्यामागच्या अमेरिकन डॉलर हेजीमनीला नाकारण्याच्या राजकीय कारणांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात ही मंडळी मग्न होती.
अर्थशास्त्राचा एक मूलभूत नियम आहे ही काल्पनिक/प्रतीकात्मक मूल्याखेरीज इतर कोणतंही वरकड मूल्य हे श्रमातून तयार होतं. हा नियम बिटकॉइन्सला लागू आहे. बिटकॉइन्सचे व्हर्च्युअल मायनिंग (उत्खननाची आभासी प्रक्रिया) करण्यासाठी लागणारी ऊर्जा, मानवी बौद्धिक श्रम, अॅडव्हान्स कॉम्प्युटेशन पॉवर (म्हणजे अत्याधुनिक क्लाउड कॉम्प्युटेशन, डेटा सेंटर स्टोरेजेस वगैरे) यांची गरज दिवसेंदिवस वाढतीच आहे. आजच्या घडीला साधारण १,८८,८१,१०६.२५ इतके बिटकॉइन्स मार्केटमध्ये आहेत. सुरुवातीला साध्या डेस्कटॉपवर मायनिंग करता येत असे. जसजसं मायनिंग मोठ्या प्रमाणात होऊ लागलं, त्यातली स्पर्धा वाढली तसतसं त्यासाठी लागणारी ऊर्जा वाढली आणि महागड्या संगणक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला. याव्यतिरिक्त मर्यादित उपलब्धता आणि प्रचंड मागणी यामुळं त्याचाही सट्टेबाजार बनून किंमती झपाट्यानं वाढल्या.
यावर काहीजण हा प्रतिवाद करतात की ऊर्जेची गरज वाढल्यानंतर अनेक मायनर स्वच्छ पुनर्निर्माणक्षम ऊर्जास्रोत (क्लीन अँड रिन्युएबल एनर्जी) असणार्या ठिकाणी स्थलांतरित झाले. पण इथं ध्यानात घेण्याची बाब ही की ज्या गोष्टी पर्यावरणाला हानीकारक नाहीत म्हणून खपवल्या जातायत, त्यातल्या अनेक गोष्टींमध्ये प्रदूषण आणि शोषण इतरत्र इतरांवर लादलं जातंय. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये वापरल्या जाणार्या लिथियम कोबाल्ट बॅटरीज. लिथियम आणि कोबाल्टच्या खाणींमध्ये होणारं शोषण आणि प्रदूषण हे त्या बॅटरीवर धावणार्या गाड्या चालवणार्यांना दिसत नाही, इतकंच! अगदी तसंच उदाहरण म्हणजे क्लाउड कॉम्प्युटेशन अर्थात ऑनलाइन संगणकक्षमता भाड्याने घेऊन वापरणे. सध्या अमेझॉन वगैरे कंपन्या त्यात मोनोपॉली निर्माण करण्यासाठी स्पर्धा करत असल्यानं या सर्व्हिसेस अत्यंत स्वस्तात देतायेत. अमेझॉन कंपनीच्या एकूण उत्पन्नात या क्लाउड सर्व्हिसेसचा सर्वात जास्त वाटा आहे. कॉम्प्युटेशनला लागणारी ही यंत्रणा आपल्या डोळ्याआड असल्यामुळे त्यासाठी लागणारी ऊर्जा कोठून येतेय, त्यामुळे किती प्रदूषण होतंय, त्यामागचं इतर शोषण आपल्याला दिसत नाही इतकंच! हीच बाब कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी लागणार्या तंत्रज्ञानाचीही आहे. या सगळ्यावर खूप मोठं संशोधन सुरू आहे.
आता मुद्दा हा आहे की बिटकॉइन्स पारंपरिक चलनाला पर्याय ठरू शकतात का?
‘चांगला पैसा वाईट पैशाची जागा घेतो’ असं म्हणत ग्रेशामचा नियम अर्धवट आणि तोही चुकीचा सांगितला जातो आहे. मुळात तो नियम उलटा आहे. ‘वाईट पैसा (ज्याची किंमत अव्वाच्या सव्वा आणि अस्थिर आहे) चांगल्या पैशाची (ज्याची दर्शनी किंमत कमी आणि स्थिर आहे) जागा घेतो आणि त्यामुळं चलनाचे मूल्य घसरत जातं’ असा तो नियम आहे. ज्यावेळी नाण्यांमध्ये सोन्या-चांदीचा वापर कमी कमी केला जाऊ लागला, त्यावेळी जुन्या नाण्यांमध्ये असलेल्या सोन्याचांदीची किंमत त्या नाण्याच्या दर्शनी मूल्याहून अधिक व्हायला लागली. त्यावरून काढलेला हा निष्कर्ष आहे. असं सोन्याचांदीचं, दर्शनी मूल्याहून अधिक किंमत असणारं चलन लोक स्वतःजवळ ठेवत आणि त्याबदली कमी मूल्यवान धातूंची नाणी बाजारात वापरली जात असत. त्यामुळं चलनाची किंमत आणखीनच घसरत जाई. यानंतरच्या भविष्यात गोल्ड स्टँडर्डऐवजी डॉलर बेसकडे जातानाही हीच टीका झाली होती. आजची व्यवस्था मूलतः डॉलरकेंद्री व्यवस्थेतून आलेली असली तरीही ती मूळच्या स्वरूपाहून बरीच बदलली आणि परस्परावलंबी झाली आहे. त्यामुळं तिला हा नियम कितपत लागू होतो, यावर अनेक मतभेद आहेत. म्हणजे आज डॉलर्सचं मूल्य रुपयांच्या तुलनेत अधिक आहे म्हणून फक्त डॉलर्स गोळा करून बदल्यात रुपये बाजारात चलनात आणले जातात का? तर नाही. कारण चलनाचा दर आता इतर अनेक गोष्टींवर ठरतो.
डॉलर्सची अनियंत्रित कर्जउभारणी आणि कर्जफुगवटा हा स्वतंत्र विषय आहे, त्यामुळं घाईघाईने त्यावर इथं बोलायला नको.
तर ग्रेशामचा नियम बिटकॉइन्सला लावायला गेल्यास आणि बिटकॉइन भविष्यात बाकीच्या चलनांची जागा घेतील अशी भविष्यवाणी करायची झाल्यास ते वाईट चलन (अव्वाच्या सव्वा किंमत आणि अस्थिरता) आहे हे सत्य स्वीकारावं लागेल. हा अंतर्विरोध इथं ध्यानी घ्यायला हवा. क्रिप्टोकरन्सीज भविष्यात कदाचित महत्वाची भूमिका बजावतील, पण आत्ता जो काही सट्टेबाजार सुरू आहे त्यावरून सध्याच्या काळात ते लगेचच शक्य नाही हे तरी नक्की. कारण बाजारात वापरलं जाणारं चलन हे सहजपणे सर्वांना उपलब्ध असणं, त्याच्या किंमती बर्यापैकी स्थिर असणं आवश्यक असतं. ज्या वस्तूला गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिलं जातंय, ती वस्तू चलन म्हणून बाजारात टिकू शकत नाही.
ज्यांना सट्टेबाजार करायचाय त्यांनी तो आपापल्या जोखमीवर करावा. भांडवली अर्थव्यवस्थेत जुनीच दारू नव्या बाटलीत भरून असे बुडबुडे तयार होत असतात. तंत्रज्ञानावरचा अतिरिक्त भरोसा आणि अवास्तव अपेक्षा यातून जन्मलेला डॉटकॉमचा बुडबुडा २००० साली असाच फुटलेला. क्रिप्टोचा फुगा इतक्यात लवकर फुटणार नाही कारण अजूनही स्वस्त व्याजदर, जनसामन्यांऐवजी बड्या भांडवलदारांना होणारा भरमसाठ वित्तपुरवठा आणि सोप्प्या मार्गांनी पैसे कमावून, करचोरी करून श्रीमंत होण्याची उद्योजकांना आळशी बनवणारी मानसिकता मिळून हा फुगा अजून काही काळ असाच फुगवत नेतील. ज्यादिवशी हा फुगा फुटेल तेव्हा गुंतवणूकदारांचं काय होईल हे वेगळं सांगायला हवं का?