एकेकाळी राजकारणात फक्त विशिष्ट सवर्ण जाती आणि काही वर्गांचीच मक्तेदारी असताना राजकारणात सहभाग घेण्यास अघोषित बंदी असलेल्या बहुजन वर्गाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ज्या महान नेत्याने केले, त्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन, म्हणजे २३ जानेवारी हा शिवसैनिकांसाठीच नव्हे, तर सगळ्या बहुजन वर्गासाठी कृतज्ञता दिवस आहे. राजकारण आणि समाजकारण यांच्या माध्यमातून लाखो लोकांच्या आयुष्यात क्रांती घडवणार्या बाळासाहेबांचा यंदाचा जन्मदिन विशेष महत्वपूर्ण ठरला कारण या वर्षी या दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत शिवशक्ती आणि भीमशक्ती यांच्या युतीची घोषणा केली. आगामी जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत, ही महाराष्ट्राच्या राजकारणात एक टर्निंग पॉइंट ठरेल अशी घटना आहे. कारण, सबंध देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील ही युती असणारच आहे, हे आता स्पष्ट झालं आहे. सध्या ही युती या दोन पक्षांचीच असली तरी पुढे जाऊन महाविकास आघाडीचा ती भाग व्हावी, हा आपला प्रयत्न असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. प्रकाश आंबेडकर आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात राजकीय सुसंवाद घडवून आणता येईल, असे सूचक विधान देखील त्यांनी केले.
या नव्या राजकीय युतीचे समीकरण जुळले तर काय होईल? २०१९च्या मतदानानुसार काँग्रेस (१६.९ टक्के), राष्ट्रवादी (१६.१ टक्के), शिवसेना (१६.६ टक्के), वंचित बहुजन आघाडी (४.६५ टक्के) यांच्या मतांची बेरीज ५४.२५ टक्के इतकी होती तर भाजपाची टक्केवारी २६.१ टक्के इतकी होती. २०१९ला भाजपाला शिवसेनेसोबतच्या युतीमुळे शिवसेनेचे देखील मतदान झाले होते, ते यंदा होणार नाही. शिवसेनेला देखील फुटीचा आणि भाजपाची साथ सोडल्याचा थोडाफार तोटा होईलच. महायुती झाल्यावर मात्र तो तोटा कैकपटीने भरून निघेल. आकडेवारीवरून कल्पना येईल की युतीची मोठी घोषणा केल्यानंतर मिंधे गट आणि त्यांचे पालक भारतीय जनता पक्ष या दोघांचे धाबे का दणाणले आहे ते? शिवसेनेची साथ सोडून भाजपासोबत घरोबा केलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची देखील बेचैनी अचानक वाढली आहे. ही युती महाराष्ट्रातील आणि देशातील देखील राजकीय समीकरणे बदलू शकतेच, शिवाय वंचित बहुजनांचे स्वतःच्या ताकदीवर सत्तेत मानाचे स्थान मिळवण्याचे स्वातंत्र्योत्तर काळात साध्य न झालेले स्वप्न देखील या निर्णयाने पूर्ण होऊ शकते.
या युतीने फक्त दोन पक्ष एकत्र आलेले नाहीत, तर महाराष्ट्रातील दोन मोठ्या निष्ठावान सैन्यबलांचे हे एकत्रीकरण ठरले आहे. आज भिमसैनिक आणि शिवसैनिक हीच तर महाराष्ट्रातील निष्ठावंत, कट्टर राजकीय ताकद आहे. नेतृत्वाच्या एका आदेशावर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे बळ फक्त इथेच आहे. इतर सगळीकडे पैसे टाकून जमवलेली भाडोत्री गर्दी आहे. आरपीआय (आठवले गट) आणि भाजपा यांच्या युतीचे पनवेलचे एक माजी उपमहापौर नुकतेच प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल वाट्टेल ते बरळल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी केली गेली. हे महाशय चेंबूर येथे भिमसैनिकांच्या तावडीत सापडले आणि या माजी उपमहापौराला भर रस्त्यात प्रकाश आंबेडकर काय आहेत याची दिव्य प्रचिती आली. त्या घटनेची व्हायरल क्लिप पाहिली तर भिमसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येणे म्हणजे काय, याची थोडीफार कल्पना सत्ताधारी करू शकतील. मंत्रालयात सत्ता कोणाचीही असली तरी रस्त्यावरची ताकद मात्र या एकत्र आलेल्या सैन्याची असेल, हा संदेश चेंबूरमधून आला आहे.
भिमशक्ती आणि शिवशक्ती हे दोन राजकीय प्रवाह कित्येक दशकापासून महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. याआधीही ते एकत्र आले आहेत, पण, इतक्या ताकदीने एकत्र आल्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. या दोन शक्तींची अधिक स्थिर युती आजवर झाली नाही, याला कारणे बरीच आहेत. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात महाराष्ट्रात काँग्रेसशिवाय इतर कोणताच पक्ष स्वतःचे अस्तित्व टिकवू शकत नव्हता. कम्युनिस्ट पक्षाची ताकद कमी होत होती, कारण तो पक्ष संघटित क्षेत्रातील कामगारवर्गाच्या प्रश्नातच गुंतून पडला होता. असंघटित कामगार, बेरोजगार, भूमीहीन शेतमजूर, लहान विक्रेते यांचे प्रश्न गंभीर होते. पण आवाज उठवणारे कोणीच नव्हते. त्या खडतर वेळी सत्तेवर अंकुश ठेवणार्या, जनतेच्या जगण्याच्या प्रश्नासाठी झगडणार्या दोन युवाशक्ती जोर धरू लागल्या होत्या, एक होती शिवसेना तर दुसरी होती दलित पँथर. पैशाचे कोणतेही पाठबळ नसताना फक्त निष्ठावान, कट्टर सैनिकांच्या जिवावर या संघटना जोमाने वाढत होत्या. यातूनच हक्कासाठी रस्त्यावर उतरणारी भिमशक्ती आणि शिवशक्ती हे राजकीय प्रवाह तयार झाले. यातील शिवशक्तीला बाळासाहेबांचे खंबीर नेतृत्व लाभले होते, ज्यामुळेच शिवसेना पक्ष म्हणून बळकटपणे उभा राहू शकला, मोठमोठी संकटे झेलून राज्यातील सत्तेतील सर्वोच्च मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला. याउलट, भिमसैनिकांची ताकद क्षीण होत गेली आणि सत्तेच्या जवळपास देखील भिमशक्ती पोहोचू शकली नाही, हे फार क्लेशकारक आहे. सत्ताधार्यांच्या धूर्त राजकारणाला बळी पडणारे नेतृत्व लाभल्याने नेत्यांच्या अहंकारी हेव्यादाव्यांतून भिमशक्तीला कायमच फुटीच्या आगीतून जावे लागले. बाळासाहेबांनी शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र आणण्याचे विचार जाहीरपणे मांडले, तसेच वेळोवेळी दलित पँथरचे महाकवी नामदेव ढसाळ, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत युती करून ते विचार कृतीत आणण्याचा प्रयत्न देखील केला. पण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन पक्षाला जे फुटीचे ग्रहण लागले, ते कधी सुटले नाही. सर्व दलित नेत्यांनी बर्याचदा प्रयत्न केले, पण स्थायी स्वरूपाचं ऐक्य कधी झाले नाही. कागदावर ३० टक्के लोकसंख्या असलेली, भक्कम आणि बलाढ्य दिसणारी दलित, मागास, भटके, अल्पसंख्यक अशा वंचित समाजाची ताकद निवडणुकीत मात्र कायमच विखुरलेली राहिल्याने सत्तेत त्यांना हक्काचा वाटा मिळाला नाही.
प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत जाण्यात राजकीय शहाणपणा नाही, त्याऐवजी त्यांनी भाजपासोबत येण्याचा विचार करावा, त्यातच राजकीय शहाणपणा आहे असे विधान रामदास आठवले यांनी केले आहे. राजकीय शहाणपणा म्हणजे आपल्यापुरते मंत्रीपद मिळवण्याचे सत्ताकारण असेल, तर आठवले यांनाच हे शहाणपण साधले आहे, यात शंका नाही. मात्र त्यांनाच ते कसे साधले, हे पण उघड गुपित आहे.
रिपब्लिकन ऐक्य झाले असते तर महाराष्ट्रातील सत्ताकारणातील जातीय समीकरणे कायमची बदलली असती. म्हणूनच आजवरच्या सत्ताधीशांनी त्यात कायम खोडा घातला. त्या राजकारणाचा भाग म्हणून एखाद्याला सत्तेची मलई दिली जाते. सत्तेतील मंत्रीपद आल्याने समस्या, कामे घेऊन जनता आपसूकच त्याच्याकडे जाऊ लागते. असा ठरवून घडवलेला नेता सत्ताधार्यांच्या ताब्यात राहतो. अशा नेत्यांच्या मंत्रिपदाने, सत्तेने वंचित समाजाचे भले झाल्याचे काही दिसलेले नाही.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर या दोन्ही नेत्यांची सर्वात मोठी पुण्याई अशी आहे की त्यांनी आजवर सत्तेसाठी लाचारी पत्करली नाही. आघाडी अथवा युती स्वबळावर केली आणि सत्तेतील पदे स्वबळावर घेतली. सत्ता चंचल आहे, क्षणिक आहे, तर संघटना कायमस्वरूपी आहे याचे पूर्ण भान असणारे हे दोन्ही नेते आहेत. आंबेडकर आणि ठाकरे ही महाराष्ट्रातील दोन वलयांकित घराणी आहेत. या घराण्यांवर महाराष्ट्रातील जनतेने अपरंपार प्रेम केले, मायेची ऊब दिली, मग सत्तेची ऊब असली-नसली तरी त्यांना फरक पडत नाही. प्रकाश आंबेडकरांकडे आजवर बरेचदा मंत्रीपदे चालत आली होती, देशाच्या महत्वपूर्ण संविधानिक पदासाठी देखील एकेकाळी त्यांना विचारणा झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असल्याचा ते क्वचितदेखील उल्लेख करत नाहीत, त्याचा राजकीय वापर करत नाहीत. अत्यंत कुशाग्र बुद्धीचे प्रकाश आंबेडकर हे एक नावाजलेले कायदेपंडित आहेत, अभ्यासू आहेत. भिमा कोरेगाव आंदोलनात घरचे सदस्य आनंद तेलतुंबडे हे कित्येक वर्षे अटकेत राहिले, तरी प्रकाश आंबेडकर झुकले नाहीत. त्यांच्या जागी जर एकादा टिल्लू नेता असता तर तो पटकन सत्तेतील पदावर उडी मारून बसला असता.
त्याचवेळी, खोकेबहाद्दर गद्दारांनी केलेल्या कटानंतर उद्धव ठाकरे यांनी क्षणभरात मुख्यमंत्रीपद कसे सोडून दिले, ते सबंध महाराष्ट्राने पाहिले आहे. सत्तापदांवर ‘मी पुन्हा येईन’चा स्वार्थी गजर जोरात सुरू असताना सत्तेतील पदांच्या पलीकडे पोहोचलेले महाराष्ट्रातील दोन नेते एकत्र येणे, ही जनतेसाठी फार आशादायक गोष्ट आहे. ही राज्याच्या उज्ज्वल भवितव्याची चाहूल आहे. या दोन नेत्यांना बहुजनांचे नेतृत्व करण्याचा नैतिक अधिकार आहे. सत्तेतील पदांची फिकीर न करणारे हे दोन्ही नेते स्वतःच्या संघटनेला मात्र जिवापाड जपतात. बहुजनांची संघटना आंदोलनाच्या मैदानात, विरोधाच्या उन्हात फोफावते, तर सत्तेच्या सावलीत फक्त बांडगुळे जगतात, संघटना मरगळते, हे दोघांना माहिती आहे. रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर या दोघांच्या नेतृत्वाची तुलना काय सांगते? २०१९च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ४.६५ टक्के मते स्थापनेनंतरच्या वर्षभरात मिळवून आपली ताकद दाखवून दिली होती. पण, गेली तीन दशके सत्तेच्या वळचणीला राहिलेला रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) पाव टक्का मतेदेखील घेऊ शकला नाही. उत्तर प्रदेशात मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला देखील आता घरघर लागली आहे. महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षातले आठवले गट, कवाडे गट, गवई गट, खोब्रागडे गट निवडणुकीत प्रभावहीन ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या राजकारणात स्वबळावर स्थान निर्माण करतात, हे फार महत्त्वाचे आहे. वंचित बहुजन आघाडीने गेल्या विधानसभेत कोणत्याच मोठ्या पक्षाशी युती केली नाही आणि सर्व जागा लढवल्या. त्यांना पदार्पणातच २४ लाख मते मिळाली. यापुढे फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच महाराष्ट्र आणि कदाचित देशातील दलित समाजाचे नेतृत्व करतील का, हे येणारा काळ ठरवेलच. दलित राजकारणातील पोकळी ते कदाचित भरून काढतील.
हिंदुत्वाच्या राजकारणात भाजपाच्या एकाधिकारशाहीला देश वैतागला आहे. तिथे शिवसेना मोठी जागा व्यापेल. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यानी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेसोबत काँग्रेस पक्ष युती करण्यास तयार असल्याचे सांगितल्याने शरद पवारांची संमती मिळून महाविकास आघाडीतही वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाला तर एक ताकदवान राजकीय पर्याय महाराष्ट्राला लौकरच मिळू शकतो.
प्रबोधनकार ठाकरे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समकालीन होते, समविचारी होते, सच्चे मित्र होते. दोघेही दादरला राहणारे, त्यामुळेच त्यांच्यात घरोबा होता. ठाकरे आणि आंबेडकर ही जोडी एकत्र चालून येणार म्हटले की कर्मठ प्रतिगामी मैदानातून पळ काढायचे. आजच्या पुरोगामी महाराष्ट्राचा पाया रचण्यात तसेच संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यात ठाकरे आणि आंबेडकर यांचे योगदान अनमोल आहे म्हणून महाराष्ट्रात ही नावे आद्य क्रमांकाने आणि आदरानेच घ्यावी लागतात. तीन पिढ्यांचे संबंध असणारे ठाकरे आणि आंबेडकर निवडणुकीच्या राजकारणात एकत्र येणे ही गोष्ट नैसर्गिक होती, तरी तो योग आजवर जुळून आला नव्हता. शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यानंतर शिवसेना संपणार अशी भाकिते वर्तवली जात असताना ही युती झाल्याने बर्याच जणांची पंचाईत झाली आहे. ते या युतीला अनैसर्गिक ठरवू पाहात आहेत. पण ही युती महाराष्ट्रातील वैचारिक सहिष्णुतेचे उदाहरण आहे. इथे एकाचवेळी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे असे विविध मतप्रवाहांचे दिग्गज आपली वैचारिक मांडणी करत होते, संघटना बनवत होते, हे विसरता कामा नये. महात्मा गांधींचे गुरू गोपालकृष्ण गोखले देखील त्याच काळातले आणि महाराष्ट्रातलेच. थोडक्यात हिंदुत्ववाद, गांधीवाद, आंबेडकरवाद या देशात महत्वपूर्ण ठरलेल्या विचारप्रवाहांचा उगम महाराष्ट्रात झाला, हा योगायोग नाही. सातत्याने देशाला, समाजाला विचार देणे, दिशा देणे हाच महाराष्ट्रधर्म आहे. देशावर आज अघोषित हुकूमशाहीचे, एकाधिकारशाहीचे, भांडवलदारांना सर्व साधनसंपत्ती विकून टाकण्याचे जे एक फार मोठे राजकीय संकट उभे आहे ते घालवण्यासाठी महाराष्ट्रालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. सह्याद्रीची जबाबदारी यावेळी हिमालयाहून जास्त आहे. शिवशक्ती आणि भिमशक्तीची युती ही घटना याची एक आशादायक सुरुवात आहे. खाजगी बसमधून जेवण आणि भत्ता देऊन आणलेल्या भाडोत्री फौजांचे सेनापती यामुळेच आता भेदरले आहेत. त्यात नवल ते काय?
भाजपा आणि मिंधे गटाकडून मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सामदामदंडभेद हे सर्व विषप्रयोग केले जाणार. पण पाच हजार वर्षं नरकयातना झेलून कोणतेही विष पचवण्याची ताकद वंचित समाजाकडे आहे. ती ताकद एकत्र झाल्याने राजकीय प्रभाव दाखवल्याशिवाय रहाणार नाही. आता भाजपासाठी मुंबई आणखी दूर गेली आहे.