मुस्लिम समाजातील जन्म, तोकड्या कपड्यातील खेळ, भारताचा कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह आणि सोशल मीडियावर सर्वच टीकाकारांना पुरून उरणारी अशी ती बंडखोर टेनिसनायिका. खरं तर तिची कारकीर्दच एखाद्या चरित्रपटासारखी ठरेल अशी. पण तिची खरी ओळख टेनिसच्या कोर्टवरची. तिची अदाकारी भारतीयांना प्रेरणादायी. संगीताच्या स्वरांची सुरुवात जशी ‘सा’ या स्वरानं होते, तशी महिला टेनिसमधील ‘सा’ म्हणजे सानिया मिर्झा!
– – –
वयाच्या १९व्या वर्षी स्वर्गवासी झालेल्या अभिनेत्री दिव्या भारती हिच्यासारखं अचाट सौंदर्य तिला लाभलं होतं… कारकीर्दीत कधी दाक्षिणात्य, तर कधी हिंदी चित्रपटांच्या तसंच आयटेम साँगच्याही ऑफर्स तिनं झिडकारल्या होत्या… त्या तिनं स्वीकारल्या असत्या, तर दीपिका पदुकोण, आलिया भट, कंगना राणावत यांच्या रांगेत ती (नृत्यगीतांपुरती तरी निश्चित) बसली असती… अशी ही जिद्दी हैदराबादी सुवर्णकन्या.
मुस्लिम समाजातील जन्म, तोकड्या कपड्यातील खेळ, भारताचा कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह आणि सोशल मीडियावर सर्वच टीकाकारांना पुरून उरणारी अशी ती बंडखोर टेनिसनायिका. खरं तर तिची कारकीर्दच एखाद्या चरित्रपटासारखी ठरेल अशी. पण तिची खरी ओळख टेनिसच्या कोर्टवरची. तिची अदाकारी भारतीयांना प्रेरणादायी. संगीताच्या स्वरांची सुरुवात जशी ‘सा’ या स्वरानं होते, तशी महिला टेनिसमधील ‘सा’ म्हणजे सानिया मिर्झा!
निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेली छत्तीस वर्षीय सानिया नुकतीच कारकीर्दीतील अखेरची ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा खेळली. यात मिश्र दुहेरीत रोहन बोपण्णाच्या साथीनं जेतेपदासह सुखद सांगता करण्यात तिला अपयश आलं. ‘‘मी आज रडले तर माझे अश्रू हे आनंदाश्रू असतील बरं का! तशी ही माझी अखेरची स्पर्धा नाही. आणखी एका स्पर्धेत मी खेळणार आहे. पण माझ्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात मेलबर्नमधून झाली आणि शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धासुद्धा हीच ठरल्याने मी भावुक झाले आहे,’’ हे सानिया बोलत होती, तेव्हा तिच्या डोळ्यांतील अश्रूंचा बांध फुटला होता… सानियाच्या कारकीर्दीचा गेल्या दोन दशकांचा प्रवास त्या अश्रूंची फुलं झाल्याची साक्ष देत होता.
१९८३च्या विश्वचषक जेतेपदानं देशात क्रिकेटक्रांती घडवली. पण देशात क्रिकेट आणि इतर खेळांमधील अनेक नायकांनी आपला खेळ रुजवला. ध्यानचंद यांनी हॉकी, सुनील गावस्कर-कपिल देव-सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट, विश्वनाथन आनंदनं बुद्धिबळ, बिलियड्स-स्नूकरमध्ये पंकज अडवाणी, अॅथलेटिक्समध्ये मिल्खा सिंग-नीरज चोप्रा आदी पुरुष नायक खेळाला प्रेरक ठरले. महिलांमध्येही धावपटू पीटी उषा, क्रिकेटपटू मिताली राज, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम अशा अनेक कर्तबगार खेळाडूंमुळे आज देशाला दबदबा निर्माण करता आला आहे. टेनिस हा खेळ भारतात लोकप्रिय झाला, तो १८८०च्या दशकापासून. ब्रिटिश सैन्य आणि अधिकारी वर्ग फावल्या वेळेत हा खेळ इथे खेळायचे. तोच महागडा खेळ पारतंत्र्यातील भारतीयांनी आत्मसात केला. लाहोरची (आता पाकिस्तानमध्ये) पंजाब लॉन टेनिस अजिंक्यपद (१८८५), कोलकाताची बंगाल लॉन टेनिस अजिंक्यपद (१८८७) आणि अलाहाबादची अखिल भारतीय टेनिस अजिंक्यपद (१९१०) अशा जुन्या भव्य-दिव्य स्पर्धा. १९३०च्या दशकात फ्रान्स, रोमानिया, हॉलंड, बेल्जियम, स्पेन, ग्रीस अशा नामांकित संघांना भारतानं धूळ चारल्याचं इतिहास सांगतो. १९३९मध्ये घौस मोहम्मद हा विम्बल्डन ग्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा पहिला भारतीय. रामनाथन कृष्णन, विजय अमृतराज यांनी भारतीय टेनिस समृद्ध केलं.
रामनाथन यांचा मुलगा रमेश कृष्णननं कनिष्ठ गटाचं विम्बल्डन आणि फ्रेंच जेतेपद पटकावून अगदी जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानापर्यंत उंची गाठली. वरिष्ठ गटात त्याची वाटचाल उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच मर्यादित राहिली. ऑलिम्पिक किंवा ग्रँडस्लॅम जेतेपदापर्यंत भारतीयांचा आलेख उंचावलाच नाही. त्यामुळे टेनिसच्या कोणत्याही स्पर्धांमध्ये भारतीयांना खिजगणतीत धरलं जात नव्हतं. परंतु नव्वदीचं दशक भारतीय टेनिसला आंतरराष्ट्रीय क्षितिजावर ओळख प्राप्त करून देणारं ठरलं. १९९६मध्ये लिएण्डर पेसनं ऑलिम्पिक कांस्यपदक पटकावलं, तर पुढच्याच वर्षी महेश भूपतीनं जपानच्या रिका हेराकीच्या साथीनं फ्रेंच खुल्या स्पर्धेत मिश्र दुहेरीचं जेतेपद पटकावलं. अशा रीतीनं पेस आणि भूपतीनं ऑलिम्पिक आणि ग्रँडस्लॅमची लक्ष्मणरेषा ओलांडली. पेस आणि भूपती यांनी मग पुरुष दुहेरीत जोडीनं खेळून धुमाकूळ घातला. १९९९मध्ये वर्षातील चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये ही जोडी अंतिम फेरीत होती. या द्वयीनं एकमेकांच्या साथीनं किंवा एकमेकांशिवाय पुरुष दुहेरीत आणि मिश्र दुहेरीत असंख्य ग्रँडस्लॅम जेतेपदं मिळवण्याचा रतीबच लावला. हेच पुरुष टेनिसची पाळंमुळं खोलवर रुजवणारं. पण महिला टेनिसचं अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी २००९ साल उजाडावं लागलं. सानियानं महेशच्या साथीनं ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅमचं मिश्र गटातील जेतेपदावर नाव कोरलं. सानिया नामक झंझावात इथंच सुरू झाला. त्यानंतर मिश्र गटातच २०१२मध्ये भूपतीच्याच आणि २०१४मध्ये ब्रूनो सोआरिसच्या साथीनं तिनं अनुक्रमे फ्रेंच आणि अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेतेपदांना गवसणी घातली. ही यशोमालिका महिला दुहेरीतही तिनं राखली. २०१५मध्ये विम्बल्डन आणि अमेरिकन, तसंच २०१६मध्ये ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम जेतेपदं तिनं मार्टिना हिंगीसच्या साथीनं प्राप्त केली. एकंदरीत सहा ग्रँडस्लॅम जेतेपदं तिच्यावर खात्यावर, इतकंच नव्हे तर दुहेरीतील जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानाचं शिखरही तिनं सर केलं. सानियाचं हेच नायिकत्व देशात टेनिसची लाट आणण्यासाठी प्रेरणादायी ठरलं.
तशी एकेरीतही सानिया चमकली. परंतु ते यश मर्यादित स्वरूपाचं होतं. २००३ ते २०१३मध्ये एकेरीतून निवृत्ती घेईपर्यंत ती भारतीय टेनिस क्रमवारीत संपूर्ण कारकीर्दीत अग्रस्थानावर होती. स्वेतलाना कुझ्नेत्सोव्हा, व्हेरा झ्वोनारेव्हा, मार्टिना हिंगीस, डिनारा सॅफिना आणि व्हिक्टोरिया अझरेंका यांच्यासारख्या रथी-महारथींना हरवून तिनं आंतरराष्ट्रीय टेनिसजगताला अचंबित केलं. अमेरिकन स्पर्धेच्या चौथ्या फेरीपर्यंतही ती झेपावली. २००७मध्ये ती एकेरीच्या जागतिक क्रमवारीत २७व्या क्रमांकावर होती. भारतीय महिला टेनिसपटूनं गाठलेला हा सर्वोच्च टप्पा आजही अबाधित आहे. पण मनगटाच्या दुखापतीमुळे तिनं एकेरीतून आपलं लक्ष्य दुहेरीकडे वळवलं. हाच निर्णय महत्त्वाचा ठरला.
लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार असताना सानिया असंख्य वादांमुळे चर्चेत राहिली. २००९मध्ये सानियाचा सोहराब मिर्झाशी साखरपुडा झाला. परंतु काही कारणास्तव हा विवाह मोडला. मग काही महिन्यांत सानियाचं क्रिकेटपटू शोएब मलिकशी प्रेमप्रकरण उघडकीस आलं. भारतीय तरुणीनं पाकिस्तानी व्यक्तीशी प्रेमसंबंध जोडण्याचं दाखवलेलं धारिष्ट्य तसं धक्कादायकच. १२ एप्रिल २०१० या दिवशी पारंपरिक हैदराबादी मुस्लिम पद्धतीनं त्यांचा शाही विवाह झाला. या विवाहाचा समारंभ जसा भारतात झाला, तसाच पाकिस्तानच्या सियालकोटमध्येही. हा विवाह देशातील असंख्य तरुणांना (त्यांची हृदयं चक्काचूर करून सानियाने ‘पाकडा’ निवडला म्हणून) रुचला नाही. त्यामुळे तिला दूषणंही दिली गेली. अगदी नवनिर्मित तेलंगण राज्यानं सानियाला सदिच्छादूत बनवलं, तेव्हाही ‘पाकिस्तानची सून देशातील राज्याचं प्रतिष्ठेचं पद भूषणवण्यास अयोग्य’ अशा शब्दांत तिची निर्भर्त्सना केली गेली. पण समाजाची तिने मुळीच पर्वा केली नाही. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावग्रस्त संबंधांत क्रीडाक्षितिजावर वावरत असताना कुठेही वैयक्तिक नातेसंबंध आड येणार नाही, याची तिनं काळजी घेतली.
२३ एप्रिल २०१८ या दिवशी सानियानं मुलाला जन्म दिला. शोएबनं ‘ट्विटर’वर ‘इजहान मिर्झा मलिक’ असं त्याचं नावही जाहीर केलं. सानिया-शोएबच्या मुलाचं नागरिकत्व भारताचं की पाकिस्तानचं, ही सुद्धा चर्चा त्यावेळी ऐरणीवर होती. भारतात जन्मल्यामुळे किंवा दोघांच्या एकत्रित निर्णयामुळे असेल, त्याचं नागरिकत्व सध्या तरी भारतीयच आहे. एका तपाच्या संसारानंतर गेले काही दिवस सानिया-शोएबचं बिनसल्याची आणि हे संबंध घटस्फोटापर्यंत पोहोचल्याचेही ऐकिवात आहे. अगदी ताजंच उदाहरण घ्या. ऑस्ट्रेलियन उपविजेतेपदानंतरच्या भावनिक भाषणात सानियानं कुटुंबीय, प्रशिक्षक, मित्र आणि टेनिस सहकार्यांना आपल्या प्रदीर्घ आणि वैभवशाली कारकीर्दीचं श्रेय दिलं. पण या श्रेयनामावलीत शोएबचं नाव कुठेच नव्हतं.
याशिवायही असंख्य वाद सानियाच्या कारकीर्दीत पाचवीला पुजलेले होते. २००६मध्ये इस्रायलचा टेनिसपटू शाहर पीरच्या साथीनं ती दुहेरीत खेळणार होती. परंतु मुस्लीम समाजातून कडव्या विरोधाच्या भीतीमुळे तिनं पीरसोबत खेळण्यास नकार दिला. वाद टळावे म्हणून व्यवस्थापकाच्या सल्ल्यानुसार फेब्रुवारी २००८पासून सानिया भारतातील टेनिस स्पर्धांपासून दूर राहू लागली. हे ग्रहण २०१०मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुटलं. २०१२च्या ऑलिम्पिकमध्ये महेश भूपती आणि रोहन बोपण्णा या दोघांनीही लिएण्डर पेसच्या साथीनं पुरुष दुहेरीत खेळण्यास नकार दिला. मग पेसनं सानियासह मिश्र दुहेरीत खेळण्याची मागणी केली. पण भूपतीसह दोन ग्रँडस्लॅम जेतेपदं जिंकल्यामुळे तिची पेसऐवजी भूपतीच्या साथीनं खेळायची इच्छा होती. पेसची मागणी मान्य झाली. या जोडीचं आव्हान मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं. पण अखिल भारतीय टेनिस संघटनेनं पेसला आनंदी राखण्यासाठी माझा वापर केला, अशी तोफ सानियानं डागली. २००८च्या बीजिंग ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या संचलनात सानियानं सुनिता रावच्या साथीनं ड्रेस कोडचं उल्लंघन केल्याचीही छायाचित्रे चर्चेत होती. पण सानियानं देशभक्तीपर विधानानं हे प्रकरण सावरलं.
सानियाचा जन्म मुंबईतला. वडील इम्रान मिर्झा हे क्रीडा पत्रकार तर आई नसीमाचा छापखाना. पण काही वर्षांतच या कुटुंबानं हैदराबादला स्थलांतर केलं. वयाच्या सहाव्या वर्षी सानियानं टेनिसचं रॅकेट हाती घेतलं, तेव्हा वडिलांचंच मार्गदर्शन तिला होतं. कालांतरानं टेनिसपटू रॉजर अँडरसन यांच्या मार्गदर्शनाखाली तिची कारकीर्द आणखी बहरली. २०१३मध्ये संयुक्त राष्ट्र संघानं दक्षिण आशियाची महिला सदिच्छादूत म्हणून सानियाची नियुक्ती केली, तर २०१६मध्ये ‘टाइम’ मासिकाच्या जगातील सर्वोत्तम १०० प्रेरणादायी व्यक्तींमध्ये तिचं नाव होतं. ब्रँड व्हॅल्यू आणि बक्षीस रक्कम या निकषातही देशातील अव्वल क्रमांकासाठी ती स्पर्धेत होती.
येत्या काही दिवसांत सानिया कारकीर्दीतील अखेरची टेनिस स्पर्धा खेळेल. पण ग्रँडस्लॅम क्षितिजावरील तिचा प्रवास संपला आहे. देशातील मुलींना हाती टेनिस रॅकेट घेण्याचं बळ देणारी सानिया पुढे काय करणार हा तसा प्रश्नच आहे. परंतु असंख्य उत्तरंसुद्धा तिच्या प्रतीक्षेत आहे. आज हैदराबादमध्ये सानियाची टेनिस अकादमी आहे. ती पुढील पिढीला घडवू शकेल किंवा तिच्या प्रतीक्षेतील चित्रपटसृष्टीत ती चमकेल, हे येणारा काळच ठरवेल.