महाराष्ट्रात अनेक पक्ष आहेत, राजकीय विचारधारा आहेत. प्रत्येकाचे अनुयायी आहेत. पण, सळसळत्या रक्ताची तरुणाई ज्यांच्याकडे आकर्षित झाली, असे दोन प्रमुख विचार होते. एक होता प्रबोधनकार ठाकरे यांच्या मुशीत घडलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मराठी बाण्याचा विचार आणि दुसरा होता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जागृत केलेल्या दलित समाजातील तरुणाईला भावलेला दलित चळवळींचा विचार. एकीकडे शिवसेना आणि दुसरीकडे दलित पँथर आणि रिपब्लिकन पक्ष ही सळसळत्या तरुणाईची ऊर्जाकेंद्रे होती. पण, जातपात न पाहता शिवसैनिक घडवणार्या बाळासाहेबांवर जातीयतेचा शिक्का मारला गेला आणि दलितांच्या एकगठ्ठा मतांसाठी त्यांना शिवसेनेच्या विरोधात उभं केलं गेलं. शिवशक्ती विरुद्ध भीमशक्ती असा संघर्ष महाराष्ट्राच्या हिताचा नाही, या दोन्ही शक्ती एकत्र आल्या पाहिजेत या विचारांनी बाळासाहेबांनी नेहमीच पुढाकार घेतला आणि दलित पक्ष, संघटनांबरोबर वेळोवेळी युती केली. रिपब्लिकन हत्तीवर स्वार झालेली शिवसेना मुंबईत काँग्रेसच्या महाराष्ट्रद्रोह्यांवर चालून गेली आहे, हे व्यंगचित्र पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या द्रष्टेपणाची साक्ष देऊन जाते… आज पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर आणि प्रबोधनकारांचे नातू उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत… शिवशक्ती आणि भीमशक्तीचा हा संगम मुंबई तोडू पाहणार्या महाराष्ट्रद्वेष्ट्यांना पळता भुई थोडी करेल, यात शंकाच नाही.