अब्दुल करीम बावलाच्या खून प्रकरणात तिघांना फाशी आणि चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पण त्याने पत्रकारांचं समाधान झालं नाही. त्यांना महाराज तुकोजीराव होळकर यांचाच बळी हवा होता. ब्रिटिशांच्या दबावामुळे त्यांना सत्ता सोडावी लागली आणि पुढचं आयुष्य युरोपात काढावं लागलं.
– – –
आपण आधी पाहिलंय की १२ जानेवारी १९२५ला मुंबई महापालिकेचा तरुण नगरसेवक अब्दुल करीम बावला याचा मलबार हिलवर खून झाला. त्याची रखेल मुमताज बेगम हिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला गेला. तिला वाचवण्यासाठी धावून आलेल्या ब्रिटिश लष्करी अधिकार्यांवरही गोळ्या झाडण्यात आल्या. मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभ्या करणार्या या हल्ल्यामुळे मुंबई पोलिसांनी ते आव्हान असल्यासारखं स्वीकारलं. त्यांनी वेगाने माग काढत गुन्हेगारांना शोधून काढलं. हल्ल्याचे धागेदोरे थेट इंदूरचे महाराज तुकोजीराजे होळकर तिसरे यांच्या राजवाड्यावर पोचले.
इंदूर दरबारचा एक अधिकारी शफी अहमद तर हल्ल्यात प्रत्यक्षच सापडला होता. त्यानंतर झालेल्या तपासात इंदूरचा उपसेनापती मेजर जनरल सरदार दिलेरजंग इतक्या पदव्या असणार्या आनंदराव फणसेला अटक झाली आणि देश हादरला. त्याआधी इंदूरहून संस्थानाच्या विमानदळाचा अधिकारी शंकरराव दिघे, दरबारचा मानकरी पुष्पशील पोंडे, मुमताज मोहम्मद हा संस्थानच्या सीआयडीचा सब इन्स्पेक्टर, अकबरशाह मोहम्मदशाह हा हुजर्या, करामत खान हा आणखी एक अधिकारी अशांना तर इंदूरहून बेड्या घालून मुंबईत आणण्यात आलं. बावलाचा ड्रायवर मोहम्मद शाह याला देखील हल्लेखोरांनी फितवलेला होता, या संशयाने त्यालादेखील अटक झाली होती.
मार्च महिन्यात चीफ प्रेसिडन्सी मॅजिस्ट्रेटसमोर तर एप्रिल महिन्यात मुंबई हायकोर्टमध्य खटला सुरू झाला. देशभरातल्या सगळ्या भाषांमधल्या वर्तमानपत्रांना या प्रकरणात सनसनाटी मसाला सापडला होता. त्याला फोडणी देण्यात मराठी आणि गुजराती वर्तमानपत्रं आघाडीवर होती. त्यामुळे खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला गर्दी होत असे. मुमताज तर आजच्या भाषेत सेलिब्रेटी बनली होती. पहिल्यांदा ती कोर्टात आली तेव्हा मुमताज, मुमताज अशा घोषणा झाल्या. तिच्या सौंदर्याची वर्णनं वर्तमानपत्रांत चवीचवीनं करण्यात आली. पुढच्या अंकात तिचा फोटो पाहा, अशा जाहिराती देण्यात आल्या. देशातले नामांकित वकील दोन्ही बाजूंनी उतरले होते. फणसेचा बचाव करण्यासाठी तर महंमद अली जिना होते. या खटल्याची इतकी चर्चा होती की जिनांच्या पत्नी रतनबाई उर्फ रुट्टी यादेखील आवर्जून सुनावण्यांना हजर राहत. मुमताजला मदत करण्याची त्यांची इच्छा होती. यावरून या प्रकरणाने किती हवा केली होती, याची कल्पना करता येऊ शकते.
शफी, दिघे आणि पोंडे हे तिघे प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी असल्याचे पुरावे होते. पण दिघे आपण याप्रसंगी उपस्थित नसल्याचं शेवटपर्यंत सांगत राहिला. आनंदराव फणसेला हा हल्ला आणि अपहरणाच्या प्रयत्नाचा सूत्रधार ठरवलं होतं. त्यावर त्याने सांगितलेली त्याची बाजू पूर्णपणे वेगळी होती. इंदूरहून सिमल्याला जाताना मुमताज दिल्लीहून पळून गेली होती. तेव्हा तिच्यासोबत असलेला दरबारचा अधिकारी शंकरराव गावडे याचा सहभाग संशयास्पद होता. तेव्हा त्याला तुकोजीरावांनी तुरुंगात टाकलं होतं. गावडे हा फणसेचा नातेवाईक आणि मित्र होता. त्यामुळे मुमताजला इंदूरला आणलं तर गावडेची सुटका होऊ शकेल, या हेतूने फणसेने प्रयत्न सुरू केले. त्याच्या मते मुमताज इंदूरला परत येण्यास इच्छुक होती. बावलाने रिवॉल्वरच्या धाकाने तिला डांबून ठेवलं होतं. त्यामुळे तिला परत नेण्यासाठी कायदेशीर प्रयत्न चालवले होते. मात्र हे काही कोर्टाला पटलं नाही. कोर्टाने शफी, दिघे आणि पोंडे या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली. सूत्रधार म्हणून फणसेला तसंच बहादूरशाह, अकबरशाह आणि अब्दुल लतिफ या हल्ल्यात सहभागी असणार्यांना जन्मठेप सुनावण्यात आली. गुन्हेगारांनी सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही शिक्षा कायम राहिल्या. १९ नोव्हेंबर १९२५ला शफी अहमद आणि शंकरराव दिघे यांना डोंगरीच्या तुरुंगात फाशी देण्यात आलं. फाशीची शिक्षा ऐकून पोंडेंची मानसिक स्थिती बिघडली. तो वेडा झाला. त्यामुळे त्याला येरवड्याच्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं.
खटल्यानंतर मुमताज बेगम अमृतसरला आई आणि सावत्र बापाकडे परतली. पण तिथे तिचे त्यांच्याशी खटके उडाले. ते मुंबईला गेलेले असताना तिने तिथल्याच एका श्रीमंत व्यापार्याशी लग्न केलं. तेव्हा बावलाच्या खुनाला फक्त एक वर्षं दोन महिने झाले होते. पुढे तीन वर्षांत हे लग्न मोडलं. मुमताज पुन्हा मुंबईला परतली. इथे ती ऑपेरा हाऊस, एडवर्ड थिएटरला गाण्याचे कार्यक्रम करू लागली. तिला आधीच हॉलिवुडच्या ऑफर येत होत्या म्हणे. त्यातली एक स्वीकारून ती हॉलिवूडला गेली. तिने हॉलिवुडमध्ये काय केलं, याची काही माहिती मिळत नाही. पण तिच्यावर एक कुलीन कांता नावाचा मूकपट आला होता. तो चांगला चाललाही.
इथे शिक्षा घोषित झाल्यानंतरही कोणत्याही गुन्हेगारांनी महाराज तुकोजीरावांचं नाव घेतलं नव्हतं. ते ना खटल्यातले आरोपी होते, ना त्यांच्याविरोधात कोणते पुरावे आले होते. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे ते स्वतंत्र नसले तरी एका संस्थानचे स्वायत्त राजे होते. त्यामुळे इंदूर दरबारच्या अधिकार्यांनी आखलेला कट इतक्यापुरतंच कोर्टाने आपल्या निकालाला सीमित ठेवलं. पण अगदी मोजके अपवाद वगळता देशभरातल्या वर्तमानपत्रांनी मीडिया ट्रायल आधीच केली होती. त्यात तुकोजीराजे आधीच दोषी ठरले होते. त्यामुळे कोर्टाने पूर्ण न्याय दिलेला नाही, अशी टीका काही वर्तमानपत्रं जोरात करू लागली. तुकोजीरावांनी अनेक वर्तमानपत्रांची तोंडं बंदही केली. पण आरोप थांबले नाहीत.
याचा फायदा घेऊन बावलाच्या गर्भश्रीमंत कुटुंबाने बदला घ्यायला ठरवला असं म्हणतात. ग्लान्सी नावाच्या मध्य भारतात कार्यरत असणार्या कारस्थानी अधिकार्याला त्यासाठी हाताशी धरलं गेलं. तुकोजीरावांच्या भोवती सर्व बाजूंनी जाळं आवळलं जात होतं. शेवटी गवर्नर जनरलने त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्याचा निर्णय घेतला. चौकशी नको असेल तर देश सोडून जाण्याचा पर्याय त्यांच्यासमोर होता. तुकोजीरावांनी कायदेतज्ञांचा सल्ला घेतला. त्यांच्या आध्यात्मिक गुरूचाही सल्ला घेतला. दुसरीकडे प्रबोधनकार, जागृतिकार भगवंतराव पाळेकर, हंटरकार खंडेराव बागल यांच्यासारखे मोजके सत्यशोधक पत्रकार मात्र या अडचणीच्या काळात त्यांची बाजू ठामपणे घेऊन उभे होते. प्रबोधनकारांचे मित्र, कोलकात्याच्या मॉडर्न रिव्यूचे संपादक रामानंद चटर्जी यांनीही मुमताजला विनाकारण हिरोईन बनवलं जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुण्यात तुकोजीरावांच्या समर्थनात सभा घेऊन त्यांनी देश सोडून जाऊ नये, अशी भूमिका घेतली.
पण तुकोजीरावांनी हार मानली. त्यांनी सत्ताच्युतीचा पर्याय स्वीकारला. वयाने अजाण असणारे युवराज यशवंतराव दुसरे यांना त्यांनी गादीवर बसवलं आणि देश सोडला. भारतीय पत्रकारांच्या ससेमिर्यापासून दूर राहण्यासाठी ते बराच काळ स्वित्झर्लंडमधल्या राजवाड्यात राहात. स्वित्झर्लंडमधल्या एका कॅसिनोत त्यांची भेट नॅन्सी मिलर या अमेरिकन तरुणीशी झाली. दोघे फ्रान्स आणि अमेरिकेत एकत्र फिरले. दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. त्यांनी लग्न करायचं ठरवलं. पण भारतातून होळकरांच्या धनगर समाजाने त्याला विरोध केला. तो मोडून काढण्यासाठी नॅन्सीला त्यांनी हिंदू धर्मात घेतलं. हा धर्मांतर विधी करण्यासाठी करवीर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांनी एक लाख रुपये दक्षिणा घेतली. तसंच त्यांना दर महिन्याला सहा हजार रुपयांचं मानधन देण्यात आलं. हा विवाह त्या काळात फार गाजला. धर्मांतरानंतर शर्मिष्ठाराजे झालेल्या नॅन्सींनी आपल्या प्रेमळ स्वभावाने सगळ्यांना जिंकून घेतलं. दोघांचा सुखाचा संसार झाला. तुकोजीरावांचा १९७८ साली पॅरिसमध्ये मृत्यू झाला.
भारतात अडचणीत असणार्या तुकोजीरावांचं युरोपात जाऊन एका अर्थाने भलंच झालं. मुमताजही स्वतंत्र झाली आणि हॉलिवुडला गेली. हल्लेखोर गुन्हेगारांना त्त्यांची शिक्षा मिळाली. तुकोजीरावांना सत्तेवरून हटवून बावलाच्या कुटुंबानेही आपला कथित बदला घेतला. तुकोजीरावांना ब्लॅकमेल करत अनेक पत्रकार संपादकांनी आपली घरं भरून घेतली. बावला मुमताज प्रकरणात सगळ्यांचा चांगलंच झालं. अपवाद फक्त प्रबोधनकारांचा. कोणताही स्वार्थ न ठेवता त्यांनी केवळ विचारांसाठी तुकोजीरावांची बाजू इतर कोणत्याही संपादकापेक्षा जास्त कळकळीने मांडली. पण त्यांच्या पदरी पडला तो फक्त एक बदनामीचा खटला. त्यासाठी कोर्टबाजीमुळे आधीच कफल्लक असणार्या प्रबोधनकारांना कर्जबाजारी होण्याशिवाय पर्याय नव्हता. या प्रकरणातल्या प्रबोधनकारांच्या संघर्षाविषयी पुढच्या भागात.
(या लेखातले बावला खून प्रकरणाचे सगळे महत्त्वाचे तपशील पत्रकार इतिहासकार धवल कुलकर्णी यांच्या द बावला मर्डर केस – लव लस्ट अँड क्राइम इन कलोनियल इंडिया या इंग्रजी पुस्तकातून साभार घेतले आहेत.)
– सचिन परब