मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास या डॉ. प्रवीण मस्तुद लिखित पुस्तकातील साप्ताहिक मार्मिकच्या स्थापनेचा परामर्श घेणारे हे प्रकरण…
– – –
बाळासाहेब ठाकरे हे पट्टीचे व्यंगचित्रकार असल्याने त्यांनी व्यंगचित्रांवर आधारित असे साप्ताहिक नियतकालिक चालू केले. त्याचा प्रभाव वाचकांवर पडणे साहजिक होते. व्यंगचित्रांना वाहिलेले असे त्याकाळी साप्ताहिक अथवा दैनिक वृत्तपत्र छापले जात नव्हते व आजही असे कोणतेही नियतकालिक नाही. त्यातच मार्मिक हे स्वतंत्र व्यंगचित्र साप्ताहिक चालू झाले. मराठी वृत्तपत्रांचा इतिहास या ग्रंथात रा. के. लेले यांनी नमूद केले आहे की ‘…दैनिकांचा साप्ताहिक आवृत्त्या साप्ताहिकांची गरज अधिकाधिक प्रमाणात भागवू लागल्यामुळे, साप्ताहिकांचे महत्त्व आणखी कमी झाले. ‘विविधवृत्त’, ‘मौज’ अशी स्वतंत्रपणे अनेक वर्षे चालू असलेली साप्ताहिके बंद पडली. पण एकेका क्षेत्रापुरती काही नवी साप्तहिकेही निघाली. चित्रपट, नाटक, क्रीडा इत्यादींचा परामर्श घेणारे ‘रसरंग’ साप्ताहिक याच काळात निघाले. शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचे ‘मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक त्यानंतर लगोलग निघाले.’
त्या काळी व्यंगचित्रांवर आधारित असे स्वतंत्र कोणतेही वृत्तपत्र नव्हते. त्यामुळे वाचकांमध्ये या पत्राचे महत्व वाढले. राजकीय व्यंगचित्रे वाचकांना जास्त भावतात. आपला भारत देश हा लोकशाही व्यवस्था स्वीकारलेला देश आहे, त्या मुळे आपल्या देशात अशी कोणतीही बाब ही अराजकीय असू शकत नाही. त्यामुळे येथील राजकारणाला खूप महत्व आहे. स्वत: बाळासाहेब ठाकरे हे राजकीय व्यक्तिमत्व होते. त्यांनी काही एक राजकीय भूमिका स्वीकारलेली होती. त्यामुळे त्यांनी काढलेल्या मार्मिकमध्ये तीही राजकीय व्यंगचित्रे छापली जाणे साहजिक होते. व्यंगचित्रांना महत्व देणारे असल्याने मार्मिकला व्यंगचित्रपत्र हा मान मिळाला पाहिजे याबाबत रा. के. लेले म्हणतात, ‘‘मार्मिक’ हे (१९६०च्या) कालखंडातील एक वैशिष्टपूर्ण साप्ताहिक होय. ‘व्यंगचित्र साप्ताहिक’ असे बिरूद मिरवीत हे साप्ताहिक जन्माला आले असल्याने व्यंगचित्रांना व व्यंगात्मक लेखनाला त्यात प्राधान्य राहात आले आहे. व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध पावलेले बाळासाहेब ठाकरे यांनी हे साप्ताहिक सुरू केले. त्याचा पहिला अंक १४ ऑगस्ट १९६० रोजी प्रसिद्ध झाला. बाळासाहेबांचे बंधू श्रीकांत ठाकरे हेही व्यंगचित्रकार असल्याने त्यांचेही सहकार्य या उपक्रमास प्रथमपासून आहे.
केवळ व्यंगचित्र व तत्सम मजकुराला वाहिलेले हे मराठीतील पहिलेच साप्ताहिक, असे म्हणता येणार नाही. गेल्या शतकाचा शेवटचा चरणात सुरू झालेले ‘हिंदु-पंच’ हे साप्ताहिक व्यंगचित्रात्मक होते. पण त्यातली चित्रे आजच्या व्यंगचित्रांसारखी नसत. चित्रे यथार्थ असत, व्यंगाचे विशेष दर्शन घडविणारी नसत. पण उपहास, टिंगल, टवाळी-दर्शन मात्र तीत असत. ‘हिंदु-पंच’ किंवा त्यावेळी ‘पंच’ हे नाव धारण करून निरनिराळ्या भाषांत जी पत्रे निघाली ती प्रामुख्याने इंग्रजी ‘पंच’ या साप्ताहिकाचा अनुकरणातून निघाली. ‘हिंदु-पंच’ पत्र बरेच गाजले व त्या पत्राने सुरू केलेली व्यंगात्मक चित्रांची व लेखनांची प्रथा महाराष्ट्रात बरीच सार्वत्रिक झाली. अनेक लहान-मोठ्या पत्रांतून त्यांचे अनुकरण झाले. चित्रकलेचा दृष्टीने परिस्थिती अनुकूल नव्हती. लाकडावर कोरून चित्रे छापावी लागत. शिळा छापाचाही उपयोग करण्यात येई. ही बाब अर्थातच कष्टाची असे, तरीही व्यंगात्मक चित्रांची व लेखनांची प्रथा महाराष्ट्रात बरीच सार्वत्रिक झाली. अनेक लहानमोठ्या पत्रांतून त्यांचे अनुकरण झाले. चित्रकलेचा दृष्टीने परिस्थिती अनुकूल नव्हती. लाकडावर कोरून चित्रे छापावी लागत. खिळा छापाचाही उपयोग करण्यात येई. ही बाब अर्थातच कष्टाची असे. तरीही व्यंगात्मक चित्रे देण्याची धडपड अनेक पत्रे करू लागली. अच्युतराव कोल्हटकर, अनंतराव गद्रे इत्यादी संपादकही अशी चित्रे आपल्या पत्रांतून देत, पण आजचे व्यंगचित्रांचे स्वरूप त्या चित्रांना तेव्हा आलेले नव्हते. चित्रे ढोबळ असत. थोड्याच रेषांत चित्र उभे करून व्यंगाचे मार्मिक दर्शन घडविण्याचे कसब तेव्हा साधलेले नव्हते. यामुळे ते प्रयत्न अपुरे होते. या दृष्टीने खर्या अर्थाने व्यंगचित्र साप्ताहिक हा मान ‘मार्मिक’ला देणे इष्ट ठरेल.’
रा. के. लेले व्यंगचित्रपत्र म्हणून मार्मिकला मान देणे इष्ट समजतात. कोणत्याही विशेषणाने पत्र चालू करावयाचे झाल्यास संपादक त्यामध्ये पारंगत असल्यास काहीही अडचण येत नाही. संपादक त्या त्या कलेमध्ये निपुण असल्यास त्याचा प्रभाव वाचकांवर चांगल्या प्रकारे पडण्याची शक्यता जास्त राहते. तसेच काहीसे मार्मिकचे झाल्याचे दिसते. ‘मार्मिक’चे संपादक बाळासाहेब ठाकरे यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये व्यंगचित्रे काढलेली होती. कित्ता या पुस्तकात नमूद केल्यानुसार त्यांना व्यंगचित्र काढण्याचा पहिला अनुभव प्रामुख्याने ‘प्रâी प्रेस जर्नल’ या इंग्रजी पत्रात मिळाला. आचार्य अत्रे यांच्या ‘नवयुग’मध्ये व पुढे ‘मराठा’ दैनिकातही त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध होत असत. त्यांच्या बंधुंची चित्रेही प्रसिद्ध होत होती. उत्तम व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष नाव झाले असल्याने, संपूर्ण साप्ताहिकच त्यासाठी चालविण्याचा आत्मविश्वास त्यांना वाटू लागला व ‘मार्मिक’चा जन्म झाला.
वृत्तपत्र चालू करताना ज्या जोशामध्ये वाचकांमध्ये जाण्याची अपेक्षा असते, त्याच पद्धतीने ‘मार्मिक’ वाचकांमध्ये गेले. ‘मार्मिक’कारांनी आपल्या पहिल्या अंकाच्या संपादकीयामध्ये ‘मार्मिक’ पत्र का काढले जाते, याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पण प्रबोधन, वाचकांवरील प्रेम, ज्ञान व मनोरंजनासाठी की पोटासाठी, असे प्रश्न निर्माण करून त्यात खरे उत्तर हे पोटासाठी अशी स्पष्ट भूमिका ते घेतात. त्यात असणारा उपहास, हसवण्याची निराळी पद्धती किंवा वाचकांपुढे जाताना आढेवेढे न घेता जे आहे ते मान्य करून वाचकांचा मनात स्थान निर्माण करण्याचा हेतू असल्याचे दिसते. ‘मार्मिक’चा पहिल्या अंकातील संपादकीय मथळा होता, ‘आम्ही तेच शोधीत आहोत’… त्यात म्हटले होते की, ‘‘हे साप्ताहिक आम्ही काढले, त्यामगचा उद्देश काय? असे एक (काल्पनिक) वाचक विचारतात. खरेच, काय बरे उद्देश? लोकशिक्षणार्थ म्हणावे तर हे काय १९वे शतक आहे थोडेच..! हे अगदी जुन्या वळणाचे ओबडधोबड उत्तर आणि ते द्यायचे तर आमचा डोक्यावर भले मोठे जात्याऐवढे पागोटे आहे कुठे? बरे जनता जनार्दनाचा सेवेकरिता? किंचित जुने आणि वरवर खरे उत्तर असले, तरी त्याला ही गांजा-भांगेसारखा किंचित उग्र दर्प आहेच आहे. तशात हेच उत्तर देऊन वेळ मारायची तर अंगावर खादीचा जाडजूड घोंगड्याचे रकटे वागविणार्यांनी ते दिल्यास शोभण्यासारखे आहे. ज्ञान आणि मनोरंजनासाठी? आहे हे एक अपटुडेड फॅशनचे उत्तर. पोटासाठी हे प्रमाणिक उत्तर. उगीच हे खरे उत्तर आणि आमचे उत्तर? अहो ‘तेच’ तर आम्ही शोधीत आहोत. वाचकांनी हातभार लावावा.’
हे संपादकीय जसे साधे मोकळे ढाकळे होते, तसेच त्यामध्ये छापलेले व्यंगचित्रही होते असे दिसते. रा. के. लेले लिहितात की ‘मार्मिक’च्या पहिल्या अंकाच्या मुखपृष्ठावर केंद्रीय मंत्री ‘मोरारजींची दहीहंडी’ हे व्यंगचित्र होते. याच अंकात ‘मराठा शिलेदाराला आमचे विनम्र प्रणिपात’ या मथळ्याखाली १३ ऑगस्टच्या आचार्य अत्रे यांचा वाढदिसानिमित्त एक निवेदन होते. त्या ‘प्रणिपाता’त म्हटले होते की, ‘मार्मिक’ हे त्यांच्या पितृवत उत्तेजनाचे पंख आहे आणि ते नवमहाराष्ट्राचा सेवेसाठी काया-वाचा-मने आपल्या करामतीची शिकस्त करीत राहील, ही त्यांनी खात्री ठेवावी… त्यांच्या त्या सेवेचा यज्ञात आम्हा दोघा बंधूंना नवयुग आणि ‘मराठा’मध्ये व्यंगचित्रांची त्यांनी जी छोटीशी कामगिरी देऊन आमचा कारागिरीला मनमोकळे उत्तेजन दिले, त्या ऋणाची भरपाई केवळ कृतज्ञ प्रणिपाताने होण्यासारखी नाही.
– बाळ आणि श्रीकान्त ठाकरे
मार्मिकने व्यंगचित्र साप्ताहिक अशी ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नांना साजेसे महत्वाचे काम केले ते म्हणजे मार्मिकच्या ‘पहिल्या अंकापासूनच विनायक कृष्ण जोशी यांची ‘व्यंगचित्र नियतकालिकांची महाराष्ट्रीय परंपरा’ ही लेखमाला सुरू झाली व ती पुढे सहाव्या सातव्या अंकापर्यंत चालू राहिली.’
प्रबोधनकार ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील होत. प्रबोधनकारांनी त्यांच्या हयातभर पुरोगामी लिखानांची मांडणी केली होती. कित्येक अभ्यासपूर्ण पुस्तके त्यांच्या लेखणीतून बाहेर पडली होती. प्रबोधनकार ही उपाधीच त्यामुळे त्यांना मिळाली होती. प्रबोधनकारांचे लिखाण हे वाचकांची शक्तीच, उर्जा, उत्साह व ज्ञान वाढवणारे असे. त्यानमुळे वाचकांना ‘मार्मिक’मध्ये अशा अभ्यासू पुरोगामी लेखकांचे लेखन मिळणे ही पर्वणीच होती. प्रबोधनकारांनी ‘मार्मिक’साठीही लिखाण केले दिसते. त्यामुळे मार्मिकची शक्ती प्रबोधनकार होते असे म्हणले तर वावगे ठरू नये. प्रबोधनकारांचा प्रभाव बाळासाहेबांवर असल्यानेच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध यांच्या ‘दोन महापुरुषांचे वैचारिक मिलन’ हे व्यंगचित्र रेखाटलेले दिसते.
लेले लिहितात की ‘केवळ व्यंगचित्राला वाहिलेले साप्ताहिक सुरू करण्याचे धाडस, आत्मविश्वासाने ठाकरे यांनी केले. पण त्यांचा आत्मविश्वास अनाठायी ठरला नाही. त्यांच्या साप्ताहिकाला चांगला प्रतिसाद मिळाला. ठाकरे बंधूंची व्यंगचित्रे लोकप्रिय झालेली होती. शिवाय, द. पां. खांबेटे यांच्यासारख्या सिद्धहस्त विनोदी लेखकाची साथ सहाय्यक म्हणून त्यांना मिळाली होती. प्रबोधनकारांनी आपले लेखणीने अनेक चमत्कार दाखविले होते. त्यांच्या लेखनाने साप्ताहिकांची शान वाढविली आणि जरूर तेव्हा दोन हात करण्यासाठी त्यांची लेखणी पट्ट्यासारखी ‘मार्मिक’च्या सहाय्याला आली. ‘मार्मिक’ पत्राचा पुढे आचार्य अत्रे यांच्याशी जो वाद झाला त्यात प्रबोधनकारांच्या हल्ल्यापुढे इतरांना लोळवणारे अत्रेही सपशेल चीत झाले. प्रबोधनकार ही यामुळे ‘मार्मिक’ची शक्ती ठरली.’
हास्य-विनोद हा मनावरील ताण कमी करतो. आजचे जग धावपळीचे व धकाधकीचे आहे, मानवी मनावर ताण वाढत आहेत. हास्याचे महत्व लक्षात घेत हास्य वर्ग भरवले जात आहेत. मनावर येणारा ताण, तणाव व त्रास कमी करण्यासाठी हास्यविनोदाचा उपयोग होतो. दिवसभराचा ताण एका विनोदाचा क्षणाने कमी होतो, असे आपण कित्येक वेळा अनुभवले आहे. त्यामुळे विनोदाचे महत्व आहे. मराठी भाषिक वृत्तपत्रीय व्यंगचित्रांचा इतिहास पहाताना आपणाला हे लक्षात येते की हास्यविनोदांचे महत्व लक्षात घेत वृत्तपत्रांनी व्यंगचित्रांना मानाचे स्थान आपल्या पत्रात देऊ केले. व्यंगात्म लिखाणाला त्याचमुळे वाव मिळाला. लेले लिहितात, ‘विनोद व विडंबनात्मक कलेमध्ये अशक्य गोष्टींचे दर्शन घडविण्यात येते, आणि त्यात शरीराला धक्के मिळाल्याने आणि खदखदून हसायला मिळाल्याने माणसांचा मनावरील ताण कमी होतो, आणि खेळकरपणामुळे मनाला मुक्त आनंद मिळतो, हेच खरे.’
बाळासाहेब हे संघटक होते. त्या बाबीचा वापर त्यांनी व्यंगचित्रकारांची संघटना बांधण्यातही केला. ‘कार्टूनिस्ट कम्बाइन’ ही मराठी व्यंगचित्रकारांची संघटना बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच अस्तित्वात आली. ३५ वर्षांत अनेक ज्येष्ठ व्यंगचित्रकारांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषवले आहे. या संस्थेतर्फे अनेक ज्येष्ठ व्यंगचित्रकारांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
– डॉ. प्रवीण मस्तुद