‘येस यंग मॅन, हाऊ आर यू?’ असं म्हणून श्यामबाबूंनी १९९३मधल्या त्या एका दिवशी माझं स्वागत केलं आणि थेट स्क्रिप्टच हातात ठेवलं… तो सिनेमा होता मम्मो, श्यामबाबू म्हणजे थोर दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि मी होतो नववीतला पुणेरी मुलगा… पौगंडावस्थेतला, तारुण्याच्या उंबरठ्यावरचा… त्यांच्या त्या ऊबदार स्वागताने मला एकदम रिलॅक्स केलं… आपण एवढ्या मोठ्या दिग्दर्शकासमोर आहोत, याचा दबावच काढून टाकला.
होय, श्यामबाबू हे किती मोठे दिग्दर्शक आहेत, हे मला त्या वयातही माहिती होतं. लहान वयापासून मी रंगमंचावर नाटकांत रमलो होतो. बालचित्रवाणीमुळे कॅमेर्यासमोर जाऊन पोहोचलो. फिल्म इन्स्टिट्यूटच्या अगणित डिप्लोमा फिल्म्समध्ये काम केलं. त्यातल्या एका फिल्ममध्ये मालतीबाई बेडेकर माझ्या आजी झाल्या होत्या आणि माझा डबल रोल होता. त्या फिल्मला सर्वोत्तम डिप्लोमा फिल्मचा पुरस्कार मिळाला होता. लहानपणापासून मोठ्या माणसांमध्ये वावरल्यामुळे मला माझ्या वयाचे मित्रच नव्हते फारसे. माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या माणसांबरोबरच मी अधिक रमायचो. फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये फिल्मच्या निमित्ताने होस्टेलवर पडीक असायचो. तिथे, नॅशनल फिल्म आर्काइव्ह्जच्या थिएटरमध्ये जगभरातले सिनेमे पाहायचो. त्यामुळे नववीत असलो तरी सिनेमाशी संबंधित होतो. श्यामबाबूंना ओळखत होतो.
१९९२ साली गोपी देसाई यांनी दिग्दर्शित केलेल्या मुझसे दोस्ती करोगे या सिनेमातल्या भूमिकेसाठी मला बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हा सिनेमा अनेक फेस्टिवल्समध्ये दाखवला गेला, त्याने अनेक पुरस्कार पटकावले. त्यानिमित्ताने मी अनेक शहरांमध्ये फिरलो, अनेक फेस्टिवल्स अटेंड केले आणि त्यातच कधीतरी श्यामबाबूंचा भूमिका मी पाहिला होता. त्यामुळेच एके दिवशी पुण्यात फोन वाजला, श्यामबाबूंच्या ऑफिसातून बोलावणं आलं, तेव्हा ही किती महान गोष्ट आहे, याची कल्पना मला होती. मी आणि आमचे दादासाहेब फाळके (म्हणजे माझे वडील हो) डेक्कन क्वीन पकडून निघालो. ताडदेवला श्यामबाबूंच्या ऑफिसात पोहोचलो.
तिथलं सगळं वातावरण सिनेमाने भारलेलं होतं, पण फिल्मी नव्हतं. मंथन, निशांत, अंकुर आदी सिनेमांची पोस्टर लागलेली होती भिंतींवर, लाकडी पॅनेल्स होती, भरभक्कम लायब्ररी होती. आत श्यामबाबू इतर कोणाशी तरी बोलत होते आणि मी, थोड्या टेन्शनमध्येच, ते मोकळे होण्याची वाट पाहात होतो. मम्मो या सिनेमात माझ्या आजीची भूमिका साकारणार्या सुरेखा सिक्रीही तिथे होत्या. पण त्या मुळातच अबोल. त्यामुळे हाय हॅलोपुढे गाडी गेली नाही. आतलं काम निपटवून श्यामबाबू बाहेर आले, प्रसन्न हसून ‘हॅलो यंग मॅन’ म्हणून हातात हात घेत त्यांनी माझं स्वागत केलं आणि माझं टेन्शन वितळून गेलं… (तसाही मी फार काळ कशाचंही दडपण वागवणारा मुलगा नव्हतो… नीट आगाऊ कॅटेगरीतच होतो… त्यात पुन्हा पुण्याचा. असो.)
गंमतीची गोष्ट म्हणजे आता माझ्या लक्षात येतंय की श्यामबाबूंनी ना माझा चेहरा सरळ, आडवा, इकडे तिकडे पाहून वगैरे निरखला, ना मला एखादा सीन करून दाखवायला सांगितला. त्यांनी मला जुजबी व्यक्तिगत माहितीच्या पलीकडे काही विचारलंही नाही. ऑडिशन, स्क्रीन टेस्ट वगैरे तर लांबच राहिलं. लेखिका शमा झैदी आणि संकलक रेणु सलुजा या मला आधीपासूनच ओळखत होत्या. त्यांनी माझं नाव श्यामबाबूंना सुचवलं असणार, असा माझा होरा आहे. मी कधी त्याची खातरजमा करून घेतली नाही. शिवाय, आदल्याच वर्षी मी बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार पटकावलाच होता की. त्यामुळे की काय, माझी निवडच होऊन गेली ताबडतोब.
अर्थात, आता हेही लक्षात येतंय की सिनेमात माझी आई बनलेली राजेश्वरी, भले एका सीनपुरती दिसत असली तरी तिचे डोळे माझ्या डोळ्यांसारखेच होते. शिवाय सिनेमातली आजी सुरेखा सिक्री, राजेश्वरी आणि मी, आम्हा तिघांचा स्किन टोन एकसारखा होता… म्हणजे आम्ही एका कुटुंबातले आहोत, हे दृश्यात्मकदृष्ट्या पटण्यासारखं होतं… एवढा विचार हिंदी सिनेमात होत नाही (अमर, अकबर, अँथनी हे तीन भाऊ पाहा, त्यांचा एकमेकांशी आणि आईवडील बनलेल्या कलाकारांशी काही नातेसंबंध आहे, हे बाहेर त्यांना पाहून कळेल का?), पण श्यामबाबू इतका बारीक विचार करायचेच. हे मला नंतर त्यांच्याबरोबर काम करताना समजलं. त्या दिवशी आलाच आहेस तर एक सीन वाचू या, असं म्हणून त्यांनी मी आणि सुरेखा सिक्री असा आम्हा दोघांनाही एक सीन वाचायला लावला आणि त्यानंतर थेट शूटिंगचीच चर्चा होऊन आम्ही परत निघालोही.
आपण श्याम बेनेगलांच्या सिनेमात काम करतो आहोत, आयुष्यातल्या दुसर्याच सिनेमात, वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी, हे काय होतं ते कळण्याचं तेव्हा वय नव्हतं… पण ते नंतर समजत गेलंच.
पुढे जाण्याआधी मुळात मम्मो हा सिनेमा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. टाइम्स ऑफ इंडियाचे प्रसिद्ध चित्रपट समीक्षक, नंतर फिल्मफेअरचे संपादक आणि त्यानंतर फिजा आणि अन्य काही सिनेमांचे दिग्दर्शक खालिद मोहम्मद यांच्या कथेवर आधारलेला हा सिनेमा होता. तो बर्यापैकी आत्मपर आहे. आपल्या आईवर झुबेदा हा सिनेमा त्यांनी नंतर लिहिला आणि तोही श्यामबाबूंनी दिग्दर्शित केला. त्यात मनोज बाजपेयी आणि करिश्मा कपूर हे प्रमुख भूमिकांमध्ये होते. मम्मो ही त्यांच्या एका दूरच्या नात्यातल्या अभागी आजीची कहाणी होती. ब्रिटिश भारतात तिचं लग्न नंतर पाकिस्तानात गेलेल्या भागातल्या माणसाशी झालं आणि फाळणीनंतर भारताची मुलगी असूनही नवरा पाकिस्तानी असल्यामुळे तिला आपल्याच देशात यायला व्हिसाची गरज पडायला लागली. ती मम्मो आजी छोट्या खालिदच्या म्हणजे सिनेमातल्या रियाझच्या घरी येते आणि तिची आणि रियाझची छान गट्टी जमते, असा तो सिनेमा. अर्थात तेवढ्यापुरता नसलेला, त्यापलीकडे मम्मोची परवड त्यात होतीच.
या सिनेमातला रियाझ साकारणं माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. मी पुण्यात मराठी माध्यमात शिकलो होतो आणि एका चाळवजा वाड्यात निम्न मध्यमवर्गीय घरात लहानाचा मोठा झालो होतो. सिनेमात संधी मिळाल्यामुळे मी वेगळ्या माणसांमध्ये वावरायला शिकलो होतो, पण रियाझचं घर (म्हणजे त्याचा अतिशय सुंदर सेट) म्हणजे माझ्यासाठी कल्चरल शॉकच होता. रियाझच्या घरात त्याला वेगळी खोली काय होती, पियानो काय होता, बाख, बीथोवन, मोझार्ट वगैरे मी कधीच न ऐकलेल्या कलावंतांचं संगीत तो काय ऐकायचा, त्याची सगळी संस्कृती वेगळीच. शिवाय तो इंग्लिश मीडियमचा, नव्हे, कॉन्व्हेंटचाच. या सिनेमात माझा मित्र दाखवलेला मुलगा कथीड्रल स्कूलमध्ये शिकत होता आणि मला तेव्हा कथीड्रलचा उच्चारही यायचा नाही. हे काय असतं ते माहिती असण्याचा तर प्रश्नच नाही. मम्मोमुळे दक्षिण मुंबईतल्या गर्भश्रीमंतांचं जग माझ्यासमोर आपसूक उलगडत गेलं.
श्यामबाबूंनी सिनेमा बर्यापैकी लिनियर पद्धतीने शूट केला. म्हणजे सिनेमात दृश्यं ज्या क्रमाने येतात, तोच क्रम बराचसा पाळला गेला. मी तसा शूटिंग या प्रकाराला सरावलो होतो तोवर, पण मला हा सेट कायमच फार वेगळा वाटायचा. अजिबात कणभराचीही बेशिस्त, असुंदरता आणि बेंगरूळपणा तिथे नसायचा. श्यामबाबू सेटवर दिग्दर्शन करतात म्हणजे काय करतात, हे बाहेरच्या कोणी पाहिलं असतं तर त्याला कळलंच नसतं. कारण सेटवर आल्यावर प्रेरणा होणं, स्फूर्ती येणं, अचानक स्फूर्तीदेवता प्रसन्न होणं वगैरे लाड त्यांच्याकडे अजिबात नव्हते, स्वत:चेही नाहीत आणि इतर कलावंतांचेही नाहीत. असं म्हणतात की कलेच्या बाबतीत कमालीचा उत्स्फूर्त आविष्कार हा रियाझातून, सरावातून, प्रचंड मेहनतीतूनच येतो, ती मेहनत आपल्याला दिसत नाही, हे कलाकाराचं यश. श्यामबाबूंचं पेपरवर्क अफाट असायचं. ते स्क्रिप्टवर प्रचंड काम करायचे. ते आणि लेखक, सहाय्यक वगैरे मिळून प्रत्येक सीन, प्रत्येक शॉटची काटेकोर आखणी करायचे. मला आणि सगळ्याच कलावंतांना स्क्रिप्ट आधीच मिळालं होतं. सगळं शूटिंग शेड्यूल पहिल्या दिवशी (होय, पहिली भेट झाली त्या दिवशी) माझ्या हातात दिलं गेलं होतं. सिनेमासाठी जेवढे दिवस मुक्रर केले होते, त्याच्या कितीतरी आधीच शूट पूर्ण झालं होतं आमचं. त्यात दोन दिवसांचा खाडा होऊनही. मला डोळे आल्यामुळे तेवढे दोन दिवस वेगळे सीन शूट झाले, माझं वेळापत्रक तेवढ्यापुरतं बदललं.
आता स्वत: टीव्ही, सिनेमा या सगळ्याच्या निर्मितीच्याच क्षेत्रात असल्यामुळे माझ्या लक्षात येतं की श्यामबाबूंचा सिनेमा हा ठराविक बजेटमध्येच तयार करण्याचं बंधन त्यांच्यावर कायमच होतं. ते काही सिल्व्हर ज्युबिली, गोल्डन ज्युबिली सिनेमे देणारे व्यावसायिक चित्रपट निर्माते, दिग्दर्शक नव्हते. त्यांचा सिनेमा एका वर्तुळापुरता मर्यादित राहणार, आशयघन सिनेमांची आवड असलेल्या प्रेक्षकांपर्यंतच पोहोचणार, हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे कोटीकोटींच्या थैल्या घेऊन उभे फायनॅन्सर नव्हते आणि श्यामबाबू कधी स्टारडम पाहून कलावंतांची निवड करत नव्हते. त्यामुळे स्टारवर पैसे लावण्याचाही विषय नव्हता. त्यामुळे कदाचित अंकुरच्या आखणीपासूनच श्यामबाबूंचं काम, खासकरून पेपरवर्क पक्कं असायचं. सगळं काही ठरलेलं असायचं सिनेमाचं प्रत्यक्ष शूट सुरू होण्याच्या आधीपासूनच.
आणखीही एक गोष्ट आता लक्षात येते की श्यामबाबूंनी प्रचंड काम करून ठेवलंय आणि फार वेगवेगळ्या प्रकारचं काम करून ठेवलंय. ते कसं जमलं असेल? ते त्या त्या वेळी तो तो विषय स्वत:त मुरवून घ्यायचे, त्या काळात तो सिनेमाच त्यांचं सर्वस्व बनायचा. मम्मोच्या वेळी मी पाहात होतो, ते त्या विषयाने झपाटलेले होते, सर्व वेळ त्या सिनेमातच होते. खातापिता, जागेपणी, झोपेत सतत तोच विचार करत होते. त्यामुळे स्क्रिप्टिंगच्या आणि शूटिंगचं शेड्यूल ठरवण्याच्या वेळेपर्यंत त्यांची इतकी आवर्तनं झालेली असायची मनातल्या मनात की तो सगळाच सिनेमा त्यांच्या मनाच्या पडद्यावर लख्ख उमटलेला असायचा. तसा तो कॅमेर्यातून उमटतो की नाही, हे ते पाहायचे.
त्यासाठी ते कलावंत निवडतानाच जो काय करायचा तो विचार करायचे. नंतर एकदा स्क्रिप्ट दिलं की रोजच्या ठरलेल्या सीन्सची पारायणं व्हायची. श्यामबाबू शिफ्टला सगळ्यांच्या आधी येऊन बसलेले असायचे. तिथून काम सुरू झालं की त्या दिवसात किती शूट करायचं आहे, ते होईपर्यंत काम करत राहायचं. येण्याची वेळ पक्की. जाण्याची वेळ काम संपल्यावरची. सिंपल फंडा. तर आधी आम्हा कलावंतांबरोबर ते सीनची तोंडी तालीम घ्यायचे. मग ब्लॉकिंग करायचे. म्हणजे कोणता सीन कोणत्या बाजूने शूट होणार, त्यात कॅमेरा कुठे असणार, कॅमेर्याची, व्यक्तिरेखांची हालचाल काय असणार, हे सगळं ठरायचं. त्यांच्याकडे व्ह्यूफाइंडर होता. हा कॅमेर्याच्या व्ह्यूफाइंडरचीच प्रतिकृती असलेला प्रकार. त्यातून पाहून ते आपल्याला कोणत्या आकाराचा शॉट हवा आहे, क्लोज अप आहे, मिड क्लोज आहे की लाँग शॉट आहे, ते ठरवायचे. मग ते सिनेमॅटोग्राफरला दाखवायचे. त्याप्रमाणे लायटिंग वगैरे झालं की शूटिंगला सुरुवात व्हायची. सगळ्यांच्याच डोक्यात स्पष्टता असल्यामुळे फारसे रिटेक व्हायचे नाहीत आणि ऐनवेळी सुचलं म्हणून अमुक केलं, असं श्यामबाबू कधीच करायचे नाहीत. मुळात सिनेमात स्वतंत्रपणे ‘दिसण्या’ची उथळ हौस असलेले दिग्दर्शक ते कधीच नव्हते.
मी युनिटमध्ये सगळ्यात लहान होतो. सुरेखा सिक्री रिझर्व्हड स्वभावाच्या. शिवाय सिनेमातही रियाझ आणि त्याची आजी यांचं काही पटत नाही फारसं. त्यांच्यात माझ्यात कायम अंतर राहिलं. मम्मो झालेल्या फरीदा जलाल मात्र खरोखरच्या मम्मोसारख्याच प्रेमळ, लाघवी. त्या फार लाड करायच्या माझे. माझ्याशी खूप गप्पा मारायच्या, किस्से सांगायच्या. आजही कुठे भेटलो की तसाच गालावरून हात फिरवतात, मायेने जवळ घेतात.
श्यामबाबूंची मात्र तशी काही आठवण नाही माझ्याकडे. मी लहान आहे, संस्कारक्षम वयात आहे म्हणून माझ्यावर त्यांनी बळजबरीचा कसलाच संस्कार केला नाही. मी त्यांच्या आसपास राहून काही ना काही शिकेन, याची त्यांना खात्री असेल किंवा कदाचित ती आपली जबाबदारी आहे, असं त्यांनी कधी ठरवलंच नसेल (अशी समजूतदार मोठी माणसं जगात किती कमी असतात, हे त्या वयाचं कोणतंही मूल तुम्हाला सांगेल). माझी इच्छा असो वा नसो, मला काही ना काही शिकवू पाहणारे शिक्षक माझ्या आसपासही असतीलच तेव्हा. श्यामबाबूंनी तो अट्टहास कधी केला नाही. ते माझ्यासाठी दूरस्थ पण प्रेमळ हेडमास्तरसारखे होते. हेडमास्तरांना तुमच्या गुणांचं कौतुक असतं, तुमच्यावर प्रेमही असतं, पण ते शिक्षकांइतकं थेट नातं नाही. श्यामबाबूंचा दबदबाच एवढा होता की त्यांच्या सेटवरच्या सगळ्यांना ते अंतर, त्यांचा मोठेपणा जाणवायचा आणि लोक त्यानुसारच वर्तन करायचे. मीही त्यांना पाहून शिकायचो. त्यांच्याशी गप्पा छाटत बसण्याची आपली कुवत नाही, हे मला माहिती होतं आणि आम्हा सगळ्यांना तसा रिकामा वेळ कुठे होता?
मम्मोचं चित्रिकरण संपलं, सगळ्यांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. ‘करीब’मध्ये विधू विनोद चोपडांच्या दिग्दर्शनात काम केल्यानंतर मी अभिनयापासून दूर झालो आणि सिनेमा-टीव्हीच्या तांत्रिक बाजूकडे वळलो, निर्मितीकडे वळलो. त्या काळात अनेकदा श्यामबाबूंची भेट व्हायची. ते नेहमी ‘यंग मॅन’ असं म्हणून हसून बोलायचे. मला प्रत्येक वेळी सांगायचे, अरे, मला सारखं वाटतं तुझं आणि दादासाहेब फाळके यांचं काही नातं असणार. मी त्यांना नेहमी सांगायचो की आमचं काहीही म्हणजे काहीही नातं नाही. ते मम्मोच्या काळात तर अनेकांना गंमतीने सांगायचे की एक फाळके काम करतोय पाहा माझ्या सिनेमात. दरवेळी भेटल्यावर ते माझी आस्थेने विचारपूस करायचे. मी अभिनय सोडला म्हणून त्यांनी कधीही हळहळ व्यक्त केली नाही. मी कॅमेरामागच्या जगात वावरतो आहे, याचा त्यांना आनंद होता, तोही यासाठी की मी माझ्या आवडीचं काम करतोय, त्यात मला आनंद मिळतोय, म्हणून. मला खात्री आहे की मी या क्षेत्रापेक्षा वेगळ्याच क्षेत्रात असतो, तरी त्यांना तेवढाच आनंद झाला असता. त्यांना मी आनंदात आहे ना, आयुष्य एन्जॉय करतोय ना, समाधानी आहे ना, हे अधिक महत्त्वाचं वाटत होतं.
त्यांच्या निधनानंतर मी अंतिम दर्शनाला गेलो. किती शांत झोपल्यासारखे दिसत होते ते. नुकताच ९०वा वाढदिवस त्यांनी त्यांच्या लाडक्या कलावंतांबरोबर साजरा केला होता. त्यांना पूर्वसूचना मिळाली असणार. त्यांनी किती शांत स्वीकार केला मृत्यूचा. तसं कृतार्थ जीवनही लाभलं होतं त्यांना. त्यातले काही क्षण मी त्यांच्यासोबत होतो, हे माझं केवढं मोठं भाग्य होतं, ते मला आज पदोपदी जाणवतं आणि माझ्या वाटचालीत मला कायम उपयोगीही पडतं…
श्यामबाबूंचा यंग मॅन त्यासाठी त्यांचा कायमचा ऋणी आहे!
– अमित फाळके