वैष्णवी पुण्यात राहणारी… इथल्या एका प्रसिद्ध महाविद्यालयात ती पदव्युत्तर शिक्षण घेत होती. रोजचा कॉलेज आणि अभ्यासासाठीचा वेळ सोडला तर तिच्याकडे खूप वेळ उपलब्ध होता. त्या फावल्या वेळात पैसे मिळवावेत, शिक्षणासाठी आणि इतर खर्चांसाठी वापरावेत, असा विचार तिच्या मनात आला होता. त्यासाठी ती पार्ट टाइम कामाच्या, व्यवसायाच्या शोधात होती.
एके दिवशी सकाळी मोबाईल पाहत असताना तिला एक मेसेज आला. ‘सिनेमाचे परीक्षण लिहा, घरबसल्या पैसे मिळवा… यासाठी तुम्हाला यूट्युबवर दिलेल्या लिंकवर याचे प्रात्यक्षिक पाहता येईल…’ हा मेसेज वाचल्यावर वैष्णवीला आनंद झाला. ही चांगली संधी आहे, असा विचार करून तिने लिंकवर क्लिक केले. मुळात सिनेमा हा तिच्या आवडीचा विषय. त्यावर ती सोशल मीडियात लिहीत होतीच. हे आवडीचं काम करण्याचे कोणी पैसे देत असेल तर मग काय बहारच की! तिने लिंक उघडली आणि मला या कामात रस आहे, असं कळवलं…
…ही तिच्या आयुष्यातल्या एका थरारक सिनेमाची सुरुवात होती…
…काही वेळाने तिला व्हॉट्सअपवर एक मेसेज आला, त्यात तिला टेलिग्रामच्या एका ग्रुपवर जॉईन होण्यास सांगितले गेले. ती लगेच तिथे जॉइन झाली. सुरुवातीला १० जणांचा ग्रुप होताच. त्यांच्याशी गप्पागोष्टी झाल्या चॅटिंगच्या माध्यमातून. त्यांच्यातल्या काहींनी या लेखनातून आपल्याला फार चांगला फायदा होत असल्याचे सांगितले. त्यामुळे वैष्णवीने लगेच त्यांनी सांगितल्याप्रमाणे एका वेबसाईटवर आपले अकाऊंटही उघडले.
त्यानंतर तिला एक मेसेज आला, ‘तुम्हाला जर अधिक पैसे कमवायचे असतील तर पाच हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.’ काम सुरूही झालेलं नाही, कामाचे पहिले पैसेही आले नाहीत, त्याआधी आपल्याकडूनच पैशांची मागणी होते आहे, यात काहीतरी गडबड आहे, हे वैष्णवीने तेव्हाच ओळखायला हवं होतं. पण ती आवडीचं काम आणि त्यातून पैसे मिळवण्याच्या धुंदीत होती. टेलिग्रामवरच्या अनोळखी माणसांनी सांगितलेल्या भाकडकथांवर तिने विश्वास ठेवला आणि अधिक पैशांच्या लालसेपोटी पाच हजार रुपये गुंतवूनही टाकले. त्यामधून महिन्याला ३० हजार रुपयांचा निव्वळ नफा होईल, तुमचे गुंतवलेले पाच हजार रुपयेदेखील परत मिळतील, असेही तिला सांगण्यात आले होते. त्याने ती वेडी झाली होती.
पहिल्या दिवशी तिने सिनेमाचं परीक्षण लिहिण्याचं काम केले, त्यामधून तिला २५० रुपयांचा फायदा झाला. दुसर्या दिवशी तिने काम वाढवले त्यामुळे तिला एका दिवसात दीड हजार रुपये मिळाले, त्यामुळे ती भलतीच खुश झाली. तुम्हाला टास्क पुरा करून अधिकचे पैसे मिळवायचे असतील तर १० हजार रुपये भरा, असा मेसेज तिला आला. आपल्याला चांगले पैसे मिळत आहेत, याचा विचार करून तिने १० हजार रुपये ऑनलाइन भरले. दुसर्या दिवशी तिने पाच ते सहा तास काम करून भरपूर लेखन केले, त्यानंतर तिसर्या दिवशी तिला २१ हजार रुपयांचा फायदा झाल्याचे दिसत होते. एवढ्या कमी काळात इतका फायदा झाला, नोकरीपेक्षा हे काम भारीच आहे, असे तिला वाटू लागले. तिने बाबांकडून एक लाख रुपये उसने घेतले. आपण टास्क पूर्ण करू अधिक पैसे मिळवू आणि अगदी सहजपणे पैसे परत करू, असा विश्वास तिला तिच्या खात्यात दिसणार्या २१ हजार रुपयांनी दिला होता. तिने त्या खात्यामधले पैसे काढण्याचा प्रयत्न केला, पण ते पैसे काही निघत नव्हते. इथेही ती सावध झाली नाही. तेव्हा तिने टेलिग्रामवर चौकशी केली तेव्हा, तुम्हाला पैसे काढायचे असतील तर किमान ८ टास्क पूर्ण करावे लागतील, असे सांगण्यात आले. टास्क पूर्ण करण्याच्या नादात वैष्णवी पैसे भरत गेली आणि ती रक्कम २० लाखाच्या पुढे गेली. तिच्या खात्यात ४० लाख रुपये दिसत होते. आठ टास्क पुरे झाले होते, म्हणून तिने पैसे काढण्यासाठी पुन्हा एकदा टेलिग्रामकडे विनंती केली. पण त्यावर कुणीच काही बोलत नव्हते, म्हणून तिने गुगलवर याबद्दल सर्च करून माहिती घेतली, तेव्हा हा सगळा फसवणुकीचा प्रकार असल्याचे तिला समजले, या प्रकारामुळे तिच्या पायाखालची वाळूच सरकली होती.
गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी तिने सायबर तज्ज्ञाची मदत घेण्याचे ठरवले, तिने त्याबाबत गुगलवर शोध घेतला. तेव्हा एक मोबाईल क्रमांक दिसला, तिने त्यावर फोन केला. पण समोरून काहीच उत्तर आले नाही, त्यामुळे ती हताश झाली. काही वेळाने तिला दुसर्या मोबाईलवरून फोन आला, तुमचे व्यवसायात अडकलेले पैसे तुम्हाला अगदी सहजपणे मिळवून देतो. तुमचे किती पैसे अडकले आहेत, त्यावर वैष्णवी म्हणाली, ४० लाख रुपये. त्याच्या १० टक्के रक्कम मला फी म्हणून द्यावी लागेल. ओके, चालेल, असे म्हणून तिने त्या सायबर एक्स्पर्टला काम सुरु करण्यास सांगितले. गेलेले पैसे पुन्हा मिळवण्यासाठी सायबर एक्स्पर्टला चार लाख रुपये देण्याकरता वैष्णवीने त्या पैशाची तरतूद करण्यास सुरवात केली. दुसर्या दिवशी त्या सायबर एक्सपर्टचा फोन आला, मॅडम तुम्हाला बँक डिटेल्स पाठवतो, त्यामध्ये दोन लाख रुपये टाका. वैष्णवीने विश्वास ठवून त्यामध्ये पैसे टाकले. त्यानंतर वैष्णवीला फोन आला, आम्ही इन्कम टॅक्समधून बोलत आहोत, तुमच्या खात्यात ४० लाख रुपये दिसत आहेत, ते कुठले आहेत, त्यावर तुम्हाला कर भरावा लागेल. तिने पुन्हा त्या सायबर एक्सपर्टशी संपर्क साधला आणि हा प्रकार सांगितला, त्यावर पुढे प्रकरण वाढेल म्हणून तुम्ही कराची जी काही रक्कम दिसते आहे, ती भरून टाका, असा सल्ला तिला दिला. आता कुठे वैष्णवीला संशय आला, हा आपल्याला असे का सांगतोय. त्यामुळे तिने हा सगळा प्रकार नवर्याला सांगितला. त्याने त्याच्या मित्राला सांगितले, तेव्हा या सगळ्यामध्ये वैष्णवीची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले होते. वैष्णवीने लाखो रुपये सायबर चोरट्यांना दिले होते. तिने या सगळ्या प्रकारची सायबर पोलिसांकडे तक्रार केली.
पोलिसांनी या प्रकाराचे गांभीर्य पाहून याचा तपास केला तेव्हा, हा सगळा प्रकार नायजेरियातून होत असल्याचे समोर आले होते. पण वैष्णवीने पैसे जिथे भरले होते, त्या बँका ओरिसा, राजस्थान पश्चिम बंगाल या भागातल्या असल्याचे निष्पन्न झाले होते. ज्या खात्यात तिने पैसे भरले होते, ती खाती अनोळखी लोकांची असल्याचे तपासात पुढे आले होते. त्यापैकी एका खात्यात २० हजार रुपये राहिले होते. पोलिसांनी हा प्रकार सांगितल्यावर बँकेने त्या खात्यात असलेले २० हजार रुपये गोठवले होते. हा सगळा प्रकार करणारे ठग विदेशातून अशा प्रकारची फसवणूक करत आहेत, सध्या हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे.
हे लक्षात ठेवा…
– व्हॉट्सअप, टेलिग्राम यासारख्या माध्यमातून अनोळखी लोकांशी कोणतंही बोलणे करणे टाळा.
– अशा प्रकारच्या फसवणुकीचा प्रकार हा अॅडव्हान्स फी फ्रॉड प्रकारात येतो. त्यामध्ये गुगल मॅप सर्च करा, ट्विटरवर लाईक करा, प्रॉडक्ट प्रमोशन करा, त्याचा रिव्ह्यू लिहा, हे सगळे प्रकार या फसवणुकीच्या प्रकारात येतात.
– असे कुठे काही पाहण्यात आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्याबाबत आलेल्या कोणत्याही लिंकला क्लिक करू नका. सायबर स्पेसमध्ये वावरताना आपण अधिक सतर्क असणे आवश्यक आहे हे विसरून चालणार नाही.