कुणी परदेशी पंचतारांकित हॉटेल भारतातून अशी बाईक ‘बनवून’ घेत असतील, तर याचा अर्थ आपण आता बाईक मॉडिफिकेशन क्षेत्रात जागतिक दर्जाचं काम करतो आहोत. थोडी अधिक माहिती घेतल्यावर कळलं की हे काम मराठा मोटरसायकल ब्रँडचे श्रीकांत दळवी यांनी केलं आहे. लोकांच्या स्वप्नातील बाईक बनवून देण्याचं काम जिथे चालतं, ते त्यांचे अंधेरीतील वर्कशॉप हे ठिकाण जगाला स्वप्नं दाखवणार्या यशराज स्टुडिओपासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर आहे, हा एक विलक्षण योगायोग.
– – –
‘भारतातून मालदीवमधील एका पंचतारांकित हॉटेलात सहा बाईक्सना सुपर बाईक बनवून निर्यात केलं गेलं,’ ही बातमी लक्ष वेधून घेणारी होती. सर्वसामान्यपणे हार्ले डेव्हिडसन, हायाबुझा अशा महागड्या आणि हाय फाय सुपर बाईक भारतात आयात केल्या जातात, यात काही नवीन नाही. पण कुणी परदेशी पंचतारांकित हॉटेल भारतातून अशी बाईक ‘बनवून’ घेत असतील, तर याचा अर्थ आपण आता बाईक मॉडिफिकेशन क्षेत्रात जागतिक दर्जाचं काम करतो आहोत. थोडी अधिक माहिती घेतल्यावर कळलं की हे काम मराठा मोटरसायकल ब्रँडचे श्रीकांत दळवी यांनी केलं आहे. त्यांना भेटायला त्यांच्या अंधेरी वर्कशॉपमध्ये पोहचलो. लोकांच्या स्वप्नातील बाईक बनवून देण्याचं काम जिथे चालतं, ते ठिकाण जगाला स्वप्नं दाखवणार्या यशराज स्टुडिओपासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर आहे, हा एक विलक्षण योगायोग.
वर्कशॉपबाहेर तीन सुपर बाईक उभ्या होत्या, तर आत दोन बाईकचे सांगाडे होते. एक तरूण डोळ्यांवर गॉगल घालून बाईकच्या चॅसिसचे जोडकाम करत होता. मला पाहून त्यांनी ओळख करून दिली, मी श्रीकांत नरसिंग दळवी. त्यांना विचारलं, मुळात सुपर बाईक म्हणजे काय? त्यावर श्रीकांत म्हणाले, ‘अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे, ६५० सीसीपेक्षा अधिक इंजिनक्षमता असलेली, वेगाच्या बाबत वार्याशी स्पर्धा करणारी आणि युनिक डिझाईनची बाईक म्हणजे सुपर बाईक. पण माझं काम केवळ सुपर बाईकपुरतं मर्यादित नाही, तर बाईक मॉडिफिकेशन, कस्टमायझेशन हे देखील माझ्या कामाचा भाग आहेत.’
ते बोलू लागले… ‘मला लहानपणापासूनच बाईक्सचं वेड होतं. खेळण्यातल्या असोत वा रस्त्यावर धावणार्या बाईक्स मला खिळवून ठेवायच्या. माझं बालपण चेंबूरला गेलं. चेंबूर नाका तेव्हा आताएवढा गजबजलेला नसायचा, तिथे जाणं ही माझ्यासाठी पर्वणी असायची. बस, टॅक्सी, स्कूटर, लूना, यांच्या भाऊगर्दीत क्वचित एखादी फटफटी (बुलेट) दिसली की तो माझा आनंदाचा दिवस. आमचं चौकोनी कुटुंब, आई बाबा आणि आम्ही दोन भाऊ. आई शकुंतला ही गृहिणी तर वडील सायन हॉस्पिटलमध्ये एक्स-रे टेक्निशियन. त्यांची इच्छा होती की मी इंजिनिअर व्हावं. दहावीनंतर भारती विद्यापीठ खारघर इथे इन्स्ट्रूमेंटेशन डिप्लोमाला प्रवेश घेतला. पण त्यात मला रस वाटेना. मला हे जमत नाही असं घरी सांगितल्यावर सुरुवातीला घरी धक्का बसला, पण पोरवय म्हणून घरच्यांनी समजून घेतलं. डिप्लोमा शिक्षण सोडून, दुसर्या कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावीनंतर एमआयटी, पुणे यांची मरीन इंजिनियरिंगची प्रवेश परीक्षा दिली. तिथे सिलेक्शन झालं. मर्चंट नेव्हीमध्ये पगार लाखांत मिळतो. तिथे नोकरी मिळाली तर मुलाच्या आयुष्याचं भलं होईल म्हणून वडिलांनी त्यांची जमा पुंजी माझ्या शैक्षणिक खर्चासाठी वापरली. सव्वा लाख रुपये दर सहामाहीची फी होती. मरीन इंजिनियरिंग अकॅडमीत अभ्यासासोबतच सेल्फ ग्रुमिंग सेशन्स असायचे. कडक इस्त्रीचा पांढरा शुभ्र गणवेश, पॉलिश केलेले शूज. रोजची ड्रिल इथलं शिक्षण शिस्तीत सुरू होतं. अभ्यासाशी संबंधीत मासिके कॉलेजात नियमित यायची, ती वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना दिनक्रमात वेळ दिला जायचा. त्यातही गाड्यांच्या इंजिन्सविषयीची मासिके माझ्या आवडीची होती. माझं ड्रॉइंग आणि टेक्निकल नॉलेज चांगलं होतं. पण दुसर्या वर्षाला मी अभ्यास करूनही दोन विषयांत नापास झालो. अभ्यास करून पुन्हा परीक्षा दिली, चांगल्या निकालाच्या अपेक्षेत होतो, पण पुन्हा फेल झालो, तेव्हा मी निराशेच्या गर्तेत सापडलो. सोबतचे मित्र पुढे चालले होते. वाईट वाटत होतं, डिप्लोमा सोडला, मरीन इंजिनियरिंगला यश मिळत नाही, आता तेही सोडावंसं वाटतंय असं घरी कोणत्या तोंडाने सांगू, हा विचार यायचा. पुढील काही महिने काहीही न करता घरी बसून काढले. बाबा काही बोलत नसले तरीही त्यांची निराशा लपून राहिली नव्हती. मीही निराश होतो, पण हातावर हात ठेवून काही होणार नाही, आपला मार्ग आपल्यालाच काढायचा आहे हे कळत होतं आणि माझ्यासाठी अपयशी होण्याचे सगळे पर्याय आता संपले होते, मी ठरवलं होतं, यापुढे इतकं यश मिळवायचं की हा ठपका धुवून निघाला पाहिजे.
आईला माझी तगमग कळत होती. तिचं प्रेम आणि माझ्याबद्दलचं निरीक्षण यांनी मला मार्ग दाखवला. लहानपणापासून मला काय आवडतं, आणि त्यातलं काय मला आता करता येईल, हे आईने मला दाखवून दिलं. त्यातूनच माझी ऑटोमोबाइलबद्दलची आवड पुन्हा समोर आली. डिस्कव्हरी चॅनलवरचे अमेरिकन चॉपर, मॉन्स्टर गॅरेज हे कार्यक्रम मी आव्ाडीने बघत असे. मरीन इंजिनियरिंग करताना पहिली तीन वर्षं मेकॅनिकलचा अभ्यासक्रम होता. त्यामुळे गाड्यांचे पार्ट, इंजिन्स, त्यांचे फंक्शन हे सगळं मला माहिती होतं. या क्षेत्रात काहीतरी करणं मला जमेल असं वाटतं होतं. तेव्हा भारतातील बाईक मॉडिफिकेशन क्षेत्रात अक्षय वर्दे यांच्या ‘वर्देंची मोटरसायकल’ बोलबाला होता. बाईकचा कायापालट कसा केला जातो, याचा अंदाज मला होता, पण प्रत्यक्षात हे काम कसं होतं आणि ते करताना काय काय अडचणी येतात हे मला वर्देंची कंपनीत शिकायला मिळेल याची खात्री होती. पण यावेळी मला घाईगडबडीत निर्णय घ्यायचा नव्हता. लहान भाऊ श्रीनाथ याच्याशी चर्चा करून मी ठरवलं की मेकॅनिक्स आणि वर्कशॉपचा वर्षभराचा कोर्स पूर्ण करून मग ‘वर्देंची मोटरसायकल’ला नोकरीसाठी अर्ज करायचा. वर्षभर नेटाने प्रयत्न करून मी कोर्स पूर्ण केला आणि नोकरीसाठी अर्ज केला.
मला अजून आठवतंय, शुक्रवारी सकाळी माझी मुलाखत होती. धीरज गवई यांनी मला विचारलं, ‘वर्देंची मोटरसायकल’ बद्दल काय माहिती आहे?’ या कंपनीचा मी फॅन होतो.
कंपनी सुरू झाल्यापासून ते मुलाखतीच्या आदल्या रात्रीपर्यंत कंपनीची प्रगती, निर्णय, प्रोजेक्ट्स सगळ्याची मी खडान्खडा माहिती ठेवून होतो. त्यांना ओझरती लक्षात असेल अशी माहितीही मी तारखेनिशी मी बोलून दाखवली. सर खूश झाले. म्हणाले, ‘कामावर यायची वेळ सकाळी दहाची आहे, पण कामावरून घरी जाण्याची वेळ फिक्स नसेल. कधी कधी रात्री वर्कशॉपमधेच राहावं लागेल. काम जास्त असेल तेव्हा रात्रंदिवस काम करण्याची तयारी ठेव.’ मेहनत करायला कधीही मागे न हटण्याचा माझा स्वभाव होता. राहायला बेलापूर नवी मुंबईला होतो, अपडाऊनसाठी बराच वेळ लागणार होता, तरीही मी या गोष्टींना होकार दिला, कारण काम आवडीच होतं. दोन मुलाखती देऊन मी इंटर्न आणि क्वालिटी कंट्रोल ऑफिसर म्हणून जॉईन झालो. माझ्यासारख्या नवख्या मुलाला अधिकाराची जागा मिळणे आत्मविश्वास वाढवणारे होते. पण वर्षांनुवर्षे हेच काम करून त्यात माहीर झालेल्या कारागिरांना, एका कालच्या पोराला रिपोर्टिंग करणं जड जात होतं. अडीच महिने काम केल्यावर मी या नोकरीचा निरोप घेतला.
पुढे काय करायचं याचा विचार करत असताना एका मेकॅनिक मित्राच्या ओळखीने एक काम आलं. क्राईम ब्रँचचे ऑफिसर हरीश ठाकूर यांना कस्टमाईज गाडी करून द्यायची होती. गाडी कशी बनवायची ते आता मला माहिती होतं, पण स्वतःचं वर्कशॉप नव्हतं. पहिलीच ऑर्डर हातातून जाऊ द्यायची नव्हती. हा माझ्या व्यवसायाचा श्रीगणेश होता. मी विचार केला, माझ्या क्लाएंटला माझ्याकडून काय हवं आहे, तर उत्तम प्रॉडक्ट; माझं स्वत:चं वर्कशॉप आहे का, याच्याशी क्लायंटला काही देणंघेणं नाही. क्लायंटला अपेक्षित डिझाईन, पार्ट्स यावर चर्चा झाल्यावर मी कामाचा ताळेबंद कागदावर मांडला. या कामाला दीड लाख रुपये खर्च येणार होता. एकदा विचार आला की नवीन व्यवसायासाठी घरून पैसे मागावे का? पण, वडिलांनी आधीच त्यांच्या ऐपतीच्या बाहेर जाऊन माझ्या शिक्षणाचा खर्च केला होता, त्यामुळे घरी पैशाचा विषय काढणं टाळलं. माझं डिझाईन आणि माझा उत्साह यावर ग्राहक खूश होते. मी कामाचे सहा टप्पे कागदावर मांडले आणि त्यातील पहिल्या कामाचे पैसे अॅडव्हान्स मागून घेतले. नंतर जसं जसं काम पूर्ण होत गेलं, तसतसे मी पैसे घेत गेलो. बेलापूरच्या एका वर्कशॉपमध्ये काम सुरू झालं. या कामासाठीचे पार्टस, त्यांचं मशिनिंग, पेंटिंग, फिनिशिंग या सगळ्याचे अपडेट्स मी वेळोवेळी क्लायंटला दिले. ही सवय मी अजुनही पाळतो. गाडी तयार झाली तेव्हा ते ऑफिसर अगदी खूश झाले. गाडी दिसायला आणि चालवायला एकदम मस्का होती.
मी बनवलेल्या पहिल्याच बाईकचं खूप कौतुक झालं. ठाकूर सरांना अनेकांनी बाईक कुठून बनवून घेतली हे विचारलं. माझ्याकडेही विचारणा होऊ लागली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ‘अपनी गाडी तो निकल पडी.’ काही दिवसांतच मला पुढचा प्रोजेक्ट मिळाला. इनक्वायरीज पण वाढत होत्या, त्यामुळे लहान का असेना पण स्वतःची जागा असणं आवश्यक होतं. जोगेश्वरीला यशराज स्टुडिओजवळ मला हवी तशी जागा मिळाली, माझ्याइतक्याच डेडिकेशनने आणि घड्याळाच्या काट्यावर नजर न ठेवता काम करणारे अविनाश पवार, राहुल धनुरे हे कारागीर मिळाले. या जागेत २०१६ला आलो.
मॉडिफाय केलेली दुसरी गाडी होती क्लासिक ५००. तिसरी गाडी होती रॉयल एनफिल्ड थंडरबर्ड. या गाडीला बॉबर स्टाईलमध्ये रेडी केली. या रुपांतरित गाडीचं रौद्रा असं नामकरण केलं. मॉडिफाइड गाडीला आम्ही तिच्या गुणविशेषांनुसार नवीन नाव देतो. गाडी मशिनिंग फेजमधे असते तेव्हा काम करायला छोटी जागा चालते किंवा वेगवेगळ्या जागांमध्ये काम करणं शक्य असतं. पण गाडी असेंबल करायची असते, तेव्हा ती एकाच जागेत व्हायला हवी. नशिबाने, रौद्रा असेंबल करतेवेळी आम्हाला बाजूच्या गॅरेजची जागा दोन दिवसांसाठी मिळाली, त्यामुळे ते काम सुरळीत पार पडलं. त्यानंतर एकदम तीन गाड्यांची ऑर्डर आली. दरवेळी असेंबल करताना जागेचा जुगाड कसा जमणार म्हणून मोठी जागा घेतली.
एखाद्या बाईकचा कायापालट कसा होतो? श्रीकांत म्हणाले, ‘एकदा डिझाईन पक्क झालं की मूळ गाडीत कुठे आणि किती बदल करायचा हे ठरवावं लागतं. पाईप्स कुठल्या धातूचे, दीर्घकाळ टिकून राहणारे, गाडीला एक स्टर्डी लुक देतील, चकाकी कायम ठेवतील असे धातू निवडावे लागतात. यासाठी मेटॅलर्जीची माहिती हवी. माझी अभियांत्रिकी पार्श्वभूमी असल्याने मी हे करू शकतो. ग्राफिक डिझाईन हा भाग प्रचंड इंटरेस्टिंग असतो. अगदी साध्या लुनापासून पुष्पक विमानापर्यंत किंवा बॅटमोबिलपर्यंत (बॅटमॅनची कार) आपण हवं ते डिझाईन कागदावर चितारू शकतो. ते प्रत्यक्षात उतरवायला टेक्निकल बेस, मेहनत आणि पॅशनेट टीम हवी. डिझाईन-फ्रेमिंग-फॅब्रिकेशन झाल्यावर गाडीची मॉक टेस्ट होते. क्लाएंटने गाडी त्याला हवी तशी आरामदायी आणि बेसिक लुकची आहे असं अप्रुवल दिल्यावर, पेंट फायनल होतो. वेगवेगळ्या रंगछटा वापरून एक फायनल केली जाते. त्यानंतर गाडीचे भाग पुन्हा सुटे करून, त्या प्रत्येक भागाचं फिनिशिंग, पेंटिंग, पावडर कोटिंग, क्रोमिंग केलं जातं आणि मग गाडी फायनली असेंबल करून, शंभर ते तीनशे कि.मी.ची टेस्ट ड्राइव्ह घेऊन मगच तिच्या मालकाकडे सुपूर्द केली जाते.
आता वाढत्या मशिनरी, टेक्नॉलॉजी, आणि तुमची पॅशन, मेहनत वापरून तुम्ही कुठल्याही गाडीचं रूप पालटून टाकू शकता. पण, मी या क्षेत्रात आलो तेव्हा पल्सरला हायाबुझा बनवणं आणि बुलेटला हार्ले डेव्हिडसन बनवणं एवढंच मर्यादित काम या क्षेत्रात होत असे. काहीवेळेला जुनी स्कूटर किंवा १२५ सीसी क्षमतेचं इंजिन असलेल्या टू व्हीलर सुपर बाईकसारख्या करून मिळतील का अशी इनक्वायरी यायची, तेव्हा मी त्यांना सांगत असे, की इंजिनची कपॅसिटी ६५० सीसी नसते, तेव्हा
कॉस्मेटिक कस्टमायजेशन करता येतं. म्हणजे रंगाची वेगळी छटा, मिरर, लाइट्स, सीट यात बदल करून गाडीला युनिक लुक देता येतो. म्हणजे गाडी दिसायला सुपर बाईकसारखी युनिक, आकर्षक, आरामदायी असेल पण वेग सुपरबाईकचा नसेल.’ कॉस्मेटिक कस्टमायजेशनची डिमांड करणाराही एक मोठा वर्ग आपल्याकडे तयार होतो आहे.
सुरुवातीपासूनच माझ्या कामाचा गाभा मी कस्टमायझेशन हाच ठेवला आहे. मास प्रॉडक्शन मी करत नाही, कारण माझ्याकडे येणार्या ग्राहकाला युनिक, त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी, आरामदायी गाडी हवी असते. ही डिमांड मास प्रॉडक्शन भागवू शकत नाही. यासाठी कस्टमरसोबत चर्चा करून गोष्टी ठरवाव्या लागतात. माझं काम कलाकारी असलेलं आणि युनिक आहे त्यामुळे क्लाएंट मला शोधत येतात.
बॉबर, चॉपर, स्क्रंबलर, कॅफे रेसर या मॉडेल्सला ग्राहकांची पसंती आहे. त्याव्यतिरिक्त ग्राहकाचं व्यक्तिमत्व आणि गाडीचा संभाव्य वापर लक्षात घेऊन त्यात बदल केले जातात. म्हणजे एखाद्या ऑफिसरला अशी बाईक हवी असते, जी शनिवारी ऑफिस पार्टीलाही नेता येईल आणि सोमवारी सकाळी बोर्ड मीटिंगलाही नेता येईल. तिथे इम्प्रेसिव्ह लुक हवा. कॉलेज विद्यार्थी, तरुणांना गाडीही आपल्याप्रमाणेच मेकओव्हर आणि ग्रूमिंग केलेली लागते. तिथे ब्राईट कलर, डोळ्यात भरणार डिझाईन यांना पुरेपूर वाव असतो. गाडीचा लुक आणि फंक्शन कसं मेन्टेन करायचं हे ग्राहकाला शिकवावं लागतं.
मनात आणलेली गाड्यांची प्रतिसृष्टी मी उभारू शकतो, ही गोष्ट मला समाधान देते. अनेक प्रयोग आणि चुका करत मी शिकत गेलो, अजूनही शिकतोय. त्याआधीही बर्याच अपयशांना सामोरे जाऊन मग मी या क्षेत्रात आलो होतो. त्यामुळे यातून मिळालेलं यश खास आहे. ज्या दिवशी पहिल्या ऑर्डरचं पेमेंट आईला नेऊन दिलं, तेव्हा आई सुखावली. मी करत असलेल्या कामाबद्दल बाबांना मात्र अजून तितकीशी खात्री नव्हती. २०१७ साली रॉयल एनफिल्डने आयोजित केलेला रायडर्स मॅनिया हा कार्यक्रम गोव्यात होता. तोवर माझं काम बाईक्सच्या जगतात प्रसिद्ध झालेलं असल्याने, या कार्यक्रमासाठी रॉयल एनफिल्डने मला निमंत्रित केलं होतं. त्याचवेळी बाबा आणि त्यांचे काही मित्र गोव्यात सहलीसाठी म्हणून आले होते. एक दिवस त्यांनी माझ्या इव्हेंटला भेट दिली. बाबा इव्हेंटला आले, त्याच वेळेस एका मराठी चॅनलवर माझा लाइव्ह इंटरव्यू घेतला जात होता. ते बघून आपला मुलगा करत असलेले काम विशेष आहे अशी बाबांची खात्री झाली. तो इंटरव्यू टेलिकास्ट झाला तेव्हा अनेक नातेवाईकांनी बाबांना अभिनंदनाचा फोन केला आणि त्यांची खात्री पटली की आपला मुलगा आता योग्य मार्गावर आहे.
आधी आई, बाबा, भाऊ आणि आता माझी पत्नी विशाखा यांनी मला नेहमी पाठिंबा दिला आहे. आमचा प्रेमविवाह. विशाखा इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. माझ्या कामाच्या (अ)वेळा ती समजून घेते, एकहाती घर चालवते, यामुळे मी कामात लक्ष देऊ शकतो. सुरुवातीला नातेवाईकांना, बाईक मेकॅनिक आणि माझ्या कामात काय फरक आहे ते माहित नव्हतं. मी सांगायचो बाईक मेकॅनिक फक्त दुरुस्ती करू शकतो, मॉडिफिकेशन करू शकत नाही आणि मी दोन्ही करू शकतो. गाडी नादुरुस्त झाल्यावर मेकॅनिक तिचा अभ्यास करतो, तर मी गाडी लाँच झाल्यापासून त्या गाडीच्या इंजिनला कुठलं डिझाईन साजेल, याचा विचार करत असतो. डुकाटी पानीगलेसारख्या सुपर बाईक थंड प्रदेशात गुळगुळीत रस्त्यांवर चालवण्याच्या दृष्टीने बनवलेल्या असतात. भारतासारख्या उष्ण तापमानाच्या देशात विकसनशील रस्त्यांवर सुपर बाईकचा परफॉर्मन्स ढासळतो. त्यामुळे मॉडीफिकेशन करताना बाईक कुठल्या वातावरणात रस्त्यांवर चालवली जाणार आहे, हे मला आणि बायकरला माहित असणं आवश्यक आहे. मी ट्रान्सफॉर्म केलेल्या बाईकने रायडर्स लेह-लडाखपर्यंत जाऊन आले आहेत. अशा बाइक्स बनवताना स्टोरेज स्पेस अधिक ठेवणं, दीर्घकाळ गाडी चालवण्याच्या दृष्टीने सीट आरामदायी करणं, उत्तम प्रतीचे टायर्स, लाईट या सगळ्या बाबींचा विचार केला जातो.
लोकांना वाटतं, कस्टमायझेशन म्हणजे गाडीत बेकायदेशीर बदल करणे. पण मी सुरुवातीपासूनच सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. रस्त्यावरून जाताना नजर आकर्षून घेणारी बाईक हवीच, पण ती तांत्रिकदृष्ट्याही सक्षम हवी. बाईकच्या वेगाच्याही आधी येते ती सुरक्षितता. कर्कश हॉर्न, डोळ्यांना त्रासदायक रंगबेरंगी लाईट, सूर्यप्रकाश परावर्तित करून अति चमकणारी प्रâेम, हे सगळं आम्ही टाळतो. मिलिटरीचे रंग सिविलीयन बाइक्सला देणं बेकायदा आहे. ग्राहकाला सेफ रायडिंगचा आनंद घेता यायला हवा. ब्रँडनेमबद्दल विचारल्यावर श्रीकांत उत्साहाने सांगू लागले, ‘मराठा या नावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठ्यांचा इतिहास मोठा रोमहर्षक आहे. त्यांना मानवंदना म्हणून मी माझ्या ब्रँडचं नाव मराठा मोटरसायकल असं ठेवलं. लोगोमधल्या तलवारी म्हणजे इतिहास, धातू म्हणजे आम्ही वापरत असलेली साधने आणि पंख हे आमच्या भरारीचं प्रतीक आहे.
बाईकला चकाकी देताना, हात काळ्या रंगाने माखतात. पेंटची अॅलर्जी, पेंट फ्युम्समुळे होणारे श्वसनविकार, दिवसरात्र एक करून काम करणं याचा प्रकृतीला त्रास होऊ शकतो. काहीवेळा अनपेक्षित संकट येऊ शकतं. पण केलेलं काम तुम्हाला तारून नेतं.
२०१८च्या रॉयल एनफिल्ड रायडर्स मॅनियाच्या वेळी गोव्यात मी जी गाडी सादर करणार होतो, त्या ग्राहकाने ऐनवेळी ती न्यायला मनाई केली. मॅनिया केवळ तीन दिवसांवर आला होता, एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर सादर करायची ती बाईक विशिष्ट प्रकारची हवी. तशीच एक बाईक मी जालन्याचे ग्राहक आदेश कोटेचा यांना बनवून दिली होती. त्यांनी बाईक स्पर्धेत पाठवण्यासाठी होकार दिला, अडचण एकच होती. बाईक मला स्वत:ला आणावी लागणार होती. परत येताना अहमदनगर-पुणे हायवेला माझ्या पुढे असणार्या चारचाकीने जागच्या जागी यू टर्न घेतला, मी सावध असल्याने झटकन ब्रेक दाबला, पण मागून येणारी अल्टो माझ्या गाडीवर आदळली. गाडीची चॅसी मागच्या बाजूने पूर्ण दाबली गेली आणि मी विमानातल्या खुर्चीसारखा पेटीपॅक झालो. बघ्यांनी मला गाडीतून बाहेर यायला मदत केली, तेव्हा मला खरचटलंही नव्हतं. मी सुरक्षित होतो कारण गाडीची बांधणी उत्तम होती. काम तारून नेतं ते असं. गाडी मुंबईला आणून, आवश्यक ते बदल करून रायडर्स मॅनियात सादर केली.
रॉयल एनफिल्ड रायडर्स मॅनियामध्ये सन्मान मिळाल्यावर देशविदेशांतून बाईक कस्टमायझेशनच्या ऑर्डर्स येत होत्या. पण कोविडच्या पहिल्या लाटेत व्यवसाय पूर्ण ठप्प झाला. काम बंद होतं तरी माणसांचा पगार, जागेचे भाडे देणे भाग होतं. त्याच वेळी वडिलांना कोविड झाला. त्यांच्यासोबत मी हॉस्पिटलमध्ये थांबलो होतो. लॉकडाऊन उघडला तरी वडिलांची तब्बेत ठीक झाली नव्हती. ऑर्डर्स थांबल्या होत्या. त्या पूर्ण करण्यासाठी मी सर्वात विश्वासू कारागीराच्या हातात संपूर्ण व्यवसाय सोपवला. पण माझ्या गैरहजेरीचा फायदा घेत त्याने जवळच स्वत:चं वर्कशॉप उघडून माझे ग्राहक पळवले. याचा खूप मन:स्ताप झाला, शिवाय आर्थिक नुकसान सहन करावं लागलं ते वेगळं. वडिलांची तब्येत खालावून ते देवाघरी गेले. मलाही कोविड झाला. आजारपणातून बाहेर येऊन पुन्हा शून्यातून व्यवसायाची जुळवाजुळव केली. काही महिन्यांनी माझा जम पुन्हा बसला आणि त्या कारागिराला त्याचं वर्कशॉप बंद करावं लागलं. त्याने पुन्हा कामावर ठेवा अशी विनंती केली, पण आता त्याच्यावर विश्वास टाकणं शक्य नव्हतं. व्यवसायाच्या सर्व किल्ल्या कोणालाही द्यायचा नसतात हा धडा मी या प्रकरणात शिकलो.
व्यवसायाच्या गाडीने आता पुन्हा वेग घेतला आहे. येणारे ग्राहक इंस्टाग्राम पेजवरील बाईक डिझाईन बघून, यापेक्षा वेगळी आणि आकर्षक बाईक बनवून द्या अशी मागणी करतात. अशी नवीन आव्हाने पेलायला मला आवडतं आणि हीच माझी खासियत आहे.
अपयशांना शरण न गेलेल्या श्रीकांत नरसिंग दळवी यांचा हा प्रवास त्यांच्या सुपर बाईकसारखाच सुपर्ब आहे. आवडीला व्यवसाय म्हणून निवडलं, त्याला कष्ट व कौशल्याची जोड दिली, तर यशाची सुपर बाईक चौखूर उधळणारच.