बर्फाळ प्रदेशात किंवा पावसात नायक-नायिका थंडीने काकडून गेल्यावर आधी शेकोटी पेटवतात आणि नंतर एकमेकांच्या ऊबेत शिरतात… रखरखीत वाळवंटात रोमान्स कसा करत असतील मग?
– गौतम डहाणूकर, पेण
आधी ऊब घेऊन नंतर थंड होत असतील… आवड आपापली…
बोलताना सतत आईवरून शिव्या देणारे लोक मदर्स डे कसा साजरा करत असतील?
– प्रतिमा बारस्कर, कणकवली
आईवडिलांना जिवंतपणी त्रास देणारे, आईवडील गेल्यावर त्यांचे दिवस घालतात, तसेच हे मदर्स डे साजरा करत असतील.
मुलगी पळून जाण्याची धमकी देते, तेव्हा आईवडिलांनी काय करावं?
– अशोक परब, सावरकर नगर, ठाणे
जा… जी ले अपनी जिंदगी म्हणून तिला जाऊ द्यावं… मुलीने आपल्याला फाट्यावर मारलं, असं लोकांना बोलायला चान्स देऊ नये.
ऑडिओ प्लेयरवर किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश यांच्या सुरात सूर मिळवून मी गातो, तेव्हा माझ्या लक्षात येतं की त्यांचा सूर कधी कधी चुकतो, कधी कधी त्यांचे शब्द पण चुकतात. असे कसे मोठे गायक बनले हे?
– प्रसाद चौधरी, बंडगार्डन रोड, पुणे
कारण तुम्ही त्यांना गुरू म्हणून भेटला नाहीत… लोकांना पण असंच पाहिजे… नको त्यांना डोक्यावर घेतात. आपल्यासारख्याला कुत्रंही विचारत नाही… म्हणून मी गात नाही.
पुरूष पाच मिनिटांत पाच शर्ट खरेदी करून मोकळे होतात, बायका पाच तास फिरून एकही साडी किंवा ड्रेस खरेदी न करता कशा बाहेर पडू शकतात?
– अब्दुल मोमीन, सांगली
घाईघाईत गोष्ट निवडली की आयुष्याचं काय होतं हे लग्न करून बायकांना कळलेलं असतं. तशी चूक त्यांना साडीच्या बाबतीत करायची नसते… आणि पुरुष काय, शर्ट न घालता पण बाहेर फिरतील. म्हणून बायकांनी पण तसंच करायचं का? तुमच्यासारखे पुरुष असं करतात म्हणून बायका तशा वागतात.
तुम्ही चहा पिता, कॉफी पिता, कोको पिता, मारामारी पिता की इतर काही?
– तनुजा गवई, नवी दिल्ली
तुम्ही पाजाल ते!
तुमचा आवडता प्राणी कोण? कुत्रा की मांजर?
– शार्दूल पाटील, पेणकर पाडा, मिरा रोड
पाळीव प्राण्याला आवड निवड असते का? मालकिणीला जे आवडेल ते आवडून घ्यावं लागतं.
भारतीय लोक स्वातंत्र्य देण्याच्या योग्यतेचे नाहीत, असं ब्रिटनचा पंतप्रधान विन्स्टन चर्चिल म्हणाला होता, तुमचं काय मत त्याबद्दल?
– सौरभ सूर्यवंशी, जिंतूर
त्या चर्चिलला पाकिस्तानात पाठवला पाहिजे. त्याची ईडी, सीबीआय चौकशी केली पाहिजे. त्याच्यावर गावागावात देशद्रोहाच्या केसेस केल्या पाहिजेत. त्याला घर खाली करायची नोटीस पाठवली पाहिजे. तो कोर्टात जाऊन जिंकला, तर त्याच्यावर अध्यादेशच आणला पाहिजे… फक्त आधी हा चर्चिल कोण ते कळलं पाहिजे!
युद्धात किंवा दंगलीत कधीच कोणत्याही मोठ्या नेत्याचा मुलगा किंवा जवळचा नातेवाईक कधीही मारला जात नाही, असं का?
– आरती गंधे, यवतमाळ
मोठे नेते जगावेत म्हणूनच युद्ध किंवा दंगली घडवल्या जातात… मग त्यात ते किंवा त्यांचे नातेवाईक कसे मरतील?… आणि ते मेलेच, तर मग त्यांना मदत कोण जाहीर करणार? काय गंधे ताई, एवढ्या साध्या गोष्टीचा गंध नाही तुम्हाला??
तुम्ही इथे इतके हजरजबाबी आहात, बायकोपुढे पण इतकेच हजरजबाबी असता का हो?
– दत्ताराम जाधव, महाड
मी हजरजबाबी असेन, पण एकाच वेळी हजार जबाब नाही देऊ शकत!
तुम्हाला रेडिओवर तुमच्या मनातल्या गुजगोष्टी लोकांना सांगण्याची संधी मिळाली, तर तुम्ही त्या कार्यक्रमाला नाव काय द्याल?
– मयूर पेठकर, अमरावती
उत्तर माझे.. प्रश्नही माझेच..
खबरदार प्रश्न विचाराल तर..
मीच आहे माझ्या जीवनाचा चित्रकार..
यातलं तुम्हाला जे पटेल ते तुम्हीच नाव ठेवा… (मी दुसर्यांच्या कार्यक्रमाला नावं ठेवत नाही… मग माझ्याच कार्यक्रमाला कसा नावं ठेवेन?)