आनंद दिघे या पंचाक्षरी मंत्राने दोन दशकांहून अधिक काळ ठाण्यासह महाराष्ट्र व शिवसेनेला मंत्रमुग्ध केले होते. अवघ्या ४९ वर्षांच्या आयुष्यात या अवलिया महापुरूषाने असंख्य लोकांच्या आयुष्यात वसंत फुलवला. असंख्य लोकांना नोकरी व स्वयंरोजगार मिळवून दिला. त्यांच्या न्यायालयात आलेल्याला वाडा, मोखाडा, पालघर, जव्हारसारख्या दुर्गम भागातील अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला. स्वत: एका फकिरासारखे जगले, परंतु असंख्य कार्यकर्त्यांचे जीवन फुलवले व समृद्ध केले. असंख्य जोडप्यांची लग्नं लावून दिली, प्रसंगी कन्यादानही केले; मात्र स्वत: अविवाहित राहून शिवसेनेस वाहून घेतले. त्यांना पितृत्व लाभले नाही, परंतु त्यांनी शिवसैनिकांवर पित्यासारखे प्रेम केले. प्रसंगी पित्याचा धाकही दाखवला. असंख्य भगिनींचे ते भाऊ होते, निराधारांचे आधारस्तंभ होते, साधुसंतांचे आश्रयदाते होते. ते नाथपंथीय होते, त्यांचे व्यक्तिमत्व गूढ होते. त्यांच्यात प्रचंड अशी आध्यात्मिक शक्ती होती.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे दैवत होते. त्यांचा आदेश प्रत्यक्षात आणणे हा त्यांचा धर्म होता. देव, देश व धर्म रक्षण करणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा ते मान राखत. त्यांना शिवसैनिक व चाहत्यांचा आग्रह कधीच मोडवत नसे. काळवेळाचे बंधन झुगारत व स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून ते आपल्या चाहत्यांचा मान राखण्यासाठी धावून जात असत.
आनंद आश्रम हे आधारतीर्थ होते. पवित्र तीर्थक्षेत्र होते. देवस्थानातही वेळेचे बंधन असते. परंतु, आनंद आश्रम हे आठवड्याचे सातही दिवस २४ तास कार्यरत असे. निवांत बोलायचे असेल तर रात्री दोन वाजता ये, असे ते मला सांगत. असं हे समाजमन जपणारं, समाजसेवेचे अग्निहोत्र २२ वर्षांपूर्वी निमालं. आपल्या चाहत्याच्या आग्रहाखातर मध्यरात्री ते गणेशदर्शनासाठी जीपने निघाले व एका बसने त्यांच्या जीपला धडक दिली. त्यात त्यांचा पाय जायबंदी झाला. त्यांचे हृदय आधीच कमकुवत झाले होते. आणि उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आला आणि आमचा आनंद हिरावला गेला. संतप्त चाहत्यांनी सिंघानियाची होळी केली. दिघे साहेबांचे पार्थिव पोलीसांच्या देखरेखीखाली रूग्णालयाच्या खाली स्टाफने आणले व तेथून टेंभी नाक्यावर अंतिम दर्शनासाठी ठेवले. त्यावेळी सतत वाजत असलेली हे राम, हे राम, जगमे है साचो नाम, ही धुन आजही कानात घुमत आहे. याचे अनेक साक्षीदार आजही हयात आहेत.
परंतु, दिघे साहेबांचा परिसस्पर्श होऊन रिक्षा ड्रायव्हरचा अब्जोपती झालेला गद्दार जो स्वत:ला दिघेसाहेबांचा स्वयंघोषित पट्टशिष्य म्हणवतो, त्याने दिघे साहेबांच्या अपघाती मृत्यूचे राजकीय भांडवल करण्याचा केलेला प्रयत्न गिधाडांनाही लाजवणारा आहे. काय तर म्हणे त्याने शिष्यपौर्णिमा केली, काय तर म्हणे सिंघानिया जळत असताना त्याने स्वत:च्या खांद्यावरून दिघे साहेबांचे पार्थिव आणले? नंतर नंतर तर कहरच केला. तब्बल २१ वर्षानंतर या गद्दाराला साक्षात्कार झाला की दिघे साहेबांचा मृत्यू हा घातपाताने झाला! त्यानंतर त्याचा आमदारही त्याचीच री ओढू लागला. दिघे साहेब, तुमच्या आनंदवनात अशी विषवल्ली पोसली गेली व ती आत्ता बांडगुळाचा धर्म निभावत आहेत.
साहेब, या गद्दारांना तुमच्या दैवी व आध्यात्मिक शक्तीने अद्दल घडवा! त्यांना तुमच्या शब्दांत हासडा. साहेब, तुमचा सहवास २६ वर्षे लाभला, हे माझे अहोभाग्य आहे. आनंद मरा नही, आनंद मरते नही, आनंद हरेक निष्ठावंत के रूप में सदियो तक जिंदा रहता है! तुमचा पवित्र आनंद आश्रम या बाटग्यांनी बळकावला, जिथे शिवसेनेची विजयी मुहूर्तमेढ रोवण्याच्या योजना आखल्या जात होत्या, तिथे शिवसेनेसाठी कबर खोदण्याची कटकारस्थानं शिजवली जात आहेत. आनंद आश्रमच्या दर्शनी भागावरील आपले अस्तित्व हेतूपुरस्सर नष्ट केले गेले आहे, इतकेच नाही तर ठाण्यातील टपर्या व स्टॉलवरील तुमचे फोटो जाऊन गद्दार दाढीचे फोटो झळकत आहेत.
जसे दाढी वाढवून आनंद दिघे होता येत नाही तसे टपर्यांवरील तुमचे फोटो काढून स्वत:चे फोटो लावून आनंद दिघे होता येणार नाही. आनंद दिघेंची पक्षनिष्ठा, नेतृत्वावरील निष्ठा, निस्वार्थ वृत्ती, कर्तव्यपरायणता, जनमानसातील प्रतिमा कुठून आणणार हे गद्दार?
दिघे साहेब तुम्ही कुठेही असाल, परंतु, या गद्दारांना क्षमा करू नका! या गद्दारांना गाडून टाका! यांचा नायनाट झाल्याखेरीज तुमच्या आत्म्याला शांती लाभणार नाही, हे मला चांगले ठाऊक आहे!