देशात जेव्हा काँग्रेसची सत्ता होती आणि काँग्रेस अजिंक्य भासत होती, तेव्हा त्या पक्षाबद्दल एका विशिष्ट वर्गाच्या मनात भयंकर रोष होता. तो रोष मुळात होता तो काँग्रेसच्या सर्वसमावेशक उदारमतवादी धोरणाबद्दल. मात्र हा वर्ग काँग्रेसला कशी भ्रष्टाचाराची, अनाचाराची कीड लागली आहे, याबद्दलच तावातावाने बोलत साधनशुचितेच्या गप्पा मारत होता. काँग्रेसनेही अल्पसंख्याकांचं अहितकारी लांगुलचालन करून त्यांचं दीर्घकालीन नुकसान केलं आणि या नाकमुरड्यांना बहुसंख्याकांच्या राजकारणात स्थान मिळवून देऊन स्वत:च्या पायावरही कुर्हाड मारून घेतली. काँग्रेसविरोधी शक्तींनी जनता पक्षाचं सरकार स्थापन केलं, त्यानंतर काँग्रेसची अढी नासवणारी सगळी कीड त्या अढीतही शिरली. इथे बाळासाहेबांनी १९७८ साली अतिशय पोटतिडकीने काढलेल्या व्यंगचित्रात भारतीय जनता एसेम जोशींसारख्या निरलस आणि सज्जन नेत्याला सांगते आहे की साधनशुचितेचा एकच आंबा वाचला आहे तुमच्याकडे, तो तरी सांभाळा… त्यावेळीही नाकाने कांदे सोलणाारा वर्ग आज मात्र चिडिचूप बसला आहे. आजच्या सत्तेच्या अढीत तर एकही आंबा वाचलेला नाही, सगळीच्या सगळी अढी नासली आहे. तरी या बोलभांड शुचिताबाजांची दातखीळ काही सुटत नाही, म्हणजे यांचा नैतिकतेचा पुळकाही किती ढोंगी होता ते पाहा!