टिंडर हे जगप्रसिद्ध डेटिंग अॅप आहे. हे मुळात डेटिंगचे म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत अनोळखी व्यक्ती शोधून त्याच्याबरोबर एखादी संध्याकाळ व्यतीत करावी, एवढ्यापुरते मर्यादित अॅप आहे. मात्र, डेटिंग ही संकल्पना इतक्या मोकळेपणाने आपल्याकडे नाही. अनेक पुढारलेल्या घरांमध्ये मुलगी-मुलगा पाहून विवाह करताना पसंती जुळली की त्यांना एकमेकांना भेटायची मुभा दिली जाते. त्याच प्रकारे लोक डेटिंगकडे पाहात आणि त्या माध्यमातून लाइफ पार्टनर शोधत असतात.
ही पुण्यातली घटना. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारी मीना हिने या अॅपवर नोंदणी केली होती. मीना तेलंगणामधल्या एका गावात राहणारी मुलगी… विद्येच्या माहेरघरी शिक्षण आणि पाठोपाठ मिळालेल्या नोकरीच्या निमित्ताने पुण्यात आली. एका कॉलेजमधून संगणकाचे शिक्षण पूर्ण केल्यावर तिने नोकरी मिळवली होती. आता आयुष्यात स्थैर्य आलं, आता ‘सेटल’ व्हावं म्हणून तिने टिंडरवर नोंदणी केली. त्यावर तिला पांढरा अॅप्रन घातलेल्या एका डॉक्टरचा फोटो दिसला. व्यक्तिगत माहितीमध्ये या डॉक्टरने, त्याला आपण किशोर म्हणू, आपण स्पेनमध्ये एका हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याचे लिहिले होते. आपली कमाई पौंडामध्ये असल्याचे त्याने लिहिले होते. मीनाने त्याला राइट स्वाइप केले, म्हणजे त्याच्यामध्ये रस दाखवला. हळुहळू दोघांची ओळख झाली. गप्पा झाल्या. मी तुझ्याबरोबर लग्न करू इच्छितो, असं किशोरने मीनाला सांगितलं. त्यानंतर सुरू झाला पुढचा एपिसोड…
मीनाला दिलेल्या माहितीनुसार किशोरला त्या डॉक्टरला वडील, भाऊ, बहीण असा कोणताही परिवार नव्हता. मीनाला सासुरवासही होणार नव्हता. कारण, किशोरची आई कसल्या तरी गंभीर आजाराने ग्रस्त होती. एका दवाखान्यात तिच्यावर उपचार सुरू असल्याचे त्याने मीनाला सांगितले होते. लग्न झाल्यावर विदेश सोडून पुण्यात स्थायिक होऊन डॉक्टरकी करण्याचा मानस त्याने मीनाकडे बोलून दाखवला होता. विदेशात राहिल्यामुळे माझ्याकडे चांगले पैसे आहेत, त्यामुळे भारतात आल्यावर आपण पुण्यात चांगली प्रॉपर्टी घेऊ, तुला जग फिरवीन, अशी अनेक स्वप्ने तिला या डॉक्टरने दाखवली होती. मीना अर्थातच सातव्या अस्मानात होती, तिला आभाळ ठेंगणं झालं होतं. किशोरचा आणखी एक गुण म्हणजे तो म्हणायचा की माझा संबंध फक्त तुझ्याशी आहे. तुझे आईवडील, कुटुंबीय, यांच्याशी काहीच संबंध नाही. तुझ्या पूर्वायुष्यातही रस नाही.
आता टिंडरच्या चॅटरूमच्या पलीकडे मामला पोहोचला होता. ऑनलाइन गप्पा आणि मेसेजेसच्या देवाणघेवाणीसाठी दोघांमध्ये ई-मेल, व्हॉट्सअप नंबरची देवाणघेवाण झाली. घट्ट मैत्री झाली. लग्नाच्या सुखस्वप्नांमध्ये दोघे रंगून गेले होते…
…आपली आई खूपच आजारी असून ती आता अखेरच्या घटका मोजत आहे, असे चित्र किशोरने उभे केले होते. त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मीनाने त्याला भावनिक, मानसिक आधार द्यायला सुरुवात केली होती. आपली अशी स्थिती असली तरी मी तुला भेटायला लवकरच भारतात येणार आहे, असे किशोर म्हणाला. तू जी साथ देते आहेस, त्यामुळे माझे तुझ्यावर खूपच प्रेम जडले आहे, मी तुला लवकरच एक हिर्यांचा हार, काही दागिने आणि काही सरप्राईझ गिफ्ट पाठवणार आहे, असं त्याने सांगितलं.
किशोरशी ओळख होऊन जेमतेम आठ दिवस झाल्यावर एक दिवस दुपारी तिला अचानक मोबाईलवर एक फोन आला. समोरील व्यक्ती सांगत होती, मॅडम, मी दिल्ली एअरपोर्टवरून कस्टम अधिकारी बोलतोय. तुमच्यासाठी स्पेनवरून एका पार्सल आलेले आहे. त्यामध्ये काही जडजवाहीर आणि परकीय चलन आहे. ते सोडवून घ्यायचे असेल तर तुम्हाला गिफ्ट टॅक्स आणि परकीय चलनावर लागणार टॅक्स यांच्यापोटी १७ लाख रुपये भरावे लागतील. ते भरले नाहीत तर तुमच्यावर कायद्याने कारवाई होऊ शकते. त्यामुळे तुम्ही या बँक अकाउंटवर तात्काळ ही रक्कम भरून टाका. मीनाने शहानिशा न करता इकडून तिकडून पैसे जमा करून ती रक्कम बँकेत भरून टाकली. हा प्रकार होऊन दोन दिवस झाल्यावर एकदा सकाळच्या वेळेत किशोरचा मीनाला फोन आला, मी दिल्लीच्या विमानतळावर आलेलो आहे, पण माझ्याकडे भारतीय चलन नाही. आता माझ्याकडे करोडो रुपयांचे पौंड आहेत, पण, मला इथे विमानतळाच्या अधिकार्यांनी थांबवून ठेवलेले आहे. त्यामुळे तू माझ्या खात्यावर ३० लाख रुपये टाक, एअरपोर्टवरून बाहेर आल्यानंतर मी लगेच तुझे पैसे परत करतो. आपला भावी नवरा आपल्याला भेटायला आलेला आहे, त्याला मदत करायला हवी, या भावनेपोटी मीनाने पुन्हा एकदा ३० लाखाची रक्कम गोळा केली आणि डॉक्टरने दिलेल्या त्या बँक अकाउंटमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून भरली. तो आत्ता येईल नंतर येईल, अशी वाट पाहण्यात तिचे दोन दिवस निघून गेले. त्यानंतर त्याचा अचानक फोन आला की मी तिकडे आलो होतो, पण आईची प्रकृती बिघडली आणि मला लगेच परत इकडे यावे लागले. सॉरी, असे म्हणून त्याने पुन्हा तिचा विश्वास संपादन केला. मीना, सध्या मी खूपच आर्थिक अडचणीत आहे, आईच्या उपचारासाठी मला दहा लाख रुपयांची रक्कम कमी पडत आहे, तू मला तेवढी मदत कर, प्लीज, असेही तो बोलला.
या कधीही न पाहिलेल्या, कधीही न भेटलेल्या डॉक्टरच्या प्रेमात वेड्या झालेल्या मीनाने पुन्हा एकदा ती रक्कम त्याला दिली. आत्तापर्यंत मीनाने वेगवेगळ्या कारणाने त्याला ५७ लाख रुपये दिले होते. काही दिवस त्या डॉक्टरांचा आणि मीनाचा संपर्क झाला नाही, त्यामुळे ती अस्वस्थ झाली. त्याला पैसे देण्यासाठी तिने कर्ज घेतले होते, राहते घर गहाण ठेवले होते. डॉक्टर किशोरने सगळा संपर्क तोडून टाकला. आपली एवढी मोठी फसवणूक झाली आहे, याची खात्री झाल्यानंतर तिची मन:स्थिती बिघडली, ती डिप्रेशनमध्ये गेली.
मीनाने हा सगळा प्रकार कोणालाही न सांगता केला होता. ती टिंडरवर काय करते आहे, याची माहिती ना तिच्या घरच्यांना होती, ना मित्रमंडळींना. आपण फसलो आहोत, हे लक्षात आल्यावर तिने हा प्रकार मित्राला सांगितला आणि पोलिसांकडे तक्रार करून या गुन्ह्याची नोंद केली…
…आता या तथाकथित डॉक्टरचा तपास लागायचा तेव्हा लागेल, कदाचित लागणारही नाही. तोवर तो वकील, इंजीनियर, उद्योगपती बनून आणखी एखाद्या शीला किंवा गीता किंवा फातिमाला जाळ्यात ओढून बसला असेल… या सगळ्या प्रकारात झालेल्या आर्थिक आणि मानसिक हानीमुळे मीना कायमची कोलमडून गेली असेल, ती कोणावरही आयुष्यात विश्वास ठेवू शकणार नाही, हे सगळ्यात वाईट आहे. हा ‘ट्रस्ट फ्रॉड’ या नावाने ओळखला जाणारा गुन्ह्याचा प्रकार आहे. यात बळी पडणार्या व्यक्तीचा विश्वास संपादन करून त्याला जाळ्यात ओढणे ही पहिली पायरी असते. विश्वास संपादन झाल्यानंतर गुन्हेगार पुढील चाल खेळतो, त्यामध्ये तो भावनिक साद घालत समोरच्या व्यक्तीला आर्थिक मदत मागतो. हे गुन्हेगार पुढच्या टप्प्यावर पुढील फसवणूक करण्याची जबाबदारी बँक अकाऊंट हाताळू शकणार्या गुन्हेगारांकडे देतात आणि त्यांना कटात सहभागी करून घेतात.
सायबर विश्वात अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून अनेकजण गुन्ह्याला बळी पडतात. कारण, बिनचेहर्याच्या व्यक्तीबरोबर इथे संवाद होत असतो. दोन जणांमध्ये होणारा संवाद इतर कोणापर्यंत जाणार नाही, अशा टेक्निकचा वापर इथे केलेला जात असतो. तुम्ही मला जर आत्ता पैसे दिले नाहीत तर माझे किंवा तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, असे टोकाचे बोलणे इथे होते. माणूस आवेगात कृती करून बसतो. त्यामुळे नालस्ती होण्याच्या, मूर्ख ठरवले जाण्याच्या भीतीपोटी अनेकजण बोलायला पुढे येत नाहीत.
सायबर विश्वात काही तत्वे पाळणे आवश्यक आहे. सर्वात पहिले म्हणजे आपण कुणाच्या बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवू नये. कायम सजग राहायला हवे. नोकरी, लग्न यासाठी कधी पैसे द्यावे लागत नाहीत, त्यामुळे आर्थिक बाबींची मागणी होऊ लागली की त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे. ज्या तांत्रिक प्रक्रियेच्या बाबतीत अज्ञान आहे, त्या बाबतीत विशेष सावध राहावे. उदाहरणार्थ, विमानतळावर असणारे कस्टम किंवा विमानतळ अधिकारी कधीही थेट बँकेच्या खात्यात पैसे भरण्यास सांगत नाहीत. ज्याच्याकडे करोडो पौंड होते, तो विमानतळावरून परत गेला आणि तिथे गेल्यावर त्याला पुन्हा १० लाख रुपयांची गरज पडली कशी, असा प्रश्नही मीनाला पडू नये. अशा बारीक सारीक तांत्रिक गोष्टीचा विचार आपण वेळोवेळी करायला हवा.
हे लक्षात ठेवा…
या फ्रॉडला ‘मॅट्रिमोनियल फसवणूक’ म्हणतात. यातला संवाद संशयास्पद स्वरूपाचा असल्याचा कोणीच विचार करत नाही. सायबर स्पेसमध्ये अविश्वास दाखवणे गरजेचे आहे. ऑफलाईन बोलताना आपण समोरच्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोलत असतो. ऑनलाईन संभाषणात मात्र समोर कोण आहे, हे माहिती नसते. तिथे विश्वास टाकू नये, फसवणूक निश्चित. ऑनलाईन संभाषणात पैशांची मागणी होते, तेव्हा तिथेच त्या नात्याचा अंत करायला हवा. त्या नात्यात पुढे जाण्याची इच्छा असेल, तर त्या व्यक्तीला समोरासमोर भेटायला बोलावावे आणि तेही दिवसाउजेडी, वर्दळीच्या ठिकाणी. आपल्यासोबत विश्वासाचा मित्र, नातेवाईक घेऊन भेटावे. प्रेमाच्या जाळ्यात अडकून गुपचूप काहीतरी साहस करत असल्याच्या थ्रिलमध्ये अडकू नये. विशेष म्हणजे परदेशी व्यक्ती, कस्टम अधिकारी बँकेच्या खात्यात तातडीने पैसे भरायला सांगतात, तेव्हा हा व्यवहार फसवा आहे, हे ओळखून जावे. एकदा मागणी पूर्ण केली की पुढे चक्रच सुरू होते.
चौकट
सायबर सुरक्षेच्या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘सायबर जाल’ हे सदर सुरू करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयात सायबर सेल विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार यांच्या अनुभवकथनाच्या आधारे या कथा तयार करण्यात आलेल्या आहेत. पात्रांची नावे बदलण्यात आली असून कुठे साधर्म्य आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा.