‘रोज मारा फेरी, वाढणार नाही ढेरी’ अशा कवितेच्या दोन ओळी मला सुचल्या आहेत… तुम्ही पुढे पूर्ण करा ना!
– मेरी पॉल थॉमस, वांद्रे
कविता अर्धवट सोडता तशा फेर्या अर्धवट सोडत असणार, मग ढेरी नाही तर काय सुटणार?
‘ये रे येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा’ हे गाणं लहानपणीच शिकवून आपण मुलांना नेमकी कसली शिकवण देतो?
– राही कांबळे, इस्लामपूर
आधी मुलं आपल्याला सीरिअसली घेतात का ते पाहावं लागेल.
जो बायकोशी भला, तो खाई तूप काला, असं म्हणतात… पण एखाद्याला तूपच आवडत नसेल, तर?
– सोमनाथ बाळापूरकर, निप्पाणी
तूप आवडत नसेल तरी चूप रहा. काहीतरी काला कराल नि घरच्या धुपाटण्याला कळलं तर तो मी नव्हेच म्हणत फिरावं लागेल.. निप्पाणीचे आहात म्हणून सांगतोय.
सुखी संसाराचा मूलमंत्र काय? तो नवर्यासाठी वेगळा आणि बायकोसाठी वेगळा असतो काय?
– रोहिणी शास्त्री, सोलापूर
काय ताई.. शास्त्री तुम्ही आणि पवारांना मंत्र विचारताय? आम्हाला बाबा कुठल्याही मूलमंत्राशिवाय मुलं झाली.
‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात ज्यांच्याकडे अमोघ अस्त्रांची पुरातन विद्या आहे, असे लोक बंदुका पण बाळगताना आणि वापरताना का दिसतात?
– प्रथमेश शेंडे, कळवा
असे चित्रपट बघणारे आपल्यासारखे वेडे (चित्रपट वेडे) असल्यावर काय फरक पडतो..
‘अब्जाधीश कसे बनावे’ हे पुस्तक मी लिहिले आहे. ते छापण्यासाठी दोन लाख रुपयांची गरज आहे. तुम्ही ते मला उसने द्याल का?
– राहुल गोडबोले, सातारा
द्यावेशे वाटतायत पण तुमचं आडनाव बघून भरोसा वाटत नाही.
यार दिलदार तुझे कैसा चाहिए?
प्यार चाहिए के पैसा चाहिए?
– सोनिया साळवी, शहापूर
जे द्याल ते.
कलावंताने राजकीय भूमिका घ्यावी की न घ्यावी?
– राजेंद्र येवलेकर, पंढरपूर
नाटक व सिनेमामधल्या भूमिकेला काही वाव मिळत नसेल तर राजकीय भूमिका घ्यावी. त्या भूमिकेला वाव नाही मिळाला तरी शिव्या नक्की मिळतील.
कोणी ‘मुस्काट फोडो’ यात्रा काढली तर त्यात तुम्हाला सहभागी होऊन कोणाकोणाचं मुस्काट फोडायची इच्छा आहे?
– रोहन पाटील, भिवपुरी
जो उलटून माझं मुस्काट फोडणार नाही त्याचं…
बायको माझा मोबाइल रोज चोरून चेक करते. हे मला माहिती आहे, हे तिला माहिती नाही. तिच्यापासून मोबाइल सुरक्षित ठेवण्यासाठी काय करू?
– माजिद खान, गोवंडी
मोबाइल मरु दे… स्वतःच्या सुरक्षेचं बघा.
देशातले सर्वोच्च नेते रोज काही ना काही खोटे बोलत असताना आपण मुलांना खरे बोलण्याची शिकवण कशी द्यायची? खरे बोलल्याने फायदा होतो, हे त्यांना कसे शिकवावे?
– बिंदू साळसकर, रत्नागिरी
बायकोला विचारावं लागेल… कारण मुलांना तीच शिकवते. (मलासुद्धा…)
तुम्ही कधी ज्योतिष्याला हात दाखवलाय का? काय म्हणाला तो?
– रमाकांत बोबडे, बेलापूर
म्हणाला, कितीही दाढी वाढव… जोतिष्याला हात दाखवावाच लागणार.
बरेच दिवस झाले, माझ्या बँकेत ५३ रुपये ७० पैसे एवढीच शिल्लक दिसते आहे. याला काय अर्थ आहे? पैसे वाढत का नाहीत? बँकेवर खटला भरू काय?
– भावेश दरेकर, कुंभार्डे, महाड
कशाला उगा खर्च करताय? बँकेवर दरोडा घाला. शिल्लक वाढेल. शिवाय खटला पण बँकच भरेल.
बायकोला सतत घर आवरण्याची आवड असल्याने अनेक नवर्यांना वेळेवर वस्तू सापडत नाहीत, हे त्यांच्या लक्षात कसं येत नाही?
– रवी पायगुडे, पुणे
दिवसभर घर आवरल्यावर लक्षात यायची वेळ येते तेव्हा नवर्याला आवरावं लागत. (नवरा रागावल्यावर दुसरं काय करणार? कधी लक्षात येणार बिचार्यांच्या?)