‘फिफा’ विश्वचषक फुटबॉलच्या जागतिक नकाशावर युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील महासत्तांचेच वर्चस्व अधोरेखित होते. जगातील सर्वात लोकप्रिय खेळाचे विश्वविजेतेपद या दोन खंडांच्या सीमारेषा ओलांडून आजवर इतर कोणत्याच राष्ट्राकडे गेले नाही. १९३०मध्ये अमेरिका आणि २००२मध्ये दक्षिण कोरिया या दोन देशांची उपांत्य फेरीपर्यंतची मजल एवढेच या खंडांपलीकडच्या देशांचे यश. यात आशियाची आकडेवारी आणि यश अतिशय तुटपुंजे आहे. पण यंदाच्या विश्वचषकाचे यजमान कतार हे राष्ट्र असणे, आतापर्यंतचा सर्वाधिक सहा आशियाई देशांचा सहभाग आणि स्पर्धेच्या पहिल्या आठवड्याभरातील घडामोडी आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियाई फुटबॉलची दखल घ्यायला लावणार्या आहेत. पहिल्या आठवड्यातच सौदी अरेबियाने लिओनेल मेसीच्या अर्जेंटिनावर तर जपानने जर्मनीवर सनसनाटी विजय मिळवले, तर दक्षिण कोरियाने उरुग्वेला बरोबरीत रोखले. या बलाढ्य संघांसमोर आशियाई संघ मजबुतीने उभे राहिलेले प्रथमच दिसत आहेत.
आशियाई आशाएँ जागवणार्या अनेक घटना आता फुटबॉलच्या जगतात घडू लागल्या आहेत. २०२६मध्ये होणार्या आगामी विश्वचषकात सहभागी होणार्या देशांचा आकडा ३२हून ४८पर्यंत वाढणार आहे. गेल्या काही वर्षांत कुमार आणि कुमारी (१७ वर्षांखालील) अशा दोन्ही विश्वचषक स्पर्धा प्रामुख्याने क्रिकेटवेड्या असलेल्या भारतात झाल्या. मँचेस्टर युनायटेडपासून काडीमोड घेणारा सुपरस्टार खेळाडू ख्रिस्टियानो रोनाल्डो आता सौदी अरेबियाच्या अल-हिलाल क्लबशी करारबद्ध होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. आशियाई फुटबॉलच्या विस्ताराला पुरेशी संधी असल्याचेच हे सारे द्योतक आहे.
यजमानपदासाठी झालेला भ्रष्टाचार आणि स्थलांतरित कामगारांबाबतचे मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे धोरण यामुळे कतारची नाचक्की झाली आहे, ही नकारात्मक बाजू. पण त्यामुळे भौगोलिक आकारमानाने छोट्या आशियाई देशात स्वयंक्षमतेच्या बळावर यंदाची विश्वचषक स्पर्धा सुरू असणे, ही सकारात्मक बाजू कशी काय दुर्लक्षित करता येईल? विस्तारित स्वरूपातील पुढील विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांकडे सोपवण्यात आले आहे. म्हणजे खर्चाची तुलना केली तरी अरबांच्या श्रीमंतीचा अंदाज येतो. ब्राझीलमध्ये २०१४ आणि रशियात २०१८मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धांसाठी अनुक्रमे १५ अब्ज डॉलर आणि ११.६ अब्ज डॉलर खर्च झाला होता. पण कतारने सर्वात महागडा विश्वचषक सिद्ध करताना २२० अब्ज डॉलरचा आकडा ओलांडल्याचे स्पष्ट होते. या आखाती देशाचे तापमान नोव्हेंबरमध्ये तीव्र असते. परंतु युरोपियन देशांच्या प्रेक्षकांना सुसह्य व्हावे म्हणून आठही स्टेडियममध्ये वातानुकूलन व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजेच आदरातिथ्यात कुठेही कमतरता नाहीच.
विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आता ९२ वर्षांची झाली आहे. पण, आशिया खंडाला प्रथमच यजमानपदाचा मान मिळाला होता जेमतेम २० वर्षांपूर्वी. २००२मध्ये जपान आणि दक्षिण कोरियाने हे शिवधनुष्य पेलले. या दोन्ही देशांनी गृहमैदानाचा लाभ उठवत साखळीचा टप्पा आरामात ओलांडला. मग कोरियाने उपांत्य फेरीपर्यंत मारलेली मजल, ही आशियाची आतापर्यंतची सर्वात मोठी भरारी ठरली. जपान (उपउपांत्यपूर्व फेरीत) आणि कोरिया या दोघांचीही घोडदौड तुर्कस्थानने रोखली.
त्याआधी, आशियाई खंडातून इतके मोठे यश हे १९६६च्या विश्वचषकात उत्तर कोरियाने मिळवले होते. आफ्रिका, आशिया आणि ओशियानिया महासंघांची एकत्रित पात्रता स्पर्धा झाली. मागील दोन स्पर्धांमध्ये आफ्रिका आणि आशियाचा एकही संघ पात्र न ठरल्यामुळे एका संघाच्या रिक्त जागेसाठी ‘फिफा’ने विशेष योजना आखली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला निलंबित करण्यात आले, तर आफ्रिका खंडाला थेट पात्रता न मिळाल्याच्या निषेधार्थ १५ संघांनी माघार घेतली. मग जपाननेही न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि उत्तर कोरिया हे दोनच पर्याय उरले. यात कोरियाने बाजी मारत पात्र ठरण्याचा मान मिळवला. प्रत्यक्ष स्पर्धेतही उत्तर कोरियाची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. पोर्तुगालविरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात २२व्या मिनिटापर्यंत कोरियाकडे ३-० अशी आघाडी होती. नंतर मात्र पोर्तुगालने ५-३ असे कोरियाला निरुत्तर केले.
‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासाची पाने चाळल्यावर आशियाई देशाचे पदार्पण १९३८मध्ये झाल्याचे अधोरेखित होते. जपानने माघार घेतल्यामुळे पारतंत्र्यात असलेल्या इंडोनेशियाला ही ‘प्रथम संधी’ चालून आली. दुर्दैवाची बाब म्हणजे त्यानंतर हा देश कधीही या स्पर्धेत दिसला नाही. बाद फेरी पद्धतीने झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात हंगेरीने इंडोनेशियाला ६-० असे नामोहरम केले.
संधी विस्तारणार
विश्वचषकाच्या गौरवशाली अध्यायाला १९३०मध्ये प्रारंभ झाला. यात काही स्पर्धांचा अपवाद वगळता १९८२पर्यंत आशियाई सहभाग हा एखाद्या देशापुरता मर्यादित असायचा. मग १९८६पासून दोन, १९९८पासून चार आणि २०१८मध्ये पाचपर्यंत तो वधारला. यंदा हाच आकडा सहा देशापर्यंत झाला आहे. पुढील विश्वचषक स्पर्धा ही प्रथमच ४८ संघांची आहे. म्हणजेच १६ वाढीव संघ यात असतील. युरोप, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका या खंडांमधील बहुतांश देश विश्वचषकाच्या प्ाटलावर आधीच सामील आहेत. त्यामुळे या वाढलेल्या रिक्त जागांकरिता सर्वात मोठी संधी आशिया खंडाला आहे.
आशियाई तारे
गेल्या दोन दशकांचा आढावा घेतला तर आशियातील काही गुणवान फुटबॉलपटूंची नावे गाजली. परंतु त्यांनी मेसी, रोनाल्डो, रोबर्ट लेवांडोवस्की, नेयमार, किलियान एम्बापे, लुइस सुआरेझ यांच्याइतकी अचाट कामगिरी करून दाखवली नाही. दक्षिण कोरियाचा जि-सुंग पार्क मँचेस्टर युनायटेकडून खेळला. जपानचा शुनसुके नाकामुरा त्याच्या सरस तंत्रासाठी ओळखला जायचा. त्याच्या हिदेतोशी नाकाताने सेरी-ए स्पर्धेत आपली छाप पाडली. परंतु २९व्या वर्षी त्याने निवृत्ती पत्करली. ‘इराणचे गोलयंत्र’ असे अली डाईला म्हटले जायचे. सध्या दक्षिण कोरियाचा सन ह्युंग-मिन हा प्रीमियर लीग स्पर्धेतील सर्वोत्तम आक्रमक मानला जातो. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल नोंदवणार्या खेळाडूंच्या यादीत भारताचा सुनील छेत्री (८४ गोल) हा संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहे.
भारताची कहाणी
क्रिकेटची पाळेमुळे खोलवर रुजलेल्या भारताचे फुटबॉल खेळातील स्थान काय, हा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा १९५०ची अनवाणी पायांची भावनिक कहाणी सांगितली जाते. शूज नसल्यामुळे भारताला विश्वचषकात सहभागी होता आले नव्हते. हे भारताने सहभाग नाकारल्याचे एक कारण असल्याचे म्हटले जाते. परंतु संपूर्ण सत्य हे नव्हे. (तेव्हाचा) बर्मा, फिलिपाइन्स आणि इंडोनेशिया या देशांनी माघार घेतल्यामुळे भारताला विश्वचषकात थेट खेळण्याची सुवर्णसंधी चालून आली होती. परंतु परदेशी चलनाची कमतरता आणि एक महिन्याचा ब्राझीलचा सागरी प्रवास अशा अनंत अडचणी समोर उभ्या ठाकल्याने भारताने विश्वचषकात न खेळण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाच्या खेळाडूंकडे ९० मिनिटांचा सामना खेळण्याची क्षमता नव्हती. १९७०पर्यंत भारतामधील स्थानिक फुटबॉल सामने ७० मिनिटांचे खेळवले जायचे. त्यामुळे ९० मिनिटांच्या सामन्यांत अखेरच्या काही मिनिटांत भारतीय खेळाडूंची दमछाक व्हायची. विश्वचषकात सहभागी होणार्या मातब्बर संघांकडून भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागेल, १९४८च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत कमावलेली प्रतिष्ठा धुळीस मिळेल, याची भीती फुटबॉल संघटकांना वाटत होती. त्यानंतर बायच्युंग भुतिया, छेत्री असे तारे देशात चमकले. अगदी ‘आयपीएल’च्या धर्तीवर ‘आयएसएल’सारखी स्पर्धासुद्धा भारतात सुरू झाली. पण मेसी-रोनाल्डो-नेयमारमध्ये रमलेली तरूण पिढी देशांतर्गत मैदानांवर आणि प्रेक्षागृहांत कुठेच आढळत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
यशोलाटेची प्रतीक्षा
१९८३चे क्रिकेटमधील विश्वविजेतेपद मिळवेपर्यंत कुठे भारतात क्रिकेट हा धर्म मानला जात होता. पण विश्वविजेतेपदाने देशात क्रिकेटक्रांती झाली. पहिल्या तिन्ही विश्वचषकांचे यजमान इंग्लंड होते, परंतु १९८७च्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आले. त्याचे नावही प्रुडेन्शियलऐवजी रिलायन्स झाले. कालांतराने जगमोहन दालमिया यांनी जागतिक क्रिकेटवर भारतीय अंकुश निर्माण केली. आता क्रिकेटच्या अर्थकारणाच्या तिजोरीवर ज्या तीन देशांचे नियंत्रण आहे, त्यात भारताचा समावेश आहे.
भारतातील आणखी काही उदाहरणे घेतल्यास विश्वनाथन आनंदमुळे बुद्धिबळ, लिएण्डर पेस-महेश भूपती-सानिया मिर्झामुळे टेनिस, सायना नेहवालमुळे बॅडमिंटन हे खेळ लोकप्रिय झाले. यातून धडा घेतल्यास देशाचे किंवा खेळाडूचे यश लक्षवेधी ठरते, तेव्हा त्या प्रेरणेची लाट येते आणि तीच खेळाला तारते, हे लक्षात येते. फुटबॉलमध्येही अशीच ‘यशोलाट’ यायला हवी, तर हा खेळ आशियात रुजेल आणि मोठा होईल, अशी आशा नक्कीच धरता येईल.