गिरगावातील ठाकूरद्वार नाक्यावरच्या सनशाईन इराणी हॉटेलचा आजचा शेवटचा दिवस. १२० वर्षांनंतर हे हॉटेल आता काही तासांनंतर बंद होईल… गेल्या आठवड्यात मित्रवर्य दिलीप ठाकूरचा दुपारी मेसेज आला. त्याच दिवशी सकाळी याच हॉटेलात होतो आणि ते बंद होणार असल्याचा थांगपत्ताही आपल्याला नाही? दुसर्या दिवशी तिथल्या ओळखीच्या वेटरला विचारले. म्हणाला, हां साब, २० तारीख लास्ट है. सांगताना त्याच्या चेहर्यावर दुःख जाणवत होतं. तिथून बाहेर पडताना पावले उलटी म्हणजे भूतकाळात पडत होती.
या हॉटेलसोबतच्या कितीतरी आठवणी आहेत. कित्येक लोकांशी इथे गप्पा झाल्या आहेत. मी आणि राज हे मित्र तर कितीतरी वर्षं या हॉटेलात जवळपास रोज सकाळी ८ वाजता पानीकम चाय आणि खारी खात होतो. हा आमचा रोजचा कार्यक्रम.. रोजचा मेन्यू.. आणि रोजची कोपर्यातली सीट. एकदा सकाळीच चहा घेताना घाईघाईत प्रदीप पटवर्धन बाजूच्या सीटवर येऊन बसला. तेव्हा म्हटलं त्याला, आज सकाळीच बाहेर कुठे शूटिंगला जाताय वाटतं. म्हणाला, जात नाही, रात्रीच शूटिंग आटपून येतोय. आता सकाळी घरी जाण्याआधी म्हटलं इथे चहा मारून जाऊ.
पावसाळ्यात एकदा आमची एक मैत्रीण गिरगावात साहित्य संघात आली होती. रात्री नऊला तिचा कार्यक्रम आटोपला. मी घरी जाताना योगायोगाने तिची भेट झाली. बाहेर धो धो पाऊस. तिला सीएसटीला जायचे होते. पण कुणी टॅक्सीवाला तयार होत नव्हता. चार सहा टॅक्सीवाल्यांना भेटल्याने ती भिजून गेली. मला म्हणाली, मला एक कप गरम चहा मिळेल का इकडे कुठे? मी तिला इथे या इराणी हॉटेलात घेऊन आलो. त्या रात्री बहुदा बाहेर खूप पाऊस असल्याने इथे खूप गर्दी होती. सगळा कलकलाट चालू होता. कपबश्यांचे आवाज. वेटर लोकांच्या ऑर्डर देण्याचे आवाज. मला वाटलं मॅडम नाराज होतील. पण इथला चहा त्यांना नक्कीच आवडेल म्हणून इथ आलो.
मॅडम चहावर खुश. त्या कल्लोळात मॅडमनी इथल्या टेबलावर एक कागदाचा तुकडा टाकून कविता केली. कधी लिहिली ते मला समोर असून कळलं नाही. जाताना कागद माझ्या हातात देत म्हणाल्या, वाचा नंतर. पावसावर ती एक उत्तम कविता होती. या हॉटेलातली ती एक सुंदर आठवण होती. पूर्वी राजेश खन्ना या हॉटेलसमोरच राहत होता. सुरुवातीच्या कारकीर्दीत तो आणि जितेंद्र खूपदा इथे बसलेले असायचे म्हणे. चर्चा वगैरे करत असतील.
लॉकडाऊननंतर जी काही हॉटेल सुरू झाली त्यातले हे लवकर सुरू झालेलं हॉटेल होतं. त्यावेळी या हॉटेलसमोर विशिष्ट अंतर पाळून पावबिस्कीट वगैरे घेण्यासाठी मोठी लाईन लागलेली असायची. मी सुद्धा कित्येकदा लायनीत उभा असायचो. पाठीमागच्याचा आपल्याला स्पर्श तर होत नाही ना, याची काळजी घेणारी बरीच मंडळी दिसायची. ‘मावळ मराठा’चे संपादक सदानंद खोपकर भेटायला यायचे, तेव्हा हेच आमचे ठिकाण असायचे. त्यांचं नवं पुस्तक भेट देताना आम्ही कितीतरी वेळा या हॉटेलच्या प्रवेशद्वारावर फोटो काढले आहेत. तीनेक वर्षांपूर्वी गिरगावात, कांदेवाडीत काही काळ राहिलेले पत्रकार मुकेश माचकर इकडे कुणालातरी भेटायला आले होते. त्यांनी फोन केला, मी आलोय गिरगावात, या भेटायला. म्हटलं, कुठे आहात? म्हणाले सनशाईन इराणी हॉटेलात. त्यांच्याही या हॉटेलच्या जुन्या आठवणी होत्याच. भेट झाली. गप्पा रंगल्या. असं हे गप्पाटप्पांचं मोठे केंद्रस्थान.
गेल्या दहीहंडीला प्रख्यात सिनेपत्रकार आणि जुना दोस्त दिलीप ठाकूर गिरगावात आला होता. दिलीप मूळचा गिरगावकर. त्याचा फोन. म्हणाला, मी आलोय, भेटूया, सनशाईनजवळ ये.योगायोगाने इथेच पाटकर नावाचे अजून एक मित्र कितीतरी वर्षांनी भेटले. मग तिघेही याच हॉटेलात गप्पांसाठी बसलो हे सांगायला नको.
या हॉटेलची काय जादू आहे (म्हणजे आता ‘होती’ असं म्हटलं पाहिजे) समजत नाही. अगदी सहज आत प्रवेश होतो. सहज चहागप्पा होतात आणि सहजपणे आपण हॉटेलच्या बाहेर जातो. इथे फक्त मैत्री आणि चहा यांचं नातं असतं. जवळच राहत असल्याने बरीच वर्ष इथे येतोय. किती कप चहा झाला असेल त्याच पत्ता नाही. एरवी चहाची वेळ सकाळची असते. पण इथून जाताना ती बदलते. कुठल्याही वेळी इथे चहा घेतलाय. कितीवेळा एकटाच गंभीरपणे चहा घेऊन गेलोय. मला वाटतं सोबत कुणी नसल्याने उगाचच गंभीर वगैरे होत असेन.
चार दिवसांपूर्वी खोपकर इथेच भेटले होते. त्यांचा अंक द्यायला आले होते. चहा घेताना त्यांना म्हटलं, चार दिवसांनी हे हॉटेल बंद होतेय. त्यांनाही चहा घेताना धक्का बसला. म्हणाले कसं शक्य आहे. तेसुद्धा खूपदा इथे आले आहेत. म्हणाले, चहा घेतानाचा एक फोटो काढा. गेला आठवडाभर या हॉटेलात खूप गर्दी होत होती. जाता-येताना बरेचजण हॉटेल समोर आपापले फोटो काढून घेताना दिसत होते. गेल्या आठवड्यात त्या नेहमीच्या वेटरने सांगितलं होतं, २० तारीख शेवटची.
आज २० तारीख. दुपारी खाली उतरलो.तेव्हा परत घराकडे जाताना पावलं नाक्यावर वळलीच. कुणीतरी आज आपला निरोप घेणार आहे. त्याला शेवटी बाय म्हणायला हवे. नकळत हॉटेलात शिरलो. पुन्हा एक शेवटचा पानीकम चहा झाला. काऊंटरजवळ आलो, तेव्हा गल्ल्यावर बसलेला शेट्टी कुणाला तरी सांगत होता. अंदर एक बावडी म्हणजे विहीर आहे. अंदर म्हणजे ते आत सगळं बनवत असतात त्या किचनच्या भागात बावडी. मला नवल वाटलं. त्याला विचारलं, मी जाऊन बघू का? म्हणाला, जाव जाव, फोटो भी निकालो. आत अशी वळणदार लंबुळकी जागा आहे (होती) तिथे पाच सहा टेबल लायनीत आहेत. इथे पीठ मळणारे दहा बारा कामगार काम करत होते. इथे कायम नो एन्ट्रीचा बोर्ड असतो. पण बहुदा आज शेवटचा दिवस असल्याने शेट्टी ओळखीच्या लोकांना आत जाण्यासाठी परवानगी देत असावा. मी ते दार ढकलून आत जातो. एकाला विचारतो, बावडी किधर है. तो डावीकडे वळायला सांगतो. आतली दुनिया वेगळीच असते. एखाद्या भुयारात गेल्यासारखे वाटते. आत बारा पंधराजण काम करत असतात. कुणी पीठ मळतोय, कुणी पावाचे तुकडे पडतोय. त्यांना अशा बाहेरून आलेल्या माणसाची सवय नसावी. काम करताना ते जरा गोंधळतात. त्यातला एकजण मला विहीर दाखवतो. पांढर्या टाइल्सनी मढवलेली विहीर या हॉटेलच्या आतल्या भागात आहे यावर विश्वास बसत नाही. तीसुद्धा या हॉटेलच्या मालकीची विहीर. या विहिरीला पंप लावलेला असतो. मी या आतल्या भागाचे मोबाईलवर दोन चार फोटो काढतो. आत लाईट कमी असल्याने ते फोटो काही नीट येत नाहीत.
जणू काही या हॉटेलने शेवटच्या दिवशी जाता जाता आपलं गुपित सांगितलं की काय असं वाटू लागतं. बाहेर खूपदा बसलोय, पण आत अस काही असेल असं वाटलं नव्हतं. आठवड्यात खूप पेपरांत या बंद होणार्या हॉटेलच्या बातम्या येऊन गेल्या आहेत. आज संध्याकाळपर्यंत कुणी चॅनेलवाले येणार असल्याची बातमी दुपारी राजने दिली. असो.
आता पलीकडे एक हॉटेल यांनी घेतलंय म्हणे. तिथे लवकरच पुन्हा नव्याने सुरुवात होईल. पण या नाक्यावरची मजा तिथे असेल का? इथून चहा पिताना बाहेरचा चारी बाजूचा रस्ता दिसायचा. घाईत जाणारी माणसे दिसायची, बस दिसायच्या, टॅक्सी तर समोरच उभ्या. सळसळणारी अख्खी मुंबई इथून आतून चहा पिताना दिसायची. चहाच्या गरम घोटातली ती मेंदूत जाणारी सळसळ आता नसेल. सनशाईननंतरचा सनसेट आता दिसू लागलाय.