आम्ही वैद्यकीय महाविद्यालयातले वर्गमित्रमैत्रिणी अधूनमधून भेटत असतो. आम्ही सगळे एकमेकांत इतके मिसळून गेलो आहोत की आता आमच्या बायका आणि नवरे देखील या ‘मैत्र’चा भाग झालेले आहेत. समवयस्क, समविचारी, समान आर्थिक पातळीवर असल्यानं आमचं एकमेकांशी मस्त जमतं. जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा तेव्हा मैफल जमते आणि गप्पा मारण्यात खूप छान वेळ जातो.
अशाच एका मैफिलीत सगळ्यांनी एकत्र फिरायला जायची टूम निघाली. कुठं जायचं यावर बराच खल झाला. देशांतर्गत काही स्थळं चर्चेत आली. पण ग्रूपमधल्या कोणी ना कोणीतरी तिथं जाऊन आलेलं होतं. त्यामुळं अनेक जागा टूर होण्याआधीच बासनात गेल्या. म्हणता म्हणता नॉर्दर्न लाइट्स पाहायच्या असं ठरलं. मग नुसत्याच नॉर्दर्न लाइट्स पाहायला इतका खर्च करण्याऐवजी तिकडचे काही देशसुद्धा पाहून येऊ असा ‘व्यवहारी’ विचार पुढं आला. टूर ठरली. हात वर करणार्यांमधले काही गळाले, काही नवे जोडले गेले आणि एकंदर १३ जणांचा ग्रूप तयार झाला. स्कॅन्डिनेव्हिया म्हटल्या जाणार्या उत्तर युरोपमधल्या देशात एकत्र जायचं हा निर्णय पक्का झाला.
मोठ्या गटाने फिरायच्या काही अडचणी असतात. त्यांची सुरुवात झाली. एकत्र जायचं तर सगळ्यांचा प्रवास एकाच विमानातून व्हायला हवा, हॉटेलमधलं वास्तव्य एकत्र हवं. प्रवासी कंपन्यांसोबत जाण्यात वेगळी सोय असते. पैसे भरले की मग आपली जबाबदारी संपते. इथं स्वतःहून जायचं म्हणजे अनेक प्रश्न असतात. विमान प्रवास, हॉटेल वास्तव्य मिळून बर्यापैकी जास्त पैसे होतात. हे पैसे कोणाकडे जमा करायचे? ज्याच्याकडे पैसे द्यायचे तो इन्कम टॅक्सला काय ‘उत्तर’ देणार? दोघं किंवा तिघं जाताना प्रश्न थोडे कमी असतात. हॉटेलमध्ये ऑनलाइन एखाद दुसरी रूम मिळणं कठीण नसतं. पण आमचा तर १३जणांचा मोठा ग्रूप. मग लागणार्या सर्व खोल्या एकत्र एकाच ठिकाणी कुठे मिळतील, याची शोधाशोध करणं आवश्यक झालं. इथे वीकएंड रोमर्सचे योजक चावरकर मदतीला धावले. त्यांनी सर्व प्रकारच्या मदतीचा हात पुढे केला. प्रवासाची दिवसागणिक मांडणी झाली. जिथे जिथे आवश्यक तिथे प्रवासी वाहनांची सोय झाली. थोडक्यात, ग्रूप मोठा असेल तर एखाद्या व्यावसायिक व्यक्तीची मदत घेणं चांगलं पडतं. त्याने आपला तणाव खूप कमी होऊ शकतो. चावरकर म्हटलं तर आमचे टूर ऑपरेटर होते आणि म्हटलं तर आम्ही स्वतंत्र होतो.
आमचा मुख्य उद्देश होता नॉर्दर्न लाइट्स पाहण्याचा. पाहिजे तर मराठीत आपण याला ‘उत्तरीय प्रकाश’ म्हणू शकतो. आकाशातला हा चमत्कार फक्त थंडीच्या दिवसात म्हणजे डिसेंबर ते मार्च या अवधीत दिसतो. अनेकदा त्यालाही नशिबाची साथ लागते. आम्हाला हा अनुभव कसंही करून घ्यायचाच होता. निसर्गाच्या लहरीपणाची आम्हाला जाणीव होती. पूर्वी अनेकांना नॉर्दर्न लाइट्सनी हुलकावणी दिलेली माहित होतं. केवळ हा अनुभव घ्यायला हा प्रवास पुन्हा करणं आमच्यातल्या ‘मध्यमवर्गीय’ विचारांच्या पलीकडे होतं. म्हणून आम्ही नॉर्दर्न लाइट्सचा चक्क ‘पाठलाग’ करायचं ठरवलं. उत्तर ध्रुवाच्या आसपासच्या काही भागाला लॅपलॅन्ड म्हणतात. तिथून सुरुवात करून नॉर्दर्न लाइट्सच्या मागे अधिकाधिक उत्तरेकडे प्रवास करायचा असा बेत होता. मग आयुष्यात कधीही न ऐकलेली शहरांची नावं कळली. जगाच्या पाठीवर रोवानिअॅमी, अॅबिस्को, किरूना, ट्रॉम्सो अशी शहरं आहेत याची माहिती आम्हाला झाली.
जायचे दिवस कुठले हे ठरवणं हा प्रश्न चर्चेला आला, तेव्हा नॉर्दर्न लाइट्स ज्या दिवसात दिसतात, त्या काळातली कडक थंडी आम्हाला सोसवेल का, हे महत्वाचं होतं. शिवाय डिसेंबर-जानेवारीमध्ये त्या भागातला दिवस खूप छोटा, कधी कधी जेमतेम दोन चार तासांचा, असतो हेही आम्हाला माहित होतं. इतक्या कमी वेळात आपण काय बघणार? सगळ्यांनी मिळून यावर तोडगा काढला. आपण मार्चमध्ये जाऊ या. वर्षाच्या या काळात दिवस आणि रात्र जवळपास समान लांबीचे असतात. शिवाय थंडी थोडीशी कमी झालेली असते, तेव्हा मार्च आम्हाला झेपेल असं वाटलं.
पुढचा विषय होता व्हिसाचा. जगाच्या ज्या भागाला स्कॅन्डिनेव्हिया म्हणतात तो एक देश नाही. स्वीडन, फिनलंड, नॉर्वे आणि डेन्मार्क असे चार देश त्यात अंतर्भूत आहेत. त्यामुळे पूर्वी सगळीकडे वेगवेगळा व्हिसा घ्यावा लागायचा. आता युरोपीय समुदाय एकत्र झाल्यामुळे तिथं शेनझेन व्हिसा लागतो. एकाच देशाच्या व्हिसावर तुम्ही स्कॅन्डिनेव्हियाच्या चारही देशांत प्रवास करू शकता. व्हिसासाठी लागणारी सगळी कागदपत्रं अचूक गोळा करूनही शेवटी थोडा घोळ झालाच. ज्या देशात तुम्ही प्रथम प्रवेश करता त्या देशाकडे व्हिसासाठी अर्ज करायचा असतो, या कल्पनेनं गेलेल्यांना परत पाठवलं गेलं. नवीन नियमांप्रमाणे ज्या देशात तुमचं वास्तव्य अधिक, त्या देशाच्या वकिलातींकडे अर्ज करायचा असतो. पुन्हा वीकएंड रोमर्स मदतीला धावलं. त्यांनी कागदावर फेरफार केले आणि नवं वेळापत्रक बनवून दिलं. व्हिसाचा मार्ग मोकळा झाला.
आता प्रवासाचे वेध लागले. थंडीत जायचं म्हणजे ऊबदार कपडे हवेत. अर्थात आम्हाला मुंबईची थंडी माहित. पारा वीसच्या खाली घसरला म्हणजे इथं आम्हाला हुडहुडी भरते. तिथलं तापमान उणे असतं. कधी कधी उणे दहा वगैरे होतं असं वाचलं. पण उणे दहा (प्रत्यक्षात ते उणे तेवीस निघालं) म्हणजे नेमकं किती हे समजायला आम्हाला तिथे पोचावं लागलं आणि तिथं पोचल्यावर, आम्ही केलेली थंडीच्या बचावाची तयारी बर्यापैकी तुटपुंजी शाबीत झाली.
एकमेकांना ओळखणार्या मंडळींचा ग्रूप सहलीला निघाला की जे होतं तेच आमच्या बाबतीतही झालं. खाण्याची ‘आबाळ’ होऊ नये म्हणून प्रत्येकाने आखणी केली. भरपूर खाणं सोबत घेतलं. आमच्यात डॉ. भारती घिवलीकर नावाची एक सदस्य होती. तिचे खाण्यापिण्याचे नियम कडक आहेत. ती बाहेरचं काही खात नाही. त्यामुळे तिनं पंधरा दिवस पुरेल इतक्या खाण्यानं भरलेली चक्क अख्खी एक बॅग घेतली.
सगळी जय्यत तयारी झाली आणि शेवटी ‘मज्जा’ करायला निघालेलो आम्ही एअरपोर्टवर गोळा झालो. आम्हाला मजा तर करायची होती, पण नेमकी काय करायची ते ठरत नव्हतं. मात्र पुढच्या पंधरा दिवसांत वेगवेगळ्या अनुभवांचं किती मोठं गाठोडं आम्ही घेऊन येणार आहोत याची आम्हाला त्या क्षणी तरी कल्पना नव्हती.
जेव्हा आपण अनेक देशांचा प्रवास करायचा बेत आखतो तेव्हा आणखी एक समस्या असते. ती म्हणजे पैसे किती आणि कोणत्या चलनात न्यायचे. सुदैवानं युरोपमधल्या अनेक देशांनी युरो हे एकच चलन मान्य केलंय. जेव्हा हे देश वेगवेगळे होते आणि वेगवेगळी चलनं वापरात होती, तेव्हा खरंच खूप कठीण होतं. तरीही स्वित्झर्लंड आणि स्कँडिनेव्हियातल्या काही देशांनी युरो स्वीकारलेला नाही. तिथं वेगवेगळी चलनं चालतात. त्यात तुमचं विमान मध्ये कुठेतरी वेगळ्याच देशात थांबून जाणार असेल, तर तो एक देश वाढतो. अर्थात अमेरिकन डॉलर कुठेही चालतो. पण त्यातही एक प्रश्न उद्भवतो. ती मंडळी डॉलर घेतात पण मोड देताना आपल्या चलनात देतात. मग आपण अठरापगड नाणी खिशात खुळखुळवत परत येतो. अर्थात आता वेगवेगळ्या बँका तुम्हाला परकीय चलनातली ‘ट्रॅव्हल कार्ड’ देतात. ते खिशात असलं की मोड वगैरे घेण्याचा प्रश्न येत नाही. एखाद्या डेबिट कार्डसारखंच ते चालतं.
आमच्या ग्रूपच्या बाबतीत ती समस्या आमच्या मुलांनी सोडवली. नवीन पिढी इंटरनेट, गूगल अशा माध्यमांना सरावलेली. त्यांनी आपला वेळ खर्चून गणितं मांडायला सुरुवात केली. मुलांपैकी मैथिलीनं अगदी म्युझियमची प्रवेश फी वगैरे जमेस धरून आकडा काढला. अश्वेकने वेगवेगळ्या देशांचं चलन जमेस धरून एक्सेल शीट बनवली. त्यात ज्यानं त्यानं खरेदीचा ठोकताळा मांडला आणि एकूण पैसे किती न्यायचे हे ठरवलं. आम्ही भेट देत असलेलं प्रत्येक शहर नीट अभ्यासून मानसीनं कुठे काय काय पाहायचं याची यादी तिच्या वडिलांकडून घोकून घेतली. वर ‘हे सगळं तुम्ही पाहायलाच हवंच’ असा आग्रहवजा दम भरला. आमच्याबद्दल घरच्यांना माहिती मिळावी म्हणून सगळ्यांनी मिळून फोनची एक किंवा दोन कार्ड घ्या वगैरे सूचना होत्याच. थोडक्यात काय? प्रवास आम्ही करणार पण गृहपाठ सगळा मुलांचा अशी परिस्थिती होती.
विमान कंपन्यांची एक खासियत असते. एखाद्या देशातून निघाल्यावर प्रथम ती आपल्या मूळ देशी, म्हणजे त्या कंपनीचं हेडक्वार्टर्स असतं तिथं जातात आणि नंतर तुम्हाला इप्सित स्थळी पोचवतात. उदा. आम्ही टर्किश एअरलाइन्सने प्रवास केला. त्या कंपनीचं हेडक्वार्टर टर्की अर्थात तुर्कस्तान या देशातल्या इस्तंबूल शहरात आहे. त्यामुळं आमचं विमान प्रथम इस्तंबूलला थांबलं. आम्हाला त्या विमानतळावर थोडा वेळ काढायचा होता. मग तिथं सगळ्यांनी ‘बकलावा’ या टर्किश मिठाईची चव घेतली.
आमच्यापैकी सगळेच स्कँडिनेव्हियाला प्रथमच जाणार होते. जगाचा तो भाग प्रचंड सुंदर आहे हे देखील अनेकांनी सांगितलं होतं. त्यामुळं काय काय पाहायला मिळणार याबद्दल उत्सुकता होती. पण जेव्हा विमान प्रत्यक्ष फिनलंड देशातल्या हेलसिंकी या राजधानीतल्या शहरात उतरू लागलं तेव्हा खिडकीतून फक्त बर्फाचा पांढरा रंग काय तो दिसत होता. आता पुढचे दोन आठवडे हा पांढरा रंगच आमची सोबत करणार होता.
विमानतळावरून हॉटेलपर्यंत पोचणं हे पुढचं काम. प्रत्येक विमानतळावर ट्रॅव्हल डेस्क असतो. ती मंडळी वाहनांची चांगली सोय करून देतात. एका व्हॅनमध्ये आम्ही तेरा जण आणि सोबतचं सामान मावणं शक्य नव्हतं. त्यामुळं वेगवेगळ्या दोन व्हॅन घेऊन आम्ही हॉटेलवर पोचलो. हॉटेल विमानतळापासून लांब असलं तरी शहराच्या मध्यवर्ती भागात होतं. पण प्रवासाने आणि थंडीने आम्ही इतके गळून गेलो होतो की बाहेर जाऊन काही पाहावं याचं त्राण कोणालाही उरलं नाही. सगळे थोडंबहुत खाऊन आपापल्या खोलीत शिरले आणि मस्त झोपी गेले. दुसर्या दिवशी काय झालं, ते वाचा पुढच्या भागात.
(क्रमश:)