श्री रामकृष्ण मठातील उत्सवातील एक प्रसंग आठवतोय. सगळा केवळ आनंदोत्सव असतो हा एकूणच, वर मंदिरात पूजेची धामधूम असते तर आमच्याकडे पाककौशल्य पणाला लागते. मंदिराच्या तळघरात असलेल्या स्वयंपाकघरात नेहमीप्रमाणे अन्नभोग बनविणारे आम्ही यादीनुसार एकेक पदार्थ बनवित होतो. ऐन धावपळीची वेळ थोडी पुढे सरकलेली, बाकी बहुतेक पदार्थ बनवून झालेले. म्हणून काही खास पदार्थ आम्ही विशेष निगुतीने बनवत होतो. तेवढ्यात वर सेवा देणारे एक ज्येष्ठ स्वयंसेवक मुद्दाम खाली आले आणि म्हणाले, अरे काय घमघमाट पसरलाय सगळीकडे! भाताच्या केशर-वेलदोडामिश्रित वासाने खेचून आणलं बघ म्हणे मला खाली. काहीतरी खास बनवतो आहेस वाटतं नैवेद्यासाठी. म्हटलं काका, साखरभात बनतोय. अर्थात बाकी गडबडीत हा संवाद इथेच थांबला, पण अनेक आठवणींना उजळा देऊन गेला.
साखरभात म्हटलं की मला पूर्वी फोन नसतानाच्या काळात अवचित येणारे पाहुणे आठवतात. बाकी स्वयंपाकात तर वैविध्य असू शकायचं पण गोडामध्ये शिरा किंवा साखरभात हुकमी एक्के असत जणू! साहित्याची फारशी जुळवाजुळव करावी लागत नसणारा, सहसा सर्वांनाच आवडणारा आणि तसा पटकन होणारा हा आपला आणखीन एक पारंपरिक पदार्थ. नारळीभाताचं हे एकाप्रकारे धाकटं भावंडच. बनवायला सोप्पा अगदी.
साजुक तुपावर दोन चार लवंगा परतून त्यात धुतलेले, शक्यतो जुने बासमती किंवा आंबेमोहोर तांदूळ आणि तांदळाच्या दुप्पट आधणाचं पाणी आणि रंगासाठी चिमूटभर हळद घालून भात छान शिजवून घ्यावा. तांदळाएवढीच साखर आणि ती बुडेल एवढे पाणी घेऊन जाड बुडाच्या भांड्यात गोळीबंद पाक करावा. त्यात केशर, वेलदोड्याची पूड व आवडीनुसार बाकी सुकामेवा म्हणजे काजू, बदाम, बेदाणे वगैरे मिसळून त्यात जरा निवलेला शिजवलेला भात मिसळावा. घट्ट असलेला पाक पुन्हा पाघळतो. पाक आणि बाकी जिन्नस भाताला सगळीकडून छान लागले आहेत, याची खात्री करून मंद आचेवर भात शिजू द्यावा. पाक पुन्हा आळतो, भात तयार झाल्याची सोपी चाचणी म्हणजे शिजणार्या भातात मधोमध खोचलेला चमचा उभा राहतो, कलंडत नाही. मग आच बंद करून वाफ थोडी मुरली की भात खायला तयार. खाताना काहीजण वरून साजुक तूप घेतात यावर.
मुळातला अगदी साधा भातासारखा भात पण चवीबरोबर रंगसुगंधाची अशी काही उधळण करतो की भलेभले बोटं चाटत राहतात, नाही का? साखरेची गोडी, केशर वेलदोड्याचा स्वादसुगंध आणि रंग, सुक्या मेव्याचा खानदानी भारदस्तपणा असा काही बेमालूमपणे अंगिकारतो नं हा भात की त्याच्या मुळच्या सामान्यत्वाचा कुठेतरी विसर पडावा! अर्थात सामान्य म्हटले तरी साध्या भातालाही स्वत:ची एक चव असतेच आणि मीपणा सोडून इतरांकडून विशेष गुण आत्मसात करण्याची प्रवृत्ती त्या भाताला खास बनवते नाही का? बाकी घटक तर आसुसलेलेच असतात की त्यांची गोडी, रंग, रूप द्यायला!
साखरभात बनविण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेत म्हटलं तर सोप्पं पण आचरणात आणायला जरा कठीण असं एक तत्व दडलंय बरं. आपल्या मर्यादा ओळखून आणि अहंकाराला काहीसे बाजूला ठेऊन जर प्रत्येकानेच आजूबाजूच्या व्यक्तींकडून, परिस्थितीकडून चांगले गुण आत्मसात केले तर नकळत आपलीच एक वरचढ आवृत्ती तयार होते. आपल्याला समोरच्याचे गुण स्वीकारण्यासाठी दोन गोष्टी प्रामुख्याने कराव्या लागतात. स्वत:मधील कमतरता स्वत:च स्वीकारणे आणि दुसर्यातल्या गुणांची पारख व कदर करणे! एकदा का मनाला हे वळण लागले नं की वाटचाल सुफळ तर होतेच, पण आनंददायीही होते, वाळ्याचा किंवा मोगर्याच्या फुलाचा सुगंध ल्यायलेल्या माठातील थंडगार पाण्यासारखीच!
या परीसस्पर्शाची महती तुकोबा फार सोप्या आणि सयुक्तिक दाखल्यांच्या आधारे पटवतात. स्वत:च्या घडविलेल्या आयुष्याचा परावा देत ते सर्वांनाच ते सुधारणेचे महाद्वार जणू उघडून देतात. समुद्राच्या संगतीने नदीचे समुद्रात झालेले रूपांतर असो, चंदनाच्या साथीने सुवासिक झालेले बाकी वृक्ष असोत, परीसस्पर्शाने सुवर्ण झालेले लोखंड असो वा विठ्ठलाच्या सानिध्यात येऊन विठ्ठलच झालेला प्रत्येक वारकरी असो, सर्वांत एक साधर्म्य आहे की त्यांनी स्वत:च्या मूळ रूपाचा वृथा अहंकार न जोपासता, समोरच्या श्रेष्ठाशी एकरूपता सहज स्वीकारली. फायदा म्हणाल तर त्यांनाच झाला, नाही का? आपल्या सामान्यत्वाचा न्यूनगंड न बाळगता इतरांमधील सुगुणांना आत्मसात केले की आपणही असामान्यत्वाकडे एक पाऊल टाकतो हे नक्की.
साक्षात श्री दत्तगुरूंनीही चोवीस गुरू केले होते असे सांगतात तर तुम्हाआम्हाला एकमेकांकडून, परिस्थितीकडून शिकण्या-सुधारण्याची मिळणारी संधी का हो दवडायची आपण? यात नुकसान तर नाहीच पण समाधानाबरोबरच सर्वांगीण प्रगतीचे नवे आयाम खुले होतात नी जीवनपुष्पाचा सुगंध चौफेर दरवळतो… साखरभातासारखाच!!