कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षणकार्याला सरकारी मान्यता आणि ग्रांट मिळावी म्हणून प्रबोधनकारही प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी साप्ताहिक लोकहितवादीमध्ये कर्मवीरांच्या कार्यावर इंग्रजीत दोन पानं माहिती छापली होती. मंत्र्यांना भेटून त्यासाठी पाठपुरावाही केला.
– – –
प्रबोधनकारांनी लिहिलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या चरित्रवजा लेखात छत्रपती शाहू महाराजांची बदनामी होते, असा ठपका मुंबई सरकारने ठेवला खरा, पण त्यातून निष्पन्न झालेल्या घटनाक्रमात प्रबोधनकार, कर्मवीर आणि शाहू महाराज या तीन सत्यशोधकांमधला परस्पर स्नेहाचा अतूट धागाच समोर आला. तो इतिहासाचा भाग असल्याने तो स्नेह आजही आपल्याला समजून घेता येतो. कर्मवीर अण्णांनी स्थापन केलेल्या बोर्डिंगचं नाव छत्रपती शाहूबोर्डिंग असं ठेवून या प्रेमादरावर शिक्कामोर्तब करून ठेवलं आहे.
सत्यशोधक भाऊराव पाटील यांचा अल्पपरिचय या लेखाच्या शेवटी प्रबोधनकार लिहितात, शाहू महाराजांनी भाऊरावचा एवढा छळ केला की त्यातून पुनर्जन्म होणे हा केवळ दैवयोगच मानला पाहिजे. इतके असून सुद्धा भाऊरावची शाहू महाराजांवरील भक्ति तीळमात्र कमी झालेली नाही. ब्राम्हणेतर चळवळ सुरू झाल्यानंतर महाराज भाऊरावला अनेक वेळा भेटले, मसलती केल्या, पण सगळ्या ब्रिटिश हद्दीत. भाऊरावनी कोल्हापुरात पाऊल ठेवलें नाही… तात्पर्य, कोणी कितीही छळ केला, निंदा केली, घातपात केले, तरी भाऊराव म्हणतात, माझे ध्येयच इतके उच्च आहे की त्यापुढे या लौकीकी गोष्टी विचारांत घ्यायला माझी लहरच लागत नाही. शाहू महाराजांकडे मी दोन दृष्टींनी पहातो, एक राज्यकर्ते शाहू महाराज व दुसरे दीनोद्धारक राजर्षि. मी दुसर्या दृष्टीचा उपासक आहे. पहिल्याबद्दल मी कधी विचारच करत नाही.
याच उपासकाच्या दृष्टीने कर्मवीर अण्णांनी शाहूबोर्डिंग हे नाव दिलं. मूळ बोर्डिंग १९१९ साली कराडजवळच्या काले या गावात सुरू झालं. सर्व जातीच्या मुलांनी एकत्र राहण्याविषयी कर्मवीर अण्णा आग्रही असल्यामुळे ते फार चाललं नाही. त्यामुळे त्यांनी १९२४ साली सातार्यातल्या सोमवार पेठेतल्या राहत्या घरी हलवलं. तेव्हा पाच विद्यार्थी होते. कर्मवीरांचे चुलतभाऊ बंडू पाटील, एन.आर. माने, लक्ष्मण भिंगारदिवे, आप्पालाल शेख, पाचव्या विद्यार्थांचं नाव काही ठिकाणी मोहिते आहे तर काही ठिकाणी खरात. शाहूबोर्डिंग हे नाव आधीच दिलेलं होतं. पण त्याची चर्चा झाली ती १९२७ साली. महात्मा गांधी सातार्याच्या प्रवासात असताना कर्मवीरांनी त्यांना सातार्याला आणलं. त्यांच्या हस्ते छत्रपती शाहूबोर्डिंग या फलकाचं अनावरण केलं. तेव्हा गांधीजींना कर्मवीरांना विचारलंही, हे कोणाचं नाव आहे आणि त्यांनी हे नाव देण्यासाठी किती देणगी दिली? कर्मवीरांनी उत्तर दिलं की शाहू महाराजांनी पैसे दिले नाहीत, तर शिक्षणकार्य करण्याची प्रेरणा दिली.
शाहू हॉस्टेलच्या कार्याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रबोधनकार सतत प्रयत्नशील होते. कारण त्यांना हे काम काही केल्या बंद पडू द्यायचं नव्हतं. त्या काळाविषयी प्रबोधनकार लिहितात, भाऊराव पाटलाने शाहूबोर्डिंगच्या कार्याचे रोप लावले. अशा कार्याकडे लोक सुरुवातीला फारसे लक्ष देत नसतात. काढला आहे एक उद्योग एका एककल्ली माणसाने, पाहू या काय होते ते. अशीच वृत्ती असणार नि होती. रोपट्याचा वृक्ष झाला म्हणजे मग दिवे ओवाळणार्या मशालजींची भाऊगर्दी उसळते. प्रबोधनातल्या चरित्रामुळे, कोणत्याही कारणाने का होईना, पुण्याच्या कलेक्टरापर्यंत भाऊराव ही व्यक्ती कोण, याचे लोण तर पोचलेच होते. हेच लोण थेट मुंबईच्या वरिष्ठ प्रधानमंडळात नेऊन कसे पोहचवावे, याचा आम्हा दोघांत खल झाला.
१९१९ च्या मॉंटेंग्यू चेम्सफर्ड योजनेनुसार इंग्रजी नोकरशाहीबरोबरच निवडणुकांतून निवडून आलेल्या स्थानिक प्रतिनिधींकडे काही अधिकार दिलेले होते. ब्रिटिश सत्तेतल्या प्रत्येक इलाख्याचे सर्वाधिकार गवर्नर जनरलकडेच होते तरीही एक स्थानिक कायदेमंडळ होतं आणि त्यातल्या निवडक प्रतिनिधींचं एक मंत्रिमंडळही असे. त्यात शिक्षण, आरोग्य, शेती आणि स्थानिक स्वराज्यसंस्था असे विषय स्थानिक मंत्री सांभाळत असत. कर्मवीरांच्या होस्टेलला सरकारी मान्यता आणि ग्रांट मिळावी यासाठी आता या मंत्रिमंडळातल्या म्हणजे गवर्नर एक्झिक्युटिव काऊन्सिलमधल्या एखाद्या मंत्र्याला गाठणं गरजेचं होतं.
या मंत्रिमंडळातले सर चुनीलाल मेहता सातारा जिल्ह्याच्या दौर्यावर असल्याची माहिती मामलेदार असणार्या रावबहादूर तात्यासाहेब दुधुस्करांनी कर्मवीर अण्णांना दिली. सातारा शहरात धनजीशेठ कूपर यांच्याकडे त्यांचं स्वागत सत्कार करणार होते. तर दौर्याचा शेवटचा टप्पा असलेल्या कोरेगावात ही जबाबदारी दुधुस्करांवर होती. त्यामुळे तिथे भेटणं सोयीचं होतं. तयारीसाठी कर्मवीर अण्णा प्रबोधनकारांना भेटण्यासाठी फेर्या मारू लागले. मंत्र्यांना फक्त भेटून काही घडणार नव्हतं. त्यामुळे कर्मवीर अण्णांच्या कार्याची माहिती छापून प्रसिद्ध केली तर पुढचं काम सोपं होईल, असं दोघांना वाटलं. त्यानुसार प्रबोधकारांनी तेव्हा प्रसिद्ध होणार्या लोकहितवादी साप्ताहिकात कर्मवीरांच्या कार्याची माहिती तब्बल दोन पानं आणि तीही इंग्रजीत छापली. त्याच्या प्रती गवर्नरपासून, पुणे, सातारा कलेक्टरांपर्यंत सगळ्यांना पाठवून दिल्या. दौर्यावर येऊ घातलेल्या चुनीलाल मेहत्ाांनाही रजिस्टर पोस्टाने प्रत पाठवली.
चुनीलाल मेहता हे मुंबई इलाख्यातली एक बडी आसामी होते. मुंबईतल्या प्रसिद्ध सेंच्युरी मिलचे ते मालक. त्या काळातल्या महाबलाढ्य गिरणी मालकांच्या लॉबीचे मंत्रिमंडळातले प्रतिनिधीच. उद्योजकांची संघटना असणार्या इंडियन मर्चंट्स चेंबरचे ते अध्यक्ष होते. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचं मानद सदस्यत्व ज्या निवडक भारतीयांना देण्यात आलं, त्यातल्या पहिल्या फळीचे ते मानकरी होते. शिक्षणाविषयीही त्यांना आस्था होती. त्यामुळे ते एसएनडीटी युनिवर्सिटीचे कुलपती होते. गवर्नर एक्झिक्युटिव काऊन्सिलच्या मंत्रिमंडळात ते १९२३ ते २५ महसूल खात्याचे तर १९२६ ते २८ दरम्याने अर्थखात्याचे मंत्री होते. त्यामुळे सरकारी ग्रांट पदरात पाडून घेण्यासाठी मेहताशेठना गाठणं गरजेचं होतं. त्यासाठी कर्मवीर अण्णा प्रबोधनकारांसह कोरेगावात ठाण मांडून बसले होते.
कोरेगावात येण्याआधी चुनीलाल मेहतांचा जंगी स्वागत सोहळा धनजीशेठ कूपरने सातारा शहरात आयोजित केला होता. त्यातही त्यांनी चौकशी केली की भाऊराव पाटील कोण आहे आणि त्याचं बोर्डिंग कुठे आहे? तिथे धनजीशेठशी पंगा घेणार्या भाऊरावांविषयी चांगलं बोलण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे एकाने सांगितलं, तो एका एकांड्या शिलेदाराचा उपद्व्याप आहे. त्यावर प्रसिद्ध वकील रावबहाद्दूर रावजी रामचंद्र काळे उसळले. त्यांचा भाऊरावांच्या कार्याला सुरुवातीपासून पाठिंबा होता आणि मदतही होती. त्याची कृतज्ञता म्हणून भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या पहिल्या प्राथमिक शाळेला रावबहादूर काळेंचं नाव दिलं. काळे म्हणाले, थट्टेवारी नेण्यासारखा तो उपद्व्याप नव्हे. आज तो चिमुकला ओढा आहे. पण सरकारने नि लोकांनी वक्तशीर हातभार लावला, तर त्याची विशाल गंगा होण्याचा संभव आहे.
रावबहादूर काळेंनीच दणका दिल्याने विरोधकांची बत्तिशी बंद झाली. उलट सातार्यात कर्मवीरांचा शोध सुरू झाला. कर्मवीर तर सरसाहेबांची कोरेगावला वाट बघत होते. साधारण दुपारी दीडच्या सुमारास चुनीलाल मेहता कोरेगावात आले. तिथे त्यांनी स्वतःहून कर्मवीर अण्णांची चौकशी केली. हा सगळा लोकहितवादीमधल्या लेखाचा परिणाम होता. कर्मवीर अण्णा तिथे होतेच. त्यांनी फर्ड्या इंग्रजीत बोर्डिंगची योजना समजावून सांगितली. त्यावर मेहता म्हणाले, हो, बहुतेक हकिकत मी लोकहितवादी साप्ताहिकात वाचलीच आहे. तुमची योजना सरकारमान्य व्हायला अगदी योग्य आहे. त्यावर कर्मवीर अण्णांनी दिलेलं उत्तरही प्रबोधनकारांनी दिलं आहे. कर्मवीर म्हणाले, पण ती मान्यता माझ्यासारख्या फटिंगाला लाभणार कशी?अस्पृश्यादि मागास समाजांच्या शिक्षणोद्धारासाठी अंगाला राख फासून मी बाहेर पडलो आहे. कर्मवीरांच्या या उत्तरावर मेहतांनी सरकारी पद्धतीने नेहमीचं आश्वासन दिलं, इतकंच प्रबोधनकार सांगतात. त्यामुळे कर्मवीरांच्या बोर्डिंगला ग्रांट कधी आणि कशी मिळाली, याचा वेगळा शोध घ्याव लागेल.
मंत्र्याच्या या दौर्यातल्या दोन विलक्षण आठवणी प्रबोधनकारांनी सांगितल्या आहेत. ते लिहितात, पहिल्या महायुद्धात शौर्य गाजविलेल्या नि व्हिक्टोरिया क्रॉस मिळविलेल्या लष्करी पेन्शनरांनी त्यांना खडी तालीम दिली. दुधुस्करांनी एकेकाचा सर साहेबांना परिचय करून देताना एका कुकरीवाल्या पेन्शनराकडे बोट दाखवून म्हटले, `या मर्दगड्याने एका रात्री याच कुकरीने सात जर्मनांना यमसदनास पाठविले. त्यावर मेहता स्मितहास्य करीत म्हणाले, ते गाढ झोपी गेलेले होते की काय? यावर खूपच हास्याचा कल्लोळ उडाला.`
प्रबोधनकारांनी सांगितलेली याच दौर्याची दुसरी आठवण यापेक्षाही भारी आहे. ती त्यांच्याच शब्दात वाचायला हवी, कोरेगावला रा.ब. दुधुस्करांनी चहा बिस्कुटांचा उपहार सिद्ध ठेवला होता. साहेबांनी हात तोंड धुण्यास पाणी मागितले. तेव्हा एकाने लेमोनेडची बाटली फोडून मेहतांपुढे धरली. `सरसाहेब, आमच्या कोरेगावला एप्रिल मेच्या सुमाराला पिण्याच्या पाण्याचा अगदी खडखडाट उडतो. कसेबसे गढूळ पाणी मिळते. आपण ही शेजारचीच विहीर पहा ना, कोरडीठाण पडली आहे. म्हणून आपल्या सरबराईसाठी हे लेमोनेड आणले आहे सातार्याहून. त्यावर पाण्याच्या प्रश्नावर चर्चा होऊ ते दौरापुराण संपले.`