नरेंद्र मोदी
चांद्रयान लँडिंगमध्ये
माझीच चमकोगिरी गाजली
दक्षिण आफ्रिकेत असूनसुद्धा
माझीच अखेर टिमकी वाजली
चमकण्याचा नामी मोका
मी कसा सोडीन लेको
ऐकून माझी भाषणबाजी
लोक म्हणाले फेको फेको
याच्यासारखी सुवर्णसंधी
पुढच्या वर्षी असेल नसेल
आताच हात धुवून घेतले
वाट पाहात कोण बसेल
—– —– —–
विजयकुमार गावित
मासे खाणार्या महिला चिकन्या
बोलता बोलता गेलो बोलून
ऐश्वर्याचा दिला दाखला
अगदी माझे हृदय खोलून
दिसती मला डोळे तिचे
जणू सुंदर त्या मासोळ्या
नव्हते काही वावगे-बिवगे
माझ्या साध्या मनात भोळ्या
महिला आयोगाचा बडगा
बसला पाठीत माझ्या जेव्हा
ऐश मला मुलीसारखी
सारवासारव केली तेव्हा
—– —– —–
दादा भुसे
कांदे महाग झाले तर ते
लोकहो तुम्ही खाऊ नका
दोन-तीन महिने कांद्याशिवाय
भोजन करा, माझे ऐका
मी तर खातो खूप पक्वान्ने
तुमच्या खिशाला नाही झेपणार
परवडणारे खा खा तुम्ही
आम्ही मात्र दाबून जेवणार
सीएम शिंदे दैवत माझे
तुमच्या-आमच्यासाठी धावतात
आम्ही सारे खुशालचेंडू
खुर्च्या उबवून शिंदे पावतात
—– —– —–
अजितदादा पवार
असे कसे यांचे मंत्री
मन मानेल ते बडबडतात
सीएम कसे ऐकून घेतात
मला वाटतं ते हडबडतात
आम्ही जाब विचारताच
त्यांचा होतो तीळपापड
असले मंत्री नव्हते पाहिले
माणसे आहेत की ते माकड
मुक्ताफळे उधळूनसुद्धा
सीएम काहीच बोलत नाही
दातखिळी बसल्यासारखे
का वागतात कळत नाही
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
मुंडे दिल्लीत पोचण्याआधीच
जपानमधून केला वांदा
कांदाप्रश्नी बूच मारून
बंद पाडला स्वार्थी धंदा
ते दिल्लीत बोलण्याआधीच
गोयलांशी घेतलं बोलून
कांदा खरेदीचा निर्णय
जाहीर केला जपानमधून
शेतकर्यांवर भाव मारून
करण्या गेले हीरोगिरी
त्यांचा पत्ता कटच केला
वेळीच रोखली चमचेगिरी