श्रावण महिना सुरु होतानाच कामवाल्या मावशींनी सांगितले, ‘म्याडम या महिन्यात सुट्ट्या जरा जास्त होतील. सणवार आहेत.’
मी म्हटले, ‘ठीक आहे मावशी, एवढी धमकी दिल्यासारखं काय सांगताय?’
‘नंतर बायका किरकिर करतात हो.’
हे सांगून झाल्या झाल्या लगेच दुसर्या दिवशी म्हणू लागल्या, ‘म्याडम, आज सगळ्यांकडे हाफ डे आहे माझा.’
मी विचारले, ‘म्हणजे?’
‘अहो म्हणजे, एक एकच काम करणार, एकतर भांडी नाहीतर लादी. तुम्ही सांगा तुमच्या घरचं काय करायचं?’
‘मावशी, आज हाफ डे घेऊन काय करणार? खरेदी वगैरे की काय?’
‘नाही, पार्लरमध्ये जायचंय.’
महाराष्ट्रातील एवढे मंत्री गुवाहाटीला गेलेले ऐकूनही मला जेवढा धक्का बसला नव्हता, तेवढा धक्का हे ऐकून बसला होता. मी काही बोलत नाही हे बघून मावशी म्हणाल्या, ‘का हो म्याडम, काय झालं? आम्ही काय पार्लरमध्ये जाऊ नये की काय?’
धक्क्यातच मी विचारलं, ‘काय विशेष मावशी?’
‘सणावाराचे दिवस आले ना, लई दिवसाचं फेश्यल आणि आयब्रो केल्या नाहीत. म्हटलं जाऊन यावं.’
मावशींची सुंदर दिसण्याची आस काही चुकीची नव्हती हे नंतर जाणवले. घरी चार लोकांना जेवायला बोलावले की जिथे बायका फेशियल, मेकअप करू लागल्या आहेत आणि पुरुष केसाला कलप लावू लागले आहेत तिथे मावशींचे काय चुकले?
बायकांचे आणि पुरुषांचे ब्युटी पार्लरबद्दल कितीही विरोधी मत असो, आमच्या शेजारच्या मंजिरी वहिनी मात्र कोणाचंच ऐकत नाहीत. त्यांचे ब्युटी पार्लरमध्ये महिन्याचे अकाऊंट आहे. कोणी त्याबद्दल त्यांना काही म्हणाले तर त्या सरळ उत्तर देतात, ‘खटारा गाड्या जातात का कधी सर्विसिंगला? चांगल्या स्थितीतील गाड्यांनाच सर्विसिंगची गरज असते ना? तसेच आहे हे. आमच्यासारख्या चांगल्या दिसणार्या बायकांनाच मेंटेन करण्याची गरज असते.’
मला तर ही पार्लरची गोष्ट म्हणजे भानगड वाटते. म्हणजे मी जेव्हा पार्लरमध्ये जाते तेव्हा तिथल्या बाईने आयब्रो करायला घेतल्या की ती म्हणते, ‘किती वाकडी आहे तुमची दुसरी आयब्रो! काही करत का नाही त्यासाठी?’
आता वाकड्या भुवईसाठी कुठली शल्यचिकित्सा वगैरे करून घ्यायची की काय?
तिचे पुढचे वाक्य, ‘खूप उन्हात जाता का तुम्ही? त्वचा खूप कोरडी झाली आहे तुमची. टॅनपण झाली आहे. ट्रीटमेंट घ्या त्यासाठी.’
मला तिला ओरडून सांगावेसे वाटते, ‘बायो, मी किनई रोज तीन तास क्रिकेटचा सराव करायला, त्यानंतर लोकांच्या गच्चीवर माळीकाम करायला जाते. तिथे खूप ऊन असतं, त्यामुळे एवढी टॅन झाली आहे.’
बरे एवढे फेशियल करून, व्हॅक्सिंग करून घरी आल्यावर वेगळेच काहीतरी असते. मागे एका कार्यक्रमासाठी मी पार्लरमध्ये जाऊन छान फेशियल करून आले. निघताना तिला म्हटले, ‘अगं, एव्हढा काही बदल दिसत नाही चेहर्यात.’
ती म्हणाली, ‘आज दिसणारच नाही. उद्या बघा चेहरा असा ग्लो करेल की सर म्हणतील की तू तर पाच वर्षांनी तरुण दिसते आहेस.’
ग्लो वाढला की आपण तरुण दिसतो हे गणित आता माझ्या डोक्यात पक्के झाले आहे. मी दुसर्या दिवशी मस्त आवरून चेहर्यावरील ग्लो घरात दाखवण्याची पूर्ण तयारी केली, तर कोणाच्याच काही लक्षात आले नाही. उलट नवरा म्हणाला, ‘किती धावपळ होते आहे तुझी. चेहरा बघ केवढा काळवंडला आहे. जा, कार्यक्रमाच्या आधी जरा पार्लरमध्ये जाऊन ये. जरा मसाज करून घेतलास तर ताजेतवाने वाटेल तुला.’
घ्या आता पाच वर्षे कमी झालेले वय कुठे गेले कुणास ठाऊक?
सुंदर दिसण्याच्या स्पर्धेत पुरुषही काही कमी नाहीत हे अशातच एका प्रसंगामुळे माझ्या लक्षात आले. आमच्या सोसायटीतील एका गृहस्थांचे बरेच केस गळाले होते. म्हणजे टकले म्हणण्याच्या आसपास त्यांचा प्रवास होता. मधले बरेच महिने ते त्यांच्या भावाकडे बाहेरच्या देशात गेले होते. मागच्या आठवड्यात ते अचानक बागेत भेटले. थांबून त्यांनी गप्पा मारल्या. बाहेरच्या देशात त्यांनी केसांचा टोप बसवला होता. माझ्या खरे तर ही गोष्ट लगेच लक्षात आली होती. पण मी प्रतिक्रिया दिली नाही. ते अध्येमध्ये सारखे नव्याने शेती केलेल्या केसावर हात फिरवत होते. कुठल्याही वाक्यावर ‘अरेच्चा, अरेच्चा’ असे म्हणत डोक्यावर हात ठेवत होते. तरीही मी काहीही प्रतिक्रिया दिली नाही, तेव्हा वैतागून ते म्हणालेच, ‘वहिनी, तुम्हाला माझ्यात काही बदल जाणवला नाही का?’
मी म्हटलं, ‘जाणवला तर. अहो, भावाकडे जाऊन आल्यावर तब्येत छान झाली आहे तुमची. मानवला तुम्हाला बाहेरचा देश.’
चिडून ते म्हणाले, ‘नाही हो, माझा टोप नवीन आहे ना. चांगला वाटतोय ना?’
‘अगं बाई हो की, तेच म्हटलं काहीतरी वेगळं वाटतंय. चांगला दिसतोय टोप.’
‘आमच्या हिला सांगा, तिला नको होता. याच्या मेन्टेनन्सचा खर्च खूप आहे म्हणून चिडली आहे ती.’
आता नंतर वहिनींना फोन करून फक्त मेन्टेनन्सबद्दल बोलायला नको होते खरे; पण मला त्यांची काळजी वाटली म्हणून बोलले. तर मुद्दा असा की पुरुषही आपले सौंदर्य राखण्याचा प्रयत्न करतात आणि हे राखलेले सौंदर्य दुसर्यांना लक्षात यावे ही त्यांचीही अपेक्षा असते.
स्त्री असो वा पुरुष आपल्या पार्लरवाल्यांशी आणि कामवाल्यांशी पंगा कधीही घेत नाहीत. त्यांना ते परवडणारे नसतेच.
सौंदर्यप्राप्तीच्या चढाओढीत फॅशन या गोष्टीचा मोठा सहभाग आहे. फाटक्या विजारी, वाढलेली दाढी, त्रिकोणी गॉगल असा कुठलाही वेष आपल्या सौंदर्यात भर टाकत असेल असे सगळ्यांना का वाटते? बरे फॅशन कशाची यावी? त्यामुळेच नेहरू शर्ट, गांधी टोपी, जयललिता साड्या, मोदी जाकीट आणि ममता दिदी स्लीपर्स प्रसिद्ध झालेल्या आहेत.
पण, माझे काय म्हणणे आहे, मेकओव्हरच्या भानगडीत एवढाही मेकओव्हर करू नये की घरी आल्यावर घरच्यांनीच आपल्याला ओळखू नये. मध्यंतरी वर्तमानपत्रात बातमी छापून आलेली होती की पार्लरमध्ये मेकओव्हर करून आल्यावर बाळाने आईला ओळखले नाही त्यामुळे ते तिच्या जवळच आले नाही.
पार्लर चालवणे किंवा मेकअप करणे हा धंदा सध्या सगळ्यात जास्त तेजीत असावा. एकवेळ नवरा नसला किंवा नवरी नसली तर लग्न होईल, पण पार्लर आणि मेकअप नसेल तर केवळ अशक्य!
आमच्या सोसायटीत दरवर्षी संक्रांतीच्या हळदीकुंकात उत्साहाने सामील होणार्या चंदाताई या वर्षी हळदीकुंकवाला आल्याच नाहीत. त्या आल्या नाहीत, म्हणजे तसेच काहीसे गंभीर कारण असणार, म्हणून चौकशीसाठी घरी गेल्यावर मला कळले की कारण खरेच गंभीर होते. त्यांची पार्लरवाली आजारी होती. त्यामुळे मेकअप होऊ शकला नाही, मग चंदाताई बाहेर कशा निघणार?
सोशल मीडियावर तर कित्येक महिलांचा रोजचा दिनक्रमच हा असतो. मेकअप करायचा आणि फोटो आपल्या वॉलवर डकवायचे. कित्येक उंडगे न चुकता येऊन त्यांना सौंदर्याचे प्रमाणपत्र देऊन जातात. म्हणजे या स्पर्धेत एकाने तर हद्दच केली. एका महिलेने तिच्या मुलीबरोबर फोटो टाकला होता, तर त्यावर हा आईलाच विचारून आला, ‘तुमच्याबरोबर ही तुमची आई आहे का? ‘
आमच्या ऑफिसातील शिवानीने हद्दच केली. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या प्रोजेक्टमध्ये तिने गरीब महिलांना लिपस्टिक वाटण्याची योजना व्यवस्थापनासमोर ठेवली. तिच्या मते लिपस्टिक ही आजकालच्या आत्यंतिक गरजेच्या वस्तूतील एक आहे. मग, गरीब महिलांनी त्यापासून वंचित का राहावे?
गोरे होण्याची प्रसाधने, केस उगवण्याची प्रसाधने, शाम्पू, सौंदर्य प्रसाधने यासाठी लवकरच बँक ‘सुंदर दिसा कर्ज योजना’ जाहीर करण्याच्या विचारात आहे, असे नुकतेच मला एक बँकवाला मित्र सांगत होता. एवढेच नव्हे तर भविष्य निर्वाह निधी वेळेच्या आधीच काढायचा असेल तर त्यासाठी ब्युटी पार्लरचा खर्च असे एक महत्वाचे कारण त्यात जोडण्याचा विचार चालू आहे असेही मी ऐकले आहे.
लग्न जमवताना हल्ली मुले-मुली एकमेकांना पार्लरचा खर्च विचारून घेतात, असेही माझ्या बघण्यात आले आहे.
आपण सुंदर दिसावं, सुंदर असावं असे प्रत्येकाला वाटणे हे अगदी स्वाभाविक आहे. पण, सुंदरता म्हणजे काय याच्या आपल्या व्याख्या कुठे जाऊन पोचल्या आहेत हे तपासायची गरज कधी नव्हे तितकी वाटू लागलेली आहे. भारतासारख्या करोडो ग्राहक असलेल्या देशावर आपली सौंदर्याची परिमाणे पाश्चात्य जगाने थोपवली आहेत आणि आपण त्यामागे अंधपणे पळतो आहोत. नेटकं राहणं आणि मेकओव्हर यात फरक आहे. सुंदर राहण्याच्या स्पर्धेत आपण कुठल्या तरी अनभिज्ञ जगातील बाहुले तर होत नाही ना हे प्रत्येकाने तपासायला हवे असे वाटते.
चला आता लेख आवरता घ्यायला हवा. आज मावशी नाहीत तर त्यावेळेत मीदेखील पार्लरमध्ये जाऊन येईन म्हणते… सुंदर मी होणार.