कितने आदमी थे?, भाग धन्नो भाग! हमारे जेल में सुरुंग?, मौसी चक्की पिसींग अँड पिसींग अँड पिसींग… इतना सन्नाटा क्यों है भाई? हे शब्द नुसते कानावर पडले की हिंदी चित्रपटसृष्टीतली महान सिनेकृती ‘शोले’चा इतिहास जागा होतो. १५ ऑगस्ट १९७५ या दिवशी चित्रपट प्रदर्शित झाला. आज ४७ वर्षानंतरही त्याची जादू कायम आहे. त्याचे अढळपद आजवर दुसर्या कुठल्याही चित्रपटाने घेतलेले नाही. मनोरंजन, अॅक्शन यांनी गच्च भरलेला हा चित्रपट अमर झालाय, हेच खरे!
क्रिकेटच्या मैदानात ‘चौकारा’ला महत्व आहे. गोलंदाजाने टाकलेल्या बॉलवर एक सणसणीत चौकार मारून उभा डाव जिंकण्याची किमया होते, याची अनेक उदाहरणे आहेत. तसाच एक डाव रंगभूमीवरल्या रसिकांच्या मैदानात यंदाच्या नव्या वर्षात संतोष पवार या बहुरूपी रंगकर्मीने खेळलाय. त्यात पहिला ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’, दुसरा ‘सुंदरा मनात भरली’, तिसरा ‘हौस माझी पुरवा’ आणि चौथा चौकाराचा फटका ‘संगीत शोले!!’ असा विक्रम करणारा हा पहिलाच नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता आहे! याची नोंद इतिहासात निश्चितच होईल!
‘आम्ही सारे लेकुरवाळे’, ‘जळूबाई जळू’, ‘युगे युगे कलियुगे’, ‘राधा ही कावरी-बावरी’, ‘लगे रहो राजाभाई’ आणि ‘यदाकदाचित’… अशा किमान डझनभर व्यावसायिक नाटकांचे संहितालेखन आणि दिग्दर्शनाचा अनुभव गाठीशी असल्याने त्या जोरावर त्यातील रंगकर्मी मजबुतीने प्रत्येक निर्मितीत उभा राहातो. अगदी एकांकिकेपासूनचा त्याचा प्रवास हा लक्षवेधी आहे. लोककलेचा पुरेपूर वापर हा तर त्याचा हक्काचा दारुगोळाच! कथानकातील बारकावे शोधून त्याची विनोद, व्यंग, उपहास यासाठी नेमकी पेरणी दिसते. विनोदातील कारुण्याचे दर्शनही घडते. त्याचा वापर शस्त्रासारखा करण्यात आलाय. पण कमरपट्ट्याखाली न मारण्याची दक्षताही तो घेतो. विनोद दुखावणार नाही, तो कुरूप, दुष्ट होणार नाही, याचीही खबरदारी त्याच्या संहितेत आहे. ढोंगीपणा, शिष्टपणा त्याची खिल्ली तर त्याच्या संहितेतले एक ठळक वैशिष्ट्यच ठरते.
आता संतोषचं नाटक म्हणजे हसवणुकीचा बुस्टर डोस हे समीकरणच. या नाटकात त्याने ‘शोले’ चित्रपट निवडून त्याला कोकणातील एका गावातला टिपिकल ‘तडका’ दिलाय आणि सबकुछ ‘पवार’ स्टायलीत! त्याची आवडती शैली त्याने यातही निवडलीय. जी गुंतवून ठेवते. ‘पवार’ची ‘पॉवर’च!
आता गाव म्हटलं की निरागसता आली. कोकणातील भजन आलं. जाखडी नृत्य आलं. नाटक आले. या सार्या सरमिसळीतून तयार झालेल निरागस धुमशान म्हणजे ‘संगीत शोले’. हे नाटकातलं नाटक कोकणातील गावात घडत असलं, तरी गाव अनुभवलेल्या प्रत्येक चाकरमान्यांचं नाटक झालंय. पोटापाण्यासाठी शहरात स्थायिक झालेली मंडळी जशा गावाकडच्या परंपरा चालीरीती जपतात, चालवतात. त्यात नाटक येणारच. अशीच भलाई वाडीतील चाकरमानी मंडळी ठरवतात की नेहमीप्रमाणे नाच, गाणी, भजन, कीर्तन न करता यंदा नाटक करायचं, तेसुद्धा ‘साध-सुधं’ नाही तर, चक्क शोले या महासिनेमावरील ‘संगीत शोले’ करायचे आणि त्यानंतर त्यांच्या भोळेपणातून जी धमाल सुरु होते ती पाहून गाव आणि गावाकडचं नाटक अनुभवलेल्या प्रत्येकाची हसून हसून पुरेवाट होते…
‘शोले’मधील जय, वीरु, बसंती, ठाकूर, गब्बरसिंग, रामलाल या गाजलेल्या व्यक्तिरेखा करताना हे चाकरमान्यांमधले नट आपली बोलीभाषा, देहबोली विसरत नाहीत, तर मुंबई पुण्यातून बोलावलेल्या नट्या आपले व्यवसाय विसरत नाहीत… ‘शोले’ सिनेमातील गाजलेले प्रसंग करताना हे कलाकार कधी भोळेपणातून आणि कधी आगाऊपणातून त्या पात्रांची तसेच प्रसंगांची जी काही धमाल उडवतात ती पाहून सात मजली हशा पिकतो.
‘शोले’च्या वेशभूषेमध्ये दशावताराच्या वेशभूषा आणि रंगभूषेची जोड हे कमालच. संगीतातही वेगळेपणा. ‘शोले’ सिनेमातील गाणी आणि गावाकडील भजन.. अभंग.. गौळणी यांचं फ्युजन मस्त आहे. नेपथ्य म्हणून उभं केलेलं कोकणातील गाव खरंखुरं कोकणातलं गाव वाटतं. रामगढ, गब्बरसिंगचा अड्डा.. वगैरे लोकेशन्स दाखवताना सिनेमातील लोकेशन्स आणि गावाकडील लोकेशन्स यांची सांगड घातली आहे.. प्रकाशयोजना समर्पकच. जिथे अंधार होतो तिथे टाळ्यांचा कडकडाट होतो. शिवाय त्या अंधारात जे घडत त्यानेही हसवणूक पसरते.
‘शोले’तल्या बसंतीप्रमाणे हंटरसारखी फुटपट्टी घेऊन नॉनस्टॉप बोलणारी शाळेतील शिक्षिका, सतत भांडणारे पण जय आणि वीरू या दोस्तांची भूमिका करणारे जसे जानी दुश्मनच. नाटकाच्या बाहेरही दशावतारातील भूमिकेसारखाच बोलणारा ठाकूर, नाटकातून स्त्रीपात्र साकारून कंटाळलेला रामलाल.. सतत दिवा घेऊन वावरावं तशी डबा घेऊन वावरणारी ठाकूरची सून, भूमिका करतानाही कीर्तन प्रवचन करणारा गब्बरसिंग.. एकाहून एक विरोधाभास असणारी सारी टीम. या सार्यांची मोट बांधणारा लेखक आणि दिग्दर्शक संतोष पवार हाच वस्ताद या प्रमुख भूमिकेत ‘संगीत शोले’च्या उभारणीचा प्रयत्न करतो. ही जुळवाजुळवी करताना हैराण झालेला वस्ताद त्याने असा काही रंगवलाय की त्याचा वावर म्हणजे रंगमंचावरला धुमाकूळ!
हे नाटक करण्यामागे या गाववाल्यांचं एक भावनिक कारणही आहे.. ते प्रकाशात आल्यावर प्रेक्षकही गलबलून जातात.. त्या एका कारणासाठी हे गाववाले प्रसंगी आपला जीवही पणाला लावतात.. कोणी ‘शोले’तल्या ठाकूरसारखे हात कापून द्यायला तयार होतं. तर कोणी बसंतीप्रमाणे काचांवर नाचतं! एक ना अनेक. धक्कातंत्र आणि हृदयस्पर्शी आवाहन यामुळे नाट्य एका उंचीवर पोहचते… हे संतोषच्या संहितेत नेहमीप्रमाणे इथेही दिसून येते.
सुजित जाधव (जय), रोहन कदम (विरु), प्रिया सोनावणे (बसंती), दीपक्षी कवळे (जया), अनुराधा घाडीगांवकर (चांदणी), सुशील घाटकर (ठाकूर), महेश गुरव (रामलाल), स्वप्नील जगताप (गब्बर), सुमित सावंत (कालिया) आणि ‘उस्ताद’ संतोष पवार – या इरसाल कलावंतांच्या टीमने कमालच केलीय. संतोष वगळून सारे नवोदित असूनही सहजता दिसते. कुठेही व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करीत असल्याचा जराही संशय येत नाही. एवढा सफाईदारपणा त्यात भरलेला. एकापेक्षा एक सरसच. गावच्या रंगकर्मींनी उभी केलेली ‘शोले’ची कॅरेक्टर्स हा विषय या नाटकातील जमेची विनोदनिर्मिती ठरते. त्या जोरावरच हसवणुकीचा डोलारा मजबुतीने उभा केलाय. गावचा रंगमंच इथे एक ‘पात्र’ आहे आणि ‘शोले’सोबतचे विडंबन आहे! कलाकार आणि रसिक हे दोघेही या नाट्याची लज्जत घेतात. त्यातून चैतन्यदायी प्रयोग आकाराला येतो.
‘शोले’ चित्रपटातील एक से बढकर एक व्यक्तिरेखांची या रंगमंचावरली उफराटी तर्हा तर कळसच आहे. जी ‘शोले’त जरी शिरली तरी आपलं कुळ अन् मूळ हे विसरलेली नाहीत. त्यात राजकारण, समाजकारण यावरचे चिमटे घेतलेत. उत्स्फूर्तता आणि इरसालपणा याचे अजब मिश्रण त्यात दिसतेय. रसिकांना जांभई किंवा डुलकी येणार नाही. मोबाईलचाही विसर पडेल. दोन अडीच तास खर्च झालेला वेळ आणि तिकिटाचे पैसे वसूल झाल्याचे समाधान मिळेल, याची दक्षता यातील सादरीकरणात पदोपदी घेण्यात आलीय.
‘गाव तिथे नाटक’ ही कोकणाची जणू व जशी ओळखच. अनेक धार्मिक उत्सव म्हटले की नाटक करण्याचा पायंडाच आहे. हाती स्क्रिप्ट असो वा नसो, बिनधास्त रंगमंचावर आत्मविश्वासाने उभे राहाणारे महाभाग इथे असतातच. ‘वस्त्रहरण’ हे जसे नाटकातले नाटक आहे, त्याच प्रकारे इथेही ‘शोले’ हे नाटकातले नाटकच. गंगाराम गवाणकर यांच्या ‘वस्त्रहरण’ने मालवणी बोलीभाषेला मानाचे पान दिले. जागतिक विक्रमी नाटक ठरले. त्याच वाटेवर अनेक नाटके रंगभूमीवर डोकावली आहेत. ‘पांडू तात्या’ ते ‘वस्ताद’ आणि पौराणिक कथानक ‘वस्त्रहरण’ ते चित्रपटावरचा ‘संगीत शोले’. असा हा रंगप्रवास. विनोदाची नेमकी जाण असलेल्या संतोष पवार यांचा हा यंदाच्या मोसमातला ‘चौकार’. जो दोन घटका गाववाल्यांसोबत मस्त विरंगुळा ठरेल. ‘येवा कोकण आपलाच असा’ या चालीवर ‘येवा शोले आपलाच असा!’ याची पुरेपूर प्रचिती या सावळ्या गोंधळात येते!
दोन वर्षांच्या नाट्यगृहे बंदीनंतर नव्या जोमात विनोदी नाटके रंगभूमीवर प्रगटत आहेत. त्यातील बहुतेक करमणूकप्रधान. या करोनानंतरच्या बदलाबद्दल चिंता करण्याची तशी मुळीच गरज नाही, कारण रसिकराजा तिकीटे काढून डोकेदुखी कधी विकत घ्यायला येत नाहीत. येणारही नाहीत. नाटकांना होत असणारी गर्दी ही करमणुकीसाठीच. मनाची मशागत ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात रंजनातला चोखंदळपणा वाढत जाणार. कोरोनाच्या घुसमटीनंतरची अशी विनोदी नाटके एक उपचार ठरत आहेत. आणि त्या वाटेवरलं हे ‘संगीत शोले!’
संगीत शोले
लेखन/दिग्दर्शन : संतोष पवार
नेपथ्य : अंकुश कांबळी
संगीत : तुषार देवल
रंगभूषा : किशोर पिंगळे
वेशभूषा : विवेक तांदळे
नृत्य : अनिकेत जाधव
सूत्रधार : गोट्या सावंत, अरविंद घोसाळकर
निर्माता : विजय इंगळे, प्रवीण चव्हाण