वसंत साठेंनी छत्री धरल्यामुळे चेहर्यावर सावली येत होती. त्यांना छत्री मागे करायला सांगितले. इंदिराजींनी साडीचा पदर डोक्यावर इतका घेतला की चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मी पदर मागे करायला सांगितला, त्यांनी थोडा मागे केला. मी हाक मारायचो तशा त्या माझ्याकडे पाहायच्या… असे अनेकदा झाले. मी पटापट फोटो टिपले. त्यांना इतक्या जवळून पाहात असताना मी भारावून गेलो. मला जसे फोटो हवे होते तसे मिळाले. मी धन्य झालो.
– – –
सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकत असताना आमची स्टडी टूर नेपाळ येथे गेली होती. एका हॉटेलमध्ये उतरलो होतो. पहाटे चार वाजता आमच्या खोलीत समोरच्या पलंगावर झोपलेला भाई नांदगावकर अचानक उठला. आम्हा सर्वांना हलवून त्याने उठवले आणि छातीत दुखत असल्याचे सांगत असतानाच काही क्षणात त्याने प्राण सोडले. डोळ्यांदेखत त्याचा जीव गेला, पण आम्ही काहीही करू शकलो नाही. काठमांडूच्या कडाक्याच्या थंडीत सर्वांची दातखीळ बसली होती.
मला डायरी लिहिण्याची सवय होती. त्यात भाईचा प्रसंगही लिहिला. मुंबईत परतलो तेव्हा प्राध्यापकांनी डायरी मागून घेतली. ती वाचली. सरांना त्यातील लेखनशैली आवडली. प्रत्येक वर्गात त्याचे सामुदायिक वाचन करण्यात आले. प्रा. सोलापूरकर सरांनी श्री. ना. पेंडसे यांचे `लव्हाळी’ पुस्तक मला बक्षीस म्हणून दिले. माझी लेखनशैली पेंडसेंच्या लिखाणासारखी आहे असे ते म्हणाले. ही डायरी कुठेतरी प्रकाशित व्हावी म्हणून प्राध्यापक मंडळी आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी सुद्धा अनेक ठिकाणी प्रयत्न करू लागलो.
माझे मेहुणे विजय नार्वेकर यांची ‘दि ब्रेन्स’ नावाची जाहिरात एजन्सी होती. तेथे कॉपीरायटिंगचे काम करण्यासाठी अनेक पत्रकार यायचे. `श्री’ साप्ताहिकाचे संपादक वसंत सोपारकर यांना नार्वेकर यांनी माझी डायरी दाखवली. त्यांनी काही पाने चाळून पाहिली आणि काही दिवसांतच ती प्रकाशित करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी `श्री’च्या ऑफिसमध्ये माझ्या चकरा सुरू झाल्या.
एक दिवस त्यांनी मला फोटो काढण्याचे काम दिले. आयुष्यात मिळालेले पहिले वहिले काम आणि ते सुद्धा या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे फोटो काढण्याचे. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची त्रिशतक पुण्यतिथी साजरी होणार होती. त्यासाठी इंदिरा गांधी येणार होत्या. मला मुंबईच्या महापौरांनाही कधी जवळून पाहता आले नव्हते तत्पूर्वी; पण इथे तर थेट पंतप्रधान भेटणार होते. त्यांचे मी काढलेले फोटो संपादकांना आवडले, तर काय सांगावं- आयुष्याला कलाटणी मिळू शकते, मी चित्रकाराचा पत्रकार होऊन नोकरीही पटकावू शकतो. या टर्निंग पॉइंटवर मी रायगडावर जाण्याचा निश्चय पक्का केला. कॉलेजचे शेवटचे वर्ष होते आणि सबमिशनचे काम चालू होते. मी दोन दिवस दांडी मारली. कॉलेजचे ओळखपत्र आणि सोपारकरांनी दिलेले पत्र घेवून `श्री’चा दिलीप जोशी आणि अन्य दोघेजण असे आम्ही चौघे रायगडावर एक दिवस अगोदरच गेलो.
दिवसभर गडावर भ्रमण केल्यानंतर एका पठारावर कॅमेर्याची बॅग डोक्याखाली घेऊन पाठ टेकली…
हर…हर… महादेव…
छत्रपती शिवाजी महाराज की जय…
अशा घोषणा देत भगवे झेंडे घेवून ढोल, लेझीमच्या तालावर नाचत गुलाल उडवीत हजारो शिवभक्त गडावर येत होते.
रात्र झाली तसे व्यापारी पेठेच्या दगडी चबुतर्यावर आम्ही झोपी गेलो. मध्यरात्री सुसाट वारा सुटला. ज्या दगडावर झोपलो होतो तो बर्फाच्या लादीसारखा थंडगार झाला. झोपमोड झाली. खाली अंथरायला काही मिळते का पाहिले. लोकांनी फरसाण वगैरे खाऊन टाकलेले कागद मी गोळा करून आणले. त्याला चिकटलेला मिरची मसाला झटकून टाकला आणि त्यावरच झोपलो.
महाराजांच्या सुखद आठवणीने झोपही येईना, तलवारींचा खणखणाट, शूरवीर मावळ्यांचा जयजयकार डोळ्यासमोर आणून रात्र जागवली. पहाट झाली लांबूनच महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक झालो मुजरा केला आणि प्रार्थना केली. महाराज… आशीर्वाद द्या. कॉलेजला दांडी मारून आलोय. आयुष्याला टर्न मिळण्याचा चान्स आलाय. आज मला चांगले फोटो मिळाले तर उद्या प्रेस फोटोग्राफरची नोकरी मिळू शकते. तुमच्या समाधीचे फोटो काढून मी नव्या पर्वाला सुरुवात करतो आहे. महाराज तुमचा जयजयकार असो.
गडावर प्रचंड गर्दी झाली. पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. सोबत आलेला जोशी गर्दीत दिसेनासा झाला. मी एकटाच पडलो. अधिकृत निमंत्रण आणि प्रेसचे ओळखपत्र दाखविल्याशिवाय पोलीस समारंभाच्या ठिकाणी जाऊ देत नव्हते. निमंत्रण जोशीकडे होते. मी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. सुदैवाने गर्दीतल्या लोकांनी मला साथ दिली.
अहो साहेब, जाऊ द्या की त्याला. इंदिराजींचा फोटो काढायचा आहे म्हणतोय तर काढून येईल एक फोटो.
पोलिसांनी बर्याच वादावादीनंतर मला आत सोडले.
सकाळी दहा वाजता इंदिराजींचे हेलिकॉफ्टर येताना दिसले. उपस्थित पंधराएक प्रेस फोटोग्राफरपैकी कुणीही पुढे सरसावत नसल्याचे पाहून मीच पुढे गेलो. इंदिराजींचे जवळून फोटो घेता येतील या आनंदात होतो.
हेलिकॉप्टर जमिनीजवळ येताच मातीचा प्रचंड धुरळा उडाला. माझ्या डोक्यात कानात कपड्यात आणि कॅमेर्याच्या बॅगेमध्ये मातीच माती शिरली. मी पूर्णपणे मातीचा पुतळा झालो. डोळ्यांतही माती गेल्यामुळे जागीच उभा राहिलो. कॅमेरा पुसण्यासाठी साधा कपडाही मिळाला नाही. हातपाय झटकून फुंका मारत माती झटकली. पुढे पाहतो तर इंदिराजी झपझप पावले टाकत महाराजांच्या पुतळ्यापाशी पोहचल्या. सोबत सुमित्रा राजे भोसले होत्या. महाराजांना पुष्पहार घातल्यानंतर एका उघड्या जीपवर उभे राहून लोकांना अभिवादन करीत समाधीस्थळाकडे निघाल्या. त्यांच्यामागे केंद्रीय मंत्री वसंत साठे छत्री धरून उभे होते. जीपच्या दोन्ही बाजूंनी फोटोग्राफर धावत, धडपडत फोटो घेत होते. जे ज्येष्ठ फोटोग्राफर होते ते धावून थकले. त्यांची दमछाक झाली. पण इंदिराजी आमच्याकडे बघायला तयार नाहीत.
मी ओरडायला सुरुवात केली, इंदिराजी! इंदिराजी! यहाँ देखिए!
वसंत साठेंनी छत्री धरल्यामुळे चेहर्यावर सावली येत होती. त्यांना छत्री मागे करायला सांगितले. इंदिराजींनी साडीचा पदर डोक्यावर इतका घेतला की चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मी पदर मागे करायला सांगितला, त्यांनी थोडा मागे केला. मी हाक मारायचो तशा त्या माझ्याकडे पाहायच्या… असे अनेकदा झाले. मी पटापट फोटो टिपले. त्यांना इतक्या जवळून पाहात असताना मी भारावून गेलो. मला जसे फोटो हवे होते तसे मिळाले मी धन्य झालो.
समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्या मुख्य सभामंडपात आल्या. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताने शाहीर साबळे यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. व्यासपीठाच्या मध्यभागी इंदिराजी बसल्या. त्यांच्या समोरच व्यासपीठाखाली मी गुडघे टेकून बसलो. दोघांत फक्त पाच सहा फुटांचे अंतर होते. अशी संधी पुन्हा केव्हा येईल तेव्हा येईल. त्यांचे सुंदर फोटो घेतले.
कार्यक्रम संपल्यानंतर इंदिराजी हेलिकॉप्टरने निघून गेल्या. हळूहळू गर्दी ओसरू लागली. तसे दिलीप जोशी पुन्हा भेटला. आम्ही संध्याकाळच्या एसटीने मुंबईत रात्री पोहोचलो.
दुसर्या दिवशी संपादकांना सर्व हकीकत सांगून फोटोच्या प्रिंट दिल्या. त्यातील तब्बल बारा फोटो प्रसिद्ध झाले. मी इंदिराजींना हाका मारून कसे फोटो काढले त्याचे वर्णन जोशी यांनी त्यांच्या लेखात लिहून माझे तोंडभरून कौतुक केले.
सुवर्णा नावाचा एक आळशी फोटोग्राफर `श्री’मध्ये होता. संपादकांनी त्याला नारळ देऊन मला नोकरीवर ठेवले. त्या दिवसापासून माझ्या कारकीर्दीला कलाटणी मिळाली. मी चित्रकार होण्याची स्वप्नं बघत असताना छायाचित्रकार झालो. पत्रकार झालो. लिहायला शिकलो. लिहिता लिहिता निवडणूक लढवली आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचा खजिनदारही झालो… पत्रकारितेशी दुरान्वयेही संबंध नसतानाही, कोण होतास तू काय झालास तू…