गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर माझा `ईडी’ फेम शाळकरी मित्र मिस्टर कावळ्या काहीतरी गूडन्यूज घेऊन येणार याची मला खात्री होतीच त्याप्रमाणे कावळ्या हातात एक मोठा चौकोनी बॉक्स घेऊन आलाच. त्यासोबत एक किलो मिक्स मिठाईचाही बॉक्स होता. मी तो अधाशासारखा फोडला आणि माझ्या तसेच कावळ्याच्या तोंडात हातात येईल तेवढी मिठाई कोंबली. ती खाऊन झाल्यावर त्या जड लागणार्या चौकोनी बॉक्सकडे लक्ष गेलं तरी त्यात काय आहे हे विचारायची हिंमत होईना. मिठाई खाताना माझा मानलेला परममित्र पोक्याची खूप आठवण येत होती. शेवटी मी रुमालाने डोळे पुसले आणि कावळ्याला विचारलं, कावळ्या या बॉक्समध्ये कसली गिफ्ट आहे? कावळ्या म्हणाला, आजपासून भाजप अगदी जाहीरपणे सामदेवबाबांच्या सहकार्याने उत्पादन क्षेत्रात म्हणजे उद्योग क्षेत्रात उतरतेय. ते उत्पादन खरं तर गेली चौदा-पंधरा वर्षे चोरुन लपून सुरू होतं पण आता मात्र पक्ष उघडपणे त्याचा प्रचार करणार आहे.
-माझी उत्सुकता आणखी ताणू नकोस. फोड तो बॉक्स आणि दाखव ते उत्पादन.
कावळ्याने बॉक्स फोडला आणि आमच्या घरात एकच अत्तरासारखा सुगंध पसरला. मी उत्सुकतेने पुढे जाऊन पाहिलं तर त्यात भाजप प्रणित कमळाच्या आकाराचे तीन इंचाचे सुंदर पॅकिंग असलेले अंगाला लावायचे साबण होते. प्रत्येक साबणाच्यामध्ये मोदींचा दाढीवाला चेहरा कोरला होता. मी कावळ्याला विचारले, बॉडीसोपचं उत्पादन करण्याची पाळी भाजपवर का आली? त्यावर तो उत्तरला, २०२४ च्या निवडणुकांपर्यंत भाजपचे ते प्रचाराचे साधन होते. पक्षाच्या म्हणण्यानुसार हा मोदी साबण लावून स्नान केल्यानंतर पूर्वीची सगळी पापं, मनाचे आणि शरीरावरचे डाग धुवून निघून जातात. हा साबण लावून गंगेत डुबकी मारून आल्यास वैद्यकीय, आर्थिक वा गुन्हेगारीची चौकशी न करता डायरेक्ट पक्षात प्रवेश दिला जातो. पुढे त्याच्यावर कसलेही बालंट येऊ नये, याची जातीने काळजी घेण्यात येते.
जो हा साबण लावून स्नान करून पक्षात येईल तो कितीही मोठा भ्रष्टाचारी असला तरी त्याच्या केसालाही आणि केस नसले तर त्याच्या टक्कलालाही धक्का लागणार नाही, याची काळजी पक्ष घेतो. ती सारी जबाबदारी पक्षाने नेहमी चॅनलवर कीटकीट करणार्या किरीट सोमय्या या पक्षात सध्या कामधंदा नसलेल्या बडबड्या नेत्यावर सोपवली आहे.
मात्र आमची अशी आवाहने फक्त संघ शाखेमार्फत आणि कणोणकर्णी संबंधितांना पोचतात. इतर पक्षातील जास्तीत जास्त लोक किंवा नेते भाजपात यावे म्हणून २०१३ पासून सुरू केलेली ही मोहीम आहे. तिला २०१४च्या निवडणुकीत एवढा प्रतिसाद मिळाला की इतर पक्षातील दिग्गज नेत्यांनी भाजपात झुंडीने प्रवेश केला. प्रत्येकाची काही ना काही आर्थिक गुन्हेगारी लफडी होती. कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, तर कुणावर अत्याचाराचे. पण मोदी आणि शहांच्या सांगण्यावरून त्या सर्वांना पक्षात पावन करून घेण्यात आलं. त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री असताना पक्षात नुसती आमदारांची झुंबड उडाली होती. त्यातील काही तर भाजपाच्या तिकिटावर निवडूनही आले, काही मंत्री झाले. एकवेळ फडणवीसांनी पक्षातील सच्चा नेत्यांना मंत्रिपदापासून खड्यासारखं दूर ठेवलं पण अनेक आयारामांना मंत्रिपदाची खिरापत वाटली. काहींना तर लोकसभेत आणि राज्यसभेत पाठवलं. ही होती मोदी सुगंधी साबणाची किमया.
आता या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पाहा. पंजाब सोडला तर इतर राज्यात भाजपला जरी सत्ता मिळाली असली तरी २०१४ पेक्षा, २०१७ पेक्षा पक्षाच्या जागा आणि मतं कमी झाली आहेत. २०२४च्या निवडणुकीत ती पुन्हा वाढवायची असतील तर त्यासाठी इतर पक्षातले आमदार, खासदार यांना हा सुगंधी साबण भेट देऊन भाजपात यायचं आमंत्रण देण्याची मोहीम आता पुन्हा नव्याने पाडव्यापासून सुरू करायची आहे. म्हणूनच इतर पक्षात ज्यांनी बक्कळ पैसा कमावला आहे, प्रॉपर्टी केली आहे, कारखाने, कंपन्या उद्योगधंदे काढले आहेत, ज्यांनी गुन्हेगारी जगतात वर्चस्व प्रस्थापित केले आहे असे आमदार, खासदार आमचे लक्ष्य आहे. त्यांना मोदी साबण देऊन, सुचिर्भूत करून पक्षात पुन्हा तिकीट देऊ आणि निवडूनही आणू. आमचा निम्म्याहून अधिक पक्ष अशाच आयारामांचा पक्ष आहे.
सच्चे नेते पक्षाच्या वरिष्ठांनी खड्यासारखे बाजूला ठेवले आहेत. आता तर महाराष्ट्रात पक्षाच्या हाती धुपाटणे आले आहे. २०२४ पर्यंत तग धरणेही पक्षाला मुश्कील आहे. ते फडणवीस बघा कसे कासावीस होऊन विधानसभेत जीवाच्या आकांताने विव्हळत असतात. त्याची दया येते. एकाने दगा दिला म्हणून काय झालं, महाराष्ट्रात अनेक पक्षात असे कितीतरी मासे आहेत की जे आम्ही गळाला लावू शकतो. आता राज्यात घरोघरी या मोदी साबणाचे मोफत वाटप होईल आणि पक्ष प्रवेश करणार्याला आणखी पाच साबण मोफत दिले जातील. इतर पक्षातील जे नेते साबण घेऊन पक्षात तिकीट मिळेल या आशेने येत असतील त्या सर्वांना गंगेत मोदी साबण लावून शाही स्नान घातलं जाईल आणि योगींच्या मुखाने पूजापाठ करून हिरवे आणि भगवे उपरणे देत त्यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पीतांबर नेसवून पक्षात रीतसर प्रवेश दिला जाईल. सामदेव बाबांनी या साबण उत्पादन कार्यात पक्षाला जी मोलाची मदत केली त्याबद्दल त्यांनाही राज्यसभेचे सन्माननीय सदस्य म्हणून नेमणार असल्याची घोषणा केली जाईल.
-पण आता वाढत्या महागाईमुळे गॅस, पेट्रोल, डिझेलचे भाव अवाच्या सवा वाढल्यामुळे जनता २०२४च्या निवडणुकीत भाजपच्या पार्श्वभागावर लाथ मारून त्यांना अस्मानातले तारे कशावरून दाखवणार नाही? कारण मोदींचे निवडणुकीच्या मोक्यावर जन्माला येत असलेले नवनवीन फंडे जनतेला आता माहीत झाले आहेत. दोन समाजामध्ये, धर्मांमध्ये, जातींमध्ये विद्वेष निर्माण करून आपली सत्तेची पोळी भाजून घ्यायची हे भाजपचे तंत्र सार्या देशाला कळले आहे. अडाणी जनताही त्यांच्या या प्रचारतंत्राला भूलत नाही, हे दिल्लीत आणि पंजाबात जनतेने दाखवून दिलं आहे. कितीही साबण वाटले तरी यांची पापे धुतली जाणार नाहीत. मी नाइलाज म्हणून हा साबणाचा बॉक्स घेऊन तुमच्या पक्षात प्रवेश करतो. कारण शेवटी, मला माझे आजपर्यंतचे काळे धंदे लपवायचे आहेत. तुला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. तू ईडीची सेवा प्रामाणिकपणे कर. कधीतरी तुलाही मोठी लॉटरी लागेल. गुड बाय!