भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासात शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे उपकरण शास्त्रातील योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या जीवनकार्यावर ‘डॉ. शंकरराव र. गोवारीकर आदरांजली!’ हा गौरवग्रंथ प्रकाशित केला आहे. त्यातील त्यांची ओळख करून देणारे हे एक प्रकरण.
– – –
भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाची ‘मुहूर्तमेढ विसाव्या शतकात खर्या अर्थाने रोवली गेली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दारिद्र्य, अज्ञान आणि उपेक्षा, यांसारखे प्रश्न भेडसावत होते. त्यांतून मार्ग काढून देशाचा विकास घडवण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित धोरण आखले गेले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी हुशार आणि देशासाठी सर्वस्व अर्पून काम करणार्या तरुणांची गरज होती. सुदैवाने त्या कालखंडात असे अनेक तरुण पुढे आले. त्यामध्ये अग्रेसर असणार्या तरुणांमध्ये डॉ. शंकरराव गोवारीकर यांचा समावेश होता. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाला गरज असते ती अद्ययावत आणि उच्च प्रतीच्या उपकरणांची. दुर्दैवाने भारतात अशी उपकरणे उपलब्ध नव्हती. विकसित देश आपली गरज भागविण्यासाठी फारसे उत्सुक नव्हते. किंबहुना त्यांचा भारताच्या या धोरणाला विरोधच होता. अशा काळात देशी बनावटीच्या आणि उच्च प्रतीच्या उपकरण निर्मितीचे आव्हान भारतीयांनी स्वीकारले. डॉ. शंकरराव गोवारीकर त्यात सतत अग्रेसर राहिले. त्यामुळेच भारतीय उपकरण शास्त्राचे प्रणेते अशी त्यांची ओळख आहे.
डॉ. शंकररावांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाच्या इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकणे उचित ठरेल. भारतात विज्ञान संशोधनाची परंपरा सुश्रुतापासून सुरू झाली, असे मानले जाते. त्यानंतर आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, नागार्जुन आणि भास्कराचार्य यांनी ती पुढे चालवली. त्यानंतर ही परंपरा खंडित झालेली दिसते. या परंपरेचे पुनर्जीवन होण्यासाठी विसावे शतक उजाडावे लागले. या काळात भारतावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रजांच्या राजवटीत संशोधन करण्याची संधी भारतीयांना मिळत नसे. भारतीयांची मजल साहाय्यक पदापर्यंतच जाऊ शकत असे. विज्ञान संशोधनासाठी लागणारे बुद्धिचातुर्य भारतीयांमध्ये नाही, असाही समज होता. आपल्या अतुलनीय कामगिरीने या समजाला दोन महान विभूतींनी छेद दिला. या विभूती होत्या, गणिती रामानुजन व नोबेल पारितोषक विजेते सर सी. व्ही. रामन. कोलकातामध्ये सर सी. व्ही. रामन यांनी ज्या संस्थेत संशोधन केले ती संस्था होती, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स. सर सी. व्ही. रामन यांनी सुरुवातीच्या काळात या संस्थेत संशोधन केले. त्यांच्या संशोधनाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेल्यानंतर त्यांना कोलकाता विद्यापीठामध्ये प्राध्यापक पदावर नियुक्त केले गेले. याच विद्यापीठात त्यांनी ‘रामन परिणाम’ शोधला. त्यासाठी त्यांनी जुन्या बाजारातून साहित्य खरेदी करून उपकरण बनवले. त्या उपकरणाची त्यावेळची किंमत फक्त दोनशे रुपये. त्यानंतरच्या काळात संशोधन केलेल्या संशोधकांत डॉ. महालनोबीस, डॉ. एस. एन. बोस, जगदीशचंद्र बोस, मेघनाद साहा यांचा समावेश आहे. ही उदाहरणे केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याएवढीच आहेत.
राष्ट्रविकासासाठी संशोधकांची फळी निर्माण व्हावी लागते. यासाठी अभियांत्रिकी आणि विज्ञान विषयांत पदवी घेणार्या पदवीधरांसाठी संशोधनाच्या संधी आवश्यक असतात. स्वातंत्र्य मिळाले तरी अशा संधी उपलब्ध नव्हत्या.
डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी त्या निर्माण केल्या. डॉ. भाभा यांच्या पुढाकाराने अणुऊर्जा क्षेत्रात संशोधन करण्याचा धाडसी निर्णय भारत सरकारने घेतला. त्यासाठी अणुऊर्जा आयोग स्थापन केला. या मंडळाचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान असतात. त्याचवेळी मुंबईला अणुऊर्जा संस्थानाची स्थापना केली. याचे संस्थापक, संचालक स्वतः डॉ. होमी भाभा होते. या संस्थेत अनेक विषयांवर संशोधन व्हावे अशी कल्पना होती. अर्थातच मुख्य भर अणुऊर्जा संशोधनावर राहाणार होता. संशोधनासाठी निवडण्यात आलेल्या विषयांत पुढील क्षेत्रांचा समावेश होता. अणु-विज्ञान, रसायन अभियांत्रिकी, पदार्थ-विज्ञान, धातू शास्त्र, इलेट्रॉनिक उपकरणे, जैव आणि वैद्यकशास्त्र, अतिवाहकत्व, उच्च ऊर्जा भौतिकशास्त्र आणि प्लाझ्मा भौतिकी या क्षेत्रांचा समावेश होता.
या संशोधन संस्थेत निवड करताना डॉ. होमी भाभा यांनी एक पद्धती विकसित केली होती. ते स्वतः निवड प्रक्रियेत भाग घेत. शंकरराव गोवारीकर यांची निवड होणे, ही त्यांच्या क्षमतेची साक्ष देणारीच आहे. ही निवड संस्था स्थापन झाल्यानंतर दुसर्या वर्षी झाली. याचा अर्थ ते पहिल्या फळीतील संशोधक होते. त्यांनी अभियांत्रिकी आणि भौतिकशास्त्र या दोन विषयांत पदवी मिळवली. त्याचप्रमाणे अणू भौतिकशास्त्रात पीएचडी देखील मिळवली. अभियांत्रिकी पदवी मिळवल्यानंतर, ज्या भौतिकशास्त्र विषयात पदवी मिळविणार्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी असे, अशा त्या काळात शंकररावांनी हा मार्ग निवडला, हे विशेषच म्हणावे लागेल.
अणुऊर्जा संस्थानाची स्थापना झाली तरी ती कार्यान्वित करण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार होते. सुरुवातीला एक त्वरक (अॅन्सिलिरेटर) हा अमेरिकेकडून मागवला असला तरी पुढील वाटचाल भारताला स्वबळावर करायची होती. डॉ. होमी भाभांनी आपल्या नेतृत्वाखाली काम करणार्या तरुण अभियंते आणि संशोधकांना हे आव्हान पेलण्याचे आवाहन केले. तरुण संशोधकांनी ते यशस्वीपणे पेलले. त्यातूनच अप्सरा या भारतीय बनावटीच्या त्वरकाची निर्मिती झाली. डॉ. शंकरराव गोवारीकर त्यात सहभागी होते. कदाचित हा दुर्मिळ अनुभवच त्यांना उपकरणशास्त्राकडे आकर्षित करून गेला असावा. पुढे त्यांनी या क्षेत्रात समर्पित भावनेने शेवटपर्यंत कार्य केले.
त्यानंतर सायरस, झरालिना, ध्रुव असे अनेक त्वरक आणि प्रारण निर्मितीचे प्रकल्प भाभा अणु-संशोधन केंद्राने (पूर्वीचे अणुऊर्जा संस्थान) राबवले. अणुऊर्जा संशोधनाची व्यापकता मोठी असल्याने मुंबईबरोबरच कोलकाता, कल्पकम सारख्या ठिकाणी अणू संशोधन प्रकल्प सुरू झाले. कोलकाता येथील बदलणार्या ऊर्जेसंबंधी ‘व्हेरिएबल एनर्जी रिसर्च सेंटर’ (सायक्लोट्रॉन) संशोधन सुरू झाले. डॉ. शंकरराव गोवारीकरांनी या संस्थेत संशोधन करून मोलाचे योगदान दिले.
कोलकाता येथील संस्थेमध्ये आयसोटोप अलगीकरणासाठी विशिष्ट उपकरणे बनवली जात होती. आयसोटोप म्हणजे एकच मूलद्रव्याची भिन्न वस्तुमान असणारी रूपे. उदाहरणार्थ कार्बन बारा आणि कार्बन चौदा अशी दोन रूपे. यांचे अलगीकरण करण्यासाठी विविध प्रक्रियांचा उपयोग केला जातो. युरेनियम या द्रव्याची रूपे अलग करणे आव्हानात्मक असते. त्यासाठी चुंबकीय क्षेत्राचा वापर करून अलगीकरण केले जाते. या सयंत्राङ्कुळे होणारी अलगीकरण प्रक्रिया संथ असली तरी अचूक असते. त्यामुळे युरेनियम शुद्ध स्वरूपात मिळविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. अणुऊर्जा प्रक्रियेत युरेनियम अनन्यसाधारण महत्त्व आहे. डॉ. गोवारीकरांनी चुंबकीय क्षेत्राचा उपयोग करून ‘आयसोटोप’ अलगीकरण करणार्या त्वरकाच्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलला.
सी.एस.आय.ओ अर्थात सेंट्रल सायन्टिफिक इन्स्ट्रुमेंट्स ऑर्गनायझेशन ही चंदीगड येथे स्थित कौन्सिल ऑफ सायन्टिफिक अॅण्ड इन्डस्ट्रियल रिसर्च या संस्थेच्या आधिपत्याखाली असणारी महत्त्वाची संस्था. या संस्थेमध्ये अद्ययावत उपकरणांची निर्मिती, वितरण आणि प्रशिक्षण दिले जाते. उपकरण निर्मिती अनेक क्षेत्रांशी संबंधित आहे. त्यांमध्ये शेतीसाठी लागणारी, भूकंपमापक, वैद्यकीय निदान आणि उपचारासाठीची उपकरणे, वर्णपटमापक, उपयोजित भौतिकशास्त्र, सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स, प्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे, पर्यावरणीय नियंत्रणासाठी, त्याचप्रमाणे धातू निर्मितीसाठी लागणार्या उपकरणांचा समावेश आहे. अशा संस्थेच्या संचालक पदावर डॉ. गोवारीकरांची १९८३ साली नेमणूक झाली. त्यांचे या क्षेत्रातील प्राविण्य, अनुभव आणि समर्पणाच्या जोरावर त्यांनी ती यशस्वी करून दाखवली. आपल्या कारकीर्दीत झालेल्या कामाचा एक विस्तृत अहवाल त्यांनी सादर केला. या संस्थेचा विकास कशा प्रकारे व्हावा, यासंबंधी त्यांचा सुस्पष्ट असा दृष्टिकोन होता. अहवालाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, ‘‘उपकरण शास्त्रात होणारा विकास आणि उपकरणे कालबाह्य होण्याचा वेग ध्यानात घेऊन संस्थेने नवीन आणि भविष्यकालीन महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले पाहिजेत.’’ त्यामुळेच संस्थेच्या विकासाला प्राधान्य दिले गेले. भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करून त्या अद्ययावत करण्यावर भर दिला गेला. वैज्ञानिक व तांत्रिक मनुष्यबळाचे विकसित आणि नवीन तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण दिले गेले. उपकरण शास्त्र हे आंतरविद्याशाखीय झाले. त्याची ओळख होण्यासाठी अनेक तज्ज्ञ व्यक्तींना व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आले. या विवेचनावरून त्यांचे उपकरण शास्त्राचे आकलन किती सखोल आणि सुस्पष्ट होते, हे दिसून येते. भविष्यात होणार्या बदलांची त्यांना अचूक जाण होती.
त्यांनी आपल्या कार्यकाळात उपकरण निर्मितीबरोबरच इतर अनेक प्रक्रिया आणि प्रकल्प राबवले. अनेक भारतीय आणि विदेशी संशोधन संस्थांबरोबर सहकार्य करार केले. प्रशिक्षणाच्या बाबतीत आयटीईएस या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत अनेक राष्ट्रांतील संशोधन संस्थांसोबत प्रशिक्षण कार्यक्रम घेतले. त्याचबरोबर मेडिकल लिनियर अॅक्सिलिरेटर या कर्करोग उपचारासाठी आवश्यक उपकरण, मुंबईच्या समीर संस्थेच्या सहकार्याने विकसित केले. तसेच अति संवेदनशील स्कॅनिंग इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाची निर्मिती केली. शेतीसाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच स्वयंचलित पाणी शोध उपकरणे बनवली. याशिवाय प्रकाशीय पटाचा उपयोग करणारी उपकरणे निर्माण करून त्यांमध्ये मोलाची भर घातली. भारत आणि स्वित्झरलँड यांच्या सहकार्याने चाललेले सीएसआयओ प्रशिक्षण केंद्र, औद्योगिक जगताला कुशल मनुष्यबळ पुरवणारे केंद्र म्हणून मान्यता पावले. आयएसटीसी या योजनेअंतर्गत चालणार्या संगणक प्रशिक्षण केंद्राचा विकास केला. विशेष म्हणजे या कार्यकालात संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा केला गेला.
डॉ. शंकरराव गोवारीकरांचे उपकरण शास्त्रातील योगदान हे केवळ प्रशासकीय आणि विकासात्मक नव्हते, तर त्यात नाविन्यताही होती. त्यांनी मिळविलेल्या पुढील स्वामित्व हक्कांवरून त्याची प्रचिती येते. पोर्टेबल डिजीटल सॉfलनिटी टेस्टर आणि इनसिटू सॉईल पी. ए. मीटर विथ मेटॅलिक सेन्सर हे दोन ते स्वामित्व हक्क. भारताची राष्ट्रीय स्तरावर असणारी उपकरणांची निर्मिती, देखभाल आणि दुरुस्ती यांची गरज भागवण्यासाठी विभागीय उपकरण केंद्रे स्थापन झाली. त्यांमध्ये डॉ. गोवारीकरांचे योगदान होते. त्याचबरोबर विद्यापीठ स्तरावर उपकरण निर्मितीच्या कार्यक्रमास त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इस्ट्रुमेंट्स, बंगळुरूच्या वतीने लाईफ टाइम अचिव्हमेंट पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. (१९९५).
सीएसआयओमधून निवृत्त झाल्यानंतर ते सतत कार्यरत राहिले. थापर अभियांत्रिकी अभिमत विद्यापीठाचे ते काही काळ कुलगुरू होते. त्याचप्रमाणे तोलानी मॅरिटाइम संस्थेमध्येही त्यांनी योगदान दिले. त्याचवेळी पुण्यात वास्तव्य असल्यामुळे सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाशी त्यांचा संबंध अधिक प्रमाणात येऊ लागला. त्यावेळी पुणे विद्यापीठात डॉ. एम. आर. भिडे यांनी उपकरण निर्मितीतून भौतिकशास्त्र विभागाचा विकास घडवून आणला होता. त्याची डॉ. गोवारीकरांना कल्पना होती. किंबहुना त्यांनी त्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदतही केली होती. विद्यापीठातील उपकरण कार्यशाळेला विशिष्ट दर्जा मिळवून देण्यातही त्यांचा हातभार होता. पुढे याच केंद्राचे उपकरण विभागात रूपांतर झाले. डॉ. भिडे ह्यांच्या निवृत्तीनंतर माझा आणि डॉ. गोवारीकरांचा जवळून परिचय झाला. मी महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाच्या संचालक पदावर असताना उपकरण शास्त्र विभागाचे प्रश्न प्राधान्याने सोडवले. त्यानंतर भौतिकशास्त्र विभागाचा प्रमुख असताना उपकरणशास्त्र विभागाचा कार्यभार माझ्याकडे आला. त्यामुळे व्यक्ती या नात्याने त्यांच्या स्वभावाचा परिचय होण्यासाठी आणखी संधी उपलब्ध झाली.
खरे तर त्या आधी २००३ साली त्यांच्या ऋजू आणि विनम्र स्वभावाची ओळख झाली. मी लिहिलेल्या ‘अंतराळी’ या विज्ञान काल्पनिकेच्या प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची त्यांना विनंती केली. विज्ञान काल्पनिका असल्याने ते तयार होतील का? असा प्रश्न मनात उमटला होता. विशेष म्हणजे त्यांनी तो प्रस्ताव आनंदाने स्वीकारला. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यकमासाठी प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. बाळ फोंडके आणि ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर व्यासपीठावर होते. माझी ८४ वर्षे वय असणारी आईही कार्यक्रमासाठी आली होती. त्यांना ते समजल्यावर त्यांनी तिच्याजवळ जाऊन वाकून नमस्कार केला आणि तिची विचारपूस केली. आम्ही सर्वच त्यांच्या विनम्रतेने प्रभावित झालो. कार्यक्रम संपवून घरी आल्यानंतर आईने त्यांच्याविषयी विचारले. ते खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत, असे सांगितल्यावर ती म्हणाली, ‘‘पाहा पंडित, विनम्रता असावी तर अशी.’’ पन्नाशीत असूनही मला एक नवीन धडा मिळाला. त्यांच्या या स्वभावाचा प्रत्यय वेळोवेळी येत असे. सभेमध्ये ते तरुण सहकार्यांना सन्मानाने वागवीत. त्याचप्रमाणे ते सर्वांचे कौतुक करून प्रोत्साहन देत. मला आठवते की प्रकाशन समारंभात त्यांच्यामुळेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर आणि सौ. गोवारीकर उपस्थित होत्या. असे असूनही त्यांनी अहंभाव सोडून दिला असे वाटत असे. संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटल्याप्रमाणे ‘जाणोनी नेणतें करी माझें मन’ याचा जिवंत प्रत्यय त्यांच्या सहवासात येई. भारतातील उपकरण शास्त्राचे प्रणेते, असे ज्यांचे सार्थ वर्णन करता येईल, असे हे मोहक आणि अलौकिक व्यक्तिमत्त्व. त्यांच्या प्रेमळ स्मृतीस माझे विनम्र अभिवादन!
डॉ. पंडित भालचंद्र विद्यासागर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘भौतिकशास्त्र’ विभागात १९७९ ते २०१५ या कालावधीत अध्यापनाचे आणि संशोधनाचे कार्य केले. या काळात त्यांनी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख, महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळ संचालक, ऊर्जा विभाग संचालक, जीववैद्यक प्रणाली सदस्य, व्यवस्थापन परिषद अशी इतरही अनेक महत्त्वाची पदे भूषविली. २०१३ ते २०१८ या कालावधीत ते स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे कुलगुरू म्हणून कार्यरत होते. या कार्यकाळात मराठवाडा विद्यापीठास नॅकचा ‘अ’ दर्जा प्राप्त झाला. त्यांनी जैवभौतिकशास्त्रात केलेल्या संशोधनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त झाली आहे. त्यांनी १६ विद्यार्थ्यांना पीएच.डी. आणि १९ विद्यार्थ्यांना एम.फिल. पदवीसाठी मार्गदर्शन केले आहे. तसेच अनेक शोधनिबंध लिहिले आहेत.
विज्ञान प्रसाराच्या कार्यात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. भारत सरकारचा मराठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, मराठी विज्ञान परिषद आणि लोकविज्ञान संघटनेच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सर्वसामान्यांमध्ये विज्ञान विषयक जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी ५००हून अधिक व्याख्याने, १६ पुस्तके, ५००हून अधिक लेख, २० लघुपट, २५ रेडिओ व्याख्याने असे योगदान दिले आहे. ‘महामानव आइन्स्टाईन’, ‘सर सी. व्ही. रामन’, ‘सुपर-क्लोन’, ‘अंतराळी’, ‘शोध जाणिवांचा’, ‘धूमयान’, ‘आम्ही शास्त्रज्ञ असे झालो’ आणि ‘ओवी गाऊ विज्ञानाची’ ही महत्त्वाची पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. त्यांपैकी त्यांची ‘सुपरक्लोन’ ही कादंबरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाली आहे. ही कादंबरी कन्नड आणि हिंदी भाषांमध्येही अनुवादित झाली आहे. याचबरोबर त्यांच्या ‘ओवी गाऊ विज्ञानाची’ या पुस्तकाचेही हिंदी आणि इंग्रजीत अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.