`फिरता’ झाला, `सरकता’ झाला, आता उडता रंगमंच आला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?
– गणेश नाईक, गिरगाव
मग काय नट आणि प्रेक्षक उडायला मोकळे (एकमेकांवर)!
मराठीतलं कोणतं नाटक खर्या अर्थाने बोल्ड होतं, असं वाटतं तुम्हाला?
– रमेश गोगावले, पंढरपूर
योनी मनीच्या गुजगोष्टी
ज्याने अळुवडी खाल्लेली नसेल, तेलकट काही खाल्लं नसेल, त्याला खाई त्याला खवखवे असं सांगितलं तर पटायचं कसं?
– सोनम पाटील, दिवा
त्याला खोकला झालेला असताना काहीही खायला द्या… तरीही कळेल… तुमच्यासारखा तो मठ्ठ नसेल तर!
पुण्यातील माझ्यासारखे कितीतरी लोक सुस्वभावी, प्रेमळ, विनम्र, मनमिळावू, सहकार्यशील पण असतात, तरी बाहेरचे लोक पुणेकरांची खडूस म्हणून बदनामी का करतात?
– मुकुंद शिंत्रे, पुणे
बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशी म्हण आहे… वरील स्वतःचे कौतिक सिद्ध करा.
कोकणची माणसं साधीभोळी असं एका गाण्यात म्हटलं आहे, एक हाडाचा कोकणी माणूस म्हणून ते पटतं तुम्हाला?
– किरण चेंदवणकर, प्रभादेवी
पुण्याचा माणूस जर विनम्र असेल, तर हेही सत्य आहे.
मला कमीत कमी पैसे गुंतवून किंवा शक्यतो पैसे न गुंतवता, फार कष्ट न करता, भरपूर नफा देणारा धंदा करायचा आहे… मी कसला धंदा करू?
– राम भिडे, तासगाव
स्लीपिंग पार्टनर व्हा राजकारण्यांचे.
लग्नात लाडू आणि बारशाला पेढे किंवा बतासेच का वाटतात?
– नीलिमा कोरान्ने, डोंबिवली
असले वैचारिक प्रश्न मला नाही पडत… गोड लागतं ते मी गोड मानून खातो!
तुम्ही अभिनेता झाला नसता, तर कोण झाला असता?
– कमलाकर कुलकर्णी, धुळे
शिक्षक
नाटक चालू असताना एखाद्या इब्लीस कार्ट्याने समोरून नेम धरून तुमच्यावर कागदी बाण फेकला किंवा असला काही इरसाल प्रसंग तुमच्या नाट्यकारकीर्दीत आला आहे का? काय केलेत तेव्हा?
– रहीम शेख, महाड
नाही. तमाशाचे लोक नाटकाला येत नाहीत, हे नशीब आमचं.
काका, घड्याळात बारा आकडेच का असतात?
– धैर्य सोनटक्के, सातारा
बारा वाजले असं म्हणता यावं म्हणून…
अनेकांना स्वत:चे ढोल हे एकच वाद्य वाजवता येते, तुम्हाला कोणते वाद्य वाजवता येते?
– शिवराम कामत, वसई
तुणतुणं
दारू प्यायल्यावर माणूस बोलण्यात इतका `धीट’ कसा काय बनतो?
– संग्राम कानेटकर, पालघर
कारण दारू विवेक पिऊन टाकते. ज्याला भितो तेच दारू काही काळासाठी पुसून टाकते.
भारतात कावळा पिंडाला शिवल्याशिवाय आत्मा आणि नातेवाईक संतुष्ट होत नाहीत. परदेशात `पिंड’ हा प्रकारच नसतो. मग ते आत्मे आणि नातेवाईक अतृप्तच राहतात का?
– विक्रम गायकवाड, घोलवड
विचार शंकराचार्यांना दम असेल तर.
कोकणात भुतांचे रात्रीस खेळ का चालतात? दिवसा का चालत नाहीत?
– संजय एडलावार, सोलापूर
नाहीतर अपूर्वा नेमळेकर दिसली असती का तुम्हाला?
लग्न करण्याचं वय २१ आहे, तर लग्न न करण्याचं वय काय असावं?
– तृप्ती गोडसे, परभणी
२० वर्ष ३६४ दिवस
मासवडी या नावाचा पदार्थ शाकाहारी कसा?
– राहुल नरसे, जिंतूर
मांस नाहीयेय ते, मास आहे.
हिरव्यागार पोपटाची चोच तेवढी लाल का असते?
– प्रथमेश गावडे, रत्नागिरी
चोच आहे हे कळावे म्हणून.