जग हे नुसतंच गोल नाही तर गोलमाल आहे. इंग्रजांनी इथं दिडशे वर्षे राज्य केल्यामुळे त्यांच्या कलेची, समाजाची नि प्रतिष्ठेची चमचेगिरी करणं ही एक फॅशन होऊन बसली आहे. ‘जिथं तिथं गॅसच्या चुली’ या आधुनिक म्हणीप्रमाणे आमच्याकडे पिटातल्या प्रेक्षकांकरता जशी चित्रं तयार केली जातात तशी जगातल्या जगत असलेल्या सर्व देशात बनवली जातात. इथं जे प्रश्न ‘आ’ वासून उभे आहेत तसेच तिथेही ताटकळत उभे आहेत. पण सांस्कृतिक कार्यक्रमासाठी किंवा शिष्टमंडळातून तिथे जाणार्या शिष्टांनी काय अनुभवलंय याचा अनुभव जरा ऐकला की पूर्ण कल्पना येते. परदेशी चित्रपटात एखाद दुसरा असा चित्रपट निघतो की त्याची आपण स्तुती करतो. तारीफ कुठल्याही सच्च्या कलेची करणं हा आपला धर्म समजला पाहिजे पण आपल्या इथंही त्याच तोडीचे काही कलाकार आहेत याची जाणीव मात्र विसरता कामा नये.
मी ‘अनुभव’ हे चित्र पाहिलं. हे खरं दिग्दर्शकाचं चित्र आहे. निव्वळ कथेच्या कुबड्यांवर चालत नाही. एक साधी आपण अनुभवलेली कौटुंबिक समस्या आर्टीस्टीक नजरेतून अशा लाजवाब तर्हेने पेश केलीय की तुम्हाला असं वाटेल की आपण चित्रपट पाहात नसून आपल्या शेजारच्या घरात या घटना घडताहेत किंवा आपण कुणी त्या घरातले संबंधित आहोत. इतका जिव्हाळा निर्माण करणं हे कठीण काम आहे आणि याबद्दल मी तरी या चित्राचे दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांना माझ्या मनाचं पारितोषिक दिलोजानसे देईन. त्यांच्या बुद्धिमत्तेची चमक वेगळी आहे. कुठल्याही परदेशी चित्राची नक्कल त्यात नाही. रंगीत चित्राच्या जमान्यात ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’चं धाडस करणार्यांपैकी भट्टाचार्य हे एक आहेत. त्यांनी चित्रात इतका वास्तववादीपणा आणलाय की वाटतं सतत पैशांची थैली डोळ्यांसमोर ठेवणार्यांच्या त्याच थैल्या डोक्यावर हाणाव्यात.
या ‘अनुभव’मध्ये आहेत मुंबईत उषा किरणसारख्या इमारतीत राहणारे नवरा बायको नि चार पाच इमानी गडी. नवरा सारखा कामात मग्न. लग्न होऊन ६ वर्षे लोटलीत. मग बायको एक ‘तरकीब’ लढवते. नोकरांना काढून टाकते. एक जुना वयस्कर फक्त राहातो आणि मग त्यांच्या एकेक भावनात्मक हालचाली अशा काही मनाला खेचतात की ते सारं सांगण्यापेक्षा पडद्यावर पाहाणं चांगलं. सांगितलं तर सारा मजा निकल जाएगा!
आजकाल प्रत्येक घरात विविध भारतीचा बोंबल्या नेहमी बोंबलत असतो, याचा उपयोग दिग्दर्शकाने इतक्या उत्कृष्ट तर्हेने केलाय की शाबासकी द्यावी तेवढी थोडी. याचाच उपयोग शेवटी ‘अब साडे ग्यारा बजे हैं, हमारी तिसरी सभा समाप्त होती है…’! इतका डोकेबाजीने केलेला पहाण्यात नाही. विविध भारतीवर लागणार्या गाण्याचा, चित्रातल्या गाण्याचा नि उल्लेख केलेल्या गाण्याचा उपयोग झकास केलाय. नवरा बायकोचा संवादही ‘क्लास’! ‘दो या तीन बस्स’ याचा जेवणात केलेला प्रयोग खसखस पिकवतो.
जसा याला समजदार बुद्धिमान दिग्दर्शक मिळाला तसाच फोटोग्राफीकार नि तसेच कलाकार. तनुजा नि संजीवकुमार यांनी ‘अॅक्टर’ म्हणून काम केलेलं नाही, तर त्यांनी खरेखुरे ‘नवरा बायको’ समर्थपणे उभे केलेत. आठवलं. शोभना समर्थ आणि फॅमिलीचा फ्लॅट या चित्रासाठी वापरला त्याचा उल्लेख नि आभार आहेत. पण त्याचा इतका शानदार उपयोग केला त्याबद्दल आरोहीचे निर्माता-दिग्दर्शक, फोटोग्राफर यांचे आभार.
या चित्राला ‘क्लास’ आला होता. ‘मास’ नव्हता. तरीसुद्धा ‘क्लास’ ‘मास’सारखा होता ही गोष्ट मानली पाहिजे. अशीच जर चित्रं काढण्याचा प्रयत्न आमच्याकडे कुणी ना कुणी करत राहिलं तर भारतीय चित्रपटसृष्टीबद्दल सतत एक आत्मीयता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.