एक राघू होता आणि एक मैना. नवरा बायकोच. अनेक दिवस अशाच एका बागेत सोबत होते. ती बाग शहरात होती.
मैना खेड्यातून आली होती खूप लांबून. साहजिकच तिला माहेरची आठवण येत होती. तिनं राघुचा नुसता पिच्छा पुरवला होता. बायकोच्या सततच्या भुनभुणीला कंटाळून राघू सासुरवाडीला यायला तयार झाला.
पोपटांना प्रवास करायचा तर ना ट्रेनचे रिझर्व्हेशन लागते, ना एसटीचे. त्यामुळे दुसर्या दिवशी सकाळी निघायचं ठरलं. आणि ठरल्यावेळी त्यानी भरारी मारली.
गाव खूप दूर होतं. संध्याकाळ होता होता ते एका ओसाड अरण्यात पोहोचले. त्या सुनसान, वैराण जंगलात रात्र काढायचं त्यांनी ठरवलं. आजूबाजूचं जंगल बघून राघूच्या मुखातून सहज बाहेर पडलं, ‘हे जंगल बघ, इथं फक्त घुबडांचं वास्तव्य असावं असं वाटतं.’
राघू एवढं बोलणार तेवढ्यात एक घुबड त्यांच्याजवळ आलं.
घुबड म्हणालं, ‘पोपटराव, हा आमचा इलाका आहे. तुम्ही पहिल्यांदा इथं आलाय. सपत्नीक आलाय. आमच्या गुहेत चला. चहापाणी घ्या. आम्हाला पाहुणचाराची संधी द्या.’
घुबड प्रेमाने आग्रह करीत होते. राघू-मैनेला भूक लागली होती. दोघांनी एकमेकांकडं पाहिलं. आणि घुबडाचं निमंत्रण स्वीकारायचं ठरलं. दोघं घुबडाच्या पाठोपाठ त्याच्या गुहेत पोहोचले. उत्तम पाहुणचार झाला. खाण्यापिण्याची चांगली सोय होती.
जेवण झाल्यावर दोघांनी घुबडाला धन्यवाद दिले. निरोप घेतला आणि निघू लागले. दोघं निघत असताना घुबड म्हणालं, ‘पोपटराव, तुम्ही जा, पण माझ्या बायकोला कुठं नेताय?’
राघू म्हणाला, ‘असं कसं बोलता? ही माझी पत्नी आहे. तुझी कशी होऊ शकते? तू घुबड आहेस. घुबड आणि मैनेची जोडी कशी काय असू शकते?’
घुबड अडून बसले होते. म्हणाले, ‘हे बघ, ही माझी बायको आहे. आणि कुणाचा बाप मला हिच्यापासून वेगळं करू शकत नाही. तू तक्रार कर नाहीतर कोर्टात जा.’
राघू हबकलाच.
जेव्हा गुन्हेगारच तक्रार करण्याचं, कोर्टात जाण्याचं आव्हान देतो तेव्हा समजून चालायचं की न्यायव्यवस्था विकली गेली आहे. अर्थात मी हे त्या सुनसान जंगलाबद्दल बोलतोय. आपल्या देशातल्या व्यवस्थेबद्दल नाही.
घुबडानं मैनेवरच दावा केल्यामुळं राघूपुढं कोर्टात जाण्यावाचून पर्याय नव्हता.
बिच्चारा राघू!
राघूनं तक्रार केली. प्रकरण कोर्टात गेलं. न्यायाधीशांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. आणि निकाल दिला,
‘मैना नेमकी कुणाची पत्नी आहे याचा घुबडाकडे काही पुरावा नाही, तसाच तो पोपटाकडेही नाही.’
‘…परंतु हा घुबडांचा प्रदेश आहे म्हणजे उल्लू राष्ट्र आहे. स्वाभाविक घुबडांच्या श्रद्धेचा विषय आहे. मोठ्या समुदायाच्या भावनेचा मुद्दा आहे, त्यामुळे मैना ही घुबडाची पत्नी आहे.’
‘मैनेला घुबडाकडे सुपूर्द करण्यात येत आहे.’
हरलेला, हताश राघू निराश होऊन जड पंखांनी एकटाच परत जायला निघाला.
तेवढ्यात घुबडानं हाक मारली.
थांबला.
मागे वळून बघितलं तर मैनाही होती.
घुबड राघूच्या जवळ आले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, ‘तू तुझ्या बायकोला सोबत घेवून जा.’
राघू आश्चर्यचकित झाला.
‘आणि ऐक. या ठिकाणीही पूर्वी सुंदर बाग होती. पण जेव्हापासून इथली न्यायव्यवस्था विकलांग झाली, न्याय संपला, बाग उजाड झाली. ओसाड जंगल बनलं. सगळे प्राणी पक्षी निघून गेले. आता इथं फक्त घुबडे राहतात.’
घुबडानं निराशेनं सुस्कारा सोडला.
आणि लक्षात ठेव मित्रा, घुबड म्हणालं, ‘घुबडांना कधी दोष देऊ नकोस. घुबडांच्या वास्तव्यामुळं कधी ओसाड जंगल तयार होत नाही. पण जिथली न्यायव्यवस्था चेष्टेचा विषय बनते, घटनात्मक संस्था लाचार बनतात तिथली शहरे, गावे, बगीचे…
फक्त घुबडांची निवासस्थानं बनतात!’
(या गोष्टीचा केंद्रीय निवडणुक आयोग, सर्वोच्च न्यायालय किंवा महाराष्ट्र विधानसभा यांच्याशी दूरान्वयानेही संबंध नाही. तसा तो जोडण्याचा कुणी प्रयत्नही करू नये.)
(मनीष सिंग यांनी ट्विटरवर केलेल्या हिंदी पोस्टचा अनुवाद.)