□ दिवाळी संपली, तरी क्षयरोग नियंत्रण कर्मचार्यांना बोनसच नाही.
■ संपली ना, गेली ना, आता बघू पुढच्या दिवाळीला!
□ एमएमआरसीएलमधील पर्यवेक्षक भरती संशयाच्या भोवर्यात.
■ कोणती भरती हल्ली संशयातीत असते?
□ मराठा आंदोलकांनी भारत संकल्प रथयात्रा रोखली; आरक्षण मिळेपर्यंत गावात राजकीय कार्यक्रमांना बंदी.
■ खोटी, न झेपणारी आश्वासनं सतत दिली गेली की कधीतरी लोकांची सहनशक्ती संपतेच.
□ मोदींना पनौती, पाकिटमार म्हटल्याने राहुल गांधींना नोटीस.
■ राहुल गांधींनी साधा श्वास घेतला तरी निवडणूक आयोग त्यांना नोटीस पाठवू शकतो… हा पोपटलाल आयोग मोदी, शहांना किंवा गेलाबाजार भाजपच्या वाचाळ नेत्यांना जेव्हा नोटीस पाठवेल, तेव्हा ती बातमी असेल!
□ आमच्या चार आमदारांच्या बदल्यात तुमच्या आठ नेत्यांना जेलमध्ये टाकणार – ममता बॅनर्जी.
■ योग्य पाऊल दीदी. शठम् प्रतिशाठ्यम् हा एकच न्याय या गुंड टोळीला लागू पडतो.
□ सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलेल्या कागदपत्रांवरच मिंध्यांचा संशय.
■ कमरेचं फिटत चाललंय, आता सावरण्यासाठी पराकाष्ठा होणारच ना…
□ ‘शासन आपल्या दारी’साठी नियोजन समितीच्या तिजोरीवर दरोडा.
■ लोकांना सरकारी कार्यालयांमध्ये जाण्यात काहीच अडचण नाही. तिथे कामं सुटसुटीतपणे आणि भ्रष्टाचारमुक्त होतील, यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ही देखावेबाजी कशाला?
□ मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराला हायकोर्टात आव्हान.
■ आंतरराष्ट्रीय कोर्टात गेले तरी हा कारभार सुधारेल अशी शक्यता वाटत नाही सध्याच्या काळात!
□ कर्जफेडीसाठी शेतकर्यांवर अवयव विकण्याची वेळ हे महाराष्ट्राचे दुर्दैव – नाना पाटोले.
■ नाना, हळू बोला. अजून शेतकर्यांकडे विकण्यासाठी अवयव शिल्लक आहेत हे कळल्यावर तेही लुबाडून घेण्याच्या योजना पुढे येतील.
□ पाच वर्षे, पाच महिन्यांनंतर डिलाईल रोड पूल सुरू; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश.
■ शिवसेनेने लावून धरले नसते, तर आणखी पाच वर्षे रखडले असते हे काम, कोणा माननीयांना उद्घाटनासाठी वेळ मिळेपर्यंत.
□ बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी धिंगाणा घालणार्या मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात शिवसेनेच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.
■ यंत्रणाही मिंध्या झाल्या आहेत…
□ किशोरी पेडणेकर यांची ईडी चौकशी.
■ असले उद्योग करून शिवसेनेचा आवाज दाबता येत नाही, हे यांना अजून लक्षात आलं नसेल? दुर्दैव त्यांचं.
□ लायकीत राहा, नाहीतर तुमची खाट टाकू – रायगडात मिंधेंचा भाजपला दम.
■ कशाला एकमेकांत वितुष्ट आणता… निवडणुका घ्या… तुमची खाट जनताच टाकणार आहे… तो फक्त तिचाच अधिकार आहे.
□ त्यांना कमळाबाईच्या पदराखाली लपून निवडणुका लढवाव्या लागतील – संजय राऊत.
■ तो पदरही आता सतरा ठिकाणी फाटलेला, विटलेला आणि गावोगावचे खरकटे उचललेले हात पुसून खराब झालेला आहे राऊत साहेब…
□ सत्तांतरापासून महाराष्ट्रात कायद्याचा गैरवापर सुरू – अॅड. असीम सरोदे यांचा आरोप.
■ ज्यांना संविधानच नष्ट करायचं आहे, त्यांच्यासाठी हा पद्धतशीर कार्यक्रमच आहे.
□ पुणे महापालिकेचा कोविड घोटाळा उघड.
■ तिथे विरोधकांची सत्ता होती की भाजपची, त्यावर त्याला घोटाळा म्हणायचं की नाही, मुळात घोटाळा झाला की नाही, हे ठरेल.
□ शहीद कॅप्टनची आई आक्रोश करत असताना भाजप मंत्र्याची चमकोगिरी; चेक देताना फोटो सेशन.
■ मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी भयंकर निबर कातडीची जात आहे ही! तिच्याकडून काय अपेक्षा करणार?
□ महाराष्ट्रातील विकासकामांची उद्घाटने लटकवून मुख्यमंत्री राजस्थानच्या प्रचारात दंग.
■ त्यांच्यावरचा मूळ संस्कार लोप पावून आता कोणता शेंदूर लागलेला आहे ते लक्षात घ्या.